आशिष अरुण कर्ले
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे (नवी मुंबई)
९७६५२६२९२६ | ashishkarle101@gmail.com

औषधयोजनेची हाताळणी (हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन)

औषधयोजनेची हाताळणी हा व्यावसायिक दृष्टीने फार्मासिस्ट, रुग्ण आणि डॉक्टर यांच्या नात्यातील एक महत्वाचा भाग आहे.औषधयोजनेची हाताळणी ही पूर्णपणे फार्मासिस्टची जबाबदारी असते. हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन हे त्याच्या मुख्य कामांपैकी एक आहे.

औषधयोजनेची हाताळणी ही कला आणि विज्ञान यांचा सुरेख संगम आहे, हे पूर्णपणे फार्मासिस्टच्या कौशल्यांवर अवलंबून असते.

औषधयोजना प्राप्त करताना रुग्णाचे हसतमुखाने स्वागत करणे, त्याच्याशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण करणे व आपण त्यांच्या आरोग्यासाठी सदैव तत्पर आहोत याची जाणीव करून देणे याही गोष्टी औषधयोजनेच्या हाताळणीमध्ये महत्वपूर्ण आसतात.

औषधयोजनेची हाताळणी करत असताना असे कोणतेही हावभाव चेहऱ्यावर आणू नयेत जेणेकरून रुग्णाच्या मनात आजार अथवा उपचार याविषयी शंका,भीती निर्माण होईल.

औषधयोजनेमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यासंदर्भात डॉक्टरांशी चर्चा करून बदल सुचवावेत. रुग्णासमोर असे कोणतेही वक्तव्य करू नये जेणेकरून डॉक्टरांच्या व्यावसायिक कार्यप्रणालीवर आक्षेप होईल व त्यांच्या व्यवसायावर गदा येईल.

तसेच कोणत्याही औषध कंपनी तसेच डॉक्टरांची प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष पद्धतीने जाहिरात करू नये.

रुग्णाचे वय, लिंग, वजन यानुसार डोस बदलत असल्याने डोस कॅलक्युलेट करणे महत्वाचे असते.

आज सर्व औषधे ही कंपनीमध्ये पूर्वीपासूनच बनवली असल्याने औषधयोजना हाताळणी मधील औषधनिर्मिती हा भाग दिसून येत नाही. काही विशिष्ट औषधे जी बनवल्या बनवल्या वापरावी लागतात (freshly prepared) अशी औषधेच फक्त बनवावी लागतात.

औषध निर्मितीसाठी योग्य पद्धतीचाच वापर करणे गरजेचे असते. रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे असते. अशी पद्धत GMP (Good Manufacturing Practice) म्हणून ओळखली जाते.

औषधांचे पॅकिंग आणि लेबलिंग हा औषधयोजनेची हाताळणी यामधील एक महत्वाचा भाग आहे. बाहेरील वातावरणापासून औषधांचे संरक्षण व्हावे,औषधांची वाहतूक सोयीस्कर व्हावी , त्यांचे नुकसान होऊ नये , औषध कार्यकाळ टिकावा व योग्य वैद्यकीय परिणाम यासाठी पॅकिंग महत्वाचे असते तर लेबलिंग ही औषधाची ओळख असते यावर रुग्णाचे नाव, औषधाचे नाव, डोस, औषध वापरासंदर्भात सूचना, औषधनिर्मिती व औषध समाप्ती तारीख (Mfg Date and Expiry Date) यांचा समावेश असतो.

पॅकिंग व लेबलिंग झाल्यानंतर औषधयोजनेची किंमत करावी (Pricing of Prescription)

यामध्ये कमीत कमी व्यावसायिक आकारणी (मिनिमम प्रोफेशनल चार्ज) असावेत. तसेच यामध्ये जागा भाडे, वीज यांची आकारणी, इन्ग्रेडीएन्ट व कंटेनर यांची किंमत इत्यादी गोष्टींचा समावेश करावा. औषध योजनेची किंमत ही फार्मासिस्ट व रुग्ण दोघांनाही परवडणारी असावी. कमीत कमी नफा व अधिक चांगली वैद्यकीय सेवा पुरवणे हा नियम फार्मासिस्टने लक्षात ठेवावा. आज सर्व औषधे ही पूर्वीपासून बनवलेली असल्याने त्यावर छापील किंमत असते. फार्मासिस्टने अधिकतम विक्री मूल्य (MRP) पेक्षा अधिक किमतीने औषधे विकू नयेत.

योग्य औषध योग्य वेळी योग्य ठिकाणी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे आणि रुग्णांना चांगली आरोग्य सेवा पुरवणे हे आपले कर्तव्य आहे हे फार्मासिस्टने नेहमी लक्षात ठेवावे.

औषधयोजनेची किंमत (Pricing of Prescription) नंतर औषधाचे वितरण , रुग्ण-समुपदेशन करावे व वितरण केलेल्या औषधांची नोंद करावी.

वितरण केलेल्या औषधांची नोंद केल्यानंतर इथेच फार्मासिस्टचे काम संपत नाही तर

रुग्ण इतिहासाची नोंद करणे व औषधांचा रुग्णाच्या शरीरावर होणाऱ्या सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम यांचा अभ्यास करणे हीसुद्धा त्याची महत्वपूर्ण कामे आहेत.

सर्वसाधारणपणे औषधयोजनेची हाताळणी करताना पुढील क्रम वापरला जातो

१)औषधयोजना प्राप्त करणे (Receiving of Prescription)
२)औषधयोजनेचे काळजीपूर्वक वाचन करणे (Reading of Prescription)
३)डोस कॅलक्युलेट करणे (Dosage Calculation)
४)औषध निर्मितीसाठी आवश्यक घटक/साहित्य जमा करणे (Collection of Ingredients)
५)औषध बनवणे, पॅकिंग करणे आणि लेबलिंग करणे (Compounding Packing and Labeling)
६)औषधयोजनेची किंमत करणे (Pricing of Prescription)
७)औषधांचे वितरण आणि रुग्ण समुपदेशन करणे (Dispensing of Medicine and patient Counciling)
८)वितरण केलेल्या औषधांची नोंद करणे (Recording of Prescription)
९)रुग्ण इतिहास नोंद करणे तसेच औषधांचा रुग्णाच्या शरीरावर होणाऱ्या सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम यांचा अभ्यास करणे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel