मुरारबाजी देशपांडे यांचे मरण हा तुमच्या आमच्या पुढील एक सवाल नाही का ? का जगायचं ? कसंतरीच जगायचं का ? ‘ अय् किल्लेदार , तुझ्या राजाला सोडून तू आमच्याकडे ये. तुला इथे सर्व काही मिळेल. ये. ‘ हे आवाहन शत्रू करतो आहे आणि मुरार बाजी जबाब देतोय राजनिष्ठेचा. स्वराज्यनिष्ठेचा अन् मग मुरार बाजी शत्रूकडून ठार मारला जातो आहे. या मुरार बाजीचा संसार तरी कोणचा होता ? त्याच्या सुखाच्या कल्पना तरी कोणच्या होत्या ?

आमचे संसार आज नेमके कसे आहेत ? आमच्या सुखाच्या कल्पना तरी कोणत्या आहेत ? टेबलाखालून नोटांचे गठ्ठे घेणं हा आमचा विजय. त्यावर जगणं हा आमचा विजयोत्सव. अन् आमच्या नेत्यांच्या घोषणा आणि आश्वासनं अशी की आपला भारत लवकरच जगातील महासत्तांच्या रांगेत उभा राहील.

पटतं का हे ? शक्य आहे का हे ?

मुरार बाजी पुरंदरावर मारला गेला. पण मिर्झाराजा जयसिंहाच्या स्वराज्यदहनाच्या कार्यक्रमात होरपळत असलेल्या मराठी माणसांची एकेक एकेक नि:शब्द आहुती स्वराज्याचं आणि महाराष्ट्र धर्माचं बळ वाढवतच होती. त्या शिवकाळात अगदी निश्चित मराठी स्वराज्यही केवळ दक्षिणेकडील नव्हे , तर संपूर्ण जगातीलच महासत्ता होती. इराणच्या शाह अब्बास बादशाहनं औरंगजेबाला पत्र लिहून म्हटलं होतंच ना की , ‘ तुम्ही कसले ‘ आलमगीर ‘? जगाचे बादशाह ? तो लहानसा शिवाजीराजा तुमच्याने आवरला जात नाही. त्याला आवरून दाखवा. ‘

इथेच जागतिक पातळीवर आमच्या राष्ट्राचं रूप आणि स्थान व्यक्त झालं. हे रूप आणि स्थान व्यक्त केलं अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांनी. अगदी अठरापगड सामान्य नागरिकांनी. एक असामान्य इतिहास याच सामान्यांनी घडविला. शिवाजीराजा आणि त्याचं हिंदवी स्वराज्य पार बुडवून टाकायला आलेले लाखालाखांचे सरदार मराठ्यांनी फुंकरून उडवले.

डोळ्यसमोर घडत असलेला पुरंदरचा संग्राम मिर्झाराजांना गदगदा हलवत होता. आपल्या आणि शिवाजीराजांच्या जगण्यातला फरक दाखवत होता. मिर्झाराजांच्या जागे होण्यालाही तरीही मर्यादा होतीच. त्यांचा मोगली धिंगाणा थांबलेला नव्हता.

पुरंदरही अजून लढतच होता. ‘ येक मुरारबाजी पडीले म्हणोन काय जाहले ? आम्ही हिम्मत धरोन भांडतो. ‘ असे म्हणत गडावरचे मराठे अजूनही लढतच होते. नेता पडला तरीही झुंजत राहण्याची शिकवण महाराजांनी महाराष्ट्राला दिली. पुढच्या काळात तानाजी सिंहगडावर पडला तरीही मराठ्यांनी गड जिंकलाच. सेनापती प्रतापराव गुजर पडले तरीही मराठ्यांनी आक्रमक बहलोलखानाचा पराभव केलाच. पुढे तर शिवाजी महाराजच मरण पावले तरीही मराठ्यांनी औरंगजेबाचा २५ वषेर् झुंजून पूर्ण पराभव केलाच. शिवाजी महाराजांनी इतिहासाचा नवा अध्याय सुरू केला. तोपर्यंत आमचा इतिहास म्हणजे , राजा किंवा सेनापती पडला की पराभव झाला नसला तरीही पळून जाणे , असा होता. पण इथे इतिहासच बदलला. प्रत्येकाने म्हणजे सैनिकाने आणि नागरिकानेही आपापले काम चोख करावे , राज्य राखावे असा इतिहास घडू लागला. घडला म्हणूनच शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतरही शिवाजीनंतर कोण आणि शिवाजीनंतर काय असा प्रश्ान्च निर्माण झाला नाही.

ही केवळ कोणाला तरी उगीच कोपरखळी देण्याची माझी भावना नाही. ती वृत्तीच नाही. इतिहासानेच सिद्ध झालेले हे अमृताचे एक आचमन आहे.

केव्हा चालून जायचे , केव्हा थांबायचे , अन् गरजच पडली तर केव्हा माघार घ्यायची हे शिवचरित्रातून शिकावे. मिर्झाराजा जयसिंह आणि दिलेरखान यांच्या या अघोरी आक्रमणाला तीन महिने पुण्याभोवतीच्या मावळ्यांनी खडतर झुंज दिली. फार सोसलं. एरवी आयुष्यभर अत्यंत पवित्र आणि धर्मनिष्ठ जीवन जगणारा मिर्झाराजा इथे स्वराज्याविरुद्ध राक्षसासारखा कठोर बनला होता. जनता सोसत होती. सैनिक झुंजत होते. पण महाराजही व्याकुळ मनाने विचार करीत होते की , हे किती सोसायचं माझ्या माणसांनी ? गेली २० वषेर् माझी माणसं सतत झुंजताहेत , सोसताहेत. विश्रांती नाही. आता आपणच चार पावलं माघार घेऊ या. म्हणून महाराजांनी मोगलांशी तह करायचा विचार केला आणि पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूरजवळ स्वत: महाराज मिर्झाराजांना भेटावयास गेले. तह झाला. स्वराज्यातील २ 3 किल्ले आणि भोवतीचा प्रदेश महाराजांनी मोगलांस द्यावा हा महत्त्वाचा मुद्दा तहात होता. तो मिर्झाराजांनी (आणि दिल्लीहून औरंगजेबानेही) मान्य केला. इतरही दोन कलमे होती. हा तह महाराजांनी अतिशय सावधपणे केला. आम्ही माणसं तहात नेहमी हरतो. गमावतो तर खूपच. पण काहीवेळा तर युद्ध जिंकूनही तहात सर्वस्व गमावतो. हे येथे घडले नाही.

एक गोष्ट प्रकर्षाने या एकूण लढ्यात दिसून आली. मिर्झाराजा दिलेर संपूर्ण स्वराज्य जिंकून घेऊन , शिवाजीराजाला समूळ नष्ट करण्यासाठी आले होते. तो त्यांचा सर्वस्वी हट्ट होता. पण तीनच महिन्यात मराठ्यांनी दिलेला संघर्ष पाहिल्यानंतर फक्त २ 3 किल्ल्यांवर समाधान मानण्याचा विचार या दोघांना मुकाट्याने करावा लागला. यातच नेतृत्त्वाचे आणि अनुयायांचे बळ व्यक्त झाले. हा शिवशाहीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ठरला.

- बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel