कामगारांच्या चळवळीप्रमाणेंच किसानांच्याहि चळवळी होत आहेत. बिहारमध्यें लाखों किसान उठूं लागले, संयुक्त प्रांतांत जमीनदारांना तोंड देण्यासाठीं गांवोगांव किसानांच्या सभा झाल्या. मध्यप्रांतांत व मुंबई प्रांतांत किसानांनीं मोर्चे काढले. आज ठिकठिकाणीं किसान संघ स्थापन होत आहेत. किसानांच्या सभा होत आहेत. किसान संघटना करावयास शिकत आहे.

आणि तरुण विद्यार्थी. तेहि संघटित होत आहेत. राजबंदीदिन, हैदराबाददिन, स्वातंत्र्यदिन वगैरे अनेक प्रसंगीं विद्यार्थ्यांनीं आपली संघटना जागरूक ठेवली. राजकारणापासून आम्ही अलिप्त राहूं शकत नाहीं हें त्यांनीं दाखविलें. अनेक ठिकाणीं विद्यार्थ्यांचे संप झाले. आज राजकोटमध्यें तमाम विद्यार्थि स्वातंत्र्ययुध्दांत दाखल झाले आहेत. जो स्वातंत्र्ययुध्दांत भाग घेणार नाहीं, तो विद्यार्थीच नव्हे असें तेथें घोषिलें जात आहे. हैदराबाद संस्थानांतील शेंकडों विद्यार्थ्यांनीं वंदे मातरमसाठीं शाळात्याग केला आहे.

अशा रीतीनें कामगार, किसान व तरुण हे जागृत होत आहेत. या तिघांना एकत्र गोवणें हें महत्त्वाचें कार्य आहे. कामगारांच्या संपांत अनेक ठिकाणीं विद्यार्थ्यांनीं सहानुभूति दाखवली, मदत पाठवली. धुळें येथील टाळेबंदीसाठीं खानदेशांतील विद्यार्थ्यांनीं हरताळ पाडले. अमळनेरच्या शेतकर्‍यांच्या टोलटॅक्सच्या झगड्यांत ४० गांवचे शेतकरी येऊन दाखल झाले. असा हा एकजीव होत आहे.

अमळनेरच्या परिषदेंत हीच गोष्ट अधिक स्पष्टपणें दिसून येईल. आपण एक गोष्ट लक्षांत ठेवूं या कीं या आपल्या सार्‍या संघटना शेवटीं कांग्रेसच्या स्वातंत्र्ययुध्दाला प्रखर करण्यासाठीं म्हणून आहेत. त्या संघटना कांग्रेसविरोधी नाहींत. रोजचे प्रश्न सोडवण्यासाठीं व प्रचंड लढा उभा राहील त्या वेळेस एकजात त्यांत सामील होण्यासाठीं अशा संघटनांची जरूरच आहे.

या सर्व संघटना अहिंसक असूं देत तरच आपलें बळ वाढेल. अहिंसा म्हणजे शरणागति नव्हे, दुबळेपणा नव्हे. अहिंसा म्हणजे आपल्या रास्त हक्कासाठीं शांतपणें परंतु ध्येयाच्या तीव्रतेनें लढणें. आपली संघटना पोरकट असतां कामा नये. हुल्लड माजवणें म्हणजे संघटना नव्हे. संघटनेंतून सामर्थ्य निर्माण न झालें तर ती संघटना कसची ? वाफ कोंडून ठेवूं या. वाफ सारी सोडणें यात शक्ति नाहीं. कोंडलेली वाफ वेळ येतांच सोडूं तरच प्रचंड हालचाली होतील. शब्दांची वाफ दवडीत नका बसूं. परंतु मनात अपार निश्चय सांठवा. अधीर होतो तो दुबळा असतो. अधीरपणा हें दुबळेपणाचें लक्षण आहे. आपण क्षणाक्षणाला, उठल्याबसल्या अधीर नाहीं होतां कामा. सिंहाच्या अंगावर उंदीर उड्या मारतील, माशा नाचतील. सिंह शांत पडून राहतो. परंतु समोरून हत्ती आला तर गर्जना करून उठतो. नाग आपलें विष सांठवून ठेवतो. होतां होईल तों तो चावत नाहीं. परंतु एकदां फणा करून उभा राहिला म्हणजे त्याच्या नजरेला नजर देता येत नाहीं.

ही संयमाची अपार शक्ति आपण सांचविली पाहिजे. किसानांचा मोर्चा न्या. परंतु तो फळ मिळविल्याशिवाय मग परत आणूं नका. संप करा, परंतु मग यशाशिवाय खालीं वाकूं नका. पदोपदीं संप, पदोपदीं मोर्चे काढूं तर प्रतिकारशक्ति वाढणार नाहीं.

कामगार, किसान, तरुण संघटित होत आहेत याचें कांग्रेसच्या आत्म्यास वाईट वाटणार नाहीं. तुमची संघटना व्हावी म्हणून तर अधिकारस्वीकार. पूर्वीच्या अमदानींत सारीच भीति. ही भीति जावी व तुम्ही निर्भय होऊन उभें राहावें हाच अधिकारस्वीकारांतील मुख्य हेतु. ही सारी संघटना शेवटीं स्वातंत्र्यसंग्रामासाठीं उपयोगांत आणा म्हणजे झालें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel