याच काळात (इ. १६७१ ) महाराज रायगडावर काही काळ होते. नेमका महिना आणि तारीख माहीत नाही. एके दिवशी गडावर एक पाहुणा आला. अचानकच आला. तरुण होता. तो हिंदी भाषिक होता. कवी होता. याचं नाव भूषण तिवारी. तो राहाणारा यमुनाकाठीच्या टिकमापूरचा. या गावाचं खरं नाव त्रिविक्रमपूर. कानपूरपासून काही कोसांवर हे गाव आहे. अकबर बादशाहाच्या जो राजा बिरबल म्हणून चतुर सरदार होता त्याचंही गाव हेच टिकमापूर. या गावात बिहारीश्वर महादेवाचं मंदिर आहे.

कवी भूषणाच्या बाबतीत अधिकृत माहिती फारच थोडी मिळते. बाकी साऱ्या कथा आणि दंतकथा. हा महत्त्वाकांक्षी आणि अत्यंत तेजस्वी भाषाप्रभू टिकमापूरहून रायगडाकडे आला. हे अंतर कमीतकमी तेराशे कि.मी. अंदाजे आहे. इतक्या दूरवरून तो दगडाधोंड्यांच्या आणि काट्याकुट्यांच्या सह्यादींवरच्या रायगडावर आला. कशाकरीता ? शिवाजीराजांच्या दर्शनाकरता. कथा , दंतकथा बाजूला ठेवल्या तरी एक गोष्ट लक्षात येते की , या भूषणाला यमुनाकाठी शिवाजीराजांच्या शौर्याच्या आणि मुत्सद्देगिरीच्या कथावार्ता नक्कीच समजलेल्या होत्या. विशेषत: महाराजांचे आग्रा प्रकरण अन् त्यातून त्यांची झालेली विलक्षण सुटका. त्याच्या मनावर या शिवचरित्राचा विलक्षण प्रभाव पडला होता.

हा काळ मोगलाईचा अन् विशेषत: औरंगजेबाचा होता. गंगायमुना अंधारातूनच चाचपडत वहात होत्या. अन्याय आणि अपमान जनतेच्या आता अंगवळणी पडले होते. जगन्नाथ पंडितासारख्या संस्कृत कवींनाही दिल्लीचा बादशाह जगदीश्वर वाटत होता. अशा काळात एक हिंदी तरुण कवी सह्यादीत येत होता. आजपर्यंत ज्यांना कधी पाहिलेलेही नाही अशा महाराजांच्या दर्शनाच्या ओढीने येत होता.

आला. महाराजांची आणि त्याची भेट रायगडावर झाली. तो कवी आहे हे त्यांना समजले आणि त्यांनी त्याला म्हटलं , आपण कवी आहात ? मला आपलं एखादं काव्य ऐकता येईल का ?

भूषणाने चटकन म्हटलं 

‘ हे राजन , 

इंद जिमि जृंभपर। बाढब सअंबपर 
रावण सदंभपर। रघुकुलराज है 


पवन बारिबाहपर। संभू रतिनाहपर 
जो सहसबाहपर। रामद्विजराज है 


दावा दुमदंडपर। चीता मृग झंडपर 
भूषण वितुंडपर। जैसे मृगराज है 


तेज तम अंशपर। कन्नजिमि कंसपर 
जो म्लेंछ वंशपर। शेर शिवराज है , 
शेर शिवराज है ‘ 

ही अप्रतिम कविता ऐकून महाराजांना आनंदच झाला. पण त्यात महाराजांची भूषणाने तुलना केली होती रामाशी , कृष्णाशी , सिंहाशी. महाराजांनी येथे एवढेच लक्षात घेतले की , हा हिंदी भाषिक कवी प्रतिभावंत भाषाप्रभू दिसतोय. या पाहुण्याचा आदर करावा आणि गडावर त्याला ठेवून घ्यावे , असे त्यांच्या मनात आले. भूषणाचा मुक्काम गडावर पडला. या काळात (म्हणजे सुमारे अडीच वषेर्) भूषणाने महाराजांच्या जीवनातील अनेक घटनांचा अन् विशेषत: युद्धप्रसंगांचा वेध घेतला , हे निश्चित आणि त्याने महाराजांच्या जीवनावर काव्यरचना करावयास प्रारंभच केला.

पण ही काव्यरचना करताना त्याने या शिवकाव्य रचनेतच वाङ्मयातील अलंकारशास्त्राचा परिचय करून दिला आहे. म्हणजे पंडित मम्मट या संस्कृत पंडिताने अलंकारशास्त्रावर काव्यप्रकाश हा गंथ लिहिला आणि वाङ्मयातील अनेकविध अलंकारांची ओळख करून दिली तसाच उपक्रम भूषणाने आपल्या शिवकाव्यात केला आहे. एक एक अलंकार त्याने फार सुंदर आणि प्रभावी शब्दांत शिवचरित्रात गुंफला आहे. अन् शिवचरित्र काव्यात गुंफले आहे. अलंकारशास्त्रावरचा हा त्याचा गंथ चिरंजीव आहे. संस्कृत भाषेत जबरदस्त प्रभावी गद्य नाटक लिहिणाऱ्या विशाखदत्त या दोन हजार वर्षांपूवीर्च्या नाटककार कवीची जेवढी योग्यता संस्कृत वाङ्मयात आहे , तेवढीच शक्तीशाली प्रतिभा आणि तेज भूषणाच्या या शिवकाव्यात आहे.

त्याने आपल्या या गंथास नाव दिले , शिवराजभूषण. यात वीररसाचा परमोत्कर्ष दिसेल. प्रत्येक अलंकाराची व्याख्या सांगून त्याचं साक्षात उदाहरण म्हणून शिवचरित्रातला एखादा प्रसंग आणि तत्त्व कवीने रसपूर्ण काव्यात लिहिले आहेत. या कवी भूषणचे एक चित्र सापडले आहे. चित्रात भूषण घोड्यावर बसलेला दाखविला आहे. चित्रकाराचे नाव कुठेही दिलेले नाही. चित्रावर तळाशी ‘ भूषणकब ‘ अशी अक्षरे आहेत. हे चित्र औंध येथील ( जि. सातारा) ऐतिहासिक वस्तुसंग्राहलयात आहे. सर्वात विशेष म्हणजे शिवचरित्रातील घटना , त्यातील संबंधित स्थळे आणि व्यक्ती यांचे उल्लेख अन्य पुराव्यांनी बिनचूक असल्याचे अभ्यासकांच्या प्रत्ययास येते. त्याचा ग्रंथ काव्याचा आहे पण विषय इतिहासाचा आहे. शस्त्रधारी वीरांचा जेवढा आदर रायगडावर होत होता , तेवढाच प्रतिभावंत कलावंतांचाही आदर होत होता.

भूषणाचं घराणं हे विद्वान कवींचं होतं. त्याचे बंधू आणि वडील हेही उत्तम कवी होते. भूषणावर अनेक संशोधकांनी लेखन केलेले आहे. पण दंतकथांच्याशिवाय त्याच्या प्रत्यक्ष जीवनातील घटनांचा शोध लागत नाही. इतिहास संशोधनाची आणि लेखनाची आपल्याकडे कुणी पर्वा केली नाही. इतिहास तो ही संशोधनपूर्वक साधार इतिहास म्हणजे देशाचे अत्यंत मोलाचे धन आहे , याचा सुगावा आत्ताशी गेल्या शंभर वर्षात आम्हाला जरा लागू लागला आहे. महाराष्ट्राबाहेर तर इतिहासाकडे फार थोडे लक्ष दिले जात आहे. आसाम , राजस्थान , कर्नाटक आणि आंध्र या प्रांतांना महाराष्ट्राइतकाच विलक्षण तेजस्वी आणि प्रेरक इतिहास आहे. तेथील कला आणि विविध विषयांवरील ग्रंथ म्हणजे कुबेराचे धन आहे. पण फार थोड्या प्रज्ञावंतांचे तिकडे लक्ष गेलेले आहे. या कविराज भूषणाबद्दल उत्तरप्रदेशात जास्तीतजास्त संशोधन होण्याची आवश्यकता आहे. हा भूषण म्हणजे प्रतिभेचा कस्तुरीगंध आहे.

-बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel