एक चांगले धष्टपुष्ट गाढव पाहून त्याच्या मांसाचा एक तरी तुकडा आपल्याला खायला मिळावा असे लांडग्याला वाटले. मग ते गाढव आपल्या हाती लागावे म्हणून लांडग्याने वैद्याचे सोंग घेतले व सर्व प्राण्यांना कळविले की, 'मी देशोदेशी फिरून सर्व प्रकारच्या औषधांचे व वनस्पतीचे अनुभव घेतले आहेत. माझ्या हातून प्राण्यांचा कोणताही रोग बरा झाल्याशिवाय राहणार नाही.' त्याचा हा लबाडपणा ओळखून त्याची खोड मोडावी अशा विचाराने ते गाढव अगदी भोळेपणा दाखवून लंगडत लंगडत लांडग्याजवळ गेले व म्हणाले, 'वैद्यबुवा माझ्या पायात काटा रुतल्यामुळे मी फार हैराण झालो आहे, कृपा करून काही उपाय करा.' लांडगा म्हणाला, 'अरे, असा जवळ ये, मला तुझा पाय पाहू दे.' मग लांडग्याजवळ जाऊन गाढवाने मागल्या पायाची एक लाथ अशी जोरात झाडली की त्यामुळे लांडग्याचे तोंड फुटून तो सारखा ओरडत राहिला व गाढव पळून गेले व जाते वेळी मनात म्हणाले, 'मला फसवणार होता त्यालाच मी फसविलं !'
तात्पर्य
- शेरास सव्वाशेर मिळाल्याशिवाय रहात नाही.