हिंदुस्थाननेंहि एक आवाज काढला पाहिजे. एक ध्येय, एक संस्था, एक झेंडा, एक राष्ट्र या भावनेनें सर्वांनीं पाहिलें पाहिजे, कृति केली पाहिजे. असें जर होईल तरच हिंदुस्थानला स्वराज्याची खरीखुरी तहान लागली आहे असें जगाला वाटेल. आपलीं दहा दिशांना दहा तोंडे राहतील तर गुलामगिरीचीच हौस हिंदुस्थानला आहे असें इंग्लण्डमधील मुत्सद्दी म्हणत राहतील.

डोंगरावर पडणारें पाणी नाना दिशांना वाहून गेलें तर प्रचंड नदी निर्माण होत नाहीं. तें सारें पाणी एका दिशेला जाईल तरच मोठा प्रवाह निर्माण होईल. कालवे, पाट, बंधारे येतील. शेतीभाती पिकेल. त्याप्रमाणेंच मतदारांच्या मतांची गंगा जर एका दिशेनें वाहील तरच कांहीं शक्ति उत्पन्न होईल. तरच सुख-समाधान उद्यां मिळण्याचा संभव.

स्वराज्य आम्हांला पाहिजे असें राष्ट्राध्यक्ष सुभाषबाबू म्हणतात. परन्तु त्यांनीं म्हणून भागणार नाहीं. सुभाषबाबूंचा हात एकट्याचा असेल तर त्या हाताला ब्रिटिश पकडतील व त्या हातांत हातकड्या घालतील. परन्तु त्या सुभाषबाबूंच्या हाताला चिकटलेले ३५ कोटि लोकांचे हात जर असतील तर तो हात वज्राचा होईल. त्या हाताला ब्रिटिश पकडणार नाहींत, तो हात आदरानें हातांत घेऊन स्वराज्य ठेवतील.

इंग्रजांना असें दिसलें पाहिजे कीं हिंदुस्थानांत अशी एक जबरदस्त संस्था उभी राहिली आहे कीं जिचा शब्द सर्वत्र झेलला जातो. राष्ट्राध्यक्षांची आज्ञा प्रांताध्यक्ष झेलतात. प्रांताध्यक्षांची आज्ञा जिल्हाध्यक्ष मानतात. जिल्हाध्यक्षांची आज्ञा तालुक्याचे काँग्रेस अधिकारी मानतात. तालुक्याच्या अध्यक्षांचा शब्द सारीं खेडींपाडीं पाळतात. कांग्रेसचें असें स्वरूप जेव्हां सर्वत्र दिसेल, त्या वेळेसच स्वराज्य जवळ येईल. त्या वेळेसच इंग्रज गंभीरपणें विचार करूं लागेल.

निवडणूक म्हणजे पोरखेळ नाहीं. जातपोत, नातगोत, चहाचिवडा, घोडागाडी नाहीं. ज्या ज्या वेळेस काँग्रेस निवडणुकीस उभी रहाते त्या त्या वेळेस ती स्वराज्याचा प्रश्न हातांत घेऊन उभी असते. त्या त्या वेळेस राष्ट्राची अब्रू हातांत घेऊन उभी असते. म्हणून मतदारांनीं ही गोष्ट लक्षांत घेतली पाहीजे. आपापल्या गांवचा कोणी उमेदवार कांग्रेसला विरोधी उभा राहिला असला तरी त्याला महत्त्व देतां कामा नये. सात लाख खेड्यांची अब्रू हातांत घेऊन कांग्रेस दारांत उभी असतां आपआपलीं गांवें तिच्यावरून ओंवाळून टाकलीं पाहिजेत. कांग्रेस नसेल त्या वेळेस माझें गांव, कांग्रेस उभी असेल तर सारीं गांवें तिच्या पायापाशीं असा देखावा दिसला पाहिजे.

सर्व मतदारांनो ! क्षुद्र भावाला, मनांत थारा न देतां एक विशाल राष्ट्रीय दृष्टि घेऊन उद्यां मतें द्यावयाला जा. मिरवणूक काढून मतें द्यावयास जा. पोळ्याच्या दिवशीं तुमच्यासाठीं कष्ट करणार्‍या बैलोबांचीहि कृतज्ञपणें तुम्ही मिरवणूक काढतां. बार वाजतात. वाद्यें वाजतात. मग कांग्रेसला मतें देतांना मिरवणूक कां नको ? झेंडा हातांत घ्या, वाद्यें वाजवा, शिंगें फुंका, टाळ मृदुंग घुमवा. पंढरपुरच्या यात्रेला निघतां तसें या स्वराज्याच्या यात्रेला निघा. उत्साहाचा समुद्र उचंबळूं दे. सर्वत्र एक दिव्य देशभक्तीचा हृदयंगम देखावा दिसूं दे. कांग्रेस शंभर टक्के यशस्वी होऊं दे. खानदेश सत्त्वपरीक्षेंत संपूर्णपणें उत्तीर्ण होऊं दे. म्हणा वंदे मातरम्, म्हणा कांग्रेसमाता की जय, भारत माता की जय !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel