उन्हाळ्यात एक सिंह एका झाडाच्या सावलीत अगदी शांत झोपला होता. तेथे उंदरांनी फारच त्रास दिला. त्यामुळे जागा होऊन त्याने एका उंदरास पंजात पकडले व त्याला फाडून खाणार तोच त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, 'महाराज, आपण मोठे, सर्व प्राण्यांचे राजे, मी आपल्यापुढे अगदीच लहान. माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नका. मला जीवदान द्यावं हेच योग्य.' ते ऐकून सिंहाला त्याची दया आली व त्याने त्याला सोडून दिले. पुढे एकदा सिंह अरण्यात फिरत असता त्याच झाडाजवळ शिकार्याने जाळे लावले होते, त्यात सापडला. त्यावेळी त्याने आपली सगळी शक्ती खर्चून धडपड केली, पण त्याची सुटका झाली नाही. तेव्हा तो निराश होऊन मोठ्याने ओरडू लागला. तो आवाज ऐकून तो उंदीर तेथे आला व सिंहाला म्हणाला, 'राजा भिऊ नकोस, स्वस्थ बस.' इतके बोलून त्याने आपल्या दाताने ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.
तात्पर्य
- मोठ्याचे एखादे मोठे काम लहानाच्या हातून एखादे वेळी होते. यासाठी कोणाला क्षुद्र समजून हिणवू नये. आपल्या चलतीच्या काळात माणसाने लोकावर उपकार केलेत तर पडत्या काळात तेच त्याच्या उपयोगी पडतात.