रंदरचा तह म्हणजे मोगलांपुढे माघार! २ 3 किल्ले आणि भोवतीचा प्रदेश मिर्झाराजा आणि दिलेर या मोगली सरदारांच्या स्वाधीन करण्याचा हा खिन्न प्रसंग. या तहाचा अभ्यास करताना संबंधित भागाचे नकाशे आणि कागदपत्रे सतत समोर ठेवावीत आणि विचार करावा. मोगलांची ही मोहिम प्रत्यक्ष सुरू झली 3 ० मार्च १६६५ आणि तहाने संपली दि. ११ जून १६६५ म्हणजे फक्त अडीच महिन्यांत शिवाजीराजांनी मोगलांपुढे हत्यार ठेवले. या अडीच महिन्यांत मोगलांनी स्वराज्याचे कोणकोणते प्रदेश जिंकले ?

उत्तर असे आहे की , फक्त वज्रगड हा पुरंदराचा छोटा उपकिल्ला दिलेरखानाने लढून जिंकला. याशिवाय स्वराज्यातील कोणताही भाग त्यांना मिळाला नाही. कोकणपट्टीकडे तर डोकावूनही त्यांना पाहता आले नाही. मोगलांचा जो काही लष्करी धूमाकूळ चालला होता , तो फक्त पुणे जिल्ह्यातल्या चार तालुक्यात चालला. पुरंदर , भोर , मावळ आणि पुणे उर्फ हवेली हे ते तालुके. यातील फक्त पुरंदर उपकिल्ला वज्रगड आणि सिंहगड यांना मोगली मोचेर् लागले. बाकीच्या स्वराज्याच्या भागांत म्हणजेच वरील चार तालुक्यातच जाळपोळ आणि लुटालूट मोगलांनी केली. मग एवढ्याच मर्यादित भागात , अवघ्या दोन किल्ल्यांच्या युद्धात , अन् त्याही यशस्वी युद्धात महाराजांना असे काय अवघड वाटले म्हणून त्यांनी माघार घ्यावी ? सातारा , सांगली , कोल्हापूर आणि संपूर्ण कोकण यावेळी सुरक्षित राहिले होते. धक्का बसला होता फक्त चार तालुक्यांना आणि सव्वादोन किल्ल्यांना मग तह का केला ? मला वाटणारे उत्तर असे आहे. पाहा पटते का!

इ. १६४६ सालापासून सतत २० वषेर् हे लहानसे स्वराज्य मोठे होण्यासाठी राबत आहे. अंतर्गत राज्य व्यवस्था आणि आक्रमक शत्रूशी सतत झुंज चालू आहे. उसंत नाहीच. आपल्या बळाच्या मानाने हा भार असह्यच होता. शत्रूही होते अफझल , शाहिस्ता , फते , सिद्दी जौहर यांच्यासारखे हत्तींशी हरणांनी किती झुंजावं ? राज्यकारभारातही किती यातना. शेती सुधारावी ? की पाण्याचा प्रश्ान् सोडवावा ? रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा की प्रतिष्ठित गुंडाचा बिमोड करावा ? अन् करावं तरी काय काय ? अन् मग संसार केव्हा करावा ? यातच २० वषेर् गेली. अन् गेंड्यांची फौज यावी तशी मिर्झा आणि दिलेरखान यांची झुंड पुणे प्रांतात घुसली. त्यातच मोगलांच्या बाजूला मिर्झाराजा जयसिंहासारखा वेगळ्याच वळणाचा हुशार सेनापती चालून आलेला तो तर घरंदारं मोडल्याशिवाय मराठे वाकणार नाहीत असं समजून ‘ उद्ध्वस्त भूमी ‘ करण्याचा डाव मांडून बसला.

आजपर्यंत आलेल्या (अन् नंतरच्याही) सर्व शत्रू सेनापतीत हा मिर्झाराजा वेगळ्याच बुद्धिचा होता. म्हणून महाराजांनी चार पावलं जरा माघार घ्यायचं ठरविलं. हे वादळ गेलं की पुन्हा सारे गडकोट जिंकून घेऊच. हा निश्चय होताच. म्हणून हा पुरंदरचा तह. तह म्हणजे निरुपायाने घेतलेली उसंत. पुढची झेप घेण्यासाठी चार पावले मागे येऊन , दबून घेतलेला मोहोरा. या तहात तीन मुद्दे होते. १ ) २ 3 किल्ले आणि सात लाख होनांचा प्रदेश औरंगजेबास देणे. २ ) दक्षिणेतील मोगलांचा जो कोणी सुभेदार शिवाजीराजांना मदतीला बोलविल त्यावेळी शिवाजीराजांनी बारा हजार घोडेस्वारांनिशी मोगल सुभेदाराच्या मदतीस जाणे. 3) युवराज संभाजीराजे भोसले (वय वषेर् नऊ) यांच्या नावाने बादशाहने पाच हजाराची मनसब देणे. संभाजीराजे ‘ नातवान ‘ म्हणजे लहान असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी म्हणून शिवाजीराजांचा एक मातब्बर सरदार काम करील. असा हा तह आहे. यांत शिवाजीराजांनी ‘ मांडलीक ‘ म्हणून राहण्याचा कुठेही उल्लेख नाही. एक स्वतंत्र पण माघार घेतलेला राजा याच नात्याने हा तह झालेला आहे. आग्ऱ्याला महाराजांनी औरंगजेबाचे भेटीस जावे असा उल्लेखसुद्धा या तहात नाही. मग आग्रा भेट , दरबार , महाराजांची कैद इत्यादी सारे प्रकार कसे घडले ?

त्याचं असं झालं , मिर्झाराजाच्या पदरी उदयराज मुन्शी या नावाचा एक अत्यंत हुशार राजस्थानी माणूस होता. तो त्यांचा एकमेव सल्लागार. मिर्झाराजे फक्त त्याचेच सल्ले ऐकत आणि मानीत. या उदयराजच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना आली. ती कल्पना म्हणजे शिवाजीराजांना बादशाहच्या भेटीसाठी दिल्ली-आग्ऱ्यास न्यावे! म्हणजे महाराजांनी आग्ऱ्यास जावे ही कल्पना स्वत: महाराजांची तर नव्हतीच. पण औरंगजेबाचीही नव्हती आणि मिर्झाराजांचीही नव्हती. ती कल्पना होती या उदयराज मुन्शीची. ती त्याने मिर्झाराजांस सांगितली. ती त्यांना एकदम अफलातून वाटली. ते बेहद्द खुश झाले.

या मुन्शीने ओळखले होते की , मिर्झाराजांच्या मनात शिवाजीराजांबद्दल जरा सादर सद्भावना आहे. त्यांच्या मनात औरंगजेबाबद्दलही निष्ठा आहे. अन् आज असलेले शाही दरबारातील आपले स्थान याहूनही अधिक उंचावे अशी मिर्झाराजांची स्वाभाविक महत्त्वाकांक्षा होती. हे सर्व ओळखून हे सर्वच साधावे असा एक बुद्धिबळाचा डाव मुन्शीने मिर्झाराजांपुढे मांडला. जर शिवाजीराजे आग्ऱ्यास बादशाहांच्या भेटीस आले , तर कोणापुढेही आजपर्यंत न वाकलेला , झुकलेला एक जबरदस्त हिंदू राजा आपल्या शाही तख्तापुढे वाकल्याने औरंगजेबाचा दिमाख नि:संशय अपार वाढणार होता. या भेटीच्या निमित्ताने शिवाजीराजांसारखा एक भयंकर शत्रू (निदान काही काळ तरी) दक्षिणेत थंडावणार होता. हा औरंगजेबाचा फायदा. अशा भयंकर शत्रूला शरण आणून मिर्झाराजांनी त्याचे २ 3 किल्ले आणि मुलुख मिळविल्यामुळे मोगलाईची आजवर झालेली बेअब्रु धुवून निघाली होती. ती मिर्झाराजांमुळे. त्यामुळे त्यांचे वजन या विजयामुळे खूपच वाढले होते. त्यातच जर शिवाजीराजे आग्ऱ्यास बादशाहपुढे आले , तर त्याहूनही ते अधिक वाढणार होते. हा मिर्झाराजांचा फायदा. अन् दिल्लीशी शिवाजीराजांची मैत्री (किंवा शांततेचा तह) झाल्यास मोगलांची वारंवार स्वराज्यावर येणारी आक्रमणे (निदान काही काळ तरी) थांबतील आणि दक्षिणेत मराठी स्वराज्याचा पूर्ण शक्तीनिशी विस्तार करण्याचा महाराजांचा हेतूही साध्य होईल , हा शिवाजीराजांचा फायदा. असे हे अफलातून राजकारण , उदयराज मुन्शी याच्या डोक्यातून उगवले. त्यातूनच औरंगजेब बादशाहच्या मस्तकातील ज्वालामुखी जागा झाला.

- बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel