हरिजनांसंबंधीं प्रश्नोत्तरें

प्रश्न :- कांग्रेसनेंच हें काम कां घ्यावें ?
उत्तर :- कांग्रेस सर्वांना माणुसकी देऊं पहाते म्हणून. वास्तविक सर्वच पक्षांचें हरिजनांची अस्पृश्यता जावी असें मत आहे. हिंदुमहासभेचे अध्यक्ष दे. भ. बॅ. सावरकर हे तर सहभोजनें करण्याचा हट्ट धरण्याबद्दल प्रसिध्द आहेत. परन्तु कांग्रेसनें हरिजनांसंबंधीं आग्रह दाखवला असतां त्या कांग्रेसचें अभिनंदन करावयास किंवा केसरीसारख्या पत्रांतून कांग्रेससंबंधीं गलिच्छ गैरसमज पसरवले जात असतां त्याचा निषेध करावयास ते उभे रहात नाहींत. हिंदुमहासभेचे प्राण हुतात्मा श्रध्दानन्द किंवा लाला लजपतराय सारे अस्पृश्यांचे कैवारी होते. श्रध्दानंदांनीं तर मंदिर-सत्याग्रह उचलला होता. त्यांनीं हरिजनांसाठीं दोन वर्तमानपत्रें चालविलीं होतीं. हिंदूंच्या संघटनेचें बिगुल वाजविणारे हरिजनांना माणुसकी मिळत नाहीं म्हणून चवताळून उठत नाहींत. कांग्रेसला मुसलमानधार्जिणी म्हणून शिव्या देणारे ती हरिजनांची बाजू घेऊन त्यांना हिंदु समाजांत माणुसकीचें स्थान मिळावें म्हणून झटते, तरीहि शिव्याच देतात ! नावडतीचें मीठ अळणी हेंच खरें. कांग्रेसजवळ दंभ नाहीं. इतर पक्षानीं ठराव करून दप्तरांत ठेवले. कांग्रेस आपले ठराव शक्य तितके प्रत्यक्ष सृष्टींत आणूं इच्छिते.

प्रश्न :- श्री तात्यासाहेब केळकरांनींहि सहभोजनांतून पूर्वी भाग घेतला होता का ?
उत्तर :- अहो, सारे घेतात. परन्तु बहुजनसमाजांत येऊन सांगण्याचें, शिकविण्याचें नैतिक धैर्य कोणासहि नाहीं.

प्रश्न :- हरिजनांची स्थिति सुधारली तर मृत गुरें नेण्याचें, भंग्याचें काम कोण करणार ?
प्रश्न :- ज्याला करतां येईल तो करील. आज शिंप्याचें काम शिंपीच करतो का ? शिक्षकाचें काम ब्राह्मणच करतो का ? दुकान चालवावयाचें काम वाणीच करतो काय ? आपापले वडिलोपार्जित धंदे सोडून किंवा वर्णाचे धंदे सोडून ज्याला जो करतां येईल तो तो धंदा मनुष्य करीत आहे. तसेंच समाजांत ज्याला भंगी-काम करतां येईल, ढोरें फाडतां येतील, मोटा शिवतां येतील, ते तीं कामें करतील. कामें अडून पडत नाहींत. ब्राह्मण लोकहि हल्लीं ढोरें फाडण्याचें काम करूं लागले आहेत व हें काम सेवेचें आहे, शास्त्रीय व पवित्र आहे, असें पटवून देत आहेत. अमक्यानें अमुक काम करावें असा आज निर्बंध वरचे वर्गांचे लोकांत उरला नाहीं. मग हरिजनांनाच तो नियम कां लावावा ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel