जर सुरतेच्या सुभेदार इनायतखानाने महाराजांना योग्य तो प्रतिसाद दिला असता आणि महाराजांशी राजकीय पातळीवरून बोलणी करून महाराज मागतात त्या खंडणीबाबत काही ठरविले असते , तर सुरतेतील हा अग्निकल्लोळ टळला असता। पण ते त्या भ्रष्टाचारी सुभेदाराने केले नाही। महाराजांना त्याने आपल्या सैन्यबळानिशी निर्वाणीचा प्रतिकारही केला नाही। तो लपून बसला. अखेर महाराजांना खंडणीचा आणि खंडणी न देणाऱ्यांचा विचार कठोरपणे करावा लागला. जगाच्या इतिहासात कठोर निर्णयाने आपले राजकीय हेतू पार न पाडणाऱ्यांना अखेर स्वत:चाच नाश उघड्या डोळ्याने बघावा लागला आहे. सुरतेच्या प्रकरणावर आज खूप कागदपत्रे आणि वृत्तांत उपलब्ध आहेत. त्याचा बारकाईने अभ्यास केला तर मराठा स्वराज्याचा हा कठोर , कर्तव्यनिष्ठ पण कठोर न्यायीही नेता जे वागला ते योग्यच वागला असे दिसून येईल. यात अभिनिवेश नाही. खोटा अभिमान बाळगून ‘ शिवाजी महाराज की जय ‘ म्हणण्याची गरज नाही.
जर शिवाजी महाराज असे वागले नसते , तर ते नेभळट ठरले असते। ते सोवळ्यातल्या मुकटा नेसून राज्यकारभार करायला उभे नव्हते , तर कठोररितीने भवानी हातात घेऊन , वेळच आली तर ब्राम्हण किंवा ख्रिश्चन मिशनरी गुन्हेगारांचा शिरच्छेद करायलाही न कचरणारे विक्रमादित्य होते. आम्ही अनेकदा नेभळटपणामुळे अन् भाबड्या सहिष्णुतेचे ‘ मुखवटे नेसून राजमुकुट गमावले हो! ‘
बोलून टाकू का ? नुकतेच घडले आहे। पाक अतिरेकी आमच्या संसदेत घुसले। आमच्या राष्ट्रदेवतेच्या हृदयसिंहासनालाच त्यांनी ठोकर मारली. आम्ही काय केले ? मुखवटा नेसून आम्ही फक्त कागदी इशारा दिला ‘ हे सहन केले जाणार नाही. ‘
पाकव्याप्त पण भारताच्याच पूर्ण हक्काच्या काश्मिरी भागात पाक अतिरेकी विषारी सर्पांनी केलेल्या वारूळांवर आम्ही बॉम्ब का टाकले नाहीत ? आपले बॉम्ब न्याय्य ठरले नसते का ?
नाही! ते आम्हाला जमणार नाही। कारण आम्ही सहिष्णुतेचे मुखवटे नेसून शिवाजी महाराजांची भवानी हाती घेण्याची नाटकी चूक करीत असतो. खरं म्हणजे आम्ही सोवळ्याचे मुकटेही नेसता कामा नयेत अन् उपभोगाची भरजरी राजवस्त्रेही पेहरता कामा नयेत. आम्ही श्रीरामाची विरक्त वल्कले परिधान करून पातकी आक्रमकांवर रामबाण सोडले पाहिजेत. महाराज असे रामबाण सोडीत होते.
हा सुरतेतला रावण काय करीत होता यावेळी ? तो सुरतेच्या किल्ल्यात आपल्या एक हजार मोगली सैन्यानिशी लपून बसला होता। त्याने आपला एक वकील , तिसऱ्या दिवशी (दि। ८ जाने. १६६४ ) शिवाजीमहाराजांच्याकडे आपले पत्र देऊन तहाची बोलणी करण्याकरता पाठविला. हा वकील काळाबागेत महाराजांकडे आला. महाराज रोजच्या प्रमाणेच एका प्रचंड झाडाच्या बुंध्याशी उंचट आसनावर बसले होते. महाराजांनी भेटीची परवानगी दिली. तो वकील महाराजांच्या समोर सुमारे पंधरा पावलांवर अदबीने उभा राहिला. आपल्या हातातील कागदाची वळकटी उलगडीत तो महाराजांना म्हणाला , ‘ आमचे सुभेदार इनायतखान आपल्याशी तह करावयास तयार आहेत. आमच्या तहाच्या अटी अशा ‘ तो वकील एवढे बोलतोय , तेवढ्यात महाराज दरडावले , ‘ तहाच्या अटी ? अटी आम्ही घालायच्या की तुम्ही ? भेकडाप्रमाणे तुमचा सुभेदार किल्ल्यात लपून बसलाय. आणि तो आम्हाला अटी पाठवतोय ?’
तेवढ्यात तो वकील ‘ महाराज , आपल्याला अगदी महत्त्वाचे मला काही सांगायचे आहे ‘ ( आपके तहनाईमें मुझे कुछ कहना है।) असे वारंवार म्हणत म्हणत महाराजांच्या दिशेने पावले टाकू लागला। तो क्षणात अगदी जवळ आला आणि त्याने एकदम आपल्या कमरेस असलेली कट्यार उपसली आणि तो घाव घालण्यासाठी महाराजांच्यावर धावला. तो झडप घालणार , एवढ्यात महाराजांच्या नजीक उभ्या असलेल्या मराठा चार-दोन सैनिकांनी या वकीलावरच विजेच्या वेगाने सपासप घाव घातले. इतके ते मराठे सावध होते. तो वकील म्हणजे इनायतखानाने महाराजांचा खून करण्याकरता पाठविलेला मारेकरी होता. मारेकरी मारला गेला. मराठे सैनिक वणव्यासारखे भडकले. आणि मग सुरतेत खरोखरच सूडाचा भडका उडाला. सुरतेत जो काही भयंकर हल्लकल्लोळ उडाला तो सर्वस्वी अन् प्रत्येक बाबतीत बेजबाबदारपणे वागलेल्या इनायतखान सुभेदारामुळेच. इथे नवल वाटते ते औरंगजेब बादशाहचेच. त्याने साम्राज्याच्या पश्चिम सागरी सरहद्दीवर , सुरतेसारख्या जागतिक बाजारपेठ असलेल्या संपन्न अर्थनगरीवर इतका नालायक बेजबाबदार , भेकड निर्लज्ज भ्रष्टाचारी आणि अक्कलशून्य सर्वाधिकारी कसा काय नेमला ?
सुरतेच्या स्वारीने स्वराज्य सैनिकांनी शिलंगण केले। सीमोल्लंघन ‘ आम्ही कधीही दुसऱ्याच्या मुलुखावर अतिक्रमण वा स्वारी करीत नाही ‘ असे अभिमानाने सोवळ्यातला मुकटा नेसून सांगणाऱ्या आमच्या मंडळींनी याचा विचार करावा ना ? महाराजांचे हे महाराष्ट्राबाहेर झालेले दुसरे शिलंगण। पहिले शिलंगण त्यांनी अफझलखानच्या स्वारीपूवीर्च कर्नाटकात मासूर या आदिलशाही ठाण्यावर , म्हणजे पुण्यापासून जवळजवळ सातशे कि। मी. दूर केले होते. महाराज तर म्हणत होते की , ‘ सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो अवघ्या मुलुखाचे राज्य आपल्या स्वराज्यात सामील करावे.
‘ केवढी विशाल पण तेवढीच उदात्त , उन्नत , उत्कट आणि उत्तुंग स्वप्न पाहणारा हा नेता होता! अशी स्वप्न जागे असणाऱ्यांनाच पडतात। झोपा काढणाऱ्यांना नाही. त्यांच्या आकांक्षा गगनाच्याही पल्याड सूर्यमंडळ भेदून जात असतात.
राहून राहून रूखरूख वाटते की , पाक अतिरेक्यांच्या काश्मिरातील वारूळांवर , संसदच्या अपमानाचा जाब विचारण्यासाठी बॉम्ब टाकण्याची अप्रतिम संधी आम्ही गमावली. शाहिस्तेखानाच्या आक्रमणाचा जाब महाराजांनी सुरतेवर विचारला औरंगजेबाला.
- बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel