जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे शहाजीराजांना भेटण्यासाठी बंगळुरास गेले। शहाजीराजांचा मुक्काम तिथं होता। तेथूनच ते आपल्या कानडी मुलुखातील जहागिरीचा कारभार पाहात होते।

पुण्याहून ही मायलेकरे बंगळुरास आली। शहाजीराजांचे सर्वच कुटुंबीय एकत्र येण्याचा आणि सुमारे दोन वषेर् एकत्र राहण्याचा हा योग होता. हाच शेवटचा योग. या दोन वर्षातच हंपी विरुपाक्ष आणि विजयनगरच्या कर्नाटकी स्वराज्याची राजधानी विजयनगर पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला. विरुपाक्ष हे तीर्थक्षेत्र होते. विजयनगर हे उद्ध्वस्त झालेले एका हिंदवी स्वराज्याचे राजधानीचे नगर होते. या प्रवासात शिवाजीराजांना खूपच पाहायला अन् शिकायला मिळाले. एवढे बलाढ्य साम्राज्य एका राक्षसतागडीच्या लढाईत धुळीला कसे काय मिळाले ? हा शेवटचा रामराजा कुठे चुकला ? त्याच्या राज्यकारभारात आणि लष्करात अशा कोणत्या जबर उणिवा झाल्या की अवघ्या एका मोठ्या पराभवाने त्याचे साम्राज्यच भुईसपाट व्हावे ?

या साऱ्या गोष्टींचा शोध आणि बोध शिवाजीराजांच्या मनात घुसळून निघत होता। त्यातून मिळालेले विवेकाचे नवनीत राजांना आपल्या भावी उद्योगात उपयोगी पडणार होते. पडले. हे वैचारिक समुदमंथन राजांच्या मनात या दोन वर्षात (इ.स १६४० ते ४२ ) घडले. राजे आणि जिजाऊसाहेब पुन्हा पुण्याकडे परतले , ( इ. स. १६४२ ) ते मराठी स्वराज्य सह्यादीच्या हृदयात निर्माण करण्याच्या निश्चयानेच! आणि शिवाजीराजांनी कानद खोऱ्यातील प्रचंड सह्यशिखरावरती बंडाचा झेंडाच उभारला. हा गड तोरणा. लगेच पुढे कोरीगड , सुभानमंगळ आणि कोंडाणा राजांनी कब्जात घेतला. आदिलशाही थक्कच झाली. एक मराठी कोवळा पोरगा सुलतानी विरुद्ध बंड करतो ? कुठून आलं हे बळ ? हे मोडलंच पाहिजे. या विचाराने महंमद आदिलशहाने एक अत्यंत धूर्त डाव सहज टाकला. या शिवाजी भोसल्याच्या बापालाच जर आपण अचानक छापा घालून कैद केलं तर हे बंड जागच्या जागी संपले. शिवाजी रुमालाने हात बांधून आपल्यापुढे शरण येईल. अन् मग पुन्हा कुणीही बंडाचा विचारही करणार नाही. याकरिता शिवाजीवर फौजही पाठवायची. जरूर तेवढा रक्तपात आणि बेचिराखी करायचीच. बस् ठरलंच.

पण याचवेळी शहाजीला कैद करायचं गरज पडली तर ठारही मारायचं। ठरलं आणि दिनांक २५ जुलै १६४८ या दिवशी शहाजीराजांवर वजीर मुस्तफाखानाचा विश्वासघातकी छापा पडला. आपल्यावर काही तरी घातकी संकट येणार आहे , आणि ते वजीराकडूनच येणार आहे हे आधी समजलेले असूनसुद्धा शहाजीराजे गाफील राहिले. झोपले. आणि वजीर मुस्तफाने त्यांना कैद केले. हातापायात बेड्या ठोकल्या. राजांची रवानगी कैदी म्हणून विजापुरास झाली. ही घटना तामिळनाडमध्ये मदुरेजवळ घडली.

शहाजीराजांना अपमानास्पदरीतीने विजापुरात आणण्याची कामगिरी अफझलखानाने केली. राजांना ‘ सत्मंजिल ‘ या हवेलीत आदिलशहाने कैदेत ठेवले.

या बातम्या पसरायच्या आतच आदिलशहाने पुण्याकडे मोठी फौज दिमतीला देऊन फत्तेखान या सरदारास रवानाही केले। शिवाजीराजा आणि त्याचं लहानसं नवं राज्य कब्जात घेण्याकरता.

राजगडावर शिवाजीराजांना ही भयंकर बातमी समजली की , तीर्थरूप साहेब शाही कैदेत पडले आणि आपल्यावर फत्तेखान चाल करुन येतोय। बादशहाचा आता उघड उघड सवाल होता की , बोल पोरा , स्वराज्य हवे की बाप हवा ? शहाजीला आम्ही कोणत्याही क्षणी ठार मारू शकतो। तरी मुकाट्याने शरण ये। जे बळकावलं आहे ते तुझं नखाएवढं स्वराज्य आमच्या स्वाधीन कर माफी माग. तर बाप सुटेल. नाहीतर अवघं भोसल्यांचं खानदान मुरगाळून टाकू. हा सवाल भयंकर होता वडलांचे प्राण की स्वराज्याचे रक्षण ? काय वाचवायचं ? आईच सौभाग्य की स्वराज्य ?

दोन्हीही तीर्थरुपच! मग दोन्हीही वाचवायचे। हा शिवाजी महाराजांच्या मनातला विचारही तेवढाच क्रांतीकारक होता. असा विचार करणारा विचारवंत योद्धा इतक्या लहान वयात ज्ञानेश्वरांच्या नंतर साडेतीनशे वर्षांनी प्रथमच मराठी मातीत उगवत होता. येणाऱ्या शाही फौजेशी झंुज द्यायची असा ठाम निश्चय राजांनी केला. राजांच लष्करी बळ चिमूटभर होतं. आक्रमण परातभरून येत होतं. नक्कीच श्ाी तुकारामांचे विचार युवा शिवाजी राजांच्या मनात दुमदुमत होते. ‘ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग! अंगी निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेचि फळ! ‘

राजे अतिशय विचारपूर्वक आणि योजनाबद्ध आराखडा आपल्या आखाड्यात रेखित होते. शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजेनिशी पूर्ण पराभव करायचा हाच डाव , हाच संकल्प आणि हाच क्रांतीसाठी सिद्धांत.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel