शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर बहुधा दुसऱ्याच दिवशी जिजाऊसाहेबांना रायगडावरून खाली पाचाड गावातील वाड्यात आणण्यात आले. त्यांची प्रकृती बरी नव्हतीच. त्यांनी पाचाडला अंथरुण धरले. हे त्यांचे अंथरुण शेवटचेच होते. वार्धक्याने त्या पूर्ण थकल्या होत्या. त्यांचे वय यावेळी ७४ किंवा ७५ असावे. त्या आता कृतार्थ मनाने मृत्यूला सामोऱ्या जात होत्या.

शिवाजीमहाराजांपेक्षा जिजाऊसाहेबांचे जीवन खडतर गेले होते. त्यांनी आयुष्यभर चिंतेतच दिवस काढले. ती त्यांची चिंता होती. स्वराज्याची , रयतेची आणि शिवाजीराजांची. प्राणावर बेतणारी संकटे महाराजांवर येत होती. मृत्यूच्या ओठावरच महाराज स्वराज्यासाठी लपंडाव खेळत होते. मृत्यूने जीभ फिरवली असती तर हा आट्यापाट्यांचा डाव मृत्यूने त्यांच्या सवंगड्यांसह गिळून टाकला असता. पण प्रत्येकवेळी महाराजांचा जणू पुनर्जन्मच होत गेला. पण त्या पुनर्जन्माच्या भयंकर प्रसूतीवेदना जिजाऊसाहेबांना सहन कराव्या लागल्या. त्या त्यांनी सहन केल्या , न कण्हता , न विव्हळता. जिजाऊसाहेब सतत चिंतेच्या चितेत उभ्या जळतच राहिल्या. आता शेवटचे जळणे त्या मानाने अगदीच शांत आणि शीतल ठरणार होते. या त्यांच्या अखेरच्या दहा-बारा दिवसांचा तब्बेतीचा तपशील कोणी लिहून ठेवलेला सापडत नाही. पण त्या नक्कीच शांत होत्या. कृतार्थ होत्या. प्रसन्न होत्या. त्यांनी अपार दानधर्म केला होता.

त्यांनी सर्वात मोठे दान या महाराष्ट्राला आणि भारतवर्षाला दिले होते. त्यांनी सूर्यपराक्रमी छत्रपती या भूमीला दिला होता. त्यांच्या शिवनेरीवरील अंगाई गीतांचे वेदमंत्र झाले होते. त्यांच्या आसवांच्या सप्तगंगा झाल्या होत्या. त्यांच्या हृदयाचे सिंहासन झाले होते. त्यांच्या मायेचे छत्र झाले होते. त्या तृप्त होत्या. दिवसा दिवसाने ज्योत मंदावत होती. तेल संपले होते. ज्योत जळत होती फक्त.

आपण जिजाऊसाहेबांच्या कथा अत्यंत आवडीने ऐकतो , सांगतो. पण त्या कथांच्यामागे केवढी व्यथा धगधगत होती , याचा आपण कधी विचार करतो का ?

कधीकधी मनात दडलेला कवी जागा होतो आणि विचार करू लागतो. ज्याक्षणी महाराज शिवाजीराजे सोन्याच्या सिंहासनावर आरूढ झाले आणि त्यांच्या मस्तकावर छत्र धरले गेले त्याक्षणी राजसभेत आनंदकल्लोळ उसळला. लोकांचे चौघडे झडू लागले. हे इतिहासाला माहितच आहे पण त्याक्षणी जिजाऊसाहेबांच्या डोळ्यांना समोर काय दिसले असेल ? काहीच दिसले नसेल आनंदाश्रूंच्या डोहात कलियामर्दन करणारा योगेश्वर त्यांना दिसला असेल. अर्जुनाचे सारथ्य करणारा श्रीकृष्ण दिसला असेल.

जिजाऊसाहेब आता निघाल्या होत्या. दहा वर्षांपूवीर् शहाजीराजे मरण पावले , तेव्हा त्या सती जायला निघाल्या होत्या. महाराजांनी त्यांना कळवळून गळामिठी घालून रडून आकांत करून परत आणले होते. पण आता मात्र ते अशक्य होते.

दिनांक १७ जून , बुधवारचा दिवस मावळला रात्र झाली , अंधार दाटत गेला , काळोखाने पृथ्वी गिळली. एक ज्योत मंदमंद होत गेली आणि जिजाऊसाहेबांनी डोळे मिटले. महाराजांच्या आणि महाराष्ट्राच्या आऊसाहेब गेल्या. महाराजांच्या मनात त्याक्षणी जो आकांत उसळला असेल तो अंदाजाने तरी शब्दात सांगता येणे शक्य आहे का ?

ती अखेरची यात्रा निघाली असेल. आऊसाहेबांचा देह पालखीत ठेवला गेला असेल. कैलासाच्या दिशेने पालखी चालू लागली असेल. महाराजांनी अखेरचे दंडवत आऊसाहेबांना घातले असेल. त्यावेळी त्यांच्या ओठातून कोणते शब्द उमटले असतील ? इतिहासाला काहीच माहीत नाही. त्याला काहीच ऐकू आलेले नाही. पण असं वाटतं की , महाराज पुटपुटले असतील ,

‘ इष्ट कार्य प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनायच ‘ ज्वाला आकाशाला पोहोचल्या.

-बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel