दरम्यान सोनी बनकरचा लव्हर साकेत न सांगता तिला सोडून निघून गेला. नेमका कुठे गेला त्याचा थांगपत्ता सोनीला लागलाच नाही. मग सोनीने स्वतःला बेबक्यू (BEBQ) च्या शुटिंगमध्ये व्यस्त ठेवलं. काही भागाचं शुटिंग झालं होतं आणि काही भागाचं बाकी होतं. पण प्रोग्रॅम टेलिकास्ट व्हायला सुरु झाला होता. सुभाष भट बारकाईने BEBQ शो वेळ मिळेल तेव्हा बघत होता कारण त्याला त्याच्या हॉरर चित्रपटासाठी नवीन चेहरा हवा होता आणि अशा रियालिटी शोजमध्ये नवे चेहेरे आणि नवनवीन टॅलेंट चिक्कार मिळतात हे तो जाणून होता. त्यातल्या त्यात त्या कार्यक्रमातली सोनी बनकर त्याचे जास्ती लक्ष वेधून घेत होती. सिंग यांचेकडून रागिणीसाठी नकार आल्याने सुभाष भटला दुसरे कुणीतरी शोधणे भाग होतेच. एकदा का हा शो संपला की सोनीला विचारून बघावे असा विचार त्याच्या मनात आला.
एका प्रायव्हेट रिसॉर्टवर दहा जणांना बोलावून त्या रियालिटी शोची शुटिंग सुरु झालेली होती. त्यात पन्नास टक्के काय करायचे ते आधीच स्क्रिप्ट लिहून ठरवलेले होते तर पन्नास टक्के आपल्या मनाने वागण्याची परवानगी होती. मात्र प्रेक्षकांना सांगण्यात आले होते की हा जगातील पहिलाच असा शो आहे की ज्यात सगळे कलाकार किंवा भाग घेणारे पार्टीसिपॅन्ट संपूर्णपणे उत्स्फूर्तपणे जगणार आणि खेळ खेळणार! म्हणजे काहीही प्लान केलेले नाही!
चोवीस तासांपैकी जवळजवळ अठरा तास सतत कॅमेरे त्यांच्या मागे राहणार होते. काही हलते कॅमेरे काही स्थिर तर काही गुप्त ठिकाणी लपवलेले कॅमेरे असणार होते. मोबाईल आणि इतर उपकरणे सगळ्यांजवळून काढून घेण्यात आली आणि फक्त एक लँडलाईन फोन गरजेपुरता वापरता येणार होता.
रिसॉर्टवर दिवसभर कंटेस्टन्ट मनाप्रमाणे इकडे तिकडे फिरू शकत होते. दरम्यान त्यांना विविध ठिकाणी लपलेले चिठ्ठ्यांच्या स्वरूपातील दुवे (क्लू) शोधायचे होते. त्या क्लू मध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे वागायचे होते. तसेच काही क्लू मध्ये खेळाडूला कठीण टास्क देऊन ते न जमल्यास त्याला बाद करण्यात येत होते. सगळ्यांना शेवटी कोणती वस्तू शोधायची आहे हे सुद्धा माहिती नव्हते. गेमच्या शेवटच्या लेव्हलला पोहोचेपर्यंत ते माहित असणार नव्हते. मग शोध संपल्यावर ज्यानेही ते शोधले तो पहिला येणार! आणि गेमच्या नियमानुसार शेवटी जे तीन जण टिकले त्यापैकी ज्या दोघांना शोध लागला नाही तो किंवा ती दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर येणार!
तसेच गेम मधले नियम एकदा तोडणाऱ्याला पेनल्टी म्हणून त्या गेमचा "बिग आय" म्हणून बघणारा संयोजक काहीतरी करायला लावणार होता. दुसऱ्यांदा नियम तोडल्यास मात्र गेम मधून बाहेर!
सोनी बनकरने एकदा गेमचा नियम मोडला. मग बिग आयने तिला एक पेनल्टी दिली - ती जोपर्यंत गेम मध्ये टिकून आहे तोपर्यंत तिने रोज रात्री दोन बॉलिवूड आयटम सॉंग्जवर डान्स करून दाखवायचा. त्यानंतर त्या गेमपेक्षा त्या गेममधले सोनीने डान्सच लोकप्रिय व्हायला लागले. पुन्हा तिच्या जुन्या सेल्फीबद्दल चर्चा व्हायला लागली. सुभाष भट हे सगळे बारकाईने पाहात होते. त्यांनी BEBQ च्या कास्टिंग डायरेक्टर के. सचदेवाला कॉल केला आणि त्याला भेटायची इच्छा बोलून दाखवली. प्रथम सचदेवाला आश्चर्य वाटले की नक्की सुभाषजीना आपल्याला का भेटायचे आहे?
पण त्यांच्या भेटीत ते क्लियर झाले, ते असे:
"मला सोनी माझ्या पुढच्या हॉरर फिल्ममध्ये हवी आहे! माझ्या डोक्यात अशी स्क्रिप्ट घोळते आहे की ज्यात म्युझिक आणि डान्स संबंधित एका ग्रुप सोबत काही सुपरनॅचरल घटना घडतात! म्हणजे सोनीचे डान्स टॅलेंटही सिनेमात वापरता येईल आणि तिला हिरोईन म्हणून पण लाँच करता येईल! लोकांना फ्रेश चेहेरा हवाय! तीच एक हिरोईन रिताशा सतत माझ्या बहुतेक हॉरर चित्रपटांत काम करतेय आणि आताशा तिचे नवे चित्रपट फ्लॉप होत आहेत!"
"बरं! हरकत नाही! सोनीच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास आमच्या शोचे सगळे एपिसोड टेलिकास्ट होऊन संपले की ती आमच्या अग्रीमेन्ट पासून मुक्त असेल! मग ती इतर कुठेही काम करू शकते! आय एम अबसोल्युटली फाईन विद धिस!"
"ते ठीक आहे! पण मला तुमच्याकडून काय हवंय ते ऐका! मला हवंय की या गेम शोची विनर तीच असेल! सोनी!"
"हे बघा! आमचा हा रियालिटी शो आहे त्यामुळे यात काय घडणार आणि काय नाही हे मी नाही सांगू शकत! आणि तिला ठरवून जिंकवणे म्हणजे इतरांवर अन्याय नाही का होणार?"
"मिस्टर मिस्टर! ऐका माझं जरा! तुमच्या या सगळ्या रियालिटी शोबद्दलची आतली रियालिटी मला चांगली कळते! तेव्हा मला तुम्ही शिकवू नका! तुम्ही या शोचे कास्टिंग डायरेक्टर आणि स्क्रिप्ट मॅनेजरपण आहात. तेव्हा तुम्ही हे मॅनेज करू शकता!"
"मिस्टर सुभाष! मी मॅनेज करू शकतो की नाही हा मुद्दा वेगळा! पण मला सांगा, मी तुमचे का ऐकू? माझा फायदा काय?"
"सांगतो! मूळ मुद्यावर येतो मी आता! मला माझी पुढची नवी हिरोईन ही गेम शो मध्ये जिंकून फेमस झालेली अशी हवी आहे आणि ती सोनीच हवी! त्याबदल्यात मी तुमचा फायदा करून देईन! तुम्हाला मी माझ्या चित्रपटाचा सहायक दिग्दर्शक म्हणून घेईन! तुम्हाला आयती प्रसिद्धी मिळेल. चित्रपटाच्या उत्पन्नातला 20 टक्के हिस्सा देईन आणि आता सायनिंग अमाऊन्ट म्हणून ताबडतोब 2 लाख रुपये देतो. मग तुमच्या शोच्या प्रोड्युसर वगैरे मंडळींना मॅनेज करून सोनीला कसे जिंकवायचे कसे ते तुमचे काम! बोला! आहे मंजूर?!"
"आता तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी करत आहात तर मी पण तुमचं काम केलंच पाहिजे, नाही का? नाहीतरी कुणाला न कुणाला तरी जिंकायचं आहेच! माझ्या माईंडमध्ये ती इंडियन-ओरिजिन फॉरेनर कंटेस्टन्ट - "जेसिका कर्टिस" जिंकायला हवी होती पण एनिवे मला जिथे फायदा आहे तिथे मी जाईन! ठीक आहे, सोनीला विनर बनवू या!"
"अरे तुझ्या त्या जेसिका कर्टिसला सेकंड नंबरवर आण! मी तिलापण चित्रपटात छोटासा रोल देतो! तिला सांग की तू तिला बॉलिवूड मध्ये ब्रेक मिळवून देणार आहे! खुश होईल ती! "
शेवटी डील ठरली. सुभाष भटना हे दाखवून द्यायचे होते की डी. पी. सिंग च्या रागिणीवाचून त्यांचे काही अडत नाही. रागिणीने स्वतः नकार दिला असे सुभाष भटना सिंग यांनी सांगितले होते. त्यामुळे ते दुखावले गेले होते. मग त्यांनी अर्थातच रागिणीला स्वतःहून कॉल करण्याचा प्रयत्न केला नव्हता...
yyyy