साहना प्रभू

मुंबईतील आमच्या बिल्डिंग मध्ये एक हॉल `तेलगू समाजा`ने भाड्याने घेतला. त्या भागांत अनेक तेलगू लोक राहत असल्याने आणि बहुतेक उच्चशिक्षित असून त्याची मुले इंग्रजी शाळांत जातात आणि त्यांना तेलगू लिहायला वाचायला येत नाही. ह्या हॉल मध्ये एक प्रकारची सायंशाळा चालवायचा त्यांचा इरादा होता जिथे लहान मुलांना तेलगू भाषा, गीते शिकवली जातील, वृद्धांना येऊन चकाट्या पिटायला मिळतील आणि धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी करता येईल असा त्यांचा इरादा होता.

सर्व काही सुरळीत झाले. त्यांनी कायद्याला अनुसरून मराठी, इंग्रजी भाषेतील फलक लावला आणि त्याच बरोबर भला मोठा तेलगू भाषेतील फलकसुद्धा लावला. दरसंध्याकाळी आता इथे गर्दी जमायची तेलगू भाषेंत थोडा गोंगाट वगैरे व्हायचा पण कुणालाही त्रास झाला नाही.

एक दिवस मला कुणाचा तरी फोन आला. मी कुठल्या तरी मराठी संघटनेतर्फे बोलत असून आपल्या कार्यालयावर कन्नड भाषेतील बोर्ड आपण स्वतःहून काढून टाकावा नाहीतर परिणाम भोगायला लागतील इत्यादी इत्यादी. मी त्यांना तो फलक पूर्णपणे कायदेशीर असून मराठी भाषेतून सुद्धा लावला आहे आणि वर कुणाच्याही धमक्यांना घाबरून मी काहीही करणार नाही असे सांगितले. वर आपण येऊन भेटा आपल्याला नक्की काय समस्या आहे हे समजून आम्ही सामोपचाराने प्रकरणावर पडदा पडू असे सुचवले. (ह्या माणसाला काही पैसे वगैरे मिळतील असे वाटले कि काय ठाऊक नाही). दुसऱ्या दिवशी आमच्या घरी सुमारे १५ लोक आले. गाड्या, दुचाकी इत्यादी.

मुंबईत मराठीच बोलली गेली पाहिजे असा आमचा आग्रह आहे असे त्यांनी सांगितले. मी सुद्धा आपला उपक्रम स्तुत्य असून मी होऊ शकेल तो हातभार लावीन असे सांगितले. मग तो कन्नड बोर्ड का काढून टाकत नाही? असा पुढून सवाल आला. तेलगू बोर्डाने मराठी भाषेला धक्का पोचत नाही आणि सदर बोर्ड मराठीत सुद्धा आहे असे मी सांगितले. त्यावर "पण महाराष्ट्रांत तेलुगु  भाषेचं काय काम ?" असे काही जणांनी विचारले.

मग मी सुद्धा गुगली टाकली. "बोर्ड कायदेशीर असल्याने मी त्यांना तो काढायला लावू शकत नाही. पण विनंती जरूर करू शकते. त्याचवेळी आपण त्यांच्यावर दबाव टाकला किंवा जबरदस्ती केली तर मालक म्हणून प्रॉपर्टीचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे पोलिसांना वगैरे मला बोलवावे लागेल. पण आम्ही तडजोड करूयात. आपण विनंतीपूर्वक एक पत्र तेलगू समाजाला पाठवा. त्यांना मी मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी जवळच्या मराठी शाळेला देणगी द्यायला मी सांगते आणि त्यांच्या प्रत्येक रुपयाला मी माझ्या पदराचा रुपया मॅच करेन त्याच वेळी ह्या संपूर्ण फंड उभारणीचे श्रेय आम्ही तुम्हाला देऊ."

ही तडजोड ऐकून मंडळी थोडी विचारात पडली. पण मी पुढे बोलती झाले.

"पण त्याच वेळी मराठी भाषेवरील आपले प्रेम निर्भेळ आहे आणि तात्विक आहे हे सुद्धा तुम्हा सर्वाना सिद्ध करावे लागेल. त्यासाठी मी आणि आपण सर्व पुढच्या गल्लीतील मशिदीत जाऊ आणि तेथील मुहर्रम कमिटीला (त्या दिवसातून मुहर्रम होता), मुह्हर्रमचे सर्व बोर्ड उर्दू ऐवजी मराठीतूनच असावेत आणि उर्दू ह्या भाषेचे महाराष्ट्रांत काहीही काम नाही असे जाऊन लिखित स्वरूपात पत्र देऊया. पुढच्या गल्लींत ४ मशिदी होत्या."

इथे मात्र सर्व मंडळींचे चेहरे पांढरे फटक  पडले. "उगाच जातीय तेढ कशाला निर्माण करायची?" एकटा टवाळ बोलला. "उर्दूसुद्धा भारतीय भाषा आहे आणि मुस्लिम समाजाची भाषा आहे" दुसरा धिम्मी बोलला.

"मग तेलगू काय रशिया मधून आली आहे का ? " त्यांच्यातीलच एक पोरटा बोलला. नेता मंडळीने त्याच्याकडे वटारून पहिले आणि तो गांगरला.

"त्याचे बोर्ड फक्त मोहरम पुरते आहेत." नेत्याने टोंन बदलत म्हटले. ह्यावर मी उठून त्यांना हात जोडून नमस्कार केला. "आपले मराठी प्रेम खोटे असून जे घाबरतात त्यांनाच दटावयाचे ह्या न्यायाने चालू आहे. मराठी अस्मितेत आम्ही शिवाजी किंवा संभाजीसारख्यांना थोर मानतो. दरोडेखोरांना नाही. " असे म्हणून मी त्यांची बोळवण केली पण पुढे ऐकू आले माझ्या प्रश्नाने त्यांच्या ग्रुप मध्येच फूट पडली.

शब्दांकन : माझे. मूळ अनुभव आमच्या आत्याचा आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel