सकाळचे अकरा वाजले होते.

चार पाच वेळा बेल वाजवूनसुद्धा दरवाजा उघडत नाही म्हणून रायमा बोस यांनी शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्या आणि शेजारच्यांपैकी दोन महिला घाईघाईत सरळ बेडरूम मध्ये पोहोचल्या तर त्यांना बेडवर अस्ताव्यस्त पहुडलेली रिताशा दिसली.

तिचा श्वास चालू होता आणि जवळच्याच टेबलवर दोन टॅब्लेट्स पडल्या होत्या त्या उचलून बघत त्यांनी रिताशाला गदागदा हलवत आणि स्वर रडकुंडीला येत म्हटले, "बेबी, शोना उठ! तुझी मम्मी आलीय. तू झोपेच्या गोळ्या घेतल्या? मला अशक्य वाटतंय!

उत्साहाने सळसळणारी सतत पॉझिटिव्ह राहणारी माझी बेबी रिताशा! आज काय हालत झाली तुझी? आणि मला एका शब्दानंही कॉल करून तू सांगितलं नाहीस? बेबी उठ!"

असे म्हणून रडत रडत रिताशाचा हात हातात घेऊन बाजूच्या खुर्चीवर रायमा बोस बसल्या. तिच्या सोबतच्या एक महिलेने एका ग्लासमध्ये फ्रिजमधले थंड पाणी घेतले आणि रिताशाच्या चेहऱ्यावर ओतले. ती आता हालचाल करू लागली पण तिचे डोळे खोल गेले होते आणि चेहऱ्यावर अतिशय निर्विकार आणि शून्याकडे बघत असल्याचे भाव होते. रायमाने तिला कमरेत धरून उठवले आणि उशीला टेकून बसवले.

रायमा इतर दोन महिलांना म्हणाली, "कृपया, मी तुम्हाला विनंती करते की हे सगळं कुणाला सांगू नका आणि तुमच्यासोबत असलेल्या इतरांनाही सांगा की कुणाला सांगू नका म्हणून! मीडियाला हिच्या अशा अवस्थेबद्दल कळलं तर ते प्रश्न विचारून विचारून हिचं जगणं नकोसे करून ठेवतील!"

त्यापैकी एक महिला म्हणाली, "काळजी करू नका ताई. आम्ही कुणाला सांगणार नाही. आजपर्यंत आमच्याशी रिताशाचे शजारी म्हणून वागणे खूप चांगले राहिले आहे. तुम्ही हिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जा!"

रायमा म्हणाल्या, "धन्यवाद तुमच्या या सगळ्या मदतीबद्दल! मी आता हिला कोलकात्याला घेऊन जाते मगच तिथल्या हॉस्पिटलला दाखल करते! काहीही केलं तरी इथे मीडिया पाठ सोडणार नाहीत!"

रायमा बोस यांनी त्या रात्री सगळीकडे गुप्तता पाळून एयर अम्ब्युलन्स मागवली आणि त्या रिताशासह कोलकात्याला पोहोचल्या. तोपर्यंत आई सोबत असल्याने रिताशाला हायसे वाटले आणि प्रवासात ती जराशी रिलॅक्स वाटत होती पण अधून मधून स्फुंदून स्फुंदून रडतही होती तेव्हा तिची आई तिच्या पाठीवरुन हात फिरवत होती मग तिला तेवढ्यापुरते बरे वाटे पण अर्ध्या तासानंतर तिला पुन्हा रडू कोसळे!

मुंबईत अशी बातमी पसरवली गेली की अभिनेत्री रिताशा काही काळाकरता सुट्टीवर गेल्याची शक्यता आहे.

तेथील डॉक्टरांनी आठ दिवसानंतर हॉस्पिटलमधून तिला परत जाऊ दिले. झोपेच्या गोळ्यांचा डोस जास्त झाल्याने झालेले परिणाम भरून काढण्यासाठी त्यांनी मेडिसिन दिले आणि घरी जाऊ दिले पण त्यांनी तिचे मन इकडेतिकडे रमवायला सांगितले. रिताशाचे वडील लहानपणीच वारले होते. मग तिची आईच तिचे वडीलसुद्धा झाली होती. आईनेच तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्याच्या तिच्या निर्णयाचे समर्थन केले होते. पण रिताशाला सहजासहजी बॉलिवूडमध्ये एंट्री मिळाली नव्हती...

रिताशाला एका रात्री अंथरुणात पडल्या पडल्या जुने संघर्षाचे दिवस आठवू लागले...

कोलकात्यातील नाट्यगृहात एकच टाळ्यांचा आवाज ऐकू आला कारण छोटी रिटा (म्हणजेच रिताशा) हिने वयाच्या बाराव्या वर्षीच "अभिसुंदरी" या नाटकातील "मौमिता" या पत्राचे संवाद अशा काही सहजसुंदर अभिनयाने सजवून म्हटले जाते की टाळ्यांचा गाजर काही केल्या थांबेचना.

जरी ती सावळी होती तरी नाकी डोळी आणि अंगाने नीटस होती. नाटकाचे दिगदर्शक बिजॉन घोष यांनी तर त्यानंतर तिला यानंतरच्या त्यांच्या सगळ्या नाटकांत तिला भूमिका देण्याबाबत घोषणासुद्धा करून टाकली. वडील लहानपणीच वारल्यानंतर आईच रिटासाठी सगळे काही होती. रिटाची लहानपणापासूनची अभिनयवृत्ती ओळखून तिने त्याला विरोध करण्याऐवजी सपोर्ट केला.

विविध बंगाली नाटकांत आणि टीव्ही शो मध्ये रिताला भाग घेण्यासाठी प्रोत्साहन तर तिने दिलेच त्याबरोबरच तिच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये हेही तिने कटाक्षाने पाळले. तिच्या नात्यातील एका काकांचा घराण्यातील मुलींनी नाटकात, टिव्हीत काम करायला विरोध होता. पण त्यांच्या विरोधाला न जुमानता प्रसंगी समाजाचे टक्के टोपणे सहन करत तिने आपल्या लाडक्या रिटाला तिच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी प्रोत्साहन दिले. त्या काकांनी समाजात तिचे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली पण त्यावेळेसही रिटाची आई अटळ राहिली.

बिजॉन घोषच्या पुढील प्रत्येक नाटकांत रिटाचा रोल असायचा. त्या रोलला ती जीव तोडून आपल्या उपजत अभिनयाने न्याय द्यायची. तिच्या अनेक नाटकांत तिच्यासोबत काम केलेला पुरुष सहकलाकार सौमित्र सरकार याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. पण तो ते कधीही शब्दांनी व्यक्त करू शकला नाही आणि डोळ्यांची भाषा समजण्यात रिताशा कमी पडली. पण रिताशाच्या आईला हे समजलं होतं. ती एके दिवशी सौमित्राशी बोलली आणि रिताशाच्या मनात काय आहे हवं ती जाणून गजेईन असे तिने त्याला सांगितले, त्यासाठी तिने त्यांचेकडे काही काळ मागितला.

दरम्यान एके दिवशी मूळचे बंगाली आणि आता एक प्रसिद्ध बॉलिवूड दिगदर्शक रबिंद्र सरकार एका बंगाली पुस्तकावर आधारित बॉलिवूड चित्रपट बनवण्यासाठी काही बंगाली कलाकार निवडीसाठी बिजॉनला भेटले. त्यांची काही नाटके त्यांनी पहिली. त्यांनी रिताशाला आपल्या आगामी हिंदी चित्रपटासाठी कास्ट करायचे ठरवले आणि बिजॉन यांची परवानगी मागितली. बिजॉन यांनी प्रथम रिताशाचा कल तपासला. फक्त राज्यापुरता अभिनय मर्यादित न ठेवता पूर्ण देशाला आपले अभिनयगुण कळले पाहिजेत असे तिलाही वाटले आणि मग बिजॉय यांनी सुद्धा तिला थांबवले नाही. अर्थातच रिताशाच्या आईनेसुद्धा तिला परवानगी दिली. मुलीच्या सुखातच आपले सुख आहे असे तिने ठरवले होते. तिचे ग्रॅज्युएशन सुद्धा तोपर्यंत पूर्ण झाले होते. मग अशी अनुकूलता झाल्यावर रिताशाने चित्रपटांत जीव तोडून काम केले. तिची आईसुद्धा मुंबईत येऊन तिच्यासोबत राहिली.

रिताशाचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट "दास बावरा" सुपर डुपर हिट ठरला. अर्थात त्यात रिताशासोबत बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री "तरण्या अरोरा" सुद्धा होती. पण तरण्यासोबतच रिताशाचा अभिनयसुद्धा वाखाणला गेला.

समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून तिचे वारेमाप कौतुक झाले. मग तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. तिने मग आपल्या आईलाच आपले मॅनेजर बनवले. दिगदर्शक, प्रोड्युसर यांना रिताशाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईनासा झाला.

रिताशाला न सांगताच परस्पर तिची आई तिला ऑफर झालेल्या काही भूमिका नाकारून टाके. कथेची गरज असली तरी काही किसिंग, बेड सिन चित्रपटांत असतील तर ते कापावे अथवा रिताशा चित्रपटांत काम करणार नाही असे तिची आई ठणकावून सांगायला लागली. कधीकधी ती शूटिंगच्या सेटवरही हजेरी लावायची. प्रथम रिताशाला हे योग्य वाटले पण नंतर तिला ऑफर येईनशा झाल्या तेव्हा बदलत्या जगानुसार आपणही बदलावे असे तिला वाटू लागले, ती आईशी वाद घालू लागली. सौमित्रबद्दल आईने सांगताच ती चिडली आणि त्याच्याशी लग्न करणार नाही असे तिने निक्षून सांगितले कारण बॉलिवूडचा एक मॅचो मॅन आणि ऍक्शन हिरो जॉनी डिसुझा तिच्या जीवनात आला होता. त्याचे अजून दोन तीनच चित्रपट आले होते आणि ते खूप जास्त सुपरहिट नव्हते पण फ्लॉपसुद्धा झाले नव्हते.

शेवटी रिताशापुढे आईने हार मानली आणि पोरीच्या सुखातच आपले सुख असे मानून तिला हवी ती मोकळीक दिली. पण तोपर्यंत तिच्या हातून अनेक चांगल्या भूमिका निघून गेल्या. एक दीड वर्षे ती रिकामी बसली.

मग एके दिवशी सुभाष भट यांनी तिला हॉरर चित्रपटाची ऑफर दिली ज्यात अनेक बेड ऐन, किसिंग सिन आणि खूप अंगप्रदर्शन करावे लागणार होते. रिताशाने कोणतीही अट न घालता होकार दिला. काही दिवस परदेशात शुटिंग होती. चित्रपटाचे नाव होते "जमीन का राज''. चित्रपट खूप सुपरहिट झाला.

काही समीक्षकांनी रिताशावर अंगप्रदर्शनाचा मार्ग स्वीकारल्याबद्दल टीकेची झोड उठवली आणि टीव्ही चॅनेल्सनी रिताशाचे चित्रपटातील हिरोबरोबर, पिंटो मोरिया बरोबर परदेशातील शुटिंगसाठीच्या वास्तव्यादरम्यान अफेअर असल्याच्या काल्पनिक बातम्या पसरवल्या. त्या इतक्या खऱ्या वाटल्या की रिताशा ने स्वतः त्याचे खंडन करूनही लोकांना आणि इंडस्ट्रीतील लोकांना ते अफेअर खरेच वाटले. याचा परिणाम म्हणून जॉनीने तिच्याशी ब्रेकप केला.

खरं तर नवखा हिरो पिंटो यानेच स्वतःच्या प्रसिद्धीसाठी या अफवा पसरवल्या होत्या पण हे त्याने बेमालूमपणे केले आणि ते अजूनही कुणालाच कळले नाही. त्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली पण आईच्या मदतीने सावरली.

दरम्यान तिला एकाच साच्याच्या हॉरर चित्रपटातल्याच भूमिका ऑफर होऊ लागल्या पण त्या स्वीकारण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. अर्थात ते चित्रपट हिट होत होते आणि ती समाधानी होती. जणू काही हॉरर चित्रपटांत तिची एकटीची एकाधिकारशाही झाली पण प्रत्येक चित्रपटांत तिचे अंगप्रदर्शन हटकून असायचे पण कालांतराने वय वाढत गेल्यावर तिच्या अभिनयात आणि अंगप्रदर्शनात तोचतोचपणा आला. तिचा हॉटनेस कमी झाला. दरम्यान तिची आई पुन्हा आपल्या घरी निघून गेली होती.

रिताशाला महागड्या लाईफस्टाईलची तोपर्यंत सवय झाली होती. जवळचे पैसे चैनीसाठी मुंबईत अपुरे पडू लागले. दर उन्हाळ्यात युरोप फिरून येण्याची सवय होती त्यासाठी आता पैसे कमी पडू लागले.

तशातच तिला कळले की एका सुमार दर्जाच्या टीव्ही स्टारला म्हणजे सोनी बनकरला सुभाष भटनी त्यांच्या आगामी चित्रपटांत घेतले. आता हक्काचे सुभाष भट सुद्धा दुरावले होते आणि हॉरर चित्रपटांची लाट थंडावली. कित्येक दिवस तिने आईला फोन केला नाही. ती डिप्रेशन मध्ये गेली. डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू केली. एकदा कहर झाला. तिने एका रात्री नैराश्यापोटी झोपेच्या जास्त गोळ्या घेतल्या पण योगायोगाने त्या दिवशी तिची आई तिच्याकडे आली आणि तिने तिला कोलकात्याला परत आणले...

हे सगळे आठवल्यावर तीला घाम आला. ती थरथर कापू लागली. तिला तहान लागली. फ्रिज मधून काचेच्या ग्लास मध्ये पाणी ओतत असतांना तिच्या डोक्यात विचारांचा गलका असह्य झाला आणि तिला डीप्रेशनचा सौम्य झटका आला. तिने ग्लास समोरच्या भिंतीवर भिरकावून दिला!!

ती मोठमोठ्याने म्हणत होती, "एक सुमार दर्जाची अभिनयशून्य नाचरी नालायक बाई, सटवी! सोनी बनकर! माझी जागा घेते? आणि तेही सुभाष भटच्या पिक्चर्स मध्ये?"

रायमा बोस, तिची आई जागी झाली आणि तिने लाईट लावला आणि तिच्याकडे धावत गेली तोपर्यंत रिताशाने तीन शोभेचे काचेचे फ्लॉवर पॉट जमिनीवर फेकून त्यांचा चुरा चुरा करून टाकला होता आणि आता तिच्या हातात भिंतीवरचे महागडे क्लॉक होते. ते क्लॉक तिने टीव्हीच्या दिशेने भिरकावले पण रायमा आडवी आली आणि ते क्लॉक जमिनीवर पडून फुटले. टीव्ही वाचला!

रायमाने तिला बळजबरीने खांद्याला पकडून ओढत नेले आणि पलंगावर बसवले.

"रिलॅक्स, बेबी! असे तोडफोड करून काहीच होणार नाही. शांत हो!"

"त्या सटवीला, सोनी बनकरला मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही."

"तिने तुझे काय बिघडवले आहे रिटा? तिला दोष देऊ नकोस!"

"तिने माझा हक्काचे काम हिरावले माझ्यापासून! माझे ''वलय'', माझे ग्लॅमर हिसकवले आहे तिने माझ्यापासून!"

"बेबी! हे तर चालायचंच या इंडस्ट्रीमध्ये! तिने ते काही मुद्दाम केलेले नाही हे तुला माहितेय! तिच्याकडे संधी आली आणि तिने ती स्वीकारली!"

"पण तिने माझी जागा घेतली त्याचे काय? नाही! मी तिला असं करू देणार नाही! ती मस्त पिक्चर करेन, यश चाखेन आणि मी इथे गाशा गुंडाळून स्वस्थपणे बसणार? मुळीच नाही!"

"अगं, मग तू करणार आहेस तरी काय?"

"मी परत मुंबईला जाणार!"

"अगं, तुझी हालत ठीक नाही. तिथे जाऊन काय करणार?"

"माझी हलत ठीक आहे! सगळं ठीक आहे. यापूर्वीही मी डिप्रेशनमधून सावरले होते! आतासुद्धा मी सावरले आहे नैराश्यातून! मी परत जाणार! काम शोधणार!"

"हे बघ बेबी! इथे कोलकात्याला पुन्हा तू थिएटर मध्ये काम करायला लाग!"

"नाही, मी बरी आहे! मी उद्याच पुन्हा मुंबईला जाणार!"

आईने लाख समजावले पण तिने ऐकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या वागणुकीत बदल जाणवत होता. ती जाणीवपूर्वक स्वतःला कंट्रोल करत होती आणि ही एक चांगली गोष्ट होती. तिने फ्लाइटचे तिकीट बुक केले आणि सामान बांधून ती तयारी करू लागली. तिच्या मनात नेमके काय चाललंय हे आज तिच्या आईला मुळीच समजत नव्हते शेवटी नाईलाजाने तिने परवानगी दिली.

मुंबईच्या विमानात बसल्यानंतर रिताशाच्या चेहऱ्यावर एक अद्भुत आणि गूढ हसू उमटले. तिच्या मनात नेमके काय चाललंय हे फक्त तीच सांगू शकणार होती, पण कसलातरी गाढ निश्चय तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता हे विमानातील तिच्या बाजूच्या सहप्रवाशाला जाणवलं हे नक्की!

yyyy




आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel