आज आपण आपला असंतोष जगजाहीर करूं या. मंत्रिमंडळापर्यंत असंतोषाच्या लाटा जाऊन आदळूं दे. शेतकर्‍यांच्या दृढनिश्चयापुढें कायदे सारे बदलले पाहिजेत. शेतकर्‍याची सदिच्छा म्हणजे हिंदुस्थानचा कायदा झाला पाहिजे. शेतकर्‍याच्या जीवावर पोसणारीं सारीं बांडगुळें आज शेतकर्‍याला मातींत मिळवूं पहात आहेत. या बांडगुळांच्या शब्दांना मान ! खेड्यांना किती छळणार, पिळणार, लुटणार ? अंमळनेरा, हा अन्याय दूर कर.

टोलटॅक्सचें अंमळनेर म्युनिसिपालिटीला उत्पन्न मिळणार सोळा हजार रुपये. परंतु सरकारला कर्जफेडीसाठीं दाखविणार पांच हजार रुपये ? जें सव्वा लाखाचें कर्ज म्युनिसिपालिटी काढीत आहे, त्याच्यासाठीं टोलटॅक्सचें सर्व उत्पन्न लाविलेलें नाहीं. पांच हजार कर्जफेडीसाठीं, अकरा हजार इतर खर्चासाठीं ! म्हणजे वीस वीस वर्षें कर्जफेड व्हावयाला नको व टॅक्स कधीं जावयाला नको.

एकीकडे गटारांसाठीं म्युनिसिपालिटी कर्ज काढते व त्यासाठीं खेड्यांतील शेतकर्‍यांच्या मानेवर दगड ठेवते. गटारांसाठीं एक कर्ज काढलें, तर उद्यां रस्ते डामरी करण्यासाठीं आणखी कर्ज काढण्यांत येणार आहे असें ऐकतों. टोलटॅक्सच्या सोळा हजार उत्पन्नांतील पांच हजार ड्रेनेजच्या कर्जासाठीं, पांच हजार डामरी रस्त्याच्या कर्जासाठीं, उरलेलें पांच हजार आणखी तिसर्‍या एखाद्या कर्जासाठीं ! शेतकरी लुटा व कर्ज काढा !

आज खानदेशचें तोंड उजळ होत आहे. श्री. सखाराम महाराजांचा अंमळनेर तालुका उभा राहिला आहे. अंमळनेरच्या म्युनिसिपालिटीचें पाहून जळगांव म्युनिसिपालिटीनें चावटपणा सुरू केला आहे. परवां भुसावळ असेंच करील. अंमळनेर तालुक्यानें या अन्यायाला मान तुकविली, म्हणून सार्‍या तालुक्यांच्या बोकांडीं हा कर बसणार आहे. यासाठीं अंमळनेर तालुक्यावर जबाबदारी आहे, ती अंमळनेर तालुक्यानें उचलली पाहिजे.

खेड्यांतील शेतकर्‍याजवळ आज रोख एक दिडकी नसते. अंमळनेरची यात्रा यंदा किती मंदावली होती ! नि:सत्त्व झालेले शेतकरी यात्रेंत कशाला येतील ? टरबुज, खरबूज घ्यावयास दिडकी नाहीं, मुलाला खेळणें घेऊन देण्यासाठीं पैसा नाहीं. यात्रा कशाला भरेल ? यात्रा भरायला हव्या असतील तर शेतकरी सुखी केला पाहिजे.

गाडींतील शेतकर्‍याजवळ टोलटॅक्सला पैसे नसले म्हणजे नाकेवाले त्याची छत्री हिसकावतात. दुसर गाडीची सोडून घेऊं लागतात, पागोटें गहाण ठेव म्हणतात ! शेतकर्‍याच्या अब्रूचे कोण हे धिंडवडे, कोण हा शेतकर्‍याचा अपमान !

अमळनेर तालुक्यांतील तरुणांनो उठा ! अमळनेर तालुक्यांतील मायबहिणींनो उठा ! अमळनेर तालुक्यांतील सर्व शेतकर्‍यांनो, उठा ! हा अन्यायी कर दूर करावयास उठा. आज एकदां तुम्ही जिंकलेंत म्हणजे दुसरे अन्याय दूर करावयासहि तुमच्यांत ताकद येईल. आपण संघटित होऊन कांहीं करूं शकतों हा आत्मविश्वास एकदां अंगीं बाणला म्हणजे मग शेतकरी सर्व जगास भारी होईल. छळणार्‍या सर्व सत्तांना तो दूर करील.
२३ मे, १९३८.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel