कामगारांनो, तुम्हीहि तयार रहा. जर कां. ला शेवटीं लढा पुकारावा लागला तर तुमचें कर्तव्य स्पष्ट आहे. राष्ट्र आठवा; बाकी सारें विसरा. हिंदुस्थान दुनियेच्या मागें न राहो. कामगारांना जगांतील राजकारण समजतें. त्यांनी आधीं उठाव केला पाहिजे.

विद्यार्थ्यांनो, तुम्ही तर उद्यांचे विचारदाते. उद्यांचा भविष्यकाल किसान व कामगार यांच्यात मिसळून तुम्हीं निर्माण करणार. किसान व कामगार उठत आहेत. ते उठले म्हणजे तुम्हींहि मागें रहातां कामा नये.

जे जे तरुण असतील त्यांचीं हृदये उचंबळली पाहिजेत. मेघांचा गडगडाट होऊं लागतांच मोर आपला भव्य पिसारा उभारतो, नाचूं लागतो. काँग्रेसची मेघगर्जना होतांच तरुणांच्या हृदयांतील शुध्द व नि:स्वार्थ भावनांचा पिसारा उभा राहिला पाहिजे. तरुण सर्वत्र विजेसारखे तळपूं लागले पाहिजेत.

आणि भगिनी का मागें राहतील ? केमालपाशाला म्हातार्‍या तुर्की मायबहिणींनीं मदत केली. चीनमध्यें हजारों स्त्रिया राष्ट्रासाठीं मरत आहेत. भारतांत--या प्रिय हिंदुस्थानांत तोच देखावा दिसला पाहिजे. काँग्रेसनें जर हांक मारलीच तर तुम्हीहि कडेवर मुलें घेऊन स्वातंत्र्यार्थ उभ्या रहा. देशाचें मुख उज्ज्वल करा. हिंदुस्थान दुनियेच्या मागें नाहीं हें दाखवून द्या.

आज भारतांत शांति आहे. परंतु ही ज्वालामुखीची शांति आहे, आज सागर शांत आहे. परंतु ही प्रचंड वादळापूर्वीची शांति आहे; आजच्या या शांतीतून काँग्रेसचा आदेश येतांच प्रचंड वणवा पेटेल; प्रचंड लाटा उसळतील. आजचें शांत असलेलें भारतीय चक्र गरगर फिरूं लागेल. त्या गरगर फिरणार्‍या चक्रांतून नवभारताचा आकार वर दिसूं लागेल. भारतीय स्वातंत्र्याचा मुखवटा वर आलेला दिसेल. म्हणून बंधुभगिनींनो सावध, सावध; त्यागाला तयार रहा. बलिदानाला तयार रहा. मरणास तयार रहा. आपणांस बलिदानाची केव्हां संधि येते तिची वाट पाहत रहा. हृदय उचंबळून येऊन अपरंपार त्याग केव्हां हातून होईल यासाठीं उत्सुक रहा. देशाचें दुर्दैव संपो; दास्य जावो. भारताचें मुख भारतीयांच्या अपार त्यागानें लौकरच स्वातंत्र्यश्रीनें शोभो. प्रचंड होमकुंड पेटणार आहे. त्यांत शांतपणें आहुति टाकण्यास तयार रहा.
‘ वंदे मातरम् ‘
--वर्ष २, अंक २५.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel