ही चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र. लाल महालात अशी ज्वालामुखीसारखी अचानक उफाळली. खान वाचला. सिंहगडकडे सुखरुपपणे पसार झालेल्या शिवाजीमहाराजांना हा तपशील नंतर समजला. ते जरा खिन्न झाले. कारण जर खान , म्हणजे प्रति औरंगजेबच मारला गेला असता तर केवळ मोगल साम्राज्यातच नव्हे , तर इराण , तुर्काण इतकंच नव्हे तर रुमशाम पावेतो मराठ्यांचा गनिमीकावा रणवाद्यांसारखा दणाणला असता.

गनिमी कावा हे मराठ्यांचे खास खास युद्धतंत्र आहे. या युद्धतंत्राचा अर्वाचीन महाआचार्य म्हणजे चीनचा माओत्सेतुंग आणि व्हिएटनामचा होचिमिन. ते सत्यही आहे. पण आपण माओ आणि मिन यांनी स्वत: वापरलेल्या त्यांच्या जीवनातील गनिमी काव्याचा आणि शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा तैलनिक अभ्यास जरुर करून पाहावा.

लाल महालावरील महाराजांच्या छाप्याच्या बाबतीत मोगलांची प्रतिक्रिया काय ? फक्त घाबरट. दहशत. भाबड्या कल्पनांची विनोदी कारंजी. याच वेळी दिल्लीमध्ये दोन युरोपीय डॉक्टर्स राहत होते. डॉ. थिवेनो आणि डॉ. सिडने ओवेन. या दोघांनी या लाल महाल छापा प्रकरणी लिहून ठेवलं आहे. ‘ या छाप्याची दहशत एवढी निर्माण झाली आहे की , शिवाजी हा नक्की चेटूकवाला असावा असे लोकांना वाटते. त्याला पंख असावेत. त्याला गुप्त होता येत असावे ‘ म्हणजे केवळ अफवा , कंड्या आणि अतिशयोक्ती.

हा सारा भाबडेपणा होता. डोळसपणाने मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा अभ्यास कुणीच करीत नव्हतं. आज आपण तो केला पाहिजे.

लष्करी अभ्यासकांनी आणि अनुभवी लष्करी पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या या युद्धपद्धतीचा डोळ्यात तेल घालून अभ्यास केला तर आमच्या हातून पुन्हा ‘ कारगिल ‘ सारख्या चुका होणार नाहीत. ‘ तेजपूर ‘ सारखा गाफिलपणा होणार नाही. आणि आमच्या संसदेवरच म्हणजे आमच्या राष्ट्राच्या हृदयावरच अतिरेकी छापा टाकणार नाहीत. पाहा पटते का ?

शाहिस्तेखान मात्र कायमचा दु:खी झाला. त्याला आपल्या पराभवापेक्षा भयंकर अन् कायमची होत राहणारी थट्टा , कुचेष्टा असह्य होत असणार. प्रत्येक घासाला त्याला आठवण होत असेल शिवाजीमहाराजांची. उजव्या हाताची तीन बोटेच तुटली ना!

खानाच्या बाबतीत आणखी काही दु:खी घटना लाल महालात आणि एकूण दख्खनच्या भूमीवर घडल्या. लाल महालात उसळलेल्या भयंकर कल्लोळात त्याची एक बायको ठार झाली. त्याचा मुलगा अबुल फतेखान हा तर महाराजांच्या हातूनच मारला गेला. या भयंकर दंगलीत त्याची एक मुलगी नाहिशी झाली. तिचे काय झाले हे कोणालाही आणि इतिहासालाही कधीच समजले नाही. पुढच्या काळात (म्हणजे इ. १६९५ ) प्रख्यात मराठा सेनापती संताजी घोरपडे याचे हातून याच शाहिस्तेखानचा एक मुलगा , हिम्मतखान हा तमीळनाडूत जिंजीच्या मार्गावर असलेल्या जंगलातील युद्धात मारला गेला. शाहिस्तेखान दीर्घायुषी होता. पण या साऱ्या दु:खांची त्याला या दीर्घायुष्यात भयंकर वेदना सहन करावी लागली.

त्याने बांधलेली एक साधी पण सुंदर मशीद औरंगाबादेत आहे. पुण्यातील मंगळवार पेठेस शाहिस्ताखान पेठ असे नाव पडले होते.

प्रचंड सैन्य , खजिना आणि प्रचंड युद्धसाहित्य हाताशी असूनही त्याला मराठ्यांवर तीन वर्षाच्या दीर्घकाळात एकही मोठा विजय मिळवता आला नाही. चाकण जिंकले. त्याला त्याने इस्लामाबाद असे नाव दिले. मोगल साम्राज्यासारख्या एका प्रचंड सत्तेचा तो सरसेनापती म्हणून महाराष्ट्रावर चालून आला. पण त्याच्या यशाच्या पारड्यात चिंचुक्याएवढेही यश पडले नाही. माणसाला कष्ट करून अपयश आले , तर समजू शकते. कारण त्या कष्टातून शिक्षण मिळते. पण केवळ खुचीर्वर बसून गडगंज पगार खाणाऱ्या माणसाने काहीही न करता चकाट्या पिटण्यात आयुष्य घालविले तर ते त्याचेही आणि कार्याचेही अफाट नुकसान असते.

अशी नुकसानी चाललेली आपण आजच्या जीवनात अनेक संस्थांत आणि मुख्यत: शासकीय नोकरशाहीत पाहतो. अशा माणसांच्या कारभारातून ‘ मेरा भारत महान ‘ जागतिक महासत्तांच्या शेजारी बसू शकेल काय ? सर्वच क्षेत्रांत आपल्याला केवढा प्रचंड पल्ला गाठायचा आहे! घोषणा तर आपण नेहमीच ऐकतो. त्या घोषणा शेवटी विनोदी ठरतात. अब्जावधी रुपयांची नासाडी करून , लष्करी छावणीत आपल्या मुलींची अफाट खर्चाने लग्न साजरी करणारे शाहिस्तेखान आम्हाला परवडणार नाहीत. आपल्याला तातडीने गरज आहे. संताजी घोरपड्यांची , हंबीरराव मोहित्यांची आणि येसबा दाभाड्यांची. रागावू नका. हा मी उपदेश करत नाही. आजच्या तरुणांकडून एक माझ्यासारखा ऐंशीवं ओलांडलेला नागरिक अपेक्षा करतो आहे. आकांक्षा ठेवतो आहे. त्या पूर्ण व्हाव्यात , त्यापुढती गगन ठेंगणे , माझ्या तरुण मित्रांनो!

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel