महाराष्ट्राला विशाल सागरी किनारा लाभला आहे. निसर्गानेच अशी रचना केली आहे की , महाराष्ट्राच्या पश्चिमेला हा समुद आणि किनाऱ्यावरची जंगलमय कोकणपट्टी दक्षिणोत्तर पसरलेली आहे. पूवेर्स घाटावरचा देश , मधून बलदंड आणि नदीनाल्यांनी सजलेला सहस्त्रशीर्ष सह्यादी असे हे महाराष्ट्राचे रूप आहे. त्यात कोकणपट्टा समुदाच्या सान्निध्यामुळे अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तेवढाच तो सांभाळावयास जोखमीचाही ठरतो. कारण या पश्चिम समुदाच्या बाजूने सारे पश्चिमी जग कोकणावर हल्ले करावयास सतत टपलेले असावयाचे. युरोपीय अठरा टोपीवाले , क्रूर सत्ताकांक्षी अरब आणि दैत्यवृत्तीचे औबिसिनियन काळे हबशी यांची ग्रहणे कोकणपट्टीला सततच ग्रासत असत.

चाचेगिरी करणाऱ्यांची क्रूर धाड जवळजवळ रोजच कुठे ना कुठे पडतच असायची. पोर्तुगीज आणि सिद्दी यांनी कोकणच्या काही भागात आपली सत्ताच कायमची मांडली होती. त्यांच्या जोडीला आता (इ. स. १६६४ पासून पुढे) इंग्रज मुंबईत कायमचे सत्ताधारी होऊन बसले होते. शिवाजीमहाराजांनी या संपूर्ण कोकण कुंडलीचा सुरतेपासून कारवारपर्यंतचा पुरेपूर अभ्यास (सव्हेर्) केलेला दिसून येतो. आपल्या हिंदवी स्वराज्याची ही पश्चिम सरहद्द समुदाला बिलगलेली असणार अन् हा समुद अनेक शत्रूंनी सततच व्याप्त असणार हे ओळखून संपूर्ण कोकणपट्टाच विनाअपवाद स्वराज्यात असला पाहिजे , असा त्यांचा ठाम निष्कर्ष आणि निर्णय होता.

महाराजांना कोकणपट्टीवर माणसे फार फार चांगली मिळाली. उरणपासून कारवारपर्यंतच्या या कोकणात जवळजवळ साठ टक्के प्रदेश आणि किनारा महाराजांना या कोकणी माणसांनी जिंकून दिला. पण पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला पश्चिम ठाणे जिल्हा , गोमांतक आणि सिद्दींच्या ताब्यात असलेला मुरुड जंजिरा , त्याचप्रमाणे मुंबईची सात बेटे व्यापून बसलेल्या इंग्रजांना समूळ उखडून काढण्याची महाराजांची महत्त्वाकांक्षी धडपड शंभर टक्के कधीच यशस्वी होऊ शकली नाही. याचा अभ्यास झाला पाहिजे. का होऊ शकली नाही ? कोणचे बळ कमी पडले ? माणसे तर मासळीसारखी चपळ , पोलादासारखी कणखर , कोल्ह्यासारखी बुद्धिमान , चतुर वाघासारखी तिखट , सुसरीसारखी डाव साधणारी अन् मुत्सद्देगिरीत कलमी आंब्यासारखी गोड अशी महाराजांना लाभली होती. मग महाराजांपाशी असे काय कमी पडले , की त्यांना सिद्दी , फिरंगी अन् इंग्रजी वैऱ्यांना समूळ उखडता आले नाही ?

एक तर मराठी आरमार हजार वर्षानंतर अगदी नव्यानेच समुदात उतरले होते. आरमारावरची युद्धसामग्री शत्रूपेक्षा कमीच अन् नवी होती. आगरी , भंडारी , कोळी , गावित कुणबी इत्यादी सगळे कोकणी मराठे पार्थपराक्रमी होते. पण अभिमन्युसारखे जरा नवीनच होते. त्यामुळे वेळ खाणारी सागरी युद्धे महाराजांना जास्तच वेळ खर्च करून लढावी लागली. यश मिळत होते. पण गती कमी पडत होती. वेळच कमी पडत होता. त्यामुळे महाराजांची हयात संपली पण हे तीन परके शत्रू शिल्लक उरले.

आता यातून मुद्दा असा की , महाराजांचा आरमारी ध्येयवाद लक्षात घेऊन पुढे पेशव्यांनी या तीनही वैऱ्यांना कायमचे नष्ट करण्याचे ध्येय प्रथम क्रमांकाने डोळ्यापुढे ठेवावयास हवे होते. देशावरचा अखिल भारतीय स्वराज्य विस्ताराचा व्याप पेशव्यांनी स्वीकारल्यामुळे आरमाराकडे म्हणजेच सागरी सरहद्दीकडे पेशव्यांचे बळ कमी पडले. त्यातून पुन्हा आपसातील भांडणे आम्हाला बाधली. त्यामुळेच हे तीन वैरी आमच्या छाताडावर कायमचे बंदूकी रोखून टिकू शकले. कान्होजी आंग्रे आणि आंग्रे परिवार आनंदराव धुळप आणि धुळप परिवार हाही तेवढाच शूर होता. पोर्तुगीजांची उत्तर कोकण किनाऱ्यावर दाणादाण उडविणारा चिमाजी अप्पा , शंकराजी महादेव फडके , खंडोजी माणकर , अणजूरकर नाईक वगैरे मंडळीही तेवढीच कर्तबगार होती.

इ. स. १७५१ मध्ये तर पेशव्यांच्या एका हेरवाडकर सरदाराने गोव्यात फोंड्याजवळ खासा पोर्तुगीज गव्हर्नर जनरललाच रणात ठार मारले. इ. स. १७३७ मध्ये पेशव्यांनी जंजिऱ्याचा खासा सुलतान सिद्दी सात याला रणात उरण येथे ठार मारले. इतिहास घडला पण वर्तमान घडले नाही. टिकले नाही. याचे कारण नेमकेच सांगायचे झाले , तर छत्रपती शिवाजीमहाराजांचे धोरण आणि अनुकरण या मंडळींना साधले नाही. आपसात वैर अन् वैऱ्यावर खैर करीत राहिलो आम्ही. इ. स. १७५५ मध्ये आपसातील भांडणापायी नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेऊन सुवर्णदुर्गाजवळ आंग्ऱ्यांचे म्हणजेच स्वराज्याचे आरमार भगव्या झेंड्यासकट समुदात बुडविले.

इतिहासात आमच्या कोणच्या ना कोणच्यातरी अन् एकूण सर्वांच्याच चुका झाल्या. त्याचे परिणाम राष्ट्राला भोगावे लागले. ‘ हे राज्य एक आहे ‘ असे आज्ञापत्रात महाराजांचे मनोगत अमात्यांनी लिहून ठेवले आहे. म्हणजेच राष्ट्रीय एकतेचा , चारित्र्याचा आणि उत्तुंग महत्त्वाकांक्षेचा महाराजांनी दिलेला धागा आणि आदेश आम्ही विसरलो. अजूनही विसरलेलेच आहोत. आपसातल्या भांडणांपायी , क्षुद मानापमानापायी , स्वार्थापायी अन् एकमेकांशी व्यक्तीगत आणि सामाजिक पातळीवरून भांडतो आहोत अन् भांडताना जयघोष मात्र शिवाजी महाराजांचा करतो आहोत. विवेक हरवला आहे. नित्य नवा दिन जागृतीचा उगवतच नाही. पण काय करावे ? कुणी चैनीत वारा खाण्यात गंुतलाय , कुणी चारा खाण्यात गुंतलाय. कुणी गुटखा खाण्यात गुंतलाय. वैतागलेल्या गरिबांना व्यवस्थित आत्महत्या करण्याइतके विष खरेदी करायलाही पैसे नाहीत. करंटे मिळाले सर्वही , जो तो ‘ दु ‘ र्बुद्धीच सांगतो.
-बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel