राष्ट्रीय सप्ताह
राष्ट्रीय सप्ताह सर्व हिंदुस्थानभर साजरा झाला. ठिकठिकाणीं चरकासप्ताह झाले. सभासद नोंद झाली. स्वयंसेवकदलें निर्माण झालीं. खादीविक्री झाली. फेर्‍या निघाल्या. झेंडावंदनें झालीं. सभा झाल्या. राष्ट्रीय सप्ताहांतील उत्साह सर्व वर्षभर आपणांस पुरला पाहिजे. महात्माजी दरवर्षी राष्ट्रीय सप्ताहाच्या आरंभीं उपवास करीत असत कीं काय तें मला माहीत नाहीं. परंतु या वर्षी ही वार्ता मी वर्तमानपत्रांतून वाचली व माझे अंत:करण भरून आलें. हा उपवास महात्माजींचा आहे. तो आमचातुमचा नाहीं. शेंगांच्या दाण्यांचा वा शिंगाड्याच्या शिर्‍याचा उपवास नाहीं. महात्माजींचा उपवास म्हणजे उपनिषद आहे. महात्माजी आज अत्यंत महत्त्वाच्या कार्यात मग्न आहेत. अहिंसेचा प्रचंड प्रयोग आज सुरू आहे. दहशतवादी लोकांची हिंसेवरील व अत्याचारावरील श्रध्दा उडाली आहे. या पूर्वहिंसावादी देशभक्तांच्या सुटकेचें कंकण त्यांनीं हातांत बांधलें आहे. आपलें जीवन हातांत घेऊन या थोर कार्यासाठीं तें उभे आहेत. काँग्रेस सरकारकडून ते अहिंसेचा अपूर्व प्रचार करूं इच्छीत आहेत. दारूबंदी करून कुटूंबांतील हिंसा ते दूर करूं पहात आहेत. समाजांतील दु:ख दूर करूं पहात आहेत. शिक्षण स्वावलंबी करून भारतीय बाळांना ते स्वतंत्र करूं पहात आहेत. दंगेधोपे झाले तर पोलीस व लष्कर उपयोगांत न आणतां, काँग्रेसचीं प्राणार्पण करणारीं अहिंसक सैन्यें ते उभीं करू पहात आहेत. हिंदुमुस्लीम ऐक्यासाठीं बॅ.जिनांजवळ पुन: प्रयत्न करीत आहेत. सूत कातणार्‍यास किमान आठ आणे खेड्यांत मिळावे असें सांगत आहेत. हरिजनांबद्दल काँग्रेस सरकारकडून व हरिजनसेवासंघाकडून अपार सेवा करवून घेत आहेत. महात्माजींनीं उपवास केला त्या दिवशीं भारताच्या शेंकडों प्रश्नाशीं ते एकरूप झाले असतील. भारतांतील विषमता, दास्य, दारिद्रय, रूढी, व्यसनें, आलस्य, अत्याचार, भेदाभेद, यांवर अहिंसक व सत्यमय मार्गानें कशी जोरानें चढाई करावयाची याचें त्यांनीं चिंतन केलें असेल. परमेश्वराला ते कळवळ्यानें म्हणाले असतील 'देवा, अहिंसेच्या व सत्याच्या मार्गानें भारताचें ग्रहण सुटावें म्हणून चाललेल्या नम्र प्रयत्नास यश दे.'

देशांत सेवेचे अनेक प्रयत्न चालले आहेत. मागें हरिजनांविषयीं महात्माजींनीं एकवीस दिवसांचा उपवास जेव्हां केला होता, तेव्हां नाशिकच्या तुरुंगांत त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी श्री.प्यारेलाल होते. महात्माजींनीं त्यांना पत्रांत लिहिलें होतें- 'मी उपवास कां करीत आहे ? श्रीमान् बिर्लाशेठ लाखों रुपये देतील. परंतु आध्यात्मिक भांडवल पाहिजे. आध्यात्मिक संपत्ति पाहिजे. माझ्या उपवासानें मी आध्यात्मिक भांडवल आणीत आहें.'

देशांतील हजारोंच्या सेवेंत आध्यात्मिक भांडवल महात्माजींच्या उपवासानें मिळत असतें. आध्यात्मिक भांडवल म्हणजे काय ? सत्य, अहिंसा, सहनशीलता, आशा, स्थिरता, सतत उद्योग, नम्रपणा, दंभराहित्य, इ.सेवेंत आणणें. अशा गुणांनीं युक्त होऊन लहानमोठे सेवाकार्यात जर तन्मय होतील तर काम झपाट्यानें वाढेल.

महात्माजींचा उपवास म्हणजे दिव्यता आहे. त्या दिवशींच्या त्यांच्या चिंतनांत काय असेल ! त्या चिंतनांत कोण डोकावूं शकेल, कोण शिरूं शकेल ? तें चिंतन अनंत सिंधूप्रमाणें व अनंत आकाशाप्रमाणें आहे. तें पवित्र, अति उदात्त व परम गंभीर आहे.

महात्माजींच्या या उपवासानें तुम्हांला स्फूर्ति नाहीं येत ? राष्ट्रीय सप्ताहाचें महत्त्व नाहीं कळत ? राष्ट्रभक्ति नाहीं समजत ? हरिजनसेवा नाहीं करावीशी वाटत ? हिंदु-मुसलमान प्रश्न मिटवावे असें नाहीं का वाटत ? खादी वापरावी असें नाहीं हृदय सांगत ? शेतकरी कामकरी यांची स्थिति सुधारावी असें नाहीं मनांत येत ? स्वदेशी नाहीं जवळ करतां येत ? स्वातंत्र्याची नाहीं तहान लागत ? अहिंसा, सत्य, ऐक्य, हीं नाहीं मनांत रुजत ?

महात्माजींच्या या उपवासानें जर तुमचें हृदय हलत नसेल तर तें हलविण्यास कोणती शक्ति आतां आणावी ?
१८ एप्रिल, १९३८

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel