हंबीरराव मोहिते , मोरोपंत , प्रतापराव , आनंदराव भोसले आणि असे अनेक समशेरीचे सरदार नासिकपासून तापीपर्यंत हुतूतू घालीत होते. महाराज स्वत: किल्ले शिवनेरीच्या रोखाने निघाले हा महाराजांच्या जन्माचा किल्ला. त्याची ओढ वेगळी काय सांगावी ? महाराजांनी शिवनेरीवर हल्ला चढवला. महाराज या गडाशी किती तास किंवा दिवस झुंजत राहिले. हे माहीत नाही. पण त्यांना या अजिंक्य शिवनेरीत अजिबात रीघ मिळेना. अखेर माघार घेऊन महाराज नाणेघाटाने कोकणाकडे वळले. (इ. १६७० एप्रिल बहुदा) शिवनेरीवर महाराजांना यश आले नाही.
महाराज कोकणात उतरले आणि त्यांनी माहुलीच्या किल्ल्यावर छापा टाकला. माहुली गड अजस्त्र आहे. भंडारदुर्ग , पळसदुर्ग आणि माहुली अशा तीन उत्तुंग शिखरांनी हा गड उभा आहे. यावेळी येथे औरंगजेबाचा किल्लेदार होता राजा मनोहरदास गौड. हा बलाढ्य किल्लेदार दक्षतेने गड सांभाळीत होता.
महाराजांचा गडावर छापा पडला. जबर झटापट झाली आणि महाराजांना माघार घ्यावी लागली. गड मिळाला नाही. पराभवच. लागोपाठ हा दुसरा पराभव. महाराज आपल्या सैन्यानिशी टिटवाळ्यास आले. महागणपतीचे हे टिटवाळे. तळ पडला. पुढचे काय पाऊल टाकावे हा विचार त्यांच्या मनी होता. शहर बंदर कल्याण आणि तेथील किल्ले दुर्गाडी मोगलांच्या ताब्यात होती. महाराजांनी तेच लक्ष्य केले. त्यांनी सुभेकल्याणवर झडप घातली. मोगलांची अक्षरश: दाणादाण उडाली. कल्याण फत्ते झाले. (इ. १६७० , एप्रिल अखेर)
माहुलीच्या किल्ल्यावर खासा सीवा चालून आला. पण आपल्या बहाद्दूर किल्लेदाराने त्याचा पूर्ण पराभव केला याच्या बातम्या औरंगजेबाला दिल्लीत समजल्या. तो सुखावला त्याने राजा मनोहरदास गौड याचे भरभरून कौतुक आणि सर्फराजी केली. मनोहर दासलाही धन्यता वाटली. कुणालाही जमत नाही ते आपल्याला जमले. सीवाचा पराभव! तो आनंदला , सुखावला आणि लगेचच धास्तावलाही. कारण हा यशाचा शिरपेच आणखीन किती तास आपल्या माथ्यावर झळकेल याची त्याला खात्री नव्हती. म्हणून त्याने औरंगजेबाकडे नोकरीतून कायमची रजा मागितली. इस्तीफा म्हणजेच राजीनामा दिला. असा अंदाज आहे की , राजा मनोहरदास हा वयाने वृद्ध असावा. कारण औरंगजेबाने त्याचा अर्ज मंजूर केला आणि माहुली गडावर अलीविदीर्खान याची नेमणूक केली.
महाराज कल्याणास होते. त्यांनी माहुलीच्या किल्ल्यावर एकदम झडप घातली. अन् किल्ला जिंकला. खान पराभूत झाला. (इ. १६७० जून १६ )
पुरंदर , शिवनेरी , माहुली आणि अनेक किल्ल्यांशी या काळात घडलेल्या लढायांचा तपशील मिळतच नाही. हा उन्हाळा होता. (जून १६७० ) पेण पनवेलच्या जवळ शिरढोणचा किल्ले कर्नाळा बोट उंचावून उभा होता. गडावर मोगली निशाण होते. महाराज या गडावर हल्ला करण्यासाठी पायथ्याशी आले. मे अखेर. महाराजांनी अचानक छापा घातला नाही आणि वेढाही घातला नाही. त्यांनी एक वेगळाच प्रयत्न सुरू केला. कर्नाळ्याच्या पायथ्याशी त्यांनी माती उकरून खूप चिखल तयार केला. त्या चिखलाची घमेली आघाडीवर बांधासारखी ओतावयास सुरुवात केली. त्यात लाकडी फळ्या उभ्या केल्या. म्हणजेच एक संरक्षक भिंत उभी केली. अशा किल्ल्याच्या दिशेने चिखलात फळ्या उभ्या करीत त्याच्या आडोशाने मराठी सैन्य गडावर पुढे पुढे सरकत होतं. अन् असे करीतकरीत त्यांनी दि. २२ जून १६७० या दिवशी कर्नाळ्यावर शेवटचा हल्ला चढविला. अन् गड काबीज झाला. या आधीच महाराजांना आपल्या मराठ्यांनी माळा लावून लोहगड (अन् विसापूर गडसुद्धा) जिंकल्याची खबर आली. दि. १ 3 मे १६७०
या संपूर्ण मोहिमेत शिवनेरीसारखा अपवाद सोडला तर सर्वत्र मराठी झेंडे फत्ते पावले. एकदा हरलेला माहुलीगड फत्ते झाला होता. आग्ऱ्यास जाण्यापूर्वी पुरंदरच्या तहात मोगलांना द्यावे लागलेले एकूण एक किल्ले स्वराज्यात आले. शिवाय इतरही काही किल्ले मराठ्यांनी घेतले. या एकूण चढाईत मराठी सैन्यात दिसणारा उत्साह , आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा कारंज्यासारखी नाचत होती.अस्वस्थ होता औरंगजेब.
- बाबासाहेब पुरंदरे