अक्षर प्रभू देसाई

(CBI ऑफिसर कैलास आणि स्वरा ह्यांच्या साहसकथा )

प्रकरण चौथे : जन्नत हॉस्पिटल

गौरी ही राठोड साहेबांची सेक्रेटरी. तिच्याशी चांगले संबंध म्हणजे राठोड साहेबांच्या हालचालींचा आधीच पत्ता लावायचा मार्ग. कैलास तिच्याशी फार चांगला वागायचा. स्वराला ते जास्त पसंद नसले तरी एक दोनदा तिने सुद्धा गौरीला छान मस्का लावून आपली कामे करवून घेतली होती. AD राठोड साहेब CBI आणि IB दोन्ही ठिकाणी काम करायचे. त्यांचे पद फार मोठे असले तरी काम ते नक्की काय करत हे गुपित असायचे.

Additional director राठोड ह्यांचे एक काम होते कैलास आणि स्वराला केसेस देणे. आज गौरीने फोन करून दोघांना बोलावून घेतले होते आणि एक नवीन केस टेबलवर येणार म्हणून कैलास आणि स्वरा दोघेही खुश होते.

"बसा" राठोड साहेबानी हुकूम सोडला. राठोड साहेबांचे केबिन म्हणजे सरकारी कार्यालयाच्या एकदम उलट. संपूर्ण टेबल वर फोन आणि लॅपटॉप सोडून काहीही नव्हते. एक पेन सुद्धा नाही. कुठेही एक फायल नावाला सुद्धा दसत नव्हती. सर्व फाईल्स कपाटांत गौरीने मांडून ठेवल्या होत्या.

"सफायर लिलाव फेल गेला असे ऐकू आले " त्यांनी कैलास उल्लेखून म्हटले. "ती महिला कुठे गेली कुणालाच पत्ता नाही. जो मेला तो फ्रांस मधील फार मोठा चोर होता. आणि लिलावांतील एक नाणे जे त्यानेजिंकले ते सुद्धा गायब आहे. एकूणच पोलीस काही शोधतील असे वाटत नाही" राठोड साहेबानी  विषय काढला आणि कैलासाला ते आपल्या जखमेवर मीठ चोळत आहेत असे वाटले.

"पण आता खऱ्या केसवर काम करायची गरज आहे". त्यांनी ड्रॉवर उघडून एक लिफाफा त्यांच्या हातांत दिला.

कैलास आणि स्वरा काहींनी ना बोलता निमूट पाने आज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणे राठोड साहेबांचे ऐकत होते. CBI भ्रष्टाचाराची बजबजपुरी असली तरी राठोड साहेब अव्वल दर्जाचे ऑफिसर होते आणि त्यांचा फार मोठा मान होता. एक आर्मी ऑफिसर म्हणून त्यांनी आपले करियर सुरु केले होते. आणि आता ते CBI मध्ये पोचले होते. नक्सलवादी लोकांचे आर्थिक व्यापार शोधून काढून त्यांचे कंबरडे मोडण्याचे फार महत्वाचे काम त्यांनी केले होते. त्यावेळी एक गोळी सुद्धा त्यांना लागली होती.

"केस फार गुप्त आहे. जन्नत हॉस्पिटल हे पनवेल मधील एक मोठे इस्पितळ आहे. भूतपूर्व रेल्वेमंत्री सादिक हसन ह्यांचे हे इस्पितळ. ह्या इस्पितळांत अजून पर्यंत ३ डॉक्टर मृत्युमुखी पडले आहेत. प्रत्येकाचा मृत्यू अपघाती होता आणि इस्पितळांतच झाला. सादिक हसन ह्यांची इच्छा आहे कि आम्ही हा विषय सोडवून लवकरांत लवकर मिटवावा." राठोड साहेबानी प्रश्नात्मक चेहेर्यानी दोघां कडे पहिले.

"पण सादिक हसन ची केस CBI का घेतेय ? पनवेल पोलीस शोध घेऊ शकतात ना ? " स्वराने प्रश्न विचारला. अर्थांत तिचा प्रश्न बरोबर होता.

"नवीन सरकारने एक भ्रष्टाचाराची फाईल उघडली आहे. सादिक हसन चे काही मंत्री सहकारी त्यांत गुंतले होते. त्यांना आंत टाकायचे तर सादीक ची साक्ष फार महत्वाची आहे. त्याशिवाय त्यांच्या विरोधांत पुरावे सादिक कडे आहेत. ३ डॉक्टरचे मृत्यू अजून मीडियाच्या हातांत पोचले नाहीत पण ते पोचले तर कुणी ना कुणी सादिकला त्यांत गुंतवेल. मग CBI ला त्याच्याकडून सहकार्य मिळणार नाही."

"थोडक्यांत गाढवाला वडील म्हणून नमस्कार घालायचा आहे" कैलासने म्हटले आणि राठोड साहेबानी मान हलवली.

"फक्त खुनाचा तपास असता तर मी रॉबिन ला नाही तर शफीला पाठवले असते पण इथे खून आणि इतिहास ह्यांची सांगड आहे. पनवेल मधील जन्नत इस्पितळ किमान ७० वर्षे जुने आहे. त्या काळी पनवेल आजच्या सारखे शहर नव्हते. हॉस्पिटलची इमारत एक कोठी होती. तिथे एक मुस्लिम जमीनदार राहत होता. एका आग दुर्घटनेत त्याची संपूर्ण फॅमिली जाळून खाक झाली. पण अफवा होती कि त्या हवेलीत त्याची संपत्ती लपवून ठेवली आहे. त्या जमीनदारांचे आजोबा मुघल दरबारी कमला होते आणि बादशाहने एक बेसुमार किमतीचा पाचू मणी त्यांना भेट म्हणून दिला होता. आग दुर्घटना कदाचित त्या संपत्तीसाठीच घडवून आणली असावी असा त्या काळच्या पोलिसांचा कयास होता.” राठोड सांगत होते आणि कैलास आणि स्वरा आज्ञाधारक मुलां प्रमाणे ऐकत होते.

"सादिक च्या मते आज सुद्धा त्याच्या हवेलीवर ज्याचे नाव जन्नत हॉस्पिटल आहे तिथे काही लोक खजिन्याचा शोध घेण्यासाठी येतात. डॉक्टर लोकांचा मृत्यू हा त्याच कारणासाठी कोणी करत आहे असे सादिक चे म्हणणे आहे. शक्य असेल तर त्या गुप्त खजिन्याचा कथेवर काही ना काही कारण देऊन पडदा पडणे आवश्यक आहे. ” राठोड साहेबानी आणखीन एक कागद पुढे सरकवला. त्यांत त्यांनी दोघा साठी मोठी गाडी आणि स्पेशिअल क्रेडिट कार्डची व्यवस्था केली होती.

कैलास आणि स्वरा राठोड साहेबांच्या केबिन मधून बाहेर पडले. "तू काहीच बोलला नाहीस आंत ? ह्याचा अर्थ तुला जन्नत हॉस्पिटल बद्दल खरेच काही ठाऊक आहे ?" स्वराने कैलास ला लिफ्ट मध्ये विचारले. कैलासाच्या चेहेऱ्यावर प्रचंड मोठे स्मित होते.

"जन्नत हॉस्पिटल जमीनदाराची कोठी नव्हतीच. त्या हवेलींत एका मोठ्या माणसाच्या रखेल राहत होत्या. सादिक हसनचे वडील त्याची अनौरस संतती होती. त्या आग दुर्घटने नंतर सादिकच्या वडिलांची जणू लॉटरी लागली."  कैलासने आपली माहिती दिली.

"तुला हे कसे ठाऊक ?" स्वराचा हा प्रश्न कैलासाला अपेक्षित होता.

थॉमस फोर्ड हे अमेरिकन पॅरानॉर्मल शोधक इथे आले होते आणि आमची दोस्ती जुनी होती. त्यांनी त्या हॉस्पिटल मध्ये भुतांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना ह्या जागेविषयी त्यांच्या भारतीय मित्रांनी माहिती दिली होती. आपसूक ती माहिती मला सुद्धा मिळाली. " कैलासने माहिती दिली.

"सापडली का त्यांना मग एखादी हडळ ? " स्वराने विनोदी स्वरांत कैलासाची थट्टा केली.

"नाही पण त्यांच्या मते त्या रखेली वारंवार गरोदर राहत आणि अनेकदा त्यांचा बाळंतपणात मृत्यू होत असे किंवा मुले मरत असत. तसल्या जागेत काय काय भानगडी होतात ह्याची कल्पना करणे सुद्धा मुश्किल आहे.“ कैलास आणि स्वराची लिफ्ट आता खाली पोचली होती.

"डॉक्टरांचे खून म्हणजे संशयाची सुई अश्या एखाद्या पेशंट कडे जाईल ज्याला एक तर ह्या डॉक्टर मंडळींनी गंडवले असेल किंवा असा कोणी नातेवाईक ज्याच्या पेशंटचा मृत्यू ह्या हॉस्पिटल मध्ये झाला असेल ?" स्वराने तर्क लढवला. ती बरोबर होती उपलब्ध पुराव्यावरून तरी संशयाची सुई हॉस्पिटल्सशी संबंधित व्यक्तीकडेच वळत होती.

स्वरा आणि कैलास सर्वांत आधी सरळ हॉस्पिटल कडे गेले. तोपर्यंत स्वराने फोन आणि डिपार्टमेंट कडून सर्व आवश्यक माहिती गोळा केली होती. जन्नत हॉस्पिटल हे सर्वसाधारण हॉस्पिटल नव्हते. तिथे फक्त सौंदर्य वर्धनाच्या शस्त्रक्रिया होत होत्या. कोणी मॉडेल आपले नाक ठीक करण्यासाठी तर कोणी एक्टरेस आपले उरोज मोठे करण्यासाठी येत असत. कित्येक वर्षे तरी इथे कोणाचाही नैसर्गिक किंवा अनैसर्गिक मृत्यू झाला नव्हता. फक्त दोन शस्त्रक्रिया चुकीच्या झाला होत्या आणि तिथे सुद्धा विशेष वाईट काही घडले नव्हते. मृत डॉक्टर डॉक्टर सदानंद आपटे, डॉक्टर विशाखा शर्मा आणि डॉक्टर गुलफाम अली अशी होती. ह्यांत गुलफाम अली हे फार वयस्क आणि अतिशय अनुभवी डॉक्टर होते.

कैलास ने हॉस्पिटलच्या पुढे गाडी पार्क केली. आता त्यांच्या लक्षांत आले कि हॉस्पिटलमधील मृत्यूकडे मीडिया चे लक्ष का गेले नव्हते. इस्पितळ एक अतिशय गरीब भागांत होतेच पण त्याच वेळी बाहेरून ते इस्पितळ असावे असे अजिबात वाटत नव्हते.

हॉस्पिटलचे सध्याचे प्रमुख होते डॉक्टर शेल्डन फर्नांडिस. स्वराने त्यांना जे जे प्रश्न विचारले त्याची सर्व उत्तरे त्यांनी व्यवस्थित दिली. डॉक्टर मंडळींवर सुद्धा कैलासाला संशय होताच. डॉक्टर सदानंद हे आपल्या केबिन मध्ये होते. तिथे त्यांना रक्ताची उलटी होऊन मृत्यू झाला होता. पोस्टमार्टम मध्ये काहीही सापडले नव्हते. डॉक्टर विशाखा ऑपेरेशन थेटर मधील खिडकीतून खाली पडल्या होत्या. खिडकी किमान ४ फूट वर होती त्यामुळे त्या चुकून पडण्याची शक्यता नव्हतीच. डॉक्टर अली मात्र आपल्या घरी वारले होते., ते एकटेच राहत. त्यांनी अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्या खाल्या होत्या. लोकल पोलिसांनी त्याला आत्महत्या म्हटले होते.

डॉक्टर शेल्डन च्या मते सर्व डॉक्टरांची मानसिक स्तिथी एकदम चांगली होती. ह्या डॉक्टरांनी आपली सर्व ऑपेरेशन्स अतिशय छान पणे पार पडली होती. कैलासने आणि स्वरांनी दोघांनी नर्स आणि वॉर्डबॉयशी सुद्धा चौकशी केली पण कुठेही संशयाला जागा आहे असे वाटत नव्हते. सर्व लोकांच्या जबान्या मिळत होत्या. कैलासची चौकशी करण्याची पद्धती वेगळी होती. त्याला कागदपत्रे चालण्यात रस नव्हता. ते काम त्याने स्वरा कडे सोपवले. त्याला स्वतःला फिल्ड वर्क आवडायचे. त्यामुळे त्याने मृत्यू झालेल्या जागांचे परीक्षण करायचे ठरवले.

डॉक्टर आपट्यांचे केबिन कॉर्नर ला होते. त्यांना दोन्ही बाजूनी खिडक्या होत्या. डॉक्टरांचा मृत्यू झाला तेंव्हा त्यांचे शव जमिनीवर पडले होते. कैलासने सर्व केबिन शोधले. त्याला काहीही संशयास्पद सापडले नाही. ऑपेरेशन थिएटर जिथून डॉक्टर विशाखा बाहेर पडली होती तिथे तर सर्व काही साफ करून ठेवले होते. ते ऑपरेशन थेटर त्या अपघाता नंतर वापरले गेलेच नव्हते. पण त्या थेटरच्या दारावर कैलासाला कुंकू सापडले. ते दाराच्या फ्रेम ला लावले होते. ते त्याला जरूर खटकले.

कैलास आपला शोध घेऊन स्वराला भेटण्यास खालच्या मजल्यावर जात होता पण स्वराने त्याला फोन करून सरळ गाडीजवळ यायला सांगितले. ती आधीच गाडींत बसली होती. "कैलास मला काही तरी सापडले आहे." तिने कैलास आंत बसताच सांगितले.

"हे बघ. ज्या दिवशी डॉक्टर विशाखा ने त्या खिडकीतून उडी मारली त्याच्या एक तास आधी हावूसकिपींग मधील कमलाबाई ह्यांनी OT ची सफाई केली होती. पण विशाखा पडली तेंव्हा ती आधीच ड्युटी संपवून घरी गेली होती. डॉक्टर सदानंद आपटे ह्यांचे केबिन दोन दिवस बंद होते. दोन दिवस आधीच कमलाबाईनीच ते साफ केले होते आणि ते उघडतांच आपटे ह्यांचा मृत्यू झाला. " स्वरा अतिशय उत्साहाने सांगत होती. "तुला काही सापडले का ? " तिने त्याला विचारले.

"हो, OT च्या दरवाज्यावर कुंकू लावले होते"त्याने खिश्यांतून एक सॅम्पल काढून दाखवले. ते पाहून स्वरा आपले मोत्यासारखे दात दाखवून हसली. "म्हणजे कोणी काळा जादू वगैरे करून डॉक्टर मंडळींना मारत आहे असे तू म्हणतो आहेस का ? " तिने विचारले.

"कमला बाई नि हे खून कसे केले ह्याचे काही स्पष्टीकरण आहे का ? " त्याने विचारले. स्वराने नकारार्थी मान हलवली. "आणि डॉक्टर अली ? त्यांचा मृत्यू तर घरी झाला".

डॉक्टर अली ह्यांच्या घरी कमलाबाई साफ सफाई साठी जात होती. पण पोलीस रिपोर्ट प्रमाणे ती माघील १५ दिवस काही कारणास्तव तिथे गेली नव्हती. CCTV कॅमेरा पाहून पोलिसांनी ह्याची खातरजमा केली होती पण OT ची साफसफाई सुद्धा कमलाबाईनीच केली होती हे पोलिसांच्या नजरेतून सुटले होते.

"तर आता आम्ही ताबडतोब तिच्या घरी जाऊन पहिले पाहिजे." कैलासने गाडी स्टार्ट करत म्हटले.

स्वराने आधीच तिचा पत्ता शोधून ठेवला होता. जन्नत हॉस्पिटलच्या बाजूला गंगा जमुना कॉलोनीमध्ये कमलाबाई राहत होती. फार जुनाट अश्या बिल्डिंगमध्ये भाडे किमान ५ हजार तरी असेल आणि एका सफाई कर्मचाऱ्याला ते परवडेल असे वाटत नव्हते. गंगा जमुना सोसायटीच्या बाहेर खुर्चीवर एक वयोवृद्ध वॉचमन बसला होता. त्याच्या पेक्षा त्याची लाकडी खुर्ची जुनी वाटत होती. भिंतींचे रंग कधीच उडून गेले होते आणि काही ठिकाणी काँक्रीट सुद्धा जाऊन आतील लोखंड दिसत होते. स्वरा आणि कैलासाला पाहून सोसायटीतील कुणीही अचंबित वाटत नव्हते. २ ऱ्या मजल्यावर ४ नंबरच्या फ्लॅटचे दार स्वराने ठोठावले. कैलासने जॅकेटच्या आंतील आपल्या पिस्तूलवर हात ठेवला होताच पण काहीही विशेष न घडता दार उघडले गेले त्याच्या मागे होती एक साधारण १६ - १७ वर्षांची मुलगी. तिच्या डोळ्यावरील कला चष्मा ती अंध होण्याची शक्यता सांगत होता पण तिच्या हावभावरून ती अंध होती हे स्पष्ट झाले.

स्वराने आंत प्रवेश केला. ती मुलगी दिसत नसले तरी स्वराच्या हालचालीने थोडी अस्वस्थ वाटली. "कमला देवी इथेच राहतात का ? " कैलासने तिला शांत करण्यासाठी प्रश्न केला. स्वरा स्त्री असल्याने तिच्या मनात अनुकंपा असेल आणि त्या अंध मुलीला आश्वस्त करण्यासाठी ती काही तरी बोलेल असा कैलासचा अंदाज चुकला होता. स्वरा अतिशय तीव्र गतीने त्या फ्लॅट मध्ये फिरत होती. तिने हॉल आणि किचन आधी पहिले आणि बेडरूम मध्ये कोणी आहे असा इशारा केला. कैलासने सुद्धा आता आपली बंदूक काढून बेडरूम कडे धाव घेतली.

आंत कमलादेवी खुर्चीवर शांतपणे बसली होती. "ती बंदूक वगैरे बाहेर काढण्याचे इथे काहीही काम नाही, चन्द्राला दिसत नसले तरी समजते हो तिला सर्व काही" कमलाबाईने शांत स्वरांत त्या दोघांना म्हटले. कैलास थोडा आश्चर्य चकित झाला होताच. चंद्रा चेहेऱ्यावर भीती दाखवत आई जवळ येऊन उभी राहिली. "आई हे कोण आहेत ? " तिने आईला विचारले.

"अग घाबरू नकोस हे चांगले लोक आहेत ...अहं ..  ह्यातील एक तरी चांगली व्यक्ती आहे .." तिने स्वराकडे पाहत म्हटले. कैलासाला तो आपल्याला एक टोमणा होता असे वाटले. खरे तर त्याने कमळादेवीच्या रोषाला प्राप्त व्हावे असे काहीही केले नव्हते. कमलाबाईला पकडण्यात स्वराचीच भूमिका होती.

बेडरूम मध्ये कैलास आणि स्वराने चोहोबाजुना पहिले. समोर एका लाल गालिच्यावर काही फुले, रक्तांत कालावल्याप्रमाणे वाटणारे तांदूळ, लिंबू एक काली बाहुली इत्यादी सामान होते. आजूबाजूला कपाटांत सगळीकडे तथाकथित काळी जादू करण्याचे सामान विखुरले गेले होते. घोरपडीचे कातडे, महाकाळाची मूर्ती, भिंतीवर कसली यंत्रे आणि एका आरश्यासमोर बाटलींत भरून ठेवलेली अनेक द्रव्ये. स्वराने फोन करून आपल्या टीमला बोलावले. तेथील रक्त, बाटलीतील द्रव्यें सर्व काही आता फॉरेन्सिक लॅब मध्ये ती पाठवणार होती. पण ह्या सर्व घटनात कमलाबाई मात्र अतिशय शांत पणे बसून होत्या. चंद्राने त्यांचा हात घट्ट पकडून ठेवला होता.

"बाई ह्या रम मधील सर्व सामान आता पुरावे आहेत त्यामुळे तुम्ही बाहेर येऊन बसा." स्वराने त्यांना हुकूम सोडला. कैलास लक्षपूर्वक स्वराच्या चेहेऱ्याकडे पाहत होता. तिच्या चेहेरीवर चंद्रा विषयी काही तरी सहानभूती दिसत होती.

"आपण वाममार्गी साधना करता ? " कैलासने कमलाबाईना विचारले. त्याचा शब्द प्रयोग आणि त्यातील कदाचित आदराची भावना स्वराला अजिबात आवडली नाही.

कमलाबाईनी आधी कैलासकडे आणि नंतर स्वराकडे पहिले. नंतर के स्मितहास्य त्यांच्या तोंडावर आले. "आपण आदरपूर्वक "वाममार्गी" वगैरे म्हटले तरी माझा दृष्टिकोन तुझ्या बाबततीत बदलणार नाही बाळा. तू काळी जादू म्हटले असते तरी चालले असते. पण तुझ्यात जास्त दक्षिणमार्ग दिसतोय मला. मी काही पाहिलेय त्या पेक्षा जास्त मानवी स्वभाव तू पहिला आहेस. तुझ्या डोळ्यांतून दिसतेय ते." तिने कैलासकडे भेदक नजरेने पाहत म्हटले. तिची तपकिरी रंगाची साडी आणि कपाळावरील छोटे कुंकू अचानक कैलास फार भीतीदायक वाटले. जणू काही तिने त्याच्यातून आरपार  पहिले असेच त्याला वाटले. हि बाई नेहमीप्रमाणे काळ्या जादूच्या नावाखालील लोकांना फसवणारी बाई नाही. इथे काही तरी चुकतेय असे कैलासाला आंतून वाटत होते.

फॉरेन्सिक तिने येण्यासाठी किमान २ तास वाट पाहणे आवश्यक होते. पण त्या दरम्यान तिची जबानी घेण्याचा प्रयत्न स्वरा करू लागली. कैलासाने दुरूनच ते ऐकणे पसंद केले. ती मृत डॉक्टर्स ना कधीपासून ओळखत होती, त्यांच्या मृत्यू झाला तेंव्हा ती कुठे होती इत्यादी इत्यादी ठराविक साच्यातील ते प्रश्न होते.

कैलास उठून बाहेर गॅलरीत गेला. त्याच्या आश्चर्याने चंद्रा उठून बाहेर गॅलरीत आली. खरेतर ती घाबरून आपल्या आईजवळ राहील असे कैलासाला वाटले होते. "आपण आमच्या आईला नेणार का ? " तिने कैलास कडे पाहत विचारले. कुठल्याही अंध मुलीच्या तोंडावर ज्याप्रकारे विचित्र हावभाव असतात त्याच प्रकारे तिच्या चेहेऱ्यावर बोलताना विचित्र हाव भाव येत होते.

"ठाऊक नाही. आम्ही तिला न्यावे असे तीने काही केले आहे का ?" कैलासने प्रतिप्रश्न केला.

"आई माझ्यासाठी खूप काही करते, तीला सर्वजण संशयाने पाहतात. पाहतात म्हणजे काय हे मला ठाऊक नसले तरी मला ऐकू येते, मला समजते. " ती बोलत होती. आणि कैलास कुतूहलाने ऐकत होता.

"मन तिचे मन कोमल आहे. ती कधीही कुणाचेही वाईट करणार नाही." तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.

३ मृत डॉक्टर्स, विशेष खास पुरावे नसणारी एक मध्यवयीन बाई, तिची अंध मुलगी. कैलास आपल्या मनात चित्र रंगवत होता. तिने खरोखर खून केला असा काहीही पुरावा नव्हता. केला असेल तरी मोटीव्ह काय ? हॉस्पिटलच्या डॉक्टर्स नी चंद्राचा इलाज करण्यास नकार दिला ? पण ते हॉस्पिटल डोळ्यांचे ऑपरेशन करण्याचे नव्ह्तेच मुळी. काही तरी चुकतेय. पण नक्की काय हे कैलासला समजत नव्हते आणि त्याचमुळे स्वरा जी चौकशी करत होती त्यांत त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता. जे दिसत नाही ते तो पाहायचा प्रयत्न करत होता.

"तू शाळेंत गेल्यास का ? " त्याने चंद्राला विचारले.

"हो, मी ब्रेल वाचू शकते. " तिने सांगितले. तिच्या चेहऱयावर अजून उदासीनता होती.

इतक्यांत कैलासाच्या नजरेत तिच्या गळ्यांतील सुंदर लॉकेट गेले. एका काळ्या धाग्यांत एक क्रिस्टल बांधला गेला होता. "तुझे लॉकेट छान आहे." त्याने म्हटले. चंद्राच्या चेहेऱ्यावर हास्य आले. "हो आईने मी ५ वर्षाची असताना बनवले होते" तीने लॉकेटशी खेळ करत म्हटले. "लॉकेट तुझे रक्षण करतेय का ? " कैलासने थट्टेच्या स्वरांत विचारले. एव्हाना तिची आई असल्या गोष्टीं रस घेत होती हे स्पष्ट होते.

"मी स्पेशल शाळेंत जात होते ना तेंव्हा मी एकटीच अंध होती तिथे. इतर कुणी अपंग होते तर बहिरे. पण अंध कोणीच नाही. इतर सर्वजण माझी थट्टा करायचे. रंग म्हणजे मला ठाऊक नाहीत, मी चित्रपट पाहू शकत नाही, चित्रे रंगवू शकत नाही म्हणून मला सतत हिणवायचे. मी एक दिवस आईला रागाने विचारले कि मी अंध का आहे. का मला दिसत नाही. मी इतकी रागावले होते त्यावेळी, मला आई शाळेंतून न्यायला आली होती. मी जमिनीवरील एक दगड काढून तिला मारायचा प्रयत्न केला." चंद्रा अतिशय आवेगाने सांगत होती. ती इतकी पर्सनल गोष्ट आपल्याला सांगत आहे हे कैलासाला थोडे विचित्र वाटले. ती अंध असेल आणि दिवसभर घरांत एकटी असेल त्यामुळे कुणीतरी तिला बोलायला भेटला ह्यामुळे ती अशी बोलत असेल असे त्याला आधी वाटले पण त्याच वेळी वयांत आलेल्या अंध मुलीला पुरुष खरे तर संशयास्पद वाटायला पाहिजे होते.

"पण मी जेंव्हा वाकून काही उचलले, तेंव्हा हातांत दगड ऐवजी कसल्या तरी झुडुपाची फांदी आली. मी आईला तीच फेकून मारली" ती सांगत होती. लॉकेटचा आणि त्याचा संबंध काय ? तो विचार करत होता.

"आईनं फांदी पकडली आणि तिने मला सांगतले कि त्या झुडुपाच्या पानाला नेहमीच दोन फाटे असतात. लाखांत एखाद्या पानालाच तीन फाटे असतात. आणि त्या फांदीला त्यावेळी तीन फाटे असलेले पान होते. त्या पानांप्रमाणेच मी सुद्धा लाखांत एक आहे आणि तिच्यासाठी मी फार फार स्पेशल आहे असे तिने मला सांगितले आणि माझा राग कुठच्या कुठे पळून गेला." ती सांगत होती आणि कैलास अतिशय विस्मयाने ऐकत होता.

"मग आईने घरी येऊन ते पण एका क्रिस्टल मध्ये बंद केले. आणि माझ्या गळ्यांत घालायला दिले. त्यानंतर मी शाळेंत गेले तेंव्हा मुलांना मी हे सर्व काही सांगितले. मला वाटले हे सर्व ऐकून त्या मुलाना मी किती स्पेशल आहे हे समजेल. ती मुले माझी थट्टा करणार नाहीत." चंद्राने आवंढा गिळला.

कैलासने मनोविज्ञानाचा गाढ अभ्यास केला होता. एका पाच वर्षांच्या मुलीची मानसिकता तो ओळखत होताच पण त्याच वेळी इतर लहान मुले एखाद्या अंध मुलीविषयी किती निष्टुर होऊ शकतात हे सुद्धा तो जाणून होता त्यामुळे चंद्राला आणखीन अपमानाला सामोरे जावे लागले असेल असा त्याचा कयास होता. आणि तो बरोबर होता.

"मी इतर मुलांना सांगताच ती मोठ्याने हसली. ह्या क्रिस्टल मध्ये तीनपदरी पण नसून दोन पदरीच पण आहे असे त्यांनी मला सांगितले. वर माझी आई किती खोटारडी असे असे सुद्धा त्यांनी म्हटले" चंद्रा सांगत होती पण तिच्या डोळ्यांत अश्रू नव्हते, आवाजांत कातरता नव्हती.

"माझी आई खरेच खोटे बोलली का ? मी त्या क्रिस्टलला हातांत घेऊन खूप खूप विचार केला. मला दिसत नव्हते. कुणाला विचारावे का ? विचारले तरी लोक खरे सांगतील ह्याचा भरवसा काय ? पाच वर्षांची मी. विचार करता करता कितीतरी वेळ गेला. आणि नंतर लक्षांत आले कि अंधारात बुडालेल्या तिच्या मुलीला एका आईने एक प्रकाशाचा किरण दिला होता. त्या क्रिस्टल मध्ये खरेच कुठले पान होते हे महत्वाचे नव्हते. मला त्याचा किती आधार होता हे महत्वाचे होते. आज पर्यंत मी कुणालाही त्या क्रिस्टल बद्धल विचारले नाही. माझ्या आईला मी जशी ओळखते त्याप्रमाणे ती खोटे बोलणार नाही असा माझा विश्वास आहे. हा क्रिस्टल मला जगण्याची आशा देतो. ज्यादिवशी मला तो साक्षात्कार झाला त्या दिवशी पासून कुणीही मला आंधळी म्हटले काय किंवा आणखी काय म्हटले मला फरक पडला नाही.  " चंद्रा सांगत होती.

कैलासने लक्षपूर्वक चंद्राच्या गळ्यांतील क्रिस्टल कडे पहिले. तो काहीही बोलला नाही. चंद्राच्या शब्दांत जो खोली होती त्यातून त्याला नक्की तापसांत काय चुकतेय ह्याचा अंदाज आला होता.

कैलास तीव्रतेने बाल्कनीतून आंत गेला. स्वर लिहून घेत होतीच पण त्याने तीला थांबवले. "त्या तिन्ही डॉक्टर्स चा मृत्यू होणार हे तुम्हाला ठाऊक होते." कैलासने कमलाबाईकडे पाहत सरळ प्रश्न केला. स्वराला त्याची एंट्री आणि प्रश्न दोन्ही अजब वाटले. "होय" कमलाबाईनी म्हटले. "आणि तुम्ही ते मृत्यू रोखण्याचा प्रयत्न केला." कैलासने तिला पुन्हा प्रश्न केला. " कमलाबाईने हसऱ्या चेहऱ्याने होकारार्थी मान हलवली". तुझ्या चेहेऱ्यावर एखाद्या विजेत्या प्रमाणे भाव होते. "excuse me पण तू नक्की काय म्हणतोयस ?" स्वराने त्याला विचारले. खरे तर अश्या प्रसंगी स्वरा त्याला कोपऱ्यांत ओढून असले प्रश्न विचारात असे पण इथे कदाचित तिचा पारा चढला होता.

"कमलाजी, हे खून कुणी केली हे तुम्ही आम्हाला सांगू शकता काय ? " कैलासने स्वराकडे पूर्ण दुर्लक्ष करत तिला विचारले.

तिच्या चेहऱ्यावर एक उदासीनता पसरली. तिचा चेहरा पांढरा फटक पडला. तिने बोलायचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले नाहीत. तिने मान वळवून चंद्रा कडे पहिले. चंद्राला ती हाक मारायचा प्रयत्न करत होती पण तोंडातून काहीही आवाज न येत असल्याने चंद्राला ते समजले नाही. दुसऱ्याच क्षणी कमलादेवीच्या तोंडातून रक्त आले. स्वरा चपळतेने उठून तिने तिला पकडले. स्वरांचं चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. आणि प्रसंगसावधान दाखवून तिने १०८ डायल केला सुद्धा पण तो पर्यंत कमला देवी मृत झाली होती. जेव्हा चंद्राला ते समजले तेव्हा तिने हंबरडा फोडला. कैलास मक्ख पणे सर्व काही पाहत होता. स्वराच्या डोळ्यांतून सुद्धा काही अक्षरी आले पण तिने ते लपवायचा प्रयत्न केला. फॉरेन्सिक वाले येऊन सर्व पुरावे गोळा करून गेले. पोलिसांनी येऊन पंचनामा केला. कैलास आणि स्वराने आपली जबानी दिली.

"कैलास... " गाडीत बसल्या नंतर स्वराने कैलासाला प्रश्न केला.

"इथे नक्की काय घडले ?" तिने खरोखरीच्या कुतूहलाने प्रश्न केला होता. स्वराच्या आवाजांतील छोटे मोठे चढउतार सुद्धा आता कैलास समजू लागला होता. खरे तर स्वराने संपूर्ण तपासांत कैलासपेक्षा एक पाऊल पुढेच टाकले होते. त्याने फक्त स्वराकडे पहिले.

"चंद्राचे आता काय होईल ? ती आई शिवाय कशी राहील ?" स्वराने पुढील प्रश्न विचारला. "स्वरा .. चंद्राला काहीही होणार नाही. आणि काही मिनिट आधी तूच कमलबाईना अटक करायला पाहत होतीस ना ? " त्याने विचारले.

"हो, पण एखादी बाई अशी कशी अचानक मरू शकते? आणि तुला ती निर्दोष आहे असे का वाटले ? तुला चंद्राने काही सांगितले का ? " स्वराने विचारले.

"चंद्राने सांगितले नाही पण दाखवले" कैलासने गाडी फर्स्ट मध्ये टाकत स्वराला उत्तर दिले.

"चंद्राच्या गळ्यांत जो ताईत होता होता त्यांत नक्की कुठले पान होते हे महत्वाचे नाही. पण तो क्रिस्टल परिधान केल्यानंतर त्या ५ वर्षांच्या लहान मुलीच्या मनाला प्रचंड शांती लाभली. त्या ताईतात ती ताकत होती. अशी आख्याहिका आहे कि महाकालाच्या भक्त अश्या काही तांत्रिक असतात. त्यांना मृत्यूचे ज्ञान असते तसेच रक्षण करणारे मंत्र त्यानां अवगत असतात. चंद्राच्या गळ्यांतील ताईत अगदी त्या आख्याहिका प्रमाणे होता. अस्वलाच्या केसापासून बनवलेला धागा त्यांत वळेल अमेरहस्त नावाचा क्रिस्टल. तिच्या बेडरूम मधील भिंतीवर असणारे यंत्र दक्षिणमार्गी साधनेतील शिव मारण यंत्र इत्यादी सर्व काही ह्याच कडे इशारा करत होते कि हि महिला एक साध्वी असून त्या डॉक्टर लोकांचा मृत्यूपासून रक्षण करण्याचा प्रयत्न तिने केय आख्याहिका असेच सांगते कि जिथे बालकांचा मृत्यू होऊन जिथे त्यांना पुरले आहे तिथे ह्या साधना करतात.  पण ह्या साधनेची किंमत फार असते. जेंव्हा तिच्या सर्व तंत्राचा उपयोग झाला नाही तेंव्हा तो प्रयोग तिच्यावर उलटला. म्हणून तिचा मृत्यू झाला. ती आमची वाट पाहत नव्हती तर ती मृत्यूची वाट पाहत तिथे बसली होती".

स्वरा कैलासकडे भूत पहिल्या सारखी पाहत होती. "कुछ भी. " तिने कैलासाला झटकले.

मी सांगते काय झाले ते. "कमलाबाई एक ढोंगी तांत्रिक होती. तिने आपल्या काही तरी साधनेसाठी तिन्ही डॉक्टर्स चा खून केला. कदाचित आपल्या अघोरी साधनेने आपल्या मुलीचे डोळे परत येतील अशी तिची समजूत असावी. जेंव्हा पोलीस दारावर ठाकले तेंव्हा घाबरून तिने आत्महत्या केली."

कैलासने तोंड वाकडे करून स्वरा कडे पहिले.  "पण तिने डॉक्टर विशाखाला ४ फूट वर असलेल्या खिडकीतून फेकले ? डॉक्टर आपटे ह्यांना कदाचित तिने विष वगैरे देऊन रक्ताची उलटी करून मारले असेल पण डॉक्टर अलींना ? तिथे तर ती चांगले १५ दिवस गेली नव्हती. "

"राठोड साहेब कुठला रिपोर्ट स्वीकारतील असे तुला वाटते ?" तिने अतिशय समर्पक प्रश्न केला.

कैलास ने तिच्याकडे पहिले "you are right" असेच त्याने म्हटले. पण जन्नत हॉस्पिटल मधील खुनाची मालिका संपली असेल का असा प्रश्न त्याला पडला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel