ते आपल्या वाणीत निग्रह दाखवीत. वक्तृत्व आवेशपूर्ण असले तरी त्यात मनाचा आवरलेला भाव स्पष्ट दिसे. इंग्लंडमध्ये या मनोनिग्रहाचा त्यांस फार फायदा झाला. आकडेशास्त्रातील ज्ञान व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यांच्या जोडीला त्यांच्या भाषणात विषयाची सुंदर मांडणी असे. एकामागून एक साखळीच्या दुव्याप्रमाणे त्यांच्या भाषणातील दुवे असत. या गुणत्रयामुळे त्यांची कायदे कौन्सिलमधील भाषणे अमोघ ठरली. आकड्यांच्या सम्यक व अचूक ज्ञानाने त्यात कोणालाही खोड काढता येत नसे. ब्रिटॅनिकाकारांनी त्यांच्या भाषणाचे वर्णन खालीलप्रमाणे केले  आहे: 'His  persuasive  eloquence, close reasoning, accurate knowledge of the subjects discussed and instincts of statesmanship won him the Indian leadership.' कर्झनसारख्या तडफदार गव्हर्नर जनरलच्या वेळची भाषणे जोरदार व प्रतिपक्षास सपशेल पालथी घालणारी, आणि नामोहरण करून टाकणारी अशी आहेत. कर्झनसाहेबांनी बोलून दाखविली की, 'He had never  met a  man of any nationality  more gifted with Parliamentary capacities.' काही सभासद राष्ट्रीय सभेसारख्या ठिकाणी मोठी आवेशाची भाषणे करावयाच्या सवयीमुळे येथेही तसे करू पाहत. त्यांस अशी भाषणे करू नयेत, असा गोखल्यांनी अनेकदा सल्ला दिला. भूपेंद्रनाथ बसूंच्या फाळणीवरच्या आवेशी भाषणाचे वर्णन करिताना चिरोलसाहेब म्हणतात, 'On this, as on other occasions, the florid style of eloquence cultivated by the leaders of the Indian National Congress fell flat- distinctly- in the calmer atmosphere of the council-room.' कोणतेही कृत्य करण्यास सरकार जरी समर्थ असले तरी आपण न्याय्य व रास्त टीका करूनच सरकारचा अध:पात जगास दाखविला पाहिजे, आणि हेही काम काही कमी महत्त्वाचे नाही. सरकारवर टीका करण्यास त्यांच्या अंगात धैर्य होते. स्वाभिमान होता. टीका करताना ते डगमगत नसत. बाहेर राहून सरकारवरील जळजळीत टीकेने वर्तमानपत्राचे रकाने भरण्यास जे धैर्य लागते, तितकेच किंबहुना त्याच्याहून जास्त धैर्य प्रत्यक्ष कौन्सिलात समोरासमोर न्याय्य व सणसणीत टीका करावयास लागते. येथे वायफळ शब्द कामाचा नाही. कल्पनेचे सहाय्य उपयोगी नसते. सरकारला कर्तव्याची हरघडी आठवण करून द्यावी, त्याच्या चुका त्याच्या पदरात घालाव्या हे त्यांचे पहिले कर्तव्य असे. 'स किं सखा साधु नव शास्ति योऽधिपं?। हितान्न य: संशृणुते स किं प्रभु:?॥' या न्यायाने गोखले साधू ठरले व सरकार हलक्या दर्जाचे ठरले. वाटेल ते कायदे जर सरकार पास करून घेईन तर ही कौन्सिले म्हणजे देखावा-केवळ फार्स होत, असे त्यांनी स्पष्ट शब्दात तेथे सांगितले. ऑफिशियल सीक्रेट्स ऍक्ट, युनिव्हर्सिटी बिल, व्हॅलिडेशन अ‍ॅक्ट, सिडिशस मीटिंग्ज अ‍ॅक्ट वगैरे प्रसंगी त्यांनी सरकारची झणझणीत कानउघाडणी केली. परंतु टीका करताना त्यांच्या मनातल व्यक्तिद्वेष कधीही नसे, संयुक्त प्रांताचे अधिकारी सर जेम्स मेस्टन यांनी आपल्या व्याख्यानात गोखल्यांच्या मनाच्या मोकळेपणाविषयी सुंदर वर्णन दिले आहे. ते म्हणतात, 'मी सरकारच्या अंदाजपत्रकाची नेहमी तरफदारी करावयाचा, गोखले त्याच्या चिंध्या उडवीत असत; परंतु कधीही उतावीळपणाने मन भडकून गोखले यांनी माझे मन दुखविले नाही. मनास लागेल असा शब्द त्यांच्या तोंडावाटे केव्हाही बाहेर आला नाही, वादविवादाच्या आरंभी आम्ही खासगी बैठकीत बोलत असू आणि मग कौन्सिलमध्ये उघड उघड सरबत्ती होई. मी व ते मित्र झालो. मी जेव्हा संयुक्त प्रांताचा अधिकारी व्हावयाचे ठरले तेव्हा ते मला मित्रत्वाच्या नात्याने म्हणाले, 'I am very anxious that you should  do well in the U. P., but you are sure to make blunders and what I want to do  is to  come and stay  with you for a few days about half way through your  term of office and to tell you, as the friend that I always have been of the mistakes you made.'' चिरोलसाहेबांनी गोखल्यांच्या सभ्यपणाविषयी, व मनाच्या उदारपणाविषयी प्रशंसापत्र दिले आहे ते असे:- ''It would be unfair not to give to Mr. Gokhale his full share of credit for the happy result. Thought often an unrelenting critic of the administration, he struck from the first a note of studied moderation and restraint to which most of his political friends attuned their utterances, He naturally  assumed the  functions of the Leader of His  Majesty's opposition, and he discharged them, not only with the ability which every one expected from him, but with the urbanity and self- restraint of a man conscious of his responsibilities as well as  of his powers, His was among the Indian members not only master-mind, but the dominant personality. The European members, on the other hand, showed  themselves invariably courteous and good-tempered, and not a few awakened corners were turned by little good-humoured banter. Nor was it unusual to see the Englishman come and sit down  by the side of in Indian members to whose  indictment he had just been replying, and in friendly conversation take all personal sting out of the controversy. ''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel