सोन्याचा दिवस १
ती पतीची वाट पहात होती. आज पगाराचा दिवस. वास्तविक तिला आनंद झाला पाहिजे होता. परंतु ती सचिंत होती. तिनें मुलांना भाकर दिली. तिनें त्यांना आज लवकर निजविलें. फाटकी घोंगडी त्यांच्या आंगावर घातली. प्रेमाच्या हातानें थापटून त्यांना ऊब दिली. झोपी गेलीं ती निष्पाप कोंकरें, झोंपी गेली ती अल्लड खेळकर पांखरें.

घरांत तिच्या निराश आशेप्रमाणें एक दिवा मिणमिण करीत होता. निराशेंत थोडी आशा, अंधारांत थोडा उजेड. ती दार उघडून मध्येंच बाहेर पाही, पुन्हां दु:खानें आंत येई. तिनें कांही खाल्लें नाहीं. तशीच ती बसली होती. अश्रूंची जपमाळ ती जप्त होती. देवाला मध्येंच प्रार्थीत होती. इतक्यांत दार धाडकन् उघडून कोणी आंत आलें. ते भूत होतें कीं पिशाच्च होतें ? तें तिचें मंगल सौभाग्य होतें. ती पुढें आली. झेपा खाणार्‍या सौभाग्याला तिनें आधार दिला. परंतु त्यानें ताडकन् थोबाडींत मारली. ती एकदम भिंतीवर आपटली. त्यानें पुन्हां मारली थोबाडींत. पायानें लाथ मारली. ती खालीं पडली. उपाशीं होती ती. तिला मूर्छा आली. तिच्या कपाळांतून रक्त वाहत होतें.

तो तेथें एका आंथरुणावर बसला. त्याच्या हाताला तें रक्त लागलें. त्याची धुंद उतरली. तो खिन्न झाला. आंधरुणावर त्यानें आंग टाकलें. त्याला झोंप लागली.

पहांटेचा थोडा गार वारा आला. ती सती जागी झाली. ती उठली कशीबशी. तिनें रक्त पुसलें. केस नीट केले. पति आंथरुणावर कसा तरी पडला होता. ती त्याच्याजवळ गेली. त्याचें डोकें तिनें एका फाटक्या उशीवर नीट ठेवलें. त्याला नीट निजविलें. त्याच्या आंगावर एक पांघरुण घातलें. किती झालें तरी तो तिच्या मुलांचा पिता होता. ती आपल्या पिलांजळ गेली. तीं निष्पाप मुलें निजलीं होतीं. आईची विटंबना त्यांनी पाहिली नाहीं, म्हणून तिला समाधान वाटलें. त्या झोंपलेल्या कळ्यांचे तिनें मुके घेतले. ‘निजा हां राजांनो’ असें ती म्हणाली.

या हिंदुस्थांनात दारुपायीं अशीं लाखों घरें दु:खांत आहेत. या दारुमुळें घरोघर ढाळलेले अश्रू जर एकत्र करतां आले असते तर त्यांचा एक महान सागरच बनला असता. दारुपायीं किती आयाबहिणींची अब्रु जाते, मुलांची केविलवाणी दशा होते, हें लेखणीनें किती लिहावें ? वाणीनें किती सांगावे ?

दारुपायीं ५६ कोटी यादव मातींत गेले. आणि आज ३५ कोटी लोकांचा देश भिकेस लागला आहे. हिंदुस्थानांत जनतेचे दारुपायी ६० कोटींवर रुपये जातात ! हिंदूस्थानांत दारु बंद करणें म्हणजे जनतेला ६० कोटि रुपये देणें. मुंबई प्रातांत सर्वत्र दारुबंदी होईल तेव्हां मुंबई प्रांताचे जवळ जवळ ७ कोटि रु. वाचतील. तहशील कमी केला तर एक कोटि कमी होईल. परंतु दारुबंदी केली तर जनतेचे ७ कोटि रुपये शिल्लक राहतील व हे समाजांत खेळूं लागतील. अप्रत्यक्ष रीत्या व्यापार वाढेल, लोक थोडे अधिक सुखी होतील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel