९ मे १६६० रोजी शाहिस्तेखान पुण्यात आला। महाराज याच काळात म्हणजे ( दि. ५ मार्च ते १२ जुलै १६६० ) पन्हाळगडच्या वेढ्यात अडकले होते. वेढा जबरदस्त होता. वेढा घालणाऱ्या सिद्दी जौहरची सेनापती व योद्धा या नात्यांनी योग्यता निविर्वाद फार मोठी होती. सिद्दी जौहर आणि शाहिस्तेखान या दोन्हीही बड्या सेनापतीत फरक मात्र फार मोठा होता. शाहिस्तेखान हा अभ्यासशून्य होता. जौहर हा प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करणारा होता. विशेषत: मराठ्यांच्या गनिमी युद्धतंत्राची त्याला खूप मोठी जाण होती. म्हणूनच तो अतिशय सावधपणे पन्हाळ्याच्या वेढ्यात उतरला होता. त्याच्या दैनंदिन युद्धनेतृत्त्वात ठिसाळपणा , योजनेत विस्कळीतपणा , शाही सैन्यांत नेहमीच आढळून येणारा ऐषाराम , रणक्षेत्राविषयी अनभिज्ञता , अनुशासनाचा अभाव असा कोणताही प्रकार कटाक्षाने तो होऊ देत नव्हता. त्याची शिस्त उत्तम होती. या सर्वच बाबतीत त्याची प्रत्येक व्यवहारावर करडी नजर होती.
त्याच्याबरोबर अफझलपुत्र फाझल महम्मद हा बरोबरीच्या नात्याने या लष्करात होता। पण संपूर्ण लष्करी कारभार तो स्वत: दक्षतेने पाहात होता. त्याच्या हाताखाली काशी तिमाजी देशपांडे हा कारभारी होता. नेमकी शाहिस्तेखानची युद्धनेता या नात्याने अगदी उलटी प्रतिमा होती.
एकाचवेळी पुण्यात शाहिस्तेखान आणि पन्हाळ्याखाली सिद्दी जौहर हे अफाट सैन्यानिशी स्वराज्याबरोबर झुंजायला उतरले होते। येथे एक चित्र स्पष्ट दिसते. शाहिस्तेखानच्या समोर राजगडावरून नेतृत्त्व करीत होत्या जिजाबाई. त्यांनी शाहिस्तेखान स्वराज्यावर आल्यापासून ते शिवाजीमहाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटेपर्यंत , म्हणजे सुमारे सहा महिने राजगडावरून शाहिस्तेखानाच्या आघाडीवर अगदी समर्थपणे तोंड दिले आहे. या खानाने सुपे , शिरवळ , पुरंदर , सासवड , गराडखिंड या भागात प्रारंभी (मार्च ते मे १६६० ) हा स्वराज्यातील उत्तर आघाडीवरचा भाग जिंकून घेण्याकरता सुमारे तीस हजार सैन्यानिशी तीन महिने खूप मोठा गहजब करून पाहिला. त्याला अजिबात यश आले नाही. याचे श्रेय नेतृत्त्वाच्या दृष्टीने जिजाऊसाहेबांनाच द्यावे लागले. हे श्रेय त्या काळात याच भागात मोगलांविरुद्ध छापे घालीत असलेल्या नेताजी पालकरांस नाही का ? आहे ना! नक्कीच आहे.
नेताजीने आपली कामगिरी खरंच चांगली केली। पण तो या काळात सतत धावत्या लढाया (छापेबाजी) करतो आहे. त्यात तो खेड-मंचरजवळ स्वत: जखमीही झाला. तरीही तो झुंजतो आहे. पण सुपे , शिरवळ , पुरंदर , सासवड इत्यादी स्थिर ठाणी थोड्याशा बळानिशी शत्रूच्या अफाट बळाला यशस्वी तोंड देत या काळात मावळ्यांनी जी अतिशय अवघड कामगिरी केली आहे , त्यामागे नेतृत्त्व आहे. राजगडावर असलेल्या जिजाऊसाहेबांचे. याच काळातील मावळच्या मराठी देशमुखांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे.
ते पत्र शिवाजीराजांच्या नावाने गेले असले , तरी ते नक्कीच राजगडावरून , म्हणजेच जिजाऊसाहेबांच्या आज्ञेने गेलेले आहे। त्या पत्रात म्हटले आहे की , ‘( आपल्या) मुलखांत मोगलांची धावणी सुरू जाहली आहे. तरी तुम्ही शिकस्तीने रयतेस सांभाळावे.
‘ मोगलांचे बळ फारच मोठे होते। त्यामुळे लुटालुट , जाळपोळ , वेठबिगारी , अत्याचार , मंदिरांना उपदव इत्यादी प्रकार सतत चालू होते. या सर्व मोगली आघातांचा उल्लेख पुढे शिवाजीमहाराजांनी सुरतेच्या सुभेदाराला लिहिलेल्या पत्रात केलेला आहे.
एकूणच स्वराज्य किती भयंकर कठीण अवस्थेतून जात होते याची कल्पना येते। या काळात स्वराज्याशी विश्वासघात करून शत्रूला जाऊन कोणी मावळे सरदार फितुर झाल्याची उदाहरणे आहेत का ? होय! फक्त उदाहरणे आहेत. पहिले आहे बाबाजीराम होनप देशपांडे याचे , आणि दुसरे संभाजी कावजी याचे.
चरकात सापडलेल्या उसाच्या कांड्याप्रमाणे सारे मराठी संसार पिळवटून निघत होते। त्यांत एखाददुसरे उदाहरण असे निघाले तर दु:खद असले तरी स्वाभाविक आहे. बाकीचे सारे स्वराज्य सह्यादीच्या शिळांसारखे घाव सोसीत अभेद्य राहिले. म्हणूनच अखेरचे चित्र असेच दिसले की , शाहिस्तेखानचाही पण पराभव आणि सिद्दी जौहरचाही पराभवच. कारण शत्रूशी झुंजणाऱ्या कडव्या शिवा काशीदांची , बाजी घोलपांची , बाजी प्रभूंची , वाघोजी तुप्यांची आणि फिरंगोजी नरसाळ्यांची प्रचंड स्वराज्यसेना महाराजांच्या आणि जिजाऊसाहेबांच्या आज्ञेची वाट बघतच तत्पर होती. जौहर आणि शाहिस्ता यांच्या दुहेरी आक्रमणात दिसून आली. मराठ्यांच्या सेनेची आणि संसारांचीही जिद्द , महत्त्वाकांक्षा , निष्ठा , शिवपेम आणि घोरपडीसारखा चिवटपणा , तीनशे वर्ष सतत आधीच्या लाचार गुलामगिरीनंतर हे सर्व राष्ट्रीय चारित्र्याचे सद्गुण राजापुरच्या गंगेसारखे उफाळून आले.
ही शिवगंगा बुद्धीमान , प्रतिभावात , कल्पक आणि तरीही अहंकाररहित आणि उपभोगशून्य युवा शिवाजीराजाच्या मस्तकातून खळाळत होती. म्हणूनच मराठ्यांची पोरं पाळण्यात असल्यापासूनच पराक्रम गाजविण्यासाठी हसतहसत मुठी वळत होती.
आपण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश जनतेने आणि त्यांच्या पंतप्रधान चचिर्लने अनेक आघाड्यांवर जर्मनी अन् जपानसारख्या शत्रूंचा फन्ना उडविला. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो. ते कौतुक योग्यही आहे. पण अशाच प्रचंड आक्रमणातून हिंदवी स्वराज्य प्रतिपंच्चंदलेखे सांभाळीत व फुलवित आणि वाढवित नेणाऱ्या आमच्या मावळ्यांना आम्ही विसरता कामा नये.
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे