निर्गुणा निर्विकारा ॥ शिवा कर्पूरगौरा ॥
व्यापुनी चराचरीं ॥ होसी प्रकृतीपरा ॥
अगणितकोटीलिंगे ॥ पुराणप्रसिद्ध बारा ॥
एक तरीं दृष्टीं पाहें । अन्यथा भूमीभारा ॥ १ ॥

जयदेवा नील कंठा सकलदेवां आदि श्रेष्टां ।
रंक मी शरण आलों ॥ निवारीं भवकष्टा ॥ धृ. ॥

सोरटीसोमनाथ ॥ जगीं एक विख्यात ॥
तयाच्या दर्शनें हो ॥ चुके संसारपंथ ॥
हिमवंतपृष्ठभागीं ॥ लिंगकेदार मुक्त ॥
साधुसंत सेविताती ॥ धरुनि कैवल्यहेत ॥ जय. ॥ २ ॥

उज्जयिनी नामपूरीं ॥ पवित्र सचराचरीं ॥
महाकाळ लिंग जेथें । धन्य जो पूजा करी ॥
ओंकारमहाबळेश्वर ॥ ज्योतिर्लिंग निर्धारी ॥
तयाच्या दर्शने हो जन्ममरण निवारी ॥ जय. ॥  ३ ॥

पश्चिमें लिंग एक ॥ जया नाम त्र्यंबक ॥
गौतमी उगम जेथें ॥ वाहे मंगलदायक ॥
दर्शने स्नान मात्रे ॥ पुण्यपावन लोक ॥
तैसाच घृष्णेश्वर ॥ सेवाळें रमणीक ॥ जय. ॥ ४ ॥

भीमेचा उगम जेथें । भीमाशंकर तेथें ॥
डांकिनी स्नान करिती ॥ लिंग म्हणती तयातें ॥
अगणित पुण्य जोडे ॥ चालतांची तेणे पंथें ॥
दक्षिणे रामेश्वर ॥ ज्योतिर्लिंग म्हणती त्यातें ॥ जय. ॥ ५ ॥

आवंढ्यानागनाथ ॥ देव आपण नांदत ॥
भक्त जन कुटुंबिया भुक्तिमुक्तिदायक ॥ प्रत्यक्ष लिंग जेथें परळीवैजनाथ ।।
हरिहर तिथें ॥ जन होत कृतार्थ ॥ जय. ॥ ६ ॥

श्रीशैल तो पर्वत ॥ लिंगरुप समस्त ॥
सभोवती नीळगंगा ॥ माजी श्रीमल्लीनाथ ॥
भूमीकैलास दूजा ॥ जन साक्ष दावीत ॥
साठिवरुपें वाट पाहे ॥ कृपाळुं तो उमाकांत ॥ जय. ॥ ७ ॥

धन्य हो काशिपुरी मणिकर्णिकातीरी ॥ विश्वेश्वरलिंग जेथें ॥
जीवमात्रा उद्धरी ॥ तारक ब्रह्ममंत्र ॥ जपे कर्णविवरी ।
तेणेंची मोक्षपद ॥ प्राप्त होय निर्धारी ॥ जय. । ८ ॥

येऊनियां संसारा ॥ माजी ज्योतिर्लिंगें बारा ॥
एक तरी दृष्टीं पाहें ॥ अन्यथा भूमिभारा ॥
विश्वेश्वर विश्वनाथ ॥ भावभक्ति निर्धारा ॥
नामया श्रीशिवदास ॥ ध्याय परात्परा जयदेवा नीलकंठा ॥ ९ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel