कवितासागर प्रकाशन

आजच्या भौतिकवादी युगात विज्ञान, तंत्रज्ञान आणि दूरसंचार या सर्वच क्षेत्रात मानवाने नव नवे आयाम स्थापित केले आहेत. पण दुसरीकडे लहान मुलांपर्यंत झिरपत जाणा-या उपभोक्तावादी प्रवृत्तीने आणि चंगळवादी संस्कृतीने मोठ्या व्यक्तींबरोबर लहान मुलांचेही नैतिक अध:पतन केले आहे. येणारी पिढी त्या नैतिक अध:पतनाच्या खाईत चालली आहे. अशावेळी साहित्य क्षेत्र हे एकमेव असे क्षेत्र उरले आहे की, जे मुलांच्या मनावर सुसंस्कार करीत आहे आणि वर्तमान काळात असे अनेक बालसाहित्यिक आहेत की, जे या पुण्य कामासाठी एकवटले आहेत.

बालसाहित्‍याच्या वेगवेगळ्या प्रकारांतून बालमनावर प्रभाव टाकणा-या अपप्रवृत्तींवर प्रकाश टाकून त्याच्यावर संस्कार होईल अशी साहित्य प्रकारांची निर्मिती करीत आहेत तसेच त्यांचे मनोरंजनही करीत आहेत.

पण लहान मुलांचे मनोरंजन होईल आणि त्यांच्यावर संस्कारसुद्धा होतील अशा बदलत्या काळातल्या अनेक साहित्य प्रकारांची मुलांसाठी नव्याने लेखन करणा-या साहित्यकारांना ओळख नाही त्या सर्व साहित्य प्रकारांची एकत्रितपणे कुणीतरी नव्याने ओळख करून देण्याची गरज होती.

बाल मनावर संस्कार करणारे बाल साहित्याचे प्रकार कोणते? त्यांची मांडणी कशी करावी? निर्मिती कशी करावी? त्याची रूपरेखा कशी आखावी? आणि त्याला मूर्त स्वरूप कसे द्यावे या विषयी वैचारिक मार्गदर्शन करणारा असा एकत्रित कोणताच ग्रंथ संध्यातरी बाजारात उपलब्ध नाही. जो नव साहित्यिकांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करू शकेल. ही उणीव लक्षात घेवून आमचे कोल्हापूरचे मित्र डॉ. श्रीकांत श्रीपति पाटील यांनी 'लिहू आनंदे' या संपादित ग्रंथाची निर्मिती केली आहे आणि ही उणीव भरून काढली आहे.

खरं म्हणजे हे काम फारच किचकट, अवघड आणि शिवधनुष्य पेलण्यासारखे होते मात्र त्यांनी ते अगदी सहज उचलले आहे.

'लिहू आनंदे' या ग्रंथात बालमनावर संस्कार करणारे सुमारे ३६ लेखांचा अत्यंत मौल्यवान संग्रह आहे. हे ३६ लेखसंग्रह म्हणजे एक एक मौलिक मोती आहे आणि त्याची सुंदर अशी वैचारिक मला तयार झाली आहे. हे सगळे लेख तयार करणे कुणाही एका तज्ज्ञ व्यक्तीचे काम नाही कारण प्रत्येक साहित्य प्रकारच्या बारकाव्यानिशी इतकी सखोल माहिती कुणा एका व्यक्तीला असणे शक्यच नाही. संपादक डॉ. श्रीकांत श्रीपति पाटील यांनी साहित्य क्षेत्रातील अशा तज्ज्ञ व्यक्ती हेरून त्यांच्याकडून बालसाहित्य लिहिणा-या लेखकांसाठी मार्गदर्शनपर असा एकेक लेख लिहून घेतला आहे आणि सर्व लेख वाचल्यावर त्यांची निवड किती सार्थ ठरली आहे याची प्रचीती येते.    

मनोगतापासून ग्रंथाच्या शेवटच्या लेखाच्या शेवटच्या पानापर्यंत वाचन कृत आत आत प्रवेश करतांना मला तर अलीबाबाच्या गुहेत शिरून प्रचंड वैचारिक खजिना सापडल्याचा आनंद होत गेला, मलाच काय? पण नव्याने लेखन करणा-या बालसाहित्यिकांनाही लेखनासाठी नवी दिशा सापडत गेल्याचा आनंद होईल. एकेक मौलिक मोती वेचून घ्यावेत असे प्रत्येक लेखातले विचार आहेत. हजारो वर्षांपासून शब्दाला वजन का आहे? किती आहे? अनेक अक्षराला धन का म्हणतात? याची जाणीव होत जाते.

या ग्रंथाचा हेतू अगदी शुद्ध आणि सात्विक आहे. बाल मन असो, कुमार मन असो किंवा प्रौढ मन असो तेविचार प्रवानशील असते त्या प्रत्येकाच्या मनात विचार चाललेले असतात आणि कोणत्याना कोणत्या प्रकारातून मनातले विचार त्यांना व्यक्त करायचे असतात. फक्त त्यांना व्यक्त होण्यासाठी फॉर्म (साचा) सापडत नाही. कोणत्या फॉर्म मधून मनातले विचार व्यक्त केले तर ते अधिक चांगल्या प्रकारे होतील याची दिशा त्यांना माहित नसते. अश बाल मनाला, बाल साहित्य लिहिणा-या लेखकाला आणि नवोदित व्यक्तींनाही योग्य मार्गदर्शन होईल. असा 'लिहू आनंदे' या ग्रंथाचा मूळ हेतू आहे. विचार आणि चिंतनातून लेखन सुचते, लेखनातून आनंद मिळतो आणि तो आनंद निर्भेळ असतो लेखनातून तो दुस-याला वाटला जातो. त्यातून अगदी नकळत बाल मनावर संस्कार होतात असे सूचित करणारा 'लिहू आनंदे' हा सात्विक ग्रंथ आहे आणि त्या कसोटीला तो पुरेपूर उतरला आहे.

बालकांनी किंवा बाल मनासाठी लेखन करणा-या कुणाही कथाकारांसाठी नीलम माणगावे यांनी कथा कशी लिहावी याचे खूप सुंदर विवेचन पहिल्याच लेखात केले आहे. लेखाची सुरुवातच एकदम भन्नाट केली आहे. लहान मुलांच्या समूहाकडून एक सामुहिक कथा कशी तयार होते याचे मौलिक मार्गदर्शन केले आहे. कथेचे प्रकार, कथाबीज कसे शोधावे, कथेची सुरुवात आणि शेवट कसा करावा, कथेची भाषा अशी क्रमाक्रमाने माहिती उलगडून दाखविली आहे आणि ती खूपच प्रेरक आहे.

वर्षा चौगुले यांनी कविता कशी सुचते आणि तिची मांडणी कशी करावी या संबंधी केलेले मार्गदर्शन नवोदितांना खूप उपयुक्त आहे.

आजच्या ग्लोबल जगात माणसे जशी जवळ येत आहेत तशी भाषाही जवळ येत आहे. आणि त्या एकमेकींच्या हातात हात घालून मुलांच्या समोर येत आहेत. मराठी बरोबरच अन्य भाषेतील बाल साहित्यही मुलांवर खूपच चांगले संस्कार करू शकतात त्यासाठी मुलांना अनुवादित कथा वाचायला मिळणे महत्त्वाचे आहे. यासाठी अनुवाद कसा करावा यावर चंद्रकांत निकाडे यांनी साध्या सोप्या सरळ भाषेत विवेचन केले आहे.

तर मुलांचा आवडता साहित्य प्रकार म्हणजे कादंबरी. कादंबरी कशी लिहावी? याचे सूत्रे महेंद्र कदम यांनी उलगडून दाखविली आहेत.

लहान मुलांना आणि नवोदित साहित्यिकांना सर्वसामान्यपणे एवढे चारच प्रमुख माहित असतात आणि त्यातूनच अभिव्यक्त होवून ते मनोरंजनाचा निर्भेळ आनंद लुटत असतात. फारतर शाळेत स्नेहसंमेलनामध्ये सादर करण्यासाठी एकांकिका आणि नाटक दोन साहित्य प्रकार मुलांना माहित होतात. पण ते तेवढ्या पुरतेच. मनोरंजनासाठी मात्र मुले अजूनही कथा, कविता आणि कादंबरी वरच अवलंबून असतात.

पण मुलांना आणि त्यांच्यासाठी लेखन करणा-या नवसाहित्यिकांना इतर प्रकारांचीही ओळख व्हावी आणि त्या प्रकारातूनही त्यांनी व्यक्त व्हावे त्या साहित्य प्रकारांची त्यांना गोडी लागावी म्हणून त्यांचा नुसता परिचयच नाही तर सखोल आणि अभ्यासपूर्ण माहितीही दिली आहे. चारोळी लेखन (अनंत शेळके), अनुभव लेखन (अशोक दादा पाटील), नाट्यछटा लेखन (परशराम रामा आंबी), पथनाट्य लेखन (अशोक भीमराव रास्ते), अनुभव लेखन (अंकुश गाजरे), सायफाय लेखन (अभिषेक ज्ञानेश्वर ठमके), संस्कार लेखन (डॉ. मा. ग. गुरव), अशा आगळ्या वेगळ्या साहित्य प्रकारातून मुलांना सर्वांगीण साहित्य प्रकार माहित व्हावे इतका सरळ आणि साधा विचार 'लिहू आनंदे' या ग्रंथातून नुसता व्यक्तच होत नाही तर तो सफल ही होतो.

'लिहू आनंदे' हे पुस्तक बाल कुमारांसाठी लेखन करणा-या नवोदित साहित्यिकांसाठी आहे असे डॉ. श्रीकांत श्रीपति पाटील यांचे म्हणणे आहे आणि मनोगतात त्यांनी तसे म्हटले आहे. त्यामुळे या ग्रंथाबाबत काही लेखांबाबत प्रश्न चिन्ह उभे राहते. समीक्षा लेखन (सुभाष विभूते), वैचारिक लेखन (संजय वारके), निबंध लेखन (प्रकाश पाटील), पटकथा लेखन (अशोक भिमराव रास्ते), व्याकरण व कोश वाङ्‌मय (सुनील सुतार) हे लेख नितांत सुंदर आहेत आणि वैचारिक विश्लेषणाच्या पातळीवर असलेल्या निकषांच्या कसोटीलाही उतरले असून नव्याने लिखाण करू पाहणा-यांसाठी सदर वैचारिक लेख अत्यंत उपयुक्त आहेत.

कोश वाङ्‌मय लेखन, पटकथा लेखन किंवा प्रबोधनपर लेखन हे जरी लहान वयातील मुलांसाठी क्लिष्ट असले तरी भविष्यात त्यांना अतिशय मोलाचे ठरू शकते.

चित्र पुस्तके / बोलकी पुस्तके (बाळ पोतदार), प्रकल्प / नवोपक्रम (शिवाजी बोरचाटे), तुम्हीच व्हा संपादक (संजय लक्ष्मण भारती), विचार संकलन (सौ. प्रणिता तेली), पर्यावरण विषयक लेखन (सौ.  दीप्ती कुलकर्णी), व्यक्ती चित्र लेखन (डॉ. कुमार रामगोंडा पाटील), या सारख्या लेखांनी 'लिहू आनंदे' या ग्रंथाची क्रियाशील उंची वाढली आहे कारण या लेखातून मुलांना गतिशील कसे बनवावे, माहिती कशी संकलित करावी, तिचे संपादन कसे करावे या संबंधी उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे. नुसतेच खेळ, वाचन, लेखन या शिवाय त्यांच्यातल्या सृजनशील शक्तीला आणि कृतीशीलतेलाही चालना मिळावी त्या दृष्टीने मुलांसाठी लेखन करणा-या नवोदितांना लेख नक्कीच मार्गदर्शक ठरतील. मुलांना काय पाहिजे? काय देणे गरजेचे आहे? आणि ते कसे द्यावे? त्यासाठी नवोदित लेखकांनी कोणती पथ्ये पाळावीत या प्रत्येक बाबतीत, प्रत्येक लेखातून उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे.

या प्रत्येक लेखाचे मला जाणवलेले वैशिष्टे म्हणजे त्या त्या लेखाची भाषा शैली आणि सुंदर विवेचन केलेले आहे. कोणत्याही लेखात लेखात कुठेही क्लिष्ट भाषा नाही आणि किचकट विवेचन नाही. अगदी लहान मुलांनी लेखक व्हायचे ठरविले तरी त्यांना सहज समजेल अशी भाषा आणि विवेचन आहे. सगळे लेखन आणि अगदी मौलिक आणि वास्तववादी आहे; आत्‍मलक्षी आहे.

'लिहू आनंदे' हा ग्रंथ एक दीपस्तंभ आहे आणि प्रत्येक शिक्षकाच्या संग्रही तो असलाच पाहिजे आणि प्रत्येक शाळेतील ग्रंथालयात सुद्धा असलाच पाहिजे. शाळेतील मुलांसमोर त्याचे वाचन झाले पाहिजे. त्यामुळे मुलांना लिहिण्याची प्रेरणा मिळेल.

- प्रा. साईनाथ पाचारणे

•        लेखसंग्रह - लिहू आनंदे  
•        संपादन - डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील   
•        मूल्य - 550 /-
•        पृष्ठे - 416 (कव्हरसह)
•        प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील
•        प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
•        संपर्क - 02322 225500, 09975873569, 08484986064
•        ईमेल - sunildadapatil@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel