टडींग टिंग...
मोबाईल मध्ये मेसेज ट्यून वाजली. ओहो, झोपताना तो घरातले आणि मोबाईलमधले वाय फाय बंद करायचे विसरला होता...
"बघू कुणाचा मेसेज?" म्हणून त्याने मोबाईल उचलला कारण आता नाहीतरी झोप उडालेली होती.
त्याने झोपण्यापूर्वी व्हॉट्सऍपच्या आधी एक "अन्नोन चॅट" (अनोळखी गप्पा) हे ऍप नुकतेच डाऊनलोड केले होते पण ते बंद करायचे तो विसरला होता.
त्यातच कुणाचा तरी मेसेज आला होता. मुलगी होती ती!
"एकटीच_मी" या टोपण नावाने चॅट करत होती. तिनें "हाय" केलं.
याने "तुझाच_मी" हे टोपण नाव टाकले आणि "हॅलो" केलं.
एकटीच_मी: "झोप येत नाही. मी एकटीच आहे मारतोस का गप्पा माझ्याशी?"
तुझाच_मी: "नक्की मारूया की गप्पा! पण तु मुलगी आहेस ना? आणि आता एकटी आहेस ना? कारण बहुतेक वेळेस अशा अनोळखी गप्पांमध्ये मुलींचे नाव टाकून मुलंच गप्पा मारतात आणि गंमत करतात"
एकटीच_मी: "मी मुलगीच आहे! आणि आता एकटीच आहे. आणि तसं पाहिलं तर प्रत्येक जण या जगात एकटाच असतो रे....ते जाऊ दे! मी मुलगी आहे हे तुला पटल्याशिवाय तू काही पुढे गप्पा मारणार नाहीस. तर मला सांग मी मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी मी नेमकं काय करू?"
तुझाच_मी: "सरळ सरळ व्हिडिओ चॅट कर म्हणजे प्रश्नच नाही येणार"
एकटीच_मी: "वाहरे! अगदी सुरुवातीलाच एकदम व्हिडिओ चॅट करायला सांगतोस? थोडी एकमेकांची ओळख तर होऊ देत! मी असे करते, तुला माझा एक छान फोटो पाठवते. विश्वास ठेव माझ्यावर, मी मुलगीच आहे!"
लगेच समोर एक फोटो आला, त्या फोटो मधली मुलगी अतिशय सुंदर दिसत होती. दिवसा काढलेला तो एक सेल्फी होता आणि तिने अतिशय आकर्षक कपडे घातले होते. तिचे लांब केस तिने मोकळे सोडलेले होते, चेहऱ्यावर स्मितहास्य होते आणि खोल गळ्याच्या तंग टीशर्ट मधून तिच्या छातीवरचे उभार बरेचसे दिसून येत होते.
एकटीच_मी: "बघा बघा कसा चेहरा उजळला एका मुलाचा आणि चेहऱ्यावरचे रंग कसे उडाले! आणि कशी धडधड वाढली माझा फोटो पाहून! एकदम "घायल पार्ट 3". अगदी इथपर्यंत ऐकू आली मला तुझे हृदयाचे वाढलेले ठोके! धक धक.. धक धक.."
तुझाच_मी: "तुला कसं कळलं गं?"
एकटीच_मी: "अरे गम्मत केली, सगळ्या मुलांची हीच हालत होते मला पहिल्यांदा या फोटोत बघतात तेव्हा!"
तुझाच_मी: "असं का? सगळ्या मुलांची? म्हणजे आणखी किती बॉयफ्रेंड्स आहेत तुझे? आणि स्वतःच्या सौंदर्याचा एवढा अभिमान बरा नाही! बरं, जाऊ दे! सुंदर मुलींना असं सांगणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी!! बरं एक सांग, आता तू काय करते आहेस? म्हणजे एकटी आहेस हे नावावरून वाटतंय पण नेमकी तू कुठे आहेस? कोणत्या शहरात राहतेस? खरंच तू एकटी आहेस का?"
एकटीच_मी: "अरे हो हो. किती वेळा सांगू की मी खरंच एकटी आहे आणि अजून आपली पुरती ओळखही नाही आणि मला माझ्या बॉयफ्रेंड्स बद्दल विचारायला सुरुवात? इतका पझेसिव्ह? आतापासूनच? मी विचारलं का तुला तुझ्या गर्लफ्रेंड्स किती म्हणून? आणि बरं का, जसा तू आता एकटा बसला आहेस ना, बेडवर पांघरूण घेऊन आणि लोडला टेकून लांब पाय करून, तशीच मी पण मऊ चादर पांघरून लोळले आहे माझ्या मऊ मऊ बेडवर...पण चादरीच्या आतमध्ये मात्र....!!!"
मनोजच्या अंगातून वेगाने एक भीतीची जोरदार लहर पायापासून मस्तकापर्यंत गेली.
हिला कळलं तरी कसं?
हिला मी दिसतोय की काय आणि कसा?
दोन क्षण त्याला काही सुचलेच नाही आणि मोबाईल हातातून बेडवर गळून पडला...
मग त्याने पांघरूण झटकले आणि खिडकीचा पडदा बाजूला करून बघितला, जणू ती मुलगी खिडकीतून त्यांचेकडे बघते आहे, पण खिडकी बाहेर कुणी नव्हतं.
एक कुत्रा मात्र समोरच्या निर्जन रस्त्यावर एका विजेच्या खांबाखली बसून करुण आवाज काढून विव्हळत होता आणि मनोजने पडदा बाजूला करून समोर बघताच तो कुत्रा मनोजकडे बघून रडायला लागला. ते पाहून त्याने पटकन पडदा बंद केला आणि मेन लाईट स्वीच ऑफ केला. त्याला भीती वाटली की आणखी कुणी उजेडामुळे आपल्याला बघत तर नाही ना!!!