आरंभ मासिकाचा पहिला वाहिला दिवाळी अंक वाचकांपुढे आणताना मला अत्यंत आनंद होत आहे. जेंव्हा जगांत औद्योगिक क्रांती होत होती तेंव्हा आपला देश त्यांत भाग घेऊ शकला नाही आणि त्यामुळे अठरा विश्वे दारिद्र्य आमच्या नशिबात आले. पण २०१८ मध्ये सुदैवाने स्तिथी फार चांगली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांत आमच्या देशाने इतर गरीब देशांच्या तुलनेने फार चांगली प्रगती केली आहे. आज जवळ जवळ प्रत्येक देशवासियाकडे फोन आहे आणि क्षणार्धांत जगाची सर्व माहिती त्याच्या हातांत उपलब्ध आहे. ह्या नवीन क्रांतींत भारतीय फक्त भाग घेणार नाहीत तर जगांत आघाडीवर सुद्धा राहणार आहेत.
आरंभ मासिक आम्ही सुरु केले ते ह्या जाणिवेनेच. ह्या नवीन जगांत पुस्तके आणि मासिके सामान्य माणूस फोन वरच वाचेल. म्हणूनच आरंभ हे मासिक फोन ऍप्प म्हणून उपलब्ध झाले. पण ह्या नवीन युगांत फक्त वाचक मंडळी बदलली नाही तर लेखक मंडळी सुद्धा बदलली आहे. आता लेखकी होण्यासाठी तुम्हाला कुर्ता पायजमा घालून तास तास बसून लेखन करायची गरज नाही. आपलया संगणक आणि फोन द्वारे आपण लिहू शकता तसेच आपल्या विषयावर संशोधन करण्यासाठी संपूर्ण जगाची माहिती आपल्या तळहातावर उपलब्ध आहे. अश्या सोयीमुळे अनेक व्यक्ती आज काळ विपुल लेखन करतात आणि अश्या लेखकांना एक व्यासपीठ मिळावे म्हणून आम्ही मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहोत. Bookstruck.in ह्या आमच्या संकेतस्थळावर कोणीही लिहू शकतो आणि लक्षावधी वाचकाकडे काही मिनिटांत पोचू शकतो. आमची शेकडो Apps संपूर्ण देशांत अत्यंत लोकप्रिय आहेत.
आरंभ मासिक ह्याच वाचक आणि लेखक मंडळींच्या सहकार्याने सुरु झाले आणि आज आम्ही सर्वप्रथम आमचा दिवाळी अंक वाचकांच्या हातांत ठेवत आहोत. ह्या अंकाला आपल्या पर्यंत पोचवण्यासाठी अनेक स्वयंसेवक मंडळींनी अपार मेहनत घेतली आहे. खऱ्या अर्थाने आरंभ एक -मासिक आहे कारण आम्ही बहुतेक स्वयंसेवकांनी एकमेकांना पाहिले सुद्धा नाही. सर्व काम इंटरनेट वरूनच झाले आहे. त्यामुळे आरंभ मासिक हे अतिशय नाविन्यपूर्ण सुद्धा आहे. नेहमीच्या धाटणीचे लेख ना टाकता होतकरू लेखकांची विविधतेने नटलेले, आधुनिक प्रकारचे साहित्य इथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मराठी भाषा जगातील सर्वांत जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहेच पण त्याच वेळी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्यात सुद्धा अग्रेसर आहे हेच आम्ही सिद्ध केले आहे.
आमच्या वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा !
संपादक
अक्षर प्रभू देसाई