महाराज निसटल्यापासून जवळजवळ १२ तासांनी फुलादखानाला हा भयंकर प्रकार लक्षात आला. रामसिंगला धावत जाऊन फुलादने ही भयंकर वार्ता सांगितली. त्यावेळी रामसिंगने त्वरित उच्चारलेले एक वाक्य एका पत्रात सापडले आहे. रामसिंग म्हणाला , ‘ शिवाजीराजे गायब झाले ? पण सारी जबाबदारी तुमच्यावरच होती. ‘ या क्षणी शिवाजीराजांनी आग्रह धरून जमानपत्र आपणांस का रद्द करावयास सांगितले , याचा बोध रामसिंगला झाला. नरवरच्या ठाणेदाराने आग्य्रास बादशाहाकडे पत्र पाठवून कळवले की , ‘ हुजूर , जिल्लेइलाही बादशाहांच्या हुकुम पावला. परवानापत्र (दस्तक) असणाऱ्यांनाच दक्षिणेकडे जाऊ द्यावे. इतर कोणालाही जाऊ देऊ नये , या आपल्या हुकुमाची अमलबजावणी मी आधीपासूनच करीत आहे. कोणालाही दस्तकाशिवाय आम्ही जाऊ देत नाही. त्यांच्यापाशी बादशाही परवानगीचे दस्तक होते. म्हणूनच आम्ही त्यांना जाऊ दिले. नाहीतर त्यांनाही अटकाव करणार होतो.

ठाणेदाराचे हे पत्र औरंगजेबाला मिळाले. तो सुन्नच झाला. काय बोलणार ? एक प्रकारे ठाणेदार या पत्राने बादशाहाला कळवत होता की , हुजूर आपण काळजी करू नये. आपल्या दस्तकाप्रमाणेच शिवाजीराजांना आम्ही सुखरूप मागीर् लावले. सुन्न झालेल्या औरंगजेबाने ठाणेदाराच्या पत्रावर फक्त तीन अक्षरात फासीर्मध्ये स्वत: शेरा मारला आहे , ‘ नरवरचा हा ठाणेदार बेवकूफ आहे. ‘

हे पत्र सध्या आंध्र – हैदराबाद येथील पुरातत्व विभागात ह्यद्गद्यद्गष्ह्लद्गस्त्र २ड्डद्मड्डद्बद्गह्य श्ाद्घ ह्लद्धद्ग ष्ठद्गष्ष्ड्डठ्ठ या संग्रहात आहे. कै. प्रा. ग. ह. खरे यांनी ते प्रसिद्ध केले.

औरंगजेबाने ताबडतोब आग्रा शहरात लष्कर घातले आणि शहराची कसून झाडाझडती सुरू केली. त्याला एकच आशा वाटत होती की , तो सीवा नक्कीच आग्य्रातच लपून बसलेला असेल. तो या झडतीत सापडेल. ही झडती तीन दिवस (१८ ते २० ऑगस्ट १६६६ ) सतत चालू होती. सीवा सापडला नाही. पण दुदैर्वाने दि. २० रोजी महाराजांचे दोन वकील सापडले. रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर हे दोन्हीही वकील कसे काय सापडले कोण जाणे. पण या दोघांचे औरंगजेबाने महाराजांचा पत्ता काढण्यासाठी आतोनात हाल केले. त्या हालांना सहन केले. पण शिवाजी महाराजांच्या बद्दल एका अक्षरानेही माहिती सांगितली नाही. हे निष्ठावान चारित्र्य कसे घडले याचा आजच्या युवकांनी अभ्यास केला पाहिजे. त्यातूनच आपल्या आजच्या हिंदवी स्वराज्याचे कडवे नागरिक उभे राहणार आहेत.

औरंगजेबाने महाराजांचा शोध घेण्याचा सतत प्रयत्न केला. पण तो व्यर्थ गेला. महाराज आणि त्यांचे सर्व सौंगडी स्वराज्यात येऊन पोहोचले. अडकले फक्त दोन वकील. ते हाल सहन करीत होते.

औरंगजेबाने दक्षिणेत दिलेरखानाच्या छावणीत असलेल्या नेताजी पालकरास ताबडतोब कैद करून आग्य्रास पाठवण्याचा गुप्त हुकूम दिलेरला पाठवला. वास्तविक नेताजी शाही चाकर बनला होता. महाराजांच्या सुटकेशी त्याचा काहीही संबंध नव्हता. तरीही त्याला दिलेरने शाही हुकुमाप्रमाणे धारूरच्या किल्ल्यात अचानक कैद केले. त्याच्याबरोबर त्याची एक बायको , मुलगा जानोजी आणि काका कोंडाजी पालकर यांनाही कैद करण्यात आले आणि आग्य्रास रवाना करण्यात आले. वड्याचे तेल वांग्यावर.

या सर्व पालकरांना बादशाहाने बाटवले. नेताजीचे नवे नाव ठेवण्यात आले मोहम्मद मशीर्द कुलीखान. महाराज सुटल्यापासून पंचविसाव्या दिवशी (१२ सप्टेंबर १६६६ ) राजगडास येऊन पोहोचले. हजार दिवाळी दसऱ्यांचा आनंद राजगडावर राजापूरच्या गंगेसारखा एकदम उसळून आला. त्या आनंदाला सीमा नव्हती. यावेळी घडलेली एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. महाराज आग्य्राहून सुटले १७ ऑगस्ट रोजी. त्याच्याआधी दोनच दिवस , म्हणजे १५ ऑगस्ट रोजी जिजाऊ साहेबांनी सैन्य पााठवून कोल्हापूर परगण्यातला रांगणा गड हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला होता. ही घटना केवढी विलक्षण आहे ? शिवाजीराजे मृत्यू्च्या दाढेत आग्य्रात असतानाच इकडे महाराष्ट्रात त्यांची आई आणि मावळी सौंगडी एक अवघड मोहीम फत्ते करीत होते. महाराज सहा महिने स्वराज्यात नव्हते. ते मृत्यूशीच आग्य्रात जणू लपंडाव खेळत होते. या कालखंडात स्वराज्यातील वीतभरही भूमी शत्रूच्या ताब्यात गेली नाही. एकही फितूर निर्माण झाला नाही. कारभार बेशिस्त नाही. उलट स्वराज्य एका जबरदस्त किल्ल्याने वाढलेच. राष्ट्रधर्माचा हा मूतीर्मंत साक्षात्कार.

या साऱ्या प्रकरणात मिर्झाराजे , कुँवर रामसिंग व त्यांचे कुटुंब भयंकर औरंगजेबी कोपात भाजून निघाले. या साऱ्या प्रकरणाचा धक्का बसून मिर्झाराजे बऱ्हाणपूर येथे मरण पावले. औरंगजेबाने उदयराज मुन्शी याच्यामार्फत मिर्झाराजांवर विषप्रयोग करून त्यांना ठार मारले , असा कीरतसिंगने उदयराजवर आरोप केला. उदयराज स्वत: धर्मांतर करून मुसलमान झाला. रामसिंगला बादशाहाने दरबार बंद केला.

एवढे सगळे होऊनही रामसिंग बादशाहाचा निष्ठावंत सेवकच राहिला! रामसिंग संस्कृत भाषेचा पंडित होता. यावर अधिक भाष्य काय करावं ?

- बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel