राजेश, सुप्रिया, सोनी आणि रागिणी यांचे जीवन वेगवेगळी वळणे घेत होती. कधी अपेक्षित तर कधी अनपेक्षित! सोनी आणि रागिणीचे मॅडम अकॅडमी मधील रीतसर शिक्षण आता पूर्ण झाले होते. सुप्रियाचे सुद्धा आधीच ते झाले होते. त्यांना रीतसर सर्टिफिकेटस मिळाले होते. तसेच त्यांनी होस्टेल सोडले. सोनी मालाडला भाड्याने रूम घेऊन राहू लागली होती. जवळच्याच एका भागात तिची एक दूरची एक विधवा स्त्री-नातेवाईक रहात होती. तसा त्यांचा जास्त घरोबा नव्हता पण ती एकदा तिच्याकडे जाऊन आली. तसेच गावाकडे आईला सोनी पैसे नियमित पाठवत असे.
आता एलेना आणि नताशा तिघींच्या पूर्वीच्या हॉस्टेल रूम मध्ये राहत होत्या. एलेना कॅनडाहून तर नताशा श्रीलंकेहून बॉलिवूड मध्ये नशीब कमवायला आलेल्या होत्या. त्या दोघींनी सुद्धा मॅडम अकॅडमी जॉईन केलेली होती. त्या दोघींसोबत तिसरी पार्टनर त्यांना जॉईन झाली, तिचे नाव - मिष्टी मेहरान!
ती मॅडम अकॅडमी मध्ये नवोदित स्टुडंट्सना शॉर्ट फिल्म्स आणि ऍड फिल्म्स बनवण्याची कला शिकवायची! आणि अर्थातच मिष्टी हे नांव आता मॅडम अकॅडेमीतच नाही तर शॉर्ट फिल्म्स क्षेत्रातही खूप प्रसिद्ध होत होते. मिष्टीने फारच कमी वयात हे यश मिळवले होते.
दरम्यान राजेशने त्याच्या स्पेशल टीममधील अनेक जणांना मिष्टीच्या शॉर्ट फिल्म्समध्ये काम मिळवून दिले आणि त्या कलाकारांचा अभिनय अनेकांकडून वाखाणला गेला, कौतुक झाले. तसेच मसालेदार कथालेखन करायची इच्छा असलेल्या काही जणांना राजेशने तो लिहीत असलेल्या स्क्रिप्टससाठी त्याचा सहायक म्हणून घेतले होते आणि ते लोक त्या बदल्यात राजेश म्हणेल त्या चित्रपटाबद्दल "अपप्रचार" करायला एका पायावर तयार होते. विशेषकरून "के. के. सुमन" शी संबंधित चित्रपट!
दरम्यान समीरण देवधरने राजेशची विनंती मान्य केली होती आणि मराठी ऐवजी हिंदी चित्रपट बनवण्याची कल्पना त्याला पसंत पडली होती. चित्रपट निर्मिती लवकरच सुरु होणार होती.
दरम्यान रागिणी आणि सूरजने लग्न करायचा विचार लांबणीवर टाकला. लिव्ह इन मध्ये ते खुश होते. सूरजच्या परदेश वाऱ्या (विशेषतः ब्राझील देशातल्या) वाढू लागल्या आणि त्याचे वडील डी. पी. सिंग यांच्यासोबत रागिणी करत असलेल्या हॉरर सिरियल्स सुपरहिट होत होत होत्या. सुभाष भटने रागिणीला त्यांच्या आगामी हॉरर चित्रपटात घेण्याबद्दल डी. पी. सिंग यांना एकांतात विचारले होते कारण रागिणीला मुंबईत कुणी नातेवाईक नाहीत हे सिंग यांनी भट यांना सांगितले होते तसेच सूरज आणि रागिणी लिव्ह इन मध्ये राहातात ही त्यांना कल्पना होती. मग सिंग यांना विचारणेच योग्य आहे असे भटना वाटले. विचार करून सांगतो असे म्हणून त्यांनी भटकडे वेळ मागितला पण रागिणीजवळ त्याबद्दल बोलण्याऐवजी त्यांना ते सूरजला आधी सांगणे योग्य वाटले.
सूरजला सांगितल्यानंतर आश्चर्य असे की त्याने परवानगी तर दिलीच नाही उलट तो म्हणाला की आता आपण रागिणीला हळूहळू मनोरंजन क्षेत्रापासून दूर करायला हवे. तिने हाउस वाईफ म्हणून राहावे किंवा सूरजच्या फूड कंपनीत त्याला काहीतरी मदत करावी अशी त्याची इच्छा दिसली. म्हणून नाईलाजाने सिंग यांनी रागिणीला भटच्या प्रपोजलबद्दल डायरेक्ट सांगणे टाळले. सूरजने त्यांना आश्वासन दिले की तो रागिणीशी याबद्दल बोलेल त्यामुळे सिंग निर्धास्त झाले आणि दोघांच्या मध्ये न पडण्याचे त्यांनी ठरवले.
पण सूरजने रागिणीला त्याबद्दल सांगितलेच नाही. दरम्यान रागिणीला राहुलच्या फोनवरच्या धमक्या पुन्हा सुरू झाल्या. पैसे संपेपर्यंत तो चूप बसायचा मग परत कॉल करायचा. ती त्याला पैसे पुरवत होती. आता सूरजला याबद्दल सांगण्यावाचून पर्याय नव्हता!!!
yyyy