एक साधा भोळा खेड्यातला उंदीर होता. त्याच्याकडे एक धष्टपुष्ट व गोजिरवाणा असा शहरातला उंदीर आला. खेड्यातल्या उंदराने आपल्या पाहुण्याचा चांगला आदरसत्कार केला. आपल्या घरातले काही पदार्थ, जवळच्या शेतातील कोवळी कणसे, वाटाण्याच्या शेंगा व भाकरीचे तुकडे त्याला दिले. पण खेड्यातले हे अन्न त्या शहरातल्या उंदराला आवडले नाही. मग तो त्या खेड्यातल्या उंदराला म्हणाला, 'अरे, तुला जर राग येणार नसेल तर मी थोडं मनमोकळेपणाने बोलतो, अरे अशा ह्या कंटाळवाण्या जागेत तू राहतोस कसा? हे रान, आसपास गवत, झाडं, डोंगर नि पाण्याचे ओहळ याशिवाय दुसरं काही नाही. इथल्या पक्ष्यांच्या किलबिलाटापेक्षा माणसाचा आवाज बरा नाही का ? या ओसाड रानापेक्षा राजधानी बरी म्हणायची. विचार कर आणि ही जागा सोडून माझ्याबरोबर शहरात चल, तिथे तुला बरंच सुख मिळेल.' हे सगळे वर्णन ऐकून त्या खेड्यातल्या उंदराला मोह झाला व दोघे सकाळी खेड्यातून निघून रात्री शहरात पोहोचले. थोडे पुढे गेले तर तेथे त्यांना एक मोठा वाडा दिसला. आदल्या दिवशीच तेथे लग्नसमारंभ झाला होता. त्या वाड्याच्या आत जाऊन ते स्वैपाक घरात शिरले. तेथे नाना प्रकारचे पदार्थ होते. पण माणसे कोणी नव्हती. ते पाहून खेड्यातला उंदराला मोठा आनंद झाला. तेव्हा शहरातला उंदीर त्याला म्हणाला, 'तू खोलीच्या मध्यभागी बस. मी एक एक पदार्थ देईन, तो खाऊन पहा आणि त्याची चव कशी काय आहे ते मला सांग !' मग तो एकेक पदार्थ आपल्या पाहुण्याला देउ लागला व तो चाखून 'अहाहा ! काय चविष्ट पदार्थ आहे हा !' असे म्हणून तो खेड्यातला उंदीर त्याचे कौतुक करू लागला. अशा प्रकारे एक तास मोठ्या आनंदात गेला. इतक्यात स्वैपाक घराचे दार उघडले गेले व ते पाहून दोघेही उंदीर एका कोनाड्यात जाऊन लपले. इतक्यात दोन मोठे बोके तेथे आले व त्यांनी मोठ्याने आवाज केला. तो ऐकून खेड्यातला उंदीर भीतीने घाबरला, त्याची छाती धडधडू लागली. मग तो हळूच शहरातल्या उंदराला म्हणाला, 'अरे, असंच जर तुझं शहरातलं सुख असेल तर ते तुझं तुलाच लखलाभ होवो. मला खेडंच बरं, तिथल्या रानातल्या शेंगा बर्‍या पण रात्रंदिवस जिवाला भिती असणारी ही इथली पक्वान्न मला नकोत.'

तात्पर्य

- शहरात सुख फार पण त्याप्रमाणे दुःखेही फार. खेड्यात मजा कमी पण त्या मानाने दुःखे व संकटेही कमी असतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel