शिक्षणाच्या काँग्रेसमध्ये स्त्रियांच्या शाखेपुढे त्यांनी हिंदुस्तानातील स्त्रीशिक्षण हा निबंध वाचला. या निबंधातील पहिल्याच अधिकरणातील एक वाक्य फार गोड व मार्मिक आहे. हिंदुस्तान पिकले फळ होते आणि इतर राष्ट्र कच्ची फळे होती. ''Time, however, which brings ripeness to the raw fruit brings also decay to the ripe one and the country which was once the cradle and long the home of a noble religion, a noble philosophy, science and art of every kind, is at the present day steeped in ignorance and superstition and all the moral helplessness which comes of such darkness.'' नंतर शिक्षणाचा इतिहास सांगितला आहे; मिशन-यांचे प्रयत्न वर्णिले आहेत; हिंदुस्तानातील सध्याच्या शिक्षणाचे शेकडा प्रमाण मुलांमुलीस किती आहे ते सर्व आकडे देऊन दाखविले आहे. स्त्रीशिक्षणास हिंदुस्थानांत होणारा विरोध दिवसेंदिवस कसा कमी होत आहे आणि हिंदुस्तानातील शिक्षण विशेष उपयुक्त अगर मताची वाढ करणारे नसून केवळ डोक्यांत कोंबले जाणारे कसे आहे हेही त्यांनी विशद करून या निबंधात दाखविले आहे.

अशा रीतीने इंग्लंडमध्ये इतर कामे चालली होती. आता ते दुस-या एका मित्राकडे राहण्याची सोय झाल्यामुळे वाच्छांकडून निघून गेले. नंतर इंग्लंडमध्ये ज्या कामासाठी ते मुख्यत्वेकरून आले होते ते काम आले. ते काम त्यांनी  उत्तम प्रकारे पार पाडले. त्यांची उलट तपासणी कसून घेण्यात आली, परंतु गोपाळराव कचरले नाहीत; डगमगले नाहीत. त्यांची तयारी पूर्ण असल्यामुळे त्यांची त्रेधातिरपीटही उडाली नाही. सर्व प्रश्नांस त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. कोठे कोठे दादाभाई त्यांस सावरून घेत. दादाभाई त्या कमिशनमध्ये असल्यामुळे गोखल्यांस धीर असे. त्यांचे विस्तृत वाचन, सर्व प्रश्नांचे केलेले सूक्ष्म परिशीलन, बिनचूक माहिती, हिंदुस्तानच्या आजपर्यंतच्या घडामोडींची बित्तंबातमी या गोष्टी त्यांच्या लेखी साक्षीवरून आणि तोंडी जबानीवरून दिसून येतात. त्यांनी आपल्या लेखी साक्षीचे तीन भाग केले होते.

१. वसूल व जमाबंदी - या सर्व जमाबंदीवर ताबा कोणाचा व किती असतो.

२. खर्च कोणत्या पध्दतीने आणि कसा करण्यात येतो.

३. इंग्लंड आणि हिंदुस्तान यांच्यामधील खर्चाची वाटणी कशी करावयाची.

गोपाळरावांनी सांगितले की, हिंदुस्तानातील बहुतेक सरकारी वसूल लष्कर, बडया बडया अंमलदारांचे मोठमोठे पगार आणि पेन्शने यात खर्च होतो. अगदी अल्प भाग शिक्षण, आरोग्य, कालवे, शेतकी यांसाठी खर्च होतो. ब्रिटिश व्यापारी आणि ब्रिटिश सावकार यांचेच हितसंबंध प्रथम पाहिले जातात आणि ज्यांच्यापासून कर मिळतो त्यांच्या हिताची वास्तपुस्तही करण्यात येत नाही. लढायांचे बेसुमार खर्च होतात आणि त्याचा बोजा गरीब बिचा-या हिंदुस्तानवर पडतो. साम्राज्य वाढविण्याची हाव तुम्हांस, परंतु पैसा आणि प्राण मात्र जाणार हिंदुस्तानाचे! दुस-याचा बळी देऊन आपली पोळी पिकविणे हे अत्यंत अनिष्ट व अहितकारक व अन्यायाचे आहे. आधीच शिक्षणादी कार्यासाठी पैसा पुरत नाही  तो या गोष्टीमुळे मुळीच पुरणार नाही आणि नि:सत्त्व व निष्कांचन होणा-या रयतेवरील करांचे ओझे मात्र खर्चाची तोंडमिळवणी व्हावी म्हणून वाढतच जाणार!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel