(CBI ऑफिसर कैलास आणि स्वरा ह्यांच्या साहसकथा )

- अक्षर प्रभू देसाई

प्रकरण तिसरे : सफायर ऑक्शन

कैलासला आज इतका सकाळी आलेला पाहून स्वरा थोडी चकित झाली होती. कैलास आपल्या डेस्कवर आज खूप काही लिहीत होता. "काय झाले आज आपण काम करताय ? " तिने थोड्या खोचक प्रमाणेच विचारले. "स्वरा .. तुझ्याजवळ एखादा छान पार्टी ड्रेस आहे का ? म्हणजे अग्नी अंबानींच्या पार्टीत जाण्यायोगा ?" त्याने तिच्याकडे पाहत विचारले. स्वरा कुठल्याही अँगल ने अतिशय सुंदर होती. CBI भवनात तिच्याविषयी खूप काही बोलले जायचे पण कैलास त्या दृष्टीने विचार करणारा माणूस नव्हताच पण स्वराचे सौंदर्य कामात उपयोगी पडले तर वापरावे असा त्याचा विचार होता.

"का ? अँटिलीया वर धाड टाकायचीय का ? " तिने प्रतिप्रश्न केला.

कैलासने टेबलवरील पांढरा लिफाफा तिच्याकडे सरकवला. तिने उघडून पहिला. आत एक छान पैकी कागदावर एक निमंत्रण होते. "सफायर ऑक्शन", ग्रेट मराठा हॉटेल मध्ये. फक्त निमंत्रितांसाठी. निमंत्रण पत्रिकेबरोबर होती मकाव मधील कसिनोतील एक चिप. "हे काय नवीन केस आहे कैलास? " ती सिरीयस झाली.

"केस नाही, एक लीड आहे".

काहीसा उठून उभा राहिला. त्याने पॅंट थोडी वर खेचली आणि बाजूची मोठी स्क्रीन ऑन केली. १९८२ सालापासून दर वर्षी सफायर ऑक्शन हा लिलाव होतो. दर वर्षी त्याचे स्थान बदलते. स्वराने लिफाफ्यातील दुसरा कागद काढला. त्यात लिलाव होणाऱ्या वस्तूंची यादी आणि छोटी चित्रे होती. अकबरच्या दरबारातील एक चांदीचा चमचा, दलाई लामांच्या बालपणातील एक खेळणे इत्यादी. "कैलास, पण ह्यांत एकही वस्तू विशेष ध्यान देण्याजोगी नाही".

"पण हीच तर खरी मेख आहे इथे. समजा वस्तू इतक्या साध्या आहेत तर मग इतके मोठे हॉटेल आणि फक्त निमंत्रितांना प्रवेश का ? ह्या साध्या वस्तू आज काल इबेवर सुद्धा विकल्या जातील". त्याने स्वराकडे निरखून पहिले.

"अनेक बेकायदेशीर धंद्यात काही वस्तुंना कोड नाव दिले जाते, म्हणजे एक कोटी रुपयांना एक खोका, एखाद्या वेश्येला ककडी इत्यादी" तिने अंदाज लावला.

"अगदी बरोबर ! पण इथे लिलाव होणाऱ्या वस्तू असाधारण आहेत. त्यांची माहिती फक्त डार्क वेब वर आहे." त्याने एक वेबपेज स्क्रिनवर प्रोजेक्ट केले.

"एक प्रचंड मोठा दगडी बेडूक .. खरोखर असाधारण " स्वराने हसून त्या चित्रा कडे पहिले.

"हा काही साधारण बेडूक नाही. ह्याची किंमत सध्या किमान ५० मिलियन डॉलर्स आहे. हा बेडूक    इजिप्तच्या फारोहाच्या काळचा आहे. असे म्हटले जाते कि हा बेडूक जिथे राहील त्या देशाचा विनाश  घडवून आणेल. रशियाने अफगाणिस्तान वर हल्ला केला तेंव्हा हा बेडूक काबुल मधील एका मोठ्या  सरदारकडे होता होता. एका रशियन अब्जाधीशाने आपली खाजगी आर्मी पाठवून तो हडप केला.      पण रशियात पोचण्याच्या आधीच CIA च्या लोकांनी तो गायब केला. ६ वर्षे आधी तो इराक मधील  सद्दामच्या ताब्यांत आहे अशी माहिती आली. अमेरिकेने सद्दामला मारले तेंव्हा तो एका खाजगी    डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर ने आपल्या ताब्यात घेतला आणि सीरियामध्ये नेला. सध्या तो कुठे आहे कुणालाच ठाऊक नाही" कैलासने पूर्ण माहिती दिली.

"आणि ह्या सर्व देशांची वाताहत झाली ती त्या बेडकामुळे? " स्वराने कुत्सितपणे विचारले. ती पक्की वैज्ञानिक होती.

"कुणास ठाऊक ? आम्हाला थोडाच तो बेडूक हवा आहे ? "

"मग आम्हाला कोण पाहिजे आहे ?" तिने विचारले.

कैलासने डार्क वेब वरील आणखीन एक पेज उघडले. Skull Rider Seven नावाच्या एका माणसाची प्रोफाइल होती. "ह्या माणसाला मी डार्क वेब वर कित्येक वर्षे फॉलो केले आहे. ह्याच्या कामाची मला माहिती आहे. हा माणूस ह्या लिलावात हजेरी लावेल. त्याला आम्हाला पकडायचे आहे. हा माणूस ब्रिटिश आहे. माझ्या मते तो कदाचित MI६ सुद्धा असू शकेल."  

"जेम्स बॉण्ड?" स्वराने विनोदाने विचारले.

"कदाचित .. "

"पण एका विदेशी नागरिकाला पकडणे म्हणजे आम्हाला आधी वॉरंट वगैरे नको का ?" स्वराने विचारले. पण तिने डोके हलवून आणखीन महत्वाचा प्रश्न उपस्थित केला "ह्या माणसाला नक्की का पकडतोय आपण ? "

"मी जेंव्हा ट्रेनिंग मध्ये होतो तेंव्हा दिल्लीत माझी पोस्टिंग होती. राष्ट्रपती भवनाच्या तळघरांत के classified documents ठेवण्याचे एक ठिकाण आहे. त्या काळी CCTV वगैरे तितके प्रचलित नव्हते  तेंव्हा एका माणसाचे कार्ड चोरून मी त्यांत प्रवेश मिळवला. भारतातील सर्व गुप्त गोष्टी इथेच आहेत. बोस चा मृत्यू नक्की कुठे झाला ? गांधीजींच्या शरीरातील चौथी गोळी नक्की कुणी झाडली होती ? होमी भाभा ह्यांचा मृत्यू कसा झाला ? शास्त्रीजी ह्यांना कोणी मारले इत्यादी सर्व गुप्त माहिती इथे  ठेवली जाते. पण प्रवेश मिळविण्यासाठी ओल्ड मॉक ची एक बाटली पुरेशी होती. " कैलासने आता स्क्रीन वर काही फोटो टाकले.

"what the f***?" स्वरा किंचाळीच !

"पण प्रवेश मी का केला ? तर १९३९ साली एक फ्रेंच जोडपे मुंबईत हजर झाले. १९४१ साली त्यांना ब्रिटिश सरकारने जर्मन हेर म्हणून अटक केली. चौकशीत त्यांचे हस्तक सिक्कीम भागांत कार्यरत  होते हे समजले पण नक्की ते इथे कशा साठी आले हेच कुणाला ठाऊक नव्हते. मी ट्रेनिंग मध्ये होतो  तेंव्हा मी ब्रिटिश सरकारचे जुने कागदपत्र अभ्यासात होतो तेंव्हा मी हे सर्व वाचले. त्यांच्याकडे एक  तिबेटियन डायरी सापडली होती. ब्रिटिश सरकारने ती वाचून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांत काही  विशेष माहिती होती असे कुणालाही आढळून आले नाही. दुसऱ्या जागतिक युद्धांत शेवटी ब्रिटन विजयी झाला अन सर्व काही विसरले गेले. १९६३ साली एका फ्रेंच माणसाने भारतांत येऊन त्या डायरीची चौकशी केली तेंव्हा भारतीय हेरखात्याने कधी नव्हे ती चाणाक्ष बुद्धी दाखवून ती डायरी राष्ट्रपती भवनातील सर्वांत सुरक्षित दालनात नेली. मला ती डायरी पाहायची होती म्हणून मी सुद्धा गेलो पण ती डायरी तिथे नव्हती. कुणी तरी ती आधीच चोरून नेली होती."

"wow!" स्वराच्या डोळ्यांत आता चमक होती. "पण काय आहे त्या डायरीत ? गुप्त खजाना? कि अमरत्वाचा फॉर्मुला ? "

"ठाऊक नाही, पण ज्याने कोणी ती चोरली तो माणूस सरकारी एजंट नव्हता. तो चीन मध्ये गेला आणि त्याने चीनमध्ये कुणाला तरी ती विकली. त्यानंतर आणखीन एक दोन मालकांच्या हाती ती आली. पण १९९५ च्या दरम्यान ती पुन्हा गायब झाली. Skull Rider Seven  मागील  अनेक  वर्षांपासून  त्याचा शोध घेत आहे. आता ही डायरी ह्या लिलावांत उपस्थित झाली आहे. तिचा प्रॉक्सी म्हणून  शिलाहार राजांचे एक नाणे आहे. माझ्या आनंदाजाने किमान ५ मिलियन डॉलरमध्ये ती डायरी विकली जाईल"

"पण आम्ही सरकारी पैसा खर्च करून ती का मिळवावी ? " स्वराने विचारले.

"ब्रिटिश सरकारने विश्वयुद्धाच्या काळांत कोडब्रेकिंग वर प्रचंड पैसा खर्च केला होता तरी सुद्धा त्या डायरीतून काहीही माहिती त्यांना हाती लागली नाही. युद्धा नंतर सुद्धा ब्रिटिश सरकारने त्यांत इंटरेस्ट दाखवला आणि चीन मध्ये सुद्धा फ्रेंच एजेंट ह्या डायरीच्या शोधांत पोचले. ह्यांत नक्कीच काही तरी आहे जे जाणून घेण्याजोगे आहे पण आमच्या कर्तव्याच्या दृष्टीने म्हणशील सरकारी ताब्यातील एक दस्तऐवजांची चोरी म्हणून आम्ही त्या कडे पाहू शकतो"

"हा, असा दस्तऐवज जो अस्तित्वांत आहे हे सुद्धा सरकार नाकारेल. असा दस्तऐवज जो तो स्वतः चोरण्याचा प्रयत्न केला होता. राठोड साहेबानी विचारले तर हेच सांगशील का ? " स्वराने नेहमी प्रमाणे "प्रोसिजर" चा डाव खेळला. केस स्वरा आणि कैलासला राठोड साहेब देत असत पण बहुतेकदा कैलास इतका कुप्रसिद्ध होता कि राठोड साहेब त्याला आपली मनमानी करायला देत असत. त्यात काय तर  "ऐतिहासिक गुन्हे" ही CBI ची ब्रांच आहे हे सुद्धा बहुतेक लोक विसरले होते.

मी राठोड साहेबांशी आधीच बोललोय. तिथे ज्या प्रकारचा लिलाव होत आहे तिथे शेकडो भारतीय कायद्यांचे उल्लंघन होत आहे. काय वाट्टेल ते कलम लावून आम्ही तिथे पाहिजे तर धाड मारू शकतो  पण मी फक्त टेहाळणी करण्यासाठी जात आहे असे वचन मी त्यांना दिले आहे. आणि त्यांनी तिथे  जाण्यासाठी एक खास BMW ची व्यवस्था सुद्धा केली आहे.

स्वराच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आले. कैलासला ठाऊक होते कि स्वराच्या मनातील वैज्ञानिक तिचे  कुतूहल मरू देणार नाही. त्यामुळे इतर सर्व मुद्दे विसरून ती आनंदाने मिशन मध्ये सहभागी होईल.

ग्रेट मराठा म्हणजे मुंबईतील सर्वांत मोठे आणि प्रशस्त हॉटेल. स्वरा तिच्या काळ्या गाऊन मध्ये  अत्यंक आकर्षक वाटत होती. त्यांच्या गाडीचे दार शोफर ने उघडले आणि दोघे जण थाटांत बाहेर  उतरले. "तू इतकी चांगली दिसतेय त्यामुळे तू अनेक लोकांच्या नजरा विनाकारण खेचून घेशील"  कैलासने तिला खुश करण्यासाठी सांगितले. अशा प्रकारे अंडर कव्हर ते पहिल्यांदाच जात होते त्यामुळे ती थोडीशी चिंताग्रस्त असू शकत होती. "पण तुझ्या त्या भयानक कोट मुळे लोक आमच्या कडे विचित्र पणे पाहताय त्याचे काय ? " तिने हसून उत्तर दिले.

सफायर ऑक्शन म्हणताच दाराबाहेरील एका भल्या मोठ्या माणसाने आधी त्यांचे आमंत्रण पत्र बारकाईने पहिले आणि त्यानंतर त्यांना अत्यंत अदबीने  एका मोठ्या कॉरिडॉर मधून स्वतः  एस्कॉर्ट केले.

कॉरिडॉर मधील तिसरा दरवाजा मानसरोवर हॉल मध्ये उघडतो हे कैलास आणि स्वराने आधीच जाणले होते.  मानसरोवर  हॉलचा दरवाजा  त्या सूट मधील माणसाने उघडला आणि आत  एका पीतवर्णीय मुलीने अतिशय मोठ्या स्मितहास्यासह त्यांना आत बोलावले.  तिथे कैलासने ती कॅसिनो चिप तिच्या हातांत ठेवली. तिने आपल्या मशीनवर ती खरी आहे हे पडताळले. "Mr अँड Mrs खान इकडे या" असे म्हणून त्या मुलीने त्यांना सीट नंबर १२२ वर नेऊन बसवले  आणि हातांत बिडिंग बोर्ड सुद्धा दिला. "नक्की बोली कशी लावायची हे तू शिकून आली आहेस ना ?"  कैलास ने तिला विचारले. "मी का म्हणून? मला वाटले तू ह्या कामांत एक्सपर्ट असशील." तिने  अभ्यास केला नव्हता. "ठीक आहे आपण पाहून शिकू".

"इकडे Skull Rider Seven नक्की कोण  असेल?"  कैलास  तिच्या  कानात  कुजबुजला.  "कुणी तरी ब्रिटिश ? " तिने प्रतिप्रश्न केला. आधी लिलाव सुरु झाला तो अकबर बादशाच्या दरबारातील एका चमच्यांच्या सेटचा. तो ४५ हजार डॉलर्स मध्ये गेला. इथले ४५ हजार डॉलर्स म्हणजे प्रॉक्सी लिलावातील वस्तू ४.५ दशलक्ष डॉलर्स ना गेली होती. कैलास आणि स्वराने  त्या  हॉलमधील  प्रत्येक माणसाकडे निरखून पहिले. काही चिनी, जपानी, गोरे, काळे, भारतीय हर प्रकारचे लोक त्या  लिलावांत हजर होते. यातील बहुतेक व्यक्ती आणखीन कुणाच्या तरी वतीने आल्या असतील ह्यांत  संशय नव्हता. पण Skull Rider Seven  हा  काही  अब्जाधीश  नव्हता.  डार्कवेब  वरील  तो  एक हॅकर होता.  पैसे  असले  तरी  ह्या  व्यक्ती  स्वतः  काम  करतात,  करवून  घेत  नाहीत.  कुठल्याही वस्तूवर अजून कैलासने बोली लावली नव्हती. खरे तर बोली लावण्याची त्याची लायकी  सुद्धा नव्हती. पण सुमारे १४ वस्तूंच्या लिलावानंतर शिलाहारांचे नाणे लिलावांत आले. कैलासने बोली ३ हजार पर्यंत नेली. तर एका गोऱ्या माणसाने ती वाढवत १० हजार पर्यंत नेली. दोन चिनी लोकांनी  सुद्धा त्यांत भाग घेतला होता. पण शेवटी त्या गोऱ्या माणसानेच १६ हजारांत ते नाणे जिंकले. कैलास आणि स्वराने एकमेकां कडे पहिले. सूट बूट मधील तो थोडासा स्थूल वाटणारा माणूस नक्कीच ब्रिटिश होता. Skull Rider Seven ! कैलास तोंडात पुटपुटला.

आपल्याला पाहिजे ती वस्तू नाही मिळाली की उठून जाणे लिलावांत सामान्य गोष्टी होती. कैलास  आणि स्वराने आधीच प्लॅन केला होता. त्या माणसाने तो लिलाव जिंकताच आधी स्वराने कैलासशी  भांडण उकरुन काढले. त्यांच्या आवाजाने आजूबाजूचे लोक त्यांच्या कडे रागाने पाहू लागले. "Lets take this outside honey" असे म्हणून कैलासने तिची बाही पकडून तिला बाहेर गेली. त्यांच्या वादाकडे काही पुरुषांनी स्मितहास्य देऊन सहानुभूतीने पहिले. बाहेर जाताना कैलासाच्या लक्षांत आले कि तिथे फार कमी महिला होत्या. स्वरा सोडली तर दोन म्हाताऱ्या चिनी बायका होत्या तर अगदी कोपऱ्यांत  एक लाल ड्रेस मध्ये अतिशय सुंदर गोरी ललना बसली होती. अजून पर्यंत तरी तिने लिलावांत भाग घेतला नव्हता.

मानसरोवर हॉल मधून बाहेर येतंच स्वरा आणि कैलासने जवळचाच कॅफे शोधला. "Skull Rider Seven कदाचित  तोच  इंग्रज  असू  शकतो."  तिने  कैलासला  म्हटले.  "पण आता  ती डायरी  नक्की त्या माणसाला कशी मिळेल ?" तिने महत्वाचा प्रश्न केला ज्याचे उत्तर कैलासाला ठाऊक होते. "डायरी कुठे आहे हे कुणालाच माहीत नाही. इथे ठेवलेल्या सर्व वस्तू फार छोट्या आहेत त्याचे एक  कारण आहे. कुणीही त्या खिशांत ठेवून जगभर प्रवेश करू शकतो. ही वस्तू नेऊन द्यायची कुरियर ला. कुरियर म्हणजे अंडरवर्ल्डचे फेडेक्स. हे लोक सर्वसाधारण व्यक्ती असतात पण विनाकारण कुणीही त्यांच्यावर हल्ला करत नाहीत. महत्वाचे बेकायदेशीर सामान वाहून नेणे हे त्यांचे काम. हे नाणे त्या  कुरिअरला दिले कि डायरी तो आणून हातांत ठेवेल." कैलासला ह्या प्रकारची फार चांगली माहिती  आधीपासून होती. हिऱ्यांच्या व्यापारावर त्याने किमान १ वर्ष तरी मेहनत केली होती आणि  मनसुखभाई पटेल ह्या व्यापाऱ्याला त्यानेच गजाआड केले होते.

"आणि आता ह्या Skull Rider Seven कडून  हे नाणे आम्ही उडवायचे ? "  स्वराने विचारले.  "तसेच काही तरी" त्याने खिशांतून आपला फोन काढला. त्यावर त्याने त्या Skull Rider Seven चे  काही फोटो घेतले होते. "तू जेंव्हा वाद घालत होतीस ना तेंव्हा मी शिताफीने हा फोटो काढला." त्याने फोटो दाखवला. व्हाट्सएप वरून त्याने तो एका ग्रुप ला पाठवला. "हे लोक कोण आहेत?" तिने विचारले. "इथले  पार्किंगवाले !  लोक बाहेरून आले असू दे किंवा इथे राहणारे अतिथी त्यांच्या मोठ्या  गाड्या  हेच पार्क करतात. काही क्षणात आम्हाला माहिती मिळेल. " त्याने सांगितले.

त्याने सांगितल्या प्रमाणे काही मिनिटांत त्याचा फोन खणाणला. एका  पार्किंग वाल्याने त्या       माणसाला पहिले होते. त्याने रिसेप्शनवर बोलून त्याचा रुम नंबर सुद्धा मिळवला होता. रूम ७०१.चल लवकर. स्वराला त्याने खूण केली आणि भर भर चालत त्यांनी लिफ्ट मध्ये प्रवेश केला. ऑक्शन मध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीसाठी दुसरे एक्झीट असते. त्यामुळे हे लोक कधीही पेमेंट करून बाहेर पडू शकतात. Skull Rider Seven एव्हाना आपल्या रूमवर पोचला सुद्धा असेल.

"आमच्या कडे बंदूक सुद्धा नाही आहे आणि चोरी करण्यात मला तरी विशेष स्किल नाही" तिने लिफ्ट मध्ये कैलास ला म्हटले. "आणि ह्या हॉटेल मध्ये प्रत्येक ठिकाणी CCTV आहेत. ही चोरी आम्हाला  महागात पडेल." तिने आपले मन बोलून दाखवले. खरे तर कैलासाला ती आपला साथ इतक्या   एकनिष्ठ पणे  देत होती याचेच आश्चर्य वाटत होते.  "स्वरा, आम्ही कायद्याचे रक्षक आहोत.  चोरी करणे आमचे काम नाही. जेंव्हा पोलीस कायद्याचा धाक दाखवून काही काढून घेऊ शकतात तर चोरी करण्याची काय गरज ? Skull Rider Seven  म्हणजे एक हॅकर आहे.  त्याला थोडीच  कुंग फु  येईल. " त्याने म्हटले.

"Who says we are not armed ? We are armed with overconfidence ". टिंगगग करून लिफ्टची  बेल वाजताच तिने बाहेर पाय ठेवत म्हटले. कैलासने सूट ठीक केला आणि मान डोलावली.

कैलासने खिशांतून एक रूम कार्ड काढून सरळ रुम ७०२ कडे मोहरा वळवला. "रूम ७०१ कैलास" स्वराने हलक्या आवाजांत त्याला आठवण करून दिली. "sh!" त्याने तिला गप्प राहायला सांगितले. पुढून  एक रूम बॉय येत होता. "हे, कैलास पुन्हा वळाला, एक काम करेगा ? ७०२ में जो साब ठहरे है उनको ये दे देना." असे म्हणून कैलासने खिशांतून ५०० रुपयांची एक नोट आणि त्याबरोबर एक लिफाफा काढून त्याच्या हाती दिला. रूम बॉय थोडा गोंधळला त्याने आधी ५०० रुपये घेतले आणि नंतर त्याने थोड्या  दुविधेनेच त्याने "साब शायद नाही है रूम पे" अशी माहिती दिली. "अजून पर्यंत नाही आले ?" स्वराने आता खेळ समजत आश्चर्याचा आव आणत विचारले.

"वो साब तो उस लाल ड्रेस वाली मेमसाब की साथ बाहर गए कुछ मिनिट पहले। " त्या रूम बॉय ने  आनंदाने माहिती दिली.

कैलासाचा फोन वाजला. कैलासाने उचलला आणि त्याने निराशेने डोके हलवले. "काय झाले ?" स्वराने त्याचा पडलेला चेहरा पाहून विचारले. "He has been shot in parking lot" कैलासने उत्तर दिले.

कैलास आणि आणि स्वरा पळत पार्किंग लॉट मध्ये गेली. तिथे आधीच पोलीस पोचली होती. कैलासने आपले ओळखपत्र दाखवताच हवालदाराने त्यांना आत सोडले. "कुणी तर मोटार सायकल वरून येऊन गोळी झाडली. Mr जेसन आणि त्यांची गर्लफ्रेंड इथे होती. जेसन हे तत्काळ गतप्राण झाले आणि  त्यांची गर्लफ्रेंड इथे किंचाळत होती. " पोलिसाने माहिती दिली. "कुठे आहे ती आता ? " स्वराने विचारले. "ती इतकी शॉक मध्ये होती कि तिला आम्ही एका महिला पोलीस बरोबर तिच्या रूम वर ७०१ मध्ये पाठवलेय. आमची महिला पोलीस असेलच तिच्या बरोबर" इन्स्पेक्टर ने सांगितले.

स्वरा आणि कैलासने एकमेका कडे पहिले आणि पुन्हा रूम कडे धूम ठोकली. ७०१ मध्ये कैलास पोचला तेंव्हा महिला पोलीस तिथे जमिनीवर बेशुद्ध होऊन पडली होती. स्वराने फोन करून पोलिसांना माहिती दिली. रुम मधील सामान अस्ताव्यस्त पडले होते. कदाचित त्या ललनेने ते नाणे उचलून नेले होते. आपण आधीच रूम मध्ये प्रवेश करायला हवा होता हे दोघांच्या लक्षांत आले पण आता तो विचार करून फायदा नव्हता. स्वराने आपले ओळखपत्र दाखवून ताबडतोप ग्रेट मराठाच्या सेक्युरिटी रूम मध्ये  प्रवेश केला होता. तर कैलास हॉटेल बाहेर रस्त्यावर आला होता. ती ललना कुठूनही बाहेर पडली असेल तर स्वराला ती CCTV च्या रिकॉर्डस वर दिसली असती.

"कैलास, मला वाटते ती रूम मधून खाली नाही आली. " स्वराने त्याला फोन वरून माहिती दिली. "तर ?"  त्याने आश्चर्याने विचारले.  "ती लिफ्टने सरळ ३६ व्या मजल्यावर गेलीय.  हा सर्वांत वरचा  मजला आहे. CCTV प्रमाणे तिने सिलिंगचा  दरवाजा  उघडून  छतावर  प्रवेश केलाय.  तिथे CCTV कॅमेरा नाहीत. हॉटलेच्या रक्षकांनी आधीच तिथे धाव घेतलीय" तिने माहिती दिली.

"ओह शीट !" कैलासला खरोखर वर खाली करून दमायला झाले होते. त्यांत ती नक्की छतावर  कशाला जाईल ? कैलासला इथे नक्की काय चाललेय हेच समजत नव्हते.  खरे तर Skull Rider Seven इतक्या सहजपणे मारला गेला हेच आश्चर्य होते. कैलास छतावर पोहचेपर्यंत स्वरा त्याच्या  बरोबर फोनवर होती. छतावर पोचताच त्याने फोन कट केला. जपून जपून त्याने आधी हॉटेलचे रक्षक कुठे दिसतात का हे पाहण्याचा प्रयत्न केला. एक रक्षक खाली जमिनीवर कदाचित बेशुद्ध पडला होता. पुढे दुसऱ्या रक्षकाच्या गळ्याभोवती वायर टाकून त्याला मारला होता. आता आपण खरोखर धोक्याच्या ठिकाणी विना शस्त्र आलोय ह्याची जाणीव कैलासाला झाली. त्याचे हृदय धडधडत होते.  गन नसल्याने नक्की काय करावे हे सुचत नव्हते.

"You don't have to worry, for now!" त्याला दुरून आवाज आला. छतावर अजिबात दिवे नव्हते आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. दूरवर लाल ड्रेसमध्ये आधी लिलावांत हजर असलेली तीच युवती उभी होती. ढगाळ आकाशाच्या पार्श्व्भूमीवर  तिची आकृतीच दिसत होती.  तिच्या हातांत गन होती. पण त्या दोन रक्षकांना तिने निव्वळ हातानी मारले होते.

ती ललना चालत त्याच्या जवळ आली. "हे नाणे माझेच राहील Mr. खान." तिने कैलासवर बंदूक  रोखत म्हटले. ती त्याला चिडवू पाहत होती. ह्या प्रकारचा गुन्हेगारी स्वभाव कैलासला ठाऊक होता. अशा परिस्तीथीत मन शांत ठेवावे हेच त्याचे ट्रेनिंग आणि अनुभव सांगत होता. स्वरा कुठल्याही क्षणी त्या दरवाजातून छतावर आली असती. छतावरून बाहेर जाण्याचा एकच मार्ग दिसत होता आणि तो त्याच्या मागे होता.

पण त्याच्या अपेक्षेच्या विरुद्ध तिने बंदूक पर्स मध्ये टाकली. "Mr .कौल, तुमच्यावर नजर ठेवण्यात  येत आहे. तुमचे शत्रू आणि हितचिंतक दोन्ही तुम्हाला अतिशय जवळून पाहत आहेत." ती खरे तर  भारतीयच मुलगी होती आणि स्पष्ट हिंदींत बोलत होती.

"त्यांत तुम्ही कुठल्या बाजूला आहात ?" कैलासने तिला इंग्रजीत विचारले. त्याला तिचा accent पहायचा होता.

"डार्क वेब वर कुणी मित्र आणि शत्रू नसतो. मी फक्त पैशासाठी काम करते. ज्याने मला हे नाणे आणायला सांगितले होते त्यांचे संदेश सुद्धा पाठवला होता. ह्या विषयावर जास्त चौकशा करू नकोस असा तो संदेश होता. आणि हे लोक पाहिल्यानंतर मी मित्र ह्या दृष्टिकोनातून खरेच तुला ह्या सर्वां पासून  दूर राहायला सांगेन." तिच्या आवाजांत एक मिश्कीलता होती.

"पण तू इथून निसटून जाऊ शकत नाहीस." कैलास तिला पकडायला बघत होता. Skull Rider Seven म्हणजे एक महिला आहे आणि ती सुद्धा इतकी तरुण असा त्यानं आणि स्वराने दोंघांनीही विचार केला नव्हता.

"मी इथून इतक्या सहजपणे जाऊ शकते जितक्या सहज प्रमाणे ह्या दोघांना मी मारले आहे." ते  म्हणून तिने आपल्या घड्याळांत पाहिले. काही क्षणांनी संपुर्ण हॉटेलभर फायर अलार्मस सुरु झाले.  स्वरा आणि पोलीस कदाचित इथे येण्यासाठी लिफ्ट मध्ये घुसले असतील आणि प्रोटोकॉल प्रमाणे  लिफ्ट्स बंद पडून हळू हळू खालच्या दिशेने जायला लागल्या असतील. इतर सर्व अतिथी गोंधळून,  घाई घाईने जिन्याने खाली पळतील आणि ह्या सर्वामुळे भलतीच धांदल उडाली असेल. कैलासच्या मनात सर्व चित्र उभे राहिले होते. Skull Rider Seven खरोखर एक  हॅकर होती आणि ती सुद्धा फार चांगली.  

इतक्यांत छता वरचे स्प्रिंकलर्स चालू झाले आणि कैलास त्या पाण्यांत भिजला. ती त्याच्या पुढून  चालत गेली, छताचा दरवाजा उघडला आणि बाहेरील गोंधळांत ती गायब झाली. पण त्याच्या आधी  तिने कैलासाच्या हातांत एक कार्ड ठेवले. कैलासाच्या होऱ्याप्रमाणे बऱ्याच वेळाने स्वरा वर आली.  "कैलास, तू ठीक आहेस ना ? ती कुठे गेली. " तिने चिंताग्रस्त चेहऱ्याने विचारले. "well she was a better thief" त्याने म्हटले आणि खांदे उडवत तो तिथून निघाला. स्वरा सुद्धा त्याच्या मागोमाग  निघाली.

कैलासने कार्डचा विषय स्वरापुढे काढला नाही. कार्डमध्ये कदाचित अशी माहिती असू शकत होती ज्यामुळे तिचा जीव धोक्यात  आला असता.  स्वराने स्वतःला हॉटेलच्या  security रूम  मध्ये कोंडून  घेतले.   फ्रेम बाय फ्रेम नी प्रत्येक कॅमेऱ्याची फुटेज  तिने त्या ललने साठी पालथी  घातली पण  ती नक्की त्या  गर्दीतून कशी गायब झाली हे तिला सापडले नाही.

कैलासने घरी जाऊन कार्ड पहिले. कोलकाता मधील एका कॉफी शॉप चा पत्ता होता. कैलासला त्याचा अर्थ समजला नाही पण त्याने ते कार्ड काळजीपूर्वक ठेवले. शालिमार द्वारे लिलावाचे निमंत्रण मिळावे ह्यासाठी त्याने एका मोठया केस चा तपास खोटे पुरावे ठेवून लांबवला होता. पण ते निमंत्रण सुद्धा  काही उपयोगाचे ठरले नव्हते. हाती आले होते फक्त एक कार्ड.

ती डायरी मिळवणे कैलासच्या दृष्टीने महत्वाचे होते त्या पेक्षा ती डायरी चुकीच्या हातांत पडू नये हे जास्त महत्वाचे होते. कैलासवर  नक्की कोण नजर ठेवून होता ?  त्यांचा आणि  Skull Rider Seven चा नक्की संबंध काय हे सर्व प्रश्न कैलासाच्या मनात होते. पण त्यांची उत्तरे मिळायला अजून वेळ जाणार होता.

(क्रमशः)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel