इतर कोठें हरिजनांना नाहीं येऊं दिलें तरी तें एक वेळ मी समजेन, परंतु देवाजवळ येऊं देत नाहीं, हें मला समजतच नाहीं. लोक म्हणतात 'मंदिरांत तर नाहींच येतां कामा. मी म्हणतों, 'मंदिरांत तर आधीं येऊं दे. म्हणजे मंदिराला मंदिरत्व येईल.' देवाजवळ तरी सारे आपापले अहंकार विसरून जाऊं या. मी ब्राह्मण, मी पंडित, मी मोठा, मी श्रेष्ठ असले श्रेष्ठपणाचे बिल्ले छातीवर लावून देवाजवळ कशाला जातां ? तुमचे हें बिल्ले पाहून देव पळेल. देवासमोर सारे क्षुद्र किडे म्हणून उभे राहा. अहंकार धुळींत मिळवून उभे रहा.

आईला जेव्हां भेटावयाचें असतें, तेव्हां कोट, बूट, सूट हॅट घालून, किंवा पागोटें, उपरणें घालून आपण जात नाहीं. हा सारा जामानिमा बाहेर ठेवून आपण आंत जातों व आई आपल्या अंगावरून प्रेमानें थबथबलेला हात फिरविते. त्याचप्रमाणें देवाचा हात तुमच्या डोक्यावरून फिरावा असें वाटत असेल तर मी ब्राह्मण, मी सरदार, मी श्रेष्ठ, मी स्पृश्य या सर्व गोष्टीं दूर करून, मनावरचे हे सारे कपडे दूर करून केवळ उघडे होऊन जा. असें जोंपर्यंत करणार नाहीं तोंपर्यंत देव दूरच राहील.

मी दीड महिन्यापूर्वी अंमळनेरच्या कामगारांच्या सभेंत म्हटलें होतें 'कामगारासाठीं उपवास करावा, नाहींतर यात्रेच्या वेळेस हरिजनांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून करावा असें मनांत येत आहे.' या वर्षी यात्रेंत गडबड होणार असें लोक म्हणत होते. सानेगुरुजी गडबड करणार नाहीं. ते मुद्दाम तुमच्या मंदिरांत जा असें हरिजनांना सांगणार नाहींत. सानेगुरुजी उपवास करणार होते. परन्तु मी विचार केला. खेड्यापाड्यांतून सर्वत्र विचारप्रसार केल्याशिवाय मी उपवास कसा करूं ? बारा वर्षे खर्‍या धर्माचा प्रचार करूं दे. व मग वाटलें तर उपवास करूं दे.

महात्माजींनीं हरिजनांसाठीं प्राणहि पणाला लावले. महान् चळवळ त्या यशांतून निर्माण झाली. परन्तु अद्याप खेड्यापाड्यांतून हरिजनांबद्दल एखादेंहि व्याख्यान झालें नाहीं. मागें पुण्यास भरलेल्या हिंदुमहासभेनें हरिजनांबद्दल एक हजार व्याख्यानें देण्याचें ठरविलें होतें. परन्तु तो ठराव खोलींतच राहिला. हिंदुमहासभेचे झाडून सारे सेवक जर हरिजनकार्याला लागतील तर ती केवढी धर्मसेवा आहे ?

माणसांचीच वाण आहे. कांग्रेसचा प्रचार करावयास तालुक्याला सर्वस्वी वाहून घेतलेला एकेक इसम नाहीं. हरिजन कार्याला सर्वस्वी वाहून घेतलेला एकहि नवीन नाहीं. सत्कल्पनांचा ध्यास घेऊन त्या मी सर्वत्र वार्‍याप्रमाणें पसरीत जाईन असें म्हणणारे वेडे लोक फारसे नाहींत. उदार धर्माचा प्रचार करणारे शेंकडों नव कीर्तनकार, शेंकडों नव शाहीर, शेंकडों पुराणिक पाहिजे आहेत, परन्तु आहेत कोठें ?

समर्थांनीं एक हजार मठ स्थापिले. एक हजार प्रचारक गांवोगांव बसविले. आज सात लाख खेड्यांना सात हजार प्रचारक कमींत कमीं हवे आहेत. शंभर गावांना एक प्रचारक. म्हणजेच तालुक्याला एक. प्रत्येक तालुक्याला कांग्रेसप्रचारक, हरिजनसेवक, खादीसेवक, साक्षरताप्रसारक, असे लोक वाहून घेतलेले असतील तरच तालुक्यांत नवचैतन्य येईल.

हरिजनांना सार्वजनिक विहिरीवर पाणी भरूं देणें, मंदिरांत येऊं देणें, सभेंत सर्वत्र बसूं देणें म्हणजे अधर्म असें जें लोकांस वाटतें, तें दूर केलें पाहिजे. यानेंच माणुसकीचा खरा धर्म येईल, यानेंच देवाला आपण आवडते होऊं असें सांगितलें पाहिजे.

पुढच्या वर्षीच्या यात्रेत तरी श्री सखाराम महाराजांच्या जवळ हरिजनांना येऊं देतील का ? वाडीच्या मंदिरांत जाऊं देतील का ? देव पाहिजे असेल, धर्माचा गाभा पाहिजे असेल तर करतील. नाहीं तर ? नाहीं तर देवाच्या यात्रेऐवजीं सनातनी लोकांच्या अहंकाराची यात्रा भरत जाईल. पालखींत कोण ? सनातनींचा अहंकार. रथांत कोण ? सनातनींच्या अहंकाराची मूर्ति. आणि मग देव कोठें आहे ? देव दु:खानें दूर दूर दूर निघून गेला ! असेंच म्हणावें लागेल.
१६ मे, १९३८.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel