सेनापति
सेनापति बापटांची एक विशेष भूमिका आहे. ते पक्षातीत आहेत. स्वातंत्र्यासाठीं कोणीहि उठो, त्याला ते नांवें ठेवणार नाहींत. इतक्या अभेदाच्या भूमिकेवरून स्वातंत्र्याचें रणशिंग फुंकणारा पुढारी फारसा आढळत नसतो. ते दोष दाखवतात, परंतु तिटकारा करीत नाहींत. ते कम्युनिस्ट बंधूंत जातात परंतु म्हणतात 'वर्गयुध्दांत श्रीमंत तेवढे वाईट व श्रमणारे सारे चांगले असें म्हणतां तें मला मान्य नाहीं. श्रीमंतहि सात्विक असतील व श्रमणारेहि नाठाळ असतील.' त्यांना अमुक एक वर्ग तमुक पंथ असलें कांहीं नाहीं. असा हा तेजस्वी अवलिया महाराष्ट्राच्या पुण्याईनें महाराष्ट्रांत वावरत आहे.

हैदराबादमध्यें स्टेट काँग्रेसनें सत्याग्रह सुरू केला आहे. बाहेरच्या सत्याग्रहींची जरूरी नाहीं, असें त्या काँग्रेसच्या अध्यक्षांनीं जाहीर केलें आहे. त्यांचें करणें त्यांच्या दृष्टीनें योग्य आहे. आपली भूमिका स्वच्छ ठेवण्यासाठीं त्यांनीं तसें पत्रक काढणें उचितहि होतें. केवळ बाहेरच्या लोकांच्या चिथावणीनें आंतील जनतेनें ही चळवळ सुरू केली नसून संस्थानांतील जनतेच्या हृदयांतून निघालेली ही स्वयंभू चळवळ आहे, हें त्यांना दाखवावयाचें होतें. त्यांचें कर्तव्य त्यांनीं केलें पाहिजे.

सेनापतींनीं ही गोष्ट जनतेला समजून दिली आहे. त्यांनीं पत्रक काढून सत्याग्रह सुरू ठेवलाच पाहिजे असें पटवून दिलें आहे. सेनापतींच्या पाठीमागें अवघ्या महाराष्ट्रानें उभें राहिलें पाहिजे. सेनापतींचा वाढदिवस साजरा करण्यांत आला. परंतु सेनापतींच्या पाठीमागें सेना उभी राहणार नसेल तर हे वाढदिवस काय कामाचे ?

आपण विवंचना करीत बसण्यांत अर्थ नाहीं. हृदय उचंबळून आलें म्हणजे माणूस चर्चा करीत बसत नाहीं. स्वातंत्र्याचा संग्राम हैदराबादमध्यें सुरू झाला. या वार्तेनें आम्ही नाचूं लागलें पाहिजे व तेथें नाचत गेलें पाहिजे. महाराष्ट्र नेहमी चर्चा करीत बसतो. कार्याची वेळ येतांच सारा उत्साह मेलेला असतो.

जुन्या इतिहासाचे पोवाडे गाण्यांतच आमचा पुरूषार्थ उरला आहे. सरदार वल्लभभाई एकदां म्हणाले, 'गुजराथला जुना भव्य दिव्य इतिहास नसेल तर गुजराथनें नवीन दिव्य इतिहास बनविला पाहिजे !' गुजराथ नवीन अहिंसक इतिहास रचीत आहे. बार्डोलीनें तेजस्वी इतिहास लिहिला. रासगांव स्वातंत्र्यांतील क्षेत्र बनलें. बोरसद तालुक्यानें नांव मिळविलें. आता राजकोट इतिहास रंगवीत आहे. महाराष्ट्राचें सारें अर्धवट. शस्त्रास्त्रांच्या चर्चा करीत बसतात. जवळ शस्त्र नाहीं म्हणून तो मार्ग बंद व नि:शस्त्र मार्ग पुळकट वाटतो. मग गुलामगिरीच्या गर्तेत का सडत बसणार ?

स्पेनच्या शेतकरी कामकरी लोकांच्या रिपब्लिकच्या मदतीस आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक हजारोंनीं गेले होते. दुसर्‍या देशाच्या स्वातंत्र्यासाठीं उचंबळून जाणारे ते पाश्चिमात्य तरुण कोठें व जवळ स्वातंत्र्याचें अभिनव असें नि:शस्त्र संगर रंगत असतां उदासीन राहणारे आम्ही करंटे कोठें ?

महर्षि सेनापतींचा शब्द महाराष्ट्रानें झेलला पाहिजे. ते मागतील तेवढे सत्याग्रही स्वयंसेवक त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजेत. मागतील तेवढा पैसा दरिद्री महाराष्ट्रानें श्रीमंत मनानें दिला पाहिजे. सेनापति महाराष्ट्राची सारखी परीक्षा करीत आहेत. १९३१ मध्यें त्यांनी मरणासाठीं तयार असणार्‍यांचीं नांवें मागितलीं होतीं. महाराष्ट्र नापास झाला. नंतर पुन्हां त्यांनीं प्राणयज्ञदलासाठीं नांवें मागितलीं. महाराष्ट्र गप्प. कदाचित् त्या दोन परीक्षा तुम्हांला मानवल्या नसतील. परन्तु आतां सोळा महिन्यांसाठीं सोळाशें स्वयंसेवक व त्यांचा खर्च ते मागत आहेत. एवढी मागणीहि जर महाराष्ट्राला पुरी करतां आली नाहीं तर महाराष्ट्रानें जगावें कशाला ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel