गोपाल खाडे
जि.प.विद्यालय कामरगांव ता.कारंजा लाड जि.वाशिम
 
रात्रभर पैशांचा चुराडा करीत
त्यांनी फोडलेल्या फटाक्यात
आम्ही शोधतो न फुटलेले फटाके
पुन्हा फोडण्याकरीता.....
क्वचित सापडतो एखादा
तेव्हा सिकंदराच्या अविर्भावात
हजारो फटाके फोडल्याचा आनंद
आमच्या चेहऱ्यावर पसरतो .....
आमची माय रडते ढसाढसा
पदराआडून केविलवाणी.....
पाण्यात भाकरी कालवून
वाढते आमच्यासमोर .....
शेजारच्या टोलेजंग वाड्यातून येणाऱ्या
शेव करंज्यांचा खमंग वास
आम्ही तोंडी लावतो भाकरीसोबत .....
त्याचवेळी आमचा संवेदनशून्य बाप
दारूत धुंद होऊन घरी येतो .....
सगळे सण दिवस रंगपंचमी मानून
दारूत तर्र होणे हा
त्याचा जन्मसिद्ध हक्क ......
याउलट माया मायचं मंगळसूत्र
दरवर्षी क्रमाक्रमानं घटतयं
अगदी तिच्या शरीराप्रमाणं...
अंधारात...
चाचपडत...
लेकरांसाठी...
प्रकाशासाठी...

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel