महात्माजींनीं मागें झेक राष्ट्रास असेंच अहिंसेनें लढावयास सांगितलें. आज ज्यूंना ते हेंच सांगत आहेत. परन्तु हें सर्वांत अधिक सांगण्याचा अधिकार त्यांना भारतीयांस आहे. या भारतभूमींतच हा संदेश अधिक आशादायी ठरण्याचा संभव आहे.

महात्माजींना 'नेहमीं विचारण्यांत येतें 'हिंदुस्थानवर कोणी स्वारी केली तर ? हिंदुस्थानच्या सरहद्दीचें काय ?' उद्यां स्वराज्य मिळाल्यावर हिंदुस्थानला इतर राष्ट्रांशीं जर लष्करी स्पर्धा करावयाची झाली तर अब्जावधि रुपये खर्चावे लागतील. देशांतील आर्थिक परिस्थिति सुधारण्यास बरींच वर्षे लागतील. परन्तु त्याच्या आधीं लष्करासाठीं आणखी कर बसवावे लागतील. जगाच्याच आंधळ्यांच्या मालिकेंत हिंदुस्थान बसणार का ? माणसांचीं पोटें कशीं फाडावीं हेंच हिंदुस्थानांतील लाखों लोकांस शिकवण्यांत येणार का ?

हें भेसूर चित्र आहे. सरहद्दीवर लाख लोक येणार्‍या परचक्रास तोंड देण्यासाठीं अहिंसक वृत्तीनें उभे राहतील का ? पुढें पंजाबांत अकाली शीख तसेच उभे राहतील का ? पुढें नंतर संयुक्त प्रांतांतील पांच लाख स्वयंसेवक मरणासाठीं पथकें पाठवतील का ? हिंदुस्थानांत सैन्य लागेल, परन्तु तें अहिंसेचें सैन्य. याच्यासाठीं सक्तीची लष्करभरती नाहीं. परन्तु आंतरिक माणुसकीची प्रेरणा हवी. या सैन्यासाठीं कारखाने नकोत, करभार नकोत. हिंदुस्थान परचक्रास अशा रीतीनें तोंड देईल. १० हजार वर्षांच्या त्याच त्या मानवी इतिहासानंतर एक नवीन पाऊल टाकलें जाईल.

महात्माजींसमोर हा प्रश्न आहे. प्रांतिक कां. सरकारांसमोर हा प्रश्न आज उभा आहे. गोळीबार करण्याची पाळी येते. अत्यंत भीत भीत व कमींत कमी करतां येईल तेवढाच गोळीबार करण्याची कांग्रेस सरकारें दक्षता घेतात. मुंबईला जर कां. मंत्री नसते तर गोळीबारांत दोघांनीं मरून भागतें ना; दोनशें मरते. कामगार ट्रामगाड्यांत मोफत घुसून लाल झेंडे फडकवीत होते. कांग्रेस सरकारानें अडथळा केला नाहीं. इतर मंत्री हें सहन करते ना. परन्तु तरीहि शेवटीं थोडा गोळीबार करावा लागला. कांग्रेस याची शेखी मिरवत नाहीं. जोंपर्यंत कांग्रेसजवळ अहिंसक स्वयंसेवकांचें पथक नाहीं, तोंपर्यंत अगतिक होऊन सहनशीलतेचा शेवटचा तंतु तुटला म्हणजे असें करावें लागतें. समजा, जर कोठें जमाव दगड मारूं लागला, तर त्या दगडांना आपल्या छातीवर व डोक्यावर घेऊन शांतपणें जमावाच्या क्रोधास तोंड देणारे सैनिक आमच्या जवळ हवेत. परन्तु आज कोठें आहेत ?

भावी हिंदुस्थानसमोर हे अनेक प्रश्न आहेत. महात्माजी ते प्रश्न सोडवण्याच्या चिंतेंत आहेत. अद्याप स्वराज्य मिळावयाचें आहें. मागें एकदां महात्माजींनीं लिहिलें होतें, 'मी पुन्हां दांडीमार्च जेव्हां सुरू करीन, त्या वेळेस मी दिलेली शिकवण देशाच्या जीवनांत किती मुरली आहे तें दिसून येईल.' आयुष्याच्या सायंसमयी स्वातंत्र्याचा शेवटचा संग्राम महात्माजी लढतील. त्यावेळेस ब्रिटिश लष्करी सत्तेसमोर उभे राहून मरा असा ते आदेश देतील. हा संग्राम, हा नवा दांडीमार्च पेशावर प्रांतांत का सुरू होईल ? त्या उंच भव्य पर्वतांच्या मुक्या अध्यक्षतेखालीं ती दिव्य मोहीम सुरू होईल का ? यासाठीं का त्यांनीं तेथें जाऊन आपली अहिंसेची बांसरी उत्कटपणें वाजविली ?

भविष्यकाळाच्या पोटांत काय आहे तें कोणास ठावें ? महात्माजींना लोक वेडा म्हणतील. वेड्यांनींच जगाला माणुसकी शिकविली आहे. आज ते नवदर्शन करीत आहेत. त्यांच्या शिकवणीचा पुढें महान् वृक्ष होईल व सारें जग त्याच्या शीतल सुगंधी छायेंत बसेल. महात्माजी उद्यां काय करतील तें मी कसें सांगूं ? 'मी उद्यां काय करीन तें मलाहि माहित नसतें' असें ते म्हणतात. ज्यानें स्वत:ला ईश्वराच्या हातांतील एक साधन केलें आहे त्या महात्म्याच्या मुखांतून असेच उद्गार निघणार. परन्तु महात्माजींच्या सरहद्द प्रांतांतील यात्रेंत उज्ज्वल भविष्य सांठवलेलें आहे, असें चिंतनशील मनास वाटल्याशिवाय रहात नाहीं.
५ डिसेंबर, १९३८.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel