अरेरे वकील, डॉक्टरांनींही नकार द्यावयाला सुरुवात केली वाटतें ! तेदेखील शेतकर्‍यांची बाजू सरकारपुढें मांडावयास तयार नाहींत ना ! ते म्हणतात, 'असली उठाठेव आमच्याकडून होणार नाहीं बुवा ! आमचाच धंदा अलीकडे बसत चालला आहे. आहे कुठें आम्हांस वेळ. सावकार, जमीनदार हीं तर आमचीं मोठीं कुळें. आज आमची सारी मदार त्यांच्यावर आहे. तुम्हां शेतकर्‍यांचें गार्‍हाणें हातांत घेऊन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला तर ते आमच्यावर रागावतील. त्यांच्याशीं आमचा विरोध आला तर आम्हांस उपाशीच मरणाची पाळी यावयाची. तेव्हां त्या भानगडींत न पडलेलें बरें !'

'काय सांगूं शेतकर्‍यांनो !' शहरी शिक्षक म्हणतो, 'आमच्या लायब्ररीच्या पुस्तकांतून तुमचे फार गोडवे कवींनीं आणि लेखकांनीं गायिलेले आहेत. मी तीं पुस्तकें नेहमीं वाचतों. तुम्ही जगावर अनंत उपकार करून राहिलां आहांत. पण तुमची गार्‍हाणीं सोडवूं का शाळा चालवूं ! दोन वर्गांशिवाय समाज तरी चालावयाचा कसा ! आजच जर कर्ज रद्द करण्याची, सावकाराला जमीन घेऊं न देण्याची भाषा बोलूं लागलांत तर त्यांच्याशीं विरोध उत्पन्न होईल. त्यांचीं मनें दुखवतील. समाजांत सर्वांनीं प्रेमानें वागावें. सावकाराकडे कर्ज कमी करण्याकरितां मागणी करणें म्हणजे आपला मूर्खपणा आहे. त्यांनीं दिलेले पैसे परत करणें यांतच खरा चांगुलपणा आहे. नाहीं का ? त्यांना न दुखवतां तुम्हांला पैशाचें दु:ख कमी करतां येईल. सांगूं उपाय ? तुम्ही नीट शिक्षण घ्या. सज्ञान व्हा. शेती सुधारा, शेती करण्याचीं आतां नवीन साधनें निघालीं आहेत. तुम्हीं अगदींच अडाणी राहिलां आहांत, म्हणूनच तुमची ही अशी स्थिति झालेली आहे. पैसे कुठें खर्च करावे, कुठें नाहीं हें तुम्हांस समजत नाहीं. वेड्यावांकड्या, खुळ्या, भोळ्या, काल्पनिक व भ्रामक, सामाजिक आणि धार्मिक कल्पना तुम्ही उराशीं बाळगून बसलां आहांत. मुलांमुलींच्या लग्नांत भयंकर पैसा खर्च करतात. स्वत:जवळ पैसे नसले तरी 'कारण' मोठ्या प्रमाणावर साजरें करावें म्हणून पैसे कर्जाऊ आणतात. हंगामांत पैसे आले म्हणजे तमाशे व वेश्येपायीं सर्व खर्च करून टाकतात. आणि सर्वांत वाईट व्यसन म्हणजे दारूचें. तें तुम्ही सोडलें पाहिजे. तुम्ही अत्यंत घाणेरडे राहतां. म्हणून तुम्हांला वाटेल तसे रोग होतात. खेडें अस्वच्छ ठेवल्यानें थंडीताप सर्व लोकांना होण्याचा संभव असतो. अशा रीतीनें तुमचें जीवन सुधारा. विनाकारण सावकाराला त्रास देण्यांत काय अर्थ आहे ? पैशाचा योग्य तो उपयोग करावयास शिका. जास्त काटकसर करा. शिक्षण घेऊन सुशिक्षित व्हा.

शहरांतील नागरिकांना जर शेतकर्‍यांच्या दु:खाकडे लक्ष द्यावयास वेळ होत नाहीं तर मग सरकारी नोकरांची गोष्ट तर बाजूलाच राहिली. अभागी शेतकर्‍या, तुझें दु:ख तुलाच वेशीवर टांगलें पाहिजे. तुझ्या हांकेला शहरांतील लोक ओ देऊं शकत नाहीं. शेट सावकार तुझी बाजू सरकारपुढें मांडतील ही गोष्ट मला तर बुवा अशक्य कोटींतील वाटते. शहरांतील मध्यम वर्गास तुझ्या दु:खी व कष्टमय जीवनाचें खरें निदान काय आहे याची अंधुक कल्पना आहे, पण तो वर्ग स्वत:च्या उपजीविकेकरितां तुला खरी मदत करूं शकणार नाहीं. तुझ्या परिस्थितीचीं वरवर दिसणारीं कारणें सांगून मलमपट्टी करण्याकडेच तुझें लक्ष वेधीत आहे. शेतकरी अशिक्षित आहे, सामाजिक व धार्मिक चुकीच्या समजुती उराशीं बाळगून बसला आहे, पैशाचा उपयोग नीट कसा करावा हें त्याला समजत नाहीं. दारूपायीं भयंकर पैसा खर्च होतो वगैरे कारणांत थोडीशी तथ्यता, सत्यता आहे असें धरून चाललें तरी शेतकर्‍यांच्या हलाखीच्या परिस्थितीचें खरें कारण तें नाहीं. खरें कारण डोईजड झालेला शेतसारा व कर्ज. पैशाचा दुरुपयोग त्याच्याकडून कांहीं वेळां होत असेल. कर्जाचें ओझें वाढण्याला हा पैशाचा दुरुपयोग कांहीं अंशीं कारणीभूत होत असेल, अगदींच नाहीं म्हणतां येत नाहीं. पण शेतकर्‍यांची दारूबंदी करून, त्याला सद्वर्तनी बनवून त्याच्या कर्जाचा प्रश्न सुटणार नाहीं. शेतकरी सुशिक्षित झाला तरी कर्जाशिवाय त्याला शेती करितां येईल असें नाहीं.

कर्ज व शेतसारा ह्या गोष्टींच्या बाबतींत जर शेतकर्‍याला मदत झाली तर त्याचें जीवन खात्रीनें सुखकर होईल. मग त्याच्या जीवनांतील कमतरता अगर वाईट गोष्टी ह्या आपोआपच नाहींशा होतील. परन्तु खर्‍या कारणांकडे लक्ष न देतां त्यानें शिक्षण घ्यावें, धर्माचें स्वरूप नीट समजून घ्यावें, काटकसर करावयास शिकावें, असें जर सांगूं लागाल तर ह्या गोष्टी पूर्णपणें फलद्रूप व्हावयाच्या नाहींतच, पण त्याचें दु:खी कष्टमय जीवन हें कायम राहूं देण्याचें पाप शहरी मध्यम वर्गाला लागेल. प्रत्यक्ष खेड्यांत जाऊन शेतकर्‍यांच्या घरांत कांहीं दिवस रहा म्हणजे तुमचीं कारणें किती फोल आहेत हें कळेल. जीवनाला आवश्यक असणार्‍या गोष्टी व त्याचे व्यवहार कसे करावे हें त्याला चांगलें कळतें. त्याला लिहिता वाचतां येत नसेल. पण त्यावाचून त्याचें जीवन अडून बसलें आहे असें नाहीं. मला वाटतें कीं दारूचा प्रश्न हा सुध्दां शहराचा प्रश्न आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel