फ्रांको आणि व्हिटोरीओ दोघांनी एकमेकांना संपर्क साधल्यावर त्यांना कळले की अपघातात सुबोधचा मृत्यू झाला आहे. व्हिटोरीओने सुप्रियाच्या आई वडिलांना आणि सुबोधच्या आईला कॉल करून ही वाईट बातमी सांगितली. प्रसंग खूपच दु:खद होता. सुबोधची आई शुद्ध हरपून बसली. सुप्रियाच्या घरी सुद्धा वाईट हाल होते. दोघांचे नातेवाईक इटलीत यायला निघाले. ते येईपर्यंत सुप्रियाला धीर देण्याचे काम व्हिटोरीओ आणि त्याची पत्नी क्रिस्टीना यांनी केले. मृतदेहाचे तुकडे एकत्र करून तो घरी आणला गेला होता. दहशतवाद्यांना लवकरच पकडून शिक्षा करण्याचा निर्धार स्थानिक पोलिसांनी केला. मृतदेहाचे इटलीतच विद्युत दाहिनीत अंतिम संस्कार करण्याचे ठरवले गेले. सुप्रिया सतत स्फुंदून रडत होती. तिचे हाल बघवले जात नव्हते.
शेवटी तिचे मन वळवण्यासाठी व्हिटोरीओ इंग्रजीतून तिला म्हणाला, "हे बघ, ऐक! एक बातमी सांगतो तुला. तुला एका भव्य हॉलीवूडपटात डबिंग आर्टिस्ट म्हणून काम मिळण्याची शक्यता आहे, गरज आहे फक्त तू एक ऑडीशन देण्याची!"
तिच्या चेहऱ्यावर खिन्नता आणि विषाद दर्शवणारी शून्य नजर होती. तिच्याकडून काहीएक प्रतिक्रिया आली नाही. तिने फक्त थोडेसे वळून व्हिटोरीओकडे पाहिले.
व्हिटोरीओने क्रिस्टिनाकडे पाहिले. ती म्हणाली,
"हे बघ सुप्रिया, जीवनात असे प्रसंग सांगून येत नाहीत. पण आपण अश्या प्रसंगाना सामोरे जायला शिकले पाहिजे!"
आता सुप्रियाच्या चेहऱ्यावर भयंकर राग दिसून आला.
"मी त्या दहशतवाद्यांना सोडणार नाही. मला त्या सगळ्यांना गोळ्या घालायच्या आहेत. तरच सुबोधला ती श्रद्धांजली ठरेल!"
क्रिस्टिना म्हणाली, "तुझा राग योग्य आहे, पण दहशतवाद्यांना शिक्षा करण्याचे काम तुझे नाही पोलिसांचे आहे!"
व्हिटोरीओ पुढे म्हणाला, "सुबोधची सुध्दा इच्छा तुला मनोरंजन क्षेत्रात खूप यश मिळावं हीच होती. तेव्हा तू या दुःखातून सावरून लवकरच या क्षेत्रात अधिकाधिक यश मिळवले तर ती खरी श्रद्धांजली ठरेल सुबोधला!"
क्रिस्टिनाने विनंती केली, "एकच कर की यापुढे सगळे निर्णय विचारपूर्वक घे. लगेच इटली सोडून जाण्याचा निर्णय घेऊ नकोस. इथे एकटे वाटून घेऊ नकोस. आम्ही दोघे आहोत. आम्हाला तुझे फॅमिली मेंबर समज!"
दुसऱ्या दिवशी सगळे सोपस्कार आटोपल्या नंतर दहा दिवसांसाठी सुप्रिया भारतात गेली.
***
दरम्यान राजेशच्या आईने राजेशला कॉल केला.
"राजेश, फोन कट करू नको. मी काय सांगते ते ऐक. तूला बाळ होणार आहे. आणि सूनंदाच्या त्या काकूला मी लवकरच वठणीवर आणणार आहे. तिनेच तुझ्या बायकोच्या मनात विष पसरविण्याचे काम केले आहे. तिला सुनंदाची संपत्ती आपल्याला मिळाल्याचं सहन झालं नव्हतं म्हणून ती असे तुमच्या संसारात विष कालवण्याचे काम करत होती!"
पुढचं जास्त न ऐकता आपल्याला बाळ होणार या कल्पनेने राजेश सुखावला होता.
"आई, फार छान बातमी सांगितली, कधी आहे तारीख?"
"काही महिन्यातच!!"
"मग निघतो यायला पण सुनंदा, तिच्या मनातले गैरसमज?"
"मी जेव्हा तिच्याशी बोलले होते राजेश तेव्हा तिला पण तिची चूक वाटू लागली पण काकूच्या धाकाने ती तुला संपर्क करण्यास धजत नव्हती. शेवटी लहानपणाासूनच त्या नालायक काकुचा पगडा तिच्या मनावर होता..तू ये. ती नाही कसला गैरसमज करणार! आणि गावाला निघून येण्याआधी जे काही घडले ते तिने मला सांगितले आता त्याचं मात्र काय ते तू बघ बाबा, आधी ये तर घरी!"
राजेश स्वागतपुरीला जायला निघाला. त्याला वारंवार पडणाऱ्या त्याच त्याच स्वप्नांत लिफ्टमध्ये तो नाजूक हात कुणाचा होता ते आता त्याला कळून चुकले होते, तो होता बाळाचा!!
***
माया माथूर जॉगिंगला गेली. सकाळच्या सहा वाजेच्या फ्रेश हवेत जॉगिंग केले तर बॉडी अर्थातच फिट राहणार होती. गेले तीन महीने तिने आराम करायचे ठरवले होते. अजून तिच्याकडे एकाही नवीन चित्रपटाची ऑफर नव्हती.
"माया मॅडम!" कुणीतरी आवाज दिला होता.
"एक्स क्यूज मी, तुमच्या मागे बघा!"
"आय डोन्ट नो यू, कोण तुम्ही!"
"मी सूरज सिंग. म्हटलं तुमच्याशी बोलायला ही सकाळची वेळच योग्य होईल, एरवी जरी सध्या चित्रपट आणि शूटिंग नसली तरी तुम्ही डान्स क्लासेस घेतात त्यामुळे बिझी असता."
"पण तुम्ही आहात कोण मिस्टर, सॉरी मी तुम्हाला ओळखले नाही. जन्टलमन तर दिसता पण तुम्हाला साधा शिष्टाचार माहीत नाही की अनोळखी महिलेशी बोलता तर बोलता, आणि विचारून सुद्धा ओळख सांगत नाहीत!"
थोडासा अंधार होता पण हळूहळू उन्हाची तिरीप चेहऱ्यावर पडल्यावर अचानक मायाला काहीतरी आठवले, "एक मिनिट, एक मिनिट, मी ओळखलं तुम्हाला! टीव्ही अॅक्टर रागिणी राठोडचे पती! आय फील सॉरी फॉर युवर गर्लफ्रेंड! आय थिंक यू आर एन ओनर ऑफ ए फुड चेन! डी. पी. सिंगचे पुत्र ना तुम्ही?"
सूरजने चेहरा गंभीर केला.
"चला बाजूला बाकड्यावर बसूया!" सूरज म्हणाला.
बाकड्यावर:
"माझ्या जीवनातल्या त्या घटना मला विसरायच्या आहेत. पत्रकाराने टीव्हीवर रागिणीच्या पूर्वायुष्यातल्या घटना उघड केल्याने तिने फार मनाला लावून घेतले होते, मी तिला सपोर्ट केला पण तिने .... !" असे म्हणून तो थोडा गंभीर झाला आणि पुढे बोलू लागला, "काही कारणास्तव मी आता डी. पी. सिंग सोबत राहत नाही. पण सोडा त्या सगळ्या गोष्टी आणि मी तुमच्याकडे कशाकरता आलोय ते सांगतो! मी चित्रपट निर्मिती सुरू केलीय हे तुम्हाला माहीत असेलच, तेव्हा माझ्या चित्रपटात तुम्ही काम करावं अशी माझी इच्छा आहे, पण चित्रपटात लीड अॅक्टर मात्र नवीन आहे, आणि आपल्या देशातला नाही पण इंडियन ओरिजिन आहे."
थोडा विचार करून माया म्हणाली, "मला वाटते थोडी घाई होतेय. मला इतर सगळे डिटेल पण हवेत, लीड अॅक्टर कोण आहे काय आहे हे सगळं बघावं लागेल नाही का! तुम्ही पुढच्या आठवड्यात माझ्या ऑफिस मध्ये सगळे डिटेल्स घेऊन या, मग बघुया!"
सूरज बागेतून परत गाडीत बसत असतांना थोडा चिंताग्रस्त दिसत होता. हिने ऐकलं नाही तर? मग तिला राजी करायला दुसरा पर्याय वापरायची वेळ तर नाही ना येणार? बघूया!" असे म्हणून तो गाडी वेगाने पळवू लागला.
नंतर एके दिवशी सूरजने मायाच्या ऑफिसमध्ये तिला त्याच्या विनोदी पण गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटाची कथा ऐकवली जी स्वत: त्याच्या "भाईने" सांगितली होती. मायाला काही ती कल्पना पसंत पडली नाही! तसेच अशा अप्रकार्च्या नवख्या हिरोबद्दल ती काम करायला तयार नव्हती. तिने नकार कळवला.
सूरज अस्वस्थ झाला. तिकडे दुबईहून भाईचा अभिनयशून्य "चचेरा भाई" माया माथुर सोबतच चित्रपटात येण्यासाठी अडून बसला होता आणि भाई त्याचेसाठी काहीही करायला तयार होता कारण चचेरा भाईने त्या भाईच्या ड्रग्ज बिझिनेस मध्ये भाईला खूप मदत केली होती. आणि इकडे सूरजने जर भाईचे ऐकले नाही तर त्याच्या धंद्याला आणि पर्यायाने एकूणच त्याला मिळणाऱ्या अमाप संपत्तीला आणि त्याद्वारे मिळणाऱ्या विविध सुंदर स्त्रियांना मुकावे लागणार होते. माय माथूर...? काय करू तुला राजी करण्यासाठी?
***
सोनी बनकर आणि भूषण ग्रोवर यांचा साखरपुडा पार पडला. अनेक वर्तमानपत्रे आणि बॉलीवूड न्यूज चॅनल्सनी त्याला ठळक प्रसिद्धी दिली. राजेशने विणा वाटवे आणि सारंग सोमय्याला त्या इव्हेंटचे कव्हरेज करायला सांगितले होते.
भूषण ग्रोवरला बॉलीवूड अभिनेत्री रिताशासोबत टीव्ही सिरीयलची ऑफर आल्याने तो खूश होताच पण सोनी सुध्दा दुप्पट खुश होती. एकंदरीत दोघांचे टिव्ही इंडस्ट्रीत बरे चालले होते आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेले होते म्हणून त्यांनी साखरपुड्याचा निर्णय घेतला होता आणि लवकरच ते लग्न बंधनात अडकणार होते. रिताशाही त्या साखरपुड्याला आवर्जून हजर होती. "डर की दहशत" ही सिरियल सुरू झाली होती आणि त्यात रिताशा भूषण यांची प्रमुख भूमिका होती. सिरियल पुन्हा चालायला लागली. लोकांमध्ये लोकप्रिय व्हायला लागली आणि सोनीची पण सुभाष भटच्या चित्रपटाची शूटिंग जवळपास संपली होती.
रिताशा आता त्या दोघांचे लग्न होण्याची वाट बघत होती. साखरपुड्याला रिताशाने त्या दोघांना भेट दिलेला एक आकर्षक आणि महाग ताजमहाल रात्री त्यांनी पॅकेज मधून उघडला तर टेबलवर ठेवताच त्याचे आपोआप दोन तुकडे झाले. दोघानाही आश्चर्य वाटले आणि थोडी चिंताही वाटली कारण हा एक प्रकारचा अपशकुन होता का? पण कदाचित अनेक हातांनी हाताळला गेल्याने तो तुटला असावा असे समजून त्यांनी तो फेकून देण्याचे ठरवले. मुद्दाम टीचलेला ताजमहाल रिताशने पॅक करून दिला होता आणि तो उघडताच दोघांचा चेहरा कसा झाला असेल हे आठवून ती गालातल्या गालात घरी रात्री हसत होती.
लवकरच त्या दोघांचे लग्न झाले. सिरियल अजूनही चॅनलच्या टॉप लिस्टवर होती. हनीमूनसाठी स्विसला जातांनाचे, गेल्यानंतरचे, सकाळी झोपेतून उठल्यावरचे, खातांना, पितांना, नाचताना, गातांना, बर्फ खेळताना, ट्रेनमध्ये एकमेकांचा किस घेतांना असे सगळे फोटो म्हणजे सेल्फी त्या दोघांनी फोटोग्राम, फ्रेंडबुक, चॅटर या सोशल साईट्स वर शेअर केले. फक्त रात्रीचे प्रायव्हेट क्षण सोडून!! रिताशा हे सगळे फॉलो करत होती. तिला त्यांची आयती खबर मिळत होती. सोनी ऐवजी फोटोत मी असेन, हा माझा पक्का निर्धार आहे असे म्हणून तिने रागाने एक फ्लावर पॉट जमीनीवर आदळला.
दोघेही हनिमूनहून परत आल्यावर काही दिवसानंतर:
रितशाने डी. पी. सिंग यांना एक सल्ला दिला की आता सिरियलची शूटिंग आपण युरोपात केल्यास प्रेक्षकवर्ग अजून वाढेल. युरोप मध्ये रहात असलेले भारतीय आणि त्यांचे स्थानिक मित्र यांना तिथे आलेले भूतांचे अनुभव आपण युरोप टूरच्या सिझन मध्ये दाखवू. तेथील स्थानिक कलाकारांना सुध्दा सामील करून घेऊ. त्यांना कल्पना पसंत पडली. मग लवकरच युरोपात जाऊन लेखकांची टीम काम करायला लागली. हा हेतू होताच पण सिरियल भारताबाहेर घेऊन जाण्याचा मूळ हेतू रिताशाचा हा होता की त्याच दरम्यान सोनी बनकरला एका डान्स रियालिटी शो मध्ये तीन पैकी एक जज्ज म्हणून संधी मिळाली, म्हणजे ती युरोपात भूषण सोबत येऊ शकणार नव्हती!
yyyy