शुद्ध सतेज बुद्धी
शुद्ध बुद्धी हीच सर्वांत मोठी देणगी आहे. ज्ञान ब्रह्म. ब्रह्म म्हणजे सर्वांत मोठी वस्तू. सर्वांत मोठी वस्तू म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजेच परमेश्र्वर. अशी सुंदर व्याख्या ज्यांनी केली त्यांचे किती उपकार ! महंमद पैगंबरही एकदा म्हणालेः “सृष्टीचे नीट निरीक्षण करणाराने नमाज म्हटला नाही तरी चालेल.” कारण ज्ञानमय प्रभूची तो सारखी प्रार्थनाच नव्हता का करीत ! सृष्टीच्या निरीक्षणानेच ज्ञान स्फुरते. अरबस्तानातील रात्रीच्या वेळेच्या अत्यंत शांत आकाशाखाली उभे राहून विश्वाशी एकरुप होऊनच महंमदाने ज्ञानाचा आवाज ऐकला.

वेदांतील सर्वात पवित्र मंत्र म्हणजे गायत्री मंत्र. त्याला का पावित्र्य ? कारण त्यात स्वच्छ बुद्धीची मागणी आहे. सूर्याजवळ अंधार नाही; त्याप्रमाणे माझ्या बुद्धीजवळ अंधार नसो; अशी थोर प्रार्थना त्यात आहे. बुद्धी सतेज असावी. सर्वत्र खोल घुसणारी नि प्रकाश आणणारी अशी असावी. कारण स्वच्छ ज्ञानप्रकाशाहून अधिक पवित्र काय ? ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही प्रार्थना गायत्री मंत्राच्या पोटातूनच निघालेली आहे.

मर्त्याने अमर्त्याची उपासना करावी
सर्वांच्या कल्याणाची इच्छा असेल तरच असत्याकडून सत्याकडे जाता येईल. मारणमरणातून चिरंजीवाकडे-स्थिर जीवनाकडे जाता येईल; अंधारातून प्रकाशाकडे जाता येईल. म्हणून असत्य नको संकुचितता नको; “भूमा स्याम-आपण मोठ्या द्दष्टीचे व्हायला हवे” असे ऋषी म्हणतो.

“अद्या मरीय यदि यातुधानोऽस्मि- मी राक्षसी बुद्धीचा असेन तर मरु दे ताबडतोब मला.” कारण जगून काय करायचे? मर्त्य माणसाने अमर्त्य जे आहे त्याची पूजा करावी. अमर्त्य काय आहे? त्या त्या माणसात जे चैतन्य आहे ते अमर्त्य आहे. व्यापक असते ते अमर असते. सत्य अमर असते. त्याची आपण पुजा करावी. अमर असा प्रकाश उत्तरोत्तर विकसित होत मानव जातीला मिळत आहे, त्याची आपण उपासना करावी. तो जो ज्ञानाग्नी प्राचीन काळापासून पेटत येत आहे. त्याची आपण मर्त्यांनी आपल्या जीवनात पूजा करावी. तरच यश मिळेल. तो समाज वैभवाकडे जाईल.

प्राचीन ऋषींनी असे थोर थोर विचार दिले. मी एकटा बसलो म्हणजे मला हा विचार आठवतो, मी उचंबळतो. मी एकटा असलो म्हणजे तेथेच डोके वाकवून त्या प्राचीन ज्ञात-अज्ञात ज्ञानेश्र्वरांना मी वंदन करतो. माझी ती थोर दैवते आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel