निघण्याची पूर्वतयारी:
या वेळी आपण अंदमानला जायचे का? सप्टेंबर मध्ये नवरा बोलला. हो चालेल; माझी उस्फूर्त प्रतिक्रिया. आईने पण दुजोरा दिला. आम्ही सगळेच सावरकर प्रेमी असल्या मुळे कधी ना कधी तरी अंदमान ला जाणार होतोच तो योग आला होता. फेवरेट ह्रितिक चा 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' बघितल्या पासून स्कूबाचं पण अतोनात आकर्षण होतंच. आता प्रवासाला जायचं म्हटल्यावर टूर्स कंपनी चा ऑप्शन कधीच आमच्या साठी नसतो. आपली टूर आपण स्वतः प्लॅन करण्यात फार विलक्षण मजा असते. आधी एक आराखडा तयार करायला घेतला. दिवाळीत पाडव्याच्या दिवशी जायचं ठरलं. डाइरेक्ट फ्लाइट जास्त महाग होती वर हॉल्ट होता चेन्नई/कोलकताचा. मग विचार केला की मदुराई, रामेश्वरम आणि कोडाइकनालचा पण प्लॅन करूया. तिथे जायचं तर होतंच एका वेळी सगळंच बघून होईल. मग तसं प्लॅनिंग केलं. पुण्याहून मदुराई, दुसऱ्या दिवशी रामेश्वरम त्याच दिवशी रात्री कोडाइ दुसऱ्या दिवशी कोडाइ बघून रात्रीच्या बसने चेन्नई गाठायची मग तिथे एक दिवस राहून अंदमान. गुगलबाबाच्या कृपेने हा हा म्हणता प्लॅनिंग केलं. हॉटेल, फ्लाइटचं बूकिंग झालं. कोडाइ ते चेन्नई बसचं रिजर्वेशन केलं. सगळी पूर्व तयारी झाली. अजून पूर्वतयारी म्हणून सगळ्या ठिकाणांची माहिती घेतली. माझ्यासाठी फिरणं म्हणजे नुसतं त्या ठिकाणांना भोज्जा करून येण्यासारखं नसतं तर जिथे जाऊ तिथे मनापासून फिरणं असतं.
मग अंदमानचं रिजर्वेशन करायला घेतलं.पण हाय रे कर्मा; आम्ही फ़ारच लवकर जागे झाले होतो. एव्हाना सगळी रेटेड हॉटेल्स बूक झाली होती. नाईलाजाने कस्टमाईज टूर करणाऱ्या टूरकंपनीच्या मागे जावं लागलं. त्यांनी आमची हॉटेल आणि क्रूज बुक्स केली. आम्ही आमची आयटनरी त्यांना दिली होती. ग्रूप टूर अजिबात आवडत नसल्यामुळे तो ऑप्शन नव्हताच.घराची आवराआवर, दिवाळी ची गडबड आणि पॅकिंग करता करता शेवटी तो पाडव्याचा दिवस उजाडला.
दिवस पहिला - मदुराई.
पुण्याहून भल्या पहाटेचं फ्लाइट होतं. आम्ही सगळे पहाटे 2.30लाच उठलो. खूप दिवसांनी प्लेन मध्ये बसण्यासाठी अनन्या (माझी मुलगी)अगदी आतुर झाली होती.ती पण लवकर उठली. तयारी करून (आणि हो पाडव्याचं औक्षण करून) निघालो. चेन्नई ला पोहोचलो. ब्रेकफस्ट (तिथल्या भाषेत सांगायचं तर टिफिन) खाऊन परत एअरपोर्ट वर आलो. चार तासांचा लेओवर होता. दुपारी दोन वाजता आम्ही मदुराईला पोहोचलो. आम्ही खूप खाली दक्षिणेला आलो होतो.अगदी कडक उन्हाने आमचं स्वागत केलं. हॉटेल मध्ये आमची रूम अपग्रेड करून मिळाली होती. खुशी मध्येच आम्ही लंच ला गेलो. या आधी पाच वर्षं हैद्राबादला राहिलो होतो. त्या मुळे साऊथ च्या जेवणा वर आमचं विशेष प्रेम.अगदी टिपीकल रसम, पप्पू (डाळ ), रस्सम,तांदळाचा पापड, पायसम खाऊन तृप्त होऊन गेलो.
संध्याकाळी मिनाक्षी अम्मान मंदिरात जायला निघालो. आणि दिसली ती प्रचंड गर्दी. मग आईला आठवलं की नुकताच कार्तिक महिना सुरू झाला होता. साऊथ मध्ये आपल्या श्रावण महिन्या सारखा कार्तिक महिना खूप पवित्र मानला जातो. त्या मुळे कुटुंबच्या कुटुंब दर्शनाला आली होती वर सबरिमलाचे काळे कपडे घालून त्यालोकांनी सुद्धा खूप गर्दी केली होती. (शक्यतो साऊथमध्ये कार्तिक महिन्यात दर्शनाला जाऊच नये कारण गर्दीला अंत नसतो)
आम्ही एक गाईड केला, सगळं मंदिर नीट बघायचं होतं. त्याने स्पेशल दर्शनाचे पास घ्यायला लावले.मंदिराचा परिसर अतिशय मोठा आहे. गोपूरं तर अप्रतिम सुंदर आहेत; आणि तिथे मिनाक्षी आणि शंकराचे दर्शन घ्यावे लगते. आम्ही घेतलेल्या गाईड ने आम्हांला अगदी त्रोटक माहिती दिली. शेवटी त्याला सोडून आम्हीच थाउज़ंड पिलर हॉल बघायला गेलो. याचं वैशिष्टय म्हणजे इथे विशिष्ट पिलरला स्पर्श करताच संगीताचे स्वर उमटू लागतात. हे एक आश्चर्य आहे. तिथे पडलेला एक प्रश्न, सगळे पीलर (ते जवळपास 8000 आहेत.) त्यांच्या टॉपला एक ड्रॅगनसद्रूश्य प्राणी आहे. तर पीलर वरच्या नक्षी कामा मध्ये चीनी माणसे( लांब, निमुळत्या दाढी वाली) कोरली आहेत. हे रामेश्वरम च्या मंदिरात पण बघायला मिळालं. चीन पासून इतक्या लांब खाली दक्षिणेला अश्या चिनी प्रतिकांचं प्रयोजन कळलं नाही.)
असो; तर मंदिर बघून होत आलं होतं. गाईड च्या मते साडेतीन हजार वर्षांपूर्वी हे बांधलं गेलं आहे. पण मंदिराचा पाहिजे तसा आस्वाद घेता नाही आला कारण तिथे असलेली प्रचंड गर्दी. अश्या मंदिरात काहीतरी गूढ असं वाटतं.( ह्या फीलिंग्स मला तिरुअनंतपुरम ला पद्मनाभ मंदिरात सुद्धा आल्या होत्या.)
दिवस दुसरा - रामेश्वरम.
दुसऱ्या दिवशी रामेश्वरम. पंबन ब्रिज हा माझ्या साठी मुख्य आकर्षण होता. खरं तर हा ब्रिज मला रेलवेतून क्रॉस करायचा होता पण ते शक्य नव्हतं. 'चेन्नई एक्सप्रेस बघितल्या पासून मला हा ब्रिज खूप आकर्षित करत होता. रामसेतू असलेल्या धनुष्कोडीला पण भेट द्यायची होती. सकाळी 7.30 वाजताच आम्ही ब्रिज वर पोहोचलो होतो. तेवढ्या सकाळी पण कडक ऊन होतं. हा ब्रिज मेन भारतीय भूमीला आणि रामेश्वरम ह्या बेटाला जोडण्याचं काम करतो.खूप सारे फोटो घेतले आणि मंदिरात पोहोचलो. तिथेही मदुराईचाच प्रकार. वर संपूर्ण मंदिरातील जमिन ओली कारण तिथे मुख्य मंदिरात बावीस तीर्थ आहेत. लोकं सगळ्या बावीस तीर्थामध्ये आंघोळ करुन पिंडीचं दर्शन घेत होते. ओल्या अंगाने सगळी लोकं फिरत होती. ही पिंडी रामरायाने समुद्राच्या वाळूपासून बांधली आहे.रामाने पिंडी बांधून शिवशंकराचे आशीर्वाद घेतले आणि सितामाईच्या सुटकेसाठी जवळच असणाऱ्या लंकेला प्रयाण केले. इथून श्रीलंका अगदी जवळ आहे. आम्ही मुख्य पिंडीचं दर्शन घेतलं आणि अष्टलक्ष्मीच्या मंदिराच्या ओवरीतून बाहेर आलो; तर तिथे तीर्थ क्र. सात चा बोर्ड होता. म्हटलं बघुया काय ते असं म्हणून तिथे चालायला सुरुवात केली. आमच्या बरोबर ओल्या अंगाने लोकं पण जात होते. जवळपास दहा मिनिटांनी कुंडं आलं. एक माणूस कुंडा मधून पाणी बकेट मधून काढत होता आणि येणाऱ्या लोकांच्या अंगावर उपडे करत होता. पाणी स्वच्छ होतं आणि त्यात कमळं पण फुलली होती. आमच्या बरोबर आलेल्या लोकांनी तीर्थ क्र. आठ चा रस्ता धरला आणि आम्ही बाहेरचा. तिथे खूप स्टॉल लागले होते. आम्ही किंचित गुलाबी छटेचा मोठा शंख विकत घेतला. आणि धनुष्कोडीला ला जायला निघालो. गुगलबाबाच्या माहिती नुसार ब्रिटिश काळामध्ये मद्रास-सीलोन अशी रेलवे चालू होती. म्हणजे चेन्नई वरून रेलवे पंबन ब्रिज क्रॉस करून रामेश्वरम ला यायची. पुढे लोकं उतरून धनुष्कोडीवरून फेरी ने श्रीलंकेच्या एका बंदरात जात असत तिथून दुसरी ट्रेन पकडून पुढचा रस्ता धरत. नंतर आलेल्या चक्रीवादळा मुळे रेलवे कायमची बंद झाली. रेलवे स्टेशन चे अवशेष मात्र अजून आहेत. इथे कन्याकुमारी सारखचं वाटतं. भारताची हद्द समाप्त होते. अतिशय रमणीय प्रदेश आहे तो.
धनुष्कोडीचा किनारा स्वच्छ आहे. बारीक मऊ रेतीची पुळण आणि मोठमोठे शंखशिंपले. लहान पणी भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं आठवलं. गल्फ ऑफ मन्नार आणि पल्कच्या सामुद्रधुनीच्या जवळ मोती आणि पोवळे मिळतात. समुद्राचं पाणी पण हिरवट निळं होतं.रामाने ज्या स्टोनचा उपयोग करून रामसेतू बांधला तसे फ्लोटिंग स्टोन मात्र बघायला मिळाले नाहीत. एका मंदिरात तसे स्टोन ठेवले आहेत. रामसेतू बघायला बोटीतून जावं लागतं. अर्थातच ते शक्य नव्हतं. आज हा ब्रिज 'ऍडम ब्रिज' म्हणून ओळखला जातो. रामेश्वरमला लक्ष्मण तीर्थ, जटायु तीर्थ सुद्धा आहेत पण कोडाइ चा पुढचा आठ तासाचा प्रवास तिथे जास्त थांबू देत नव्हता. रस्त्यात मिसाइल मॅन अब्दुल कलाम आझाद यांचं घर मात्र जरूर बघायला गेलो जे की आता राष्ट्रीय स्मारक आहे. सर्वत्र त्यांचे फोटो ठेवलेले आहेत. मिसाईलच्या प्रतिकृती आहेत. जरूर भेट दयावी असं ठिकाण. खूप भावूक मनाने रामेश्वरम चा निरोप घेतला आणि कोडाइ ला जायला निघालो. खूप रात्री आम्ही कोडईला पोहोचलो.
दिवस तिसरा - कोडई.
कोडाइबद्द्ल काय बोलणार. मऊ धुक्या ची शाल पांघरलेलं ते कोडाइ नजरे समोरून नाही जात आहे. त्याच रात्री आम्ही बसने कोडई वरून चेन्नईला जायला निघालो.
दिवस चौथा - चेन्नई.
दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी चेन्नईला पोहोचलो. मंगळवारी पोर्टब्लेअरची फ्लाइट होती. विशेष असं काही न बघता आम्ही थोडा आराम केला. फक्त एक म्युझिअम आणि संध्याकाळी फक्त मरिना बीच आणि अष्टलक्ष्मीचं सुंदर मंदिर बघितलं. आपल्या कडे जनरली अष्टलक्ष्मीची मंदिरं बघायला नाही मिळत.मला स्वतः ला प्राचीन मंदिरं बघण्यात खूप रस आहे. त्यामुळे अशी वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं जी फक्त साऊथलाच आहेत ती बघणं ओघानं आलंच.यात वेगवेगळ्या आठ लक्ष्मीच्या मूर्ती आहेत. त्या अश्या क्रमाने आहेत- आदी किंवा महालक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि वीर किंवा धैर्यलक्ष्मी.
दिवस पाचवा पोर्टब्लेअर - अंदमान.
दुसऱ्या दिवशी अंदमानची फ्लाइट, आशिषची (नवऱ्याची) खरी पिकनिक तर अंदमान पासून सुरू होणार होती.जेव्हा तुमचं बरंचस आयुष्य हे समुद्राजवळ जातं तेव्हा तुमचं समुद्राबद्द्लचे जे आकर्षण असतं ओढ असते ही कमी नाही होत तर उलट वाढत जाते. मी मूळची वसईची. समुद्र माझा अगदी जवळचा सखा. आमच्या प्लेन ने चेन्नई वरून टेक ऑफ केलं आणि समुद्राच्या साथीने आमचा प्रवास सुरू झाला. अडीच तासाने अंदमान ची भूमी दिसायला लागली. इतका वेळ असलेला निळा प्रवास संपून हिरवट गोडव्यातून प्रवास सुरू झाला. आता पुढचे सहा दिवस याच दोन रंगाच्या छटा आमचा पिच्छा पुरवणार होत्या.
अंदमान हा 572 बेटांचा समूह आहे. यांमध्ये फक्त 36 बेटांवरच सुधारीत मनुष्य पोहोचू शकला आहे.मलय भाषेत हनुमानाला हंडुमान म्हटलं जातं त्यावरून अंदमान हा शब्द आलाय तर निकोबार म्हणजे नग्न लोकांचे बेट.असं म्हणतात की सीतेच्या शोधात जेंव्हा हनुमान फिरत होता तेव्हा हनुमान अंदमानला अंदाज घ्यायला आला होता की इथून लंकेला जाणं शक्य आहे का याची चाचपणी हनुमानाने केली.पण नंतर अंदमान वगळून सगळी वानरसेना रामेश्वरमच्या मार्गाने लंकेत पोहोचली. नॉर्थ अंदमान हे म्यानमार जवळ तर निकोबार हे इंडोनेशियाच्या जवळ आहे. तसं बघायला गेलं तर आपल्या भारतापासून अंदमान निकोबार खूप लांब आहेत. भौगोलिक दृष्ट्या इंडोनेशिया आणि म्यानमार जवळ आहेत. भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी अंदमानच्या एका बेटाजवळ आहे.अंदमान आणि निकोबार ला अजूनही आदिवासी लोकं राहतात जे सुधारित जगा पासून खूप लांब आहेत. त्यांना आधुनिक जगाशी कुठलाही संपर्क ठेवायचा नाही. ते अजूनही त्यांचीच लाइफस्टाइल जगतात. मागे धर्मप्रसारासाठी गेलेल्या एका युवकाला आपला प्राण गमवावा लागला. तो सेंटीनेड या बेटावर गेला होता. ह्या बेटावरील लोकं सेंटीनेड याच नावाने ओळखली जातात. त्यांनी कोणताही संपर्क अजूनपर्यंत सुधारित जगाशी ठेवला नाही. पण सुनामी पासून मात्र ती जमात आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. 'जारवा' नावाची एक जमात (जवळजवळ पाचशे लोकसंख्या) ती सुद्धा अलिप्त जीवन व्यतित करते. जगामध्ये सर्वाधिक चर्चेची अशी ही बेटे आहेत. आपल्या वीस रुपयाच्या नोटेवर जो जंगलाचा भाग दिसतो तो अंदमानचा आहे. सुनामीचा 75% फटका एकट्या निकोबार ला बसला ज्यात तिथल्या काही आदिवासी जमाती पूर्णपणे नामशेष झाल्या. रॉस आयलंड मुळे पोर्टब्लेअरचं कमी नुकसान झालं. रॉस मात्र सुनामीच्या तडाख्यात आलं. निकोबार ला जाण्या साठी आपल्याला परमिट घ्यावं लागतं.तिथे सहजा सहजी पर्यटनाला जायला मिळत नाही. निकोबारला फक्त स्थानिक राजकीय व्यक्ती, शास्त्रज्ञ, नेव्ही चे सैनिक अशीच लोकं जाऊ शकतात. अगदी अंदमानच्या काही भागांमध्ये सुद्धा जाण्यासाठी परमिट घ्यावं लागतं.जगातली सगळ्यांत प्राचीन भाषा अंदमान आणि निकोबारची आहे असं म्हणतात. संरक्षण द्रुष्टीने अंदमान आणि निकोबार आइलँड्स खूप महत्वाची आहेत.अंदमानचा राज्यप्राणी डूडोंग नावाचा समुद्रिजीव आहे. इथे उष्णबंधीय बेटांवरून खूप फुलपाखरे येतात. त्यामुळे अंदमानला खूप फुलपाखरे दिसतात. इथे कोकोनट क्रॅब खूप जास्त दिसतात.नारळ हा त्यांचा आवडता आहार आहे. हे क्रॅब आपल्या तोंडाने नारळ लीलया फोडून खाऊ शकतात. अंदमान मध्ये खूप मोठ मोठी कासवे turtle आढळतात.अंदमानला मासेमारी करणे कायद्याने गुन्हा ठरवला आहे. अंदमान ला सूर्योदय सकाळी 4.30/5 लाच होतो तर संध्याकाळी 5 ला गुडुप अंधार. सुरवातीला थोडंसं जुळवून घ्यायला आम्हांला वेळ लागला. दिवस भर तर इतकं तीव्र उन्ह होतं की सहा दिवसांत आम्ही एस्ट इंडीज चे वेस्ट इंडीज होऊन गेलो.
वीर सावरकर एअरपोर्ट ला उतरलो आणि उत्साहाची आपोआपच लागण झाली. खरं तर मन खूप उचंबळून आलं होतं. सावरकरांच्या कष्टांचे, त्रासाचे, प्रखर देशभक्तीचे इथे पोर्टब्लेअर एअरपोर्टला नाव देउन थोडं तरी चिज झालं होतं. इथे त्यांचा एक पुतळा सुध्दा आहे पण रेस्टिक्टेड एअरपोर्ट असल्या मुळे फोटो काढायला बंदी होती. आम्ही बाहेर आलो तर 'नीवा' आमच्या नावाची पाटी घेऊन उभा होता. त्यानेच आम्हांला एअरपोर्टच्या समोरच्या हॉटेल मध्ये नेलं. दुपारचे दोन वाजून गेले होते पण तसेच फक्त फ्रेश होऊन न खाता पिता आम्ही सेल्युलर जेल मध्ये जायला निघालो. कारण चार नंतर एंट्री क्लोज़ होणार होती. आमची तिकिटे आधीच काढून ठेवली होती; आणि आम्ही तिथे असलेल्या प्रचंड गर्दी मध्ये सामिल झालो. बस च्या बस भरून लोकं येत होती. आणि मजा म्हणजे तिथे सगळी कडून मराठी कानावर येत होतं. मला चुकून आपण परत पुण्याला नाही ना आलो असा भास झाला. अगदी नंतर च्या sound & light शो ला तर मी शनिवार वाड्यात आहे असाच फील येत होता. अर्थात तिथे आलेले लोकं फक्त एक टूरिस्ट प्लेस म्हणून त्याकडे बघत होते की मनापासून आले होते हा एक संशोधनाचा विषय आहे. सावरकरांबद्द्ल ऐकण्या साठी जीव नुसता आतुर झाला होता. तसंही परिसरात आल्यापासूनच डोळ्यांतून सारखं पाणी येत होतं. सावरकरांनी लिहिलेलं 'माझी जन्मठेप' पूर्ण वाचण्याची माझी हिम्मत नाही. गाईड एक एक वर्णन करत होते आणि मला ते ऐकवत नव्हतं. तिथे आईची आणि नवऱ्याची स्थिती पण फारशी वेगळी नव्हती. फाशी च्या ठिकाणी कशी फाशी दिली जायची, कसा कोलू फिरवायला द्यायचे. बापरे!! मला आताही लिहिताना अंगावर शहारा येतोय. कसे काय राहिले असतील कैदी तिथे? आणि त्यांचा गुन्हा काय तर मातृभूमीला परकीयांच्या ताब्यातून सोडवण हा? किती प्रकारच्या शिक्षा मिळत तिथे. एकच सांगते कैदी लोकांना ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळा नैसर्गिक विधिला जायला सुद्धा परवानगी नव्हती.त्या साठी एकच छोटं भांड देत असत. त्या पेक्षा जास्त लघवी करायची नाही. जास्त झाली की फटके बसायचे.अगदी दिवसा सुद्धा. रात्रीचं तर सोडूनच दया. गाईड ने सावरकरांची दुसऱ्या मजल्यावर असलेली सेल दाखवली. फाशी द्यायचे त्या जागेच्या बरोबर समोर,का? ब्रिटिशांना त्यांचं मनोधैर्य खचवायचं होतं का? खरोखरीच काळं पाणी ते. सावरकरांचे मोठे बंधू पण इथे कैद होते पण दोघांना एकमेकांचा पत्ता तीन वर्षानंतर लागला. त्यांच्या सेल मध्ये गेले. वाटलं ही सगळी माणसं अगदी एका क्षणासाठी तरी अद्रूश्य होऊंदे. मला एकटीला रहायचं होत. तिथे त्यांचे दोन फोटो ठेवले आहेत. डबडबत्या डोळ्यांनी त्यांना नमस्कार केला. सेल च्या भिंती भिंती वरून स्पर्श केला. जिथे सावरकर दहा वर्षं राहिले त्या इवल्याशा कोठडीत मला जायला मिळालं.माझं अहोभाग्य!! तो क्षण मी नाही विसरणार कधी. आज त्यांच्याबद्द्ल सोशल मीडियात काहिही लिहून येतं तेंव्हा मन अगदी पिळवटून उठतं. त्यांना सावरकर कधी कळलेच नाहीत. कृपया माफीवीर म्हणून त्यांची संभावना करू नका. भारताच्या त्या सुपुत्राला शतशः नमन. आज या लेखाच्या माध्यमातून मला सांगावसं वाटतं की प्रत्येकाने तिथे जाऊन भेट दिली पाहिजे. आणि सावरकर अनुभवले पाहिजेत.आणि नुसते सावरकरच नाहीत तर अजून किती तरी कैदी तिथे कैद होते.
सुभाष चंद्र बोसांनी आझाद हिंद सेनेच्या मदतीने या बेटांना जिंकून अंदमान आणि निकोबार ला शहिद आणि स्वराज्य बेट अशी नावे दिली होती. त्यांच्या नंतर इथे जपानी लोकांचा तीन वर्षं खूप जुलुम झाला पण अखेरीस त्यांना पण स्वातंत्र्य मिळाले.
तिथून निघताना सावरकरांच्या सेल ला नमस्कार केला. मागून आई म्हणाली कधी वाटलं नव्हतं इथे येईन म्हणून. माझी काशी हिच. खरंच तेव्हा अगदी कृतार्थ वाटलं.
सगळं बघून आम्ही हॉटेल वर जायला निघालो. अंदमान चा पहिला दिवस पार पडला. दुसऱ्या दिवशी हॅवलॉक आइलँड ला जायचं होतं. उत्साहाचे इंजेक्शन टोचून घेतलं.
दिवस सहावा – हॅवलॉक आइलँड.
सेल्युलर जेलबद्द्लची निगेटिवीटी मागे टाकून दुसरा दिवस उजाडला. उत्साहाचं इंजेक्शन टोचून घेतलं होतंच. जेलच्या गाईडचे शब्द खरे ठरले. सगळी निगेटिवीटी संपली होती. हॅवलॉक ला जायला उत्साहाने फसफसत होतो. हॅवलॉक म्हणजे अंदमान चा मुकुटमणी आहे. अतिशय फेमस असे एलिफंट बीच, कालापठार बीच आणि राधानगरी बीच ही प्रमुख आकर्षणे. एकंदरीत हे एक बऱ्यापैकी मोठे आइलँड आहे.
सकाळी आमची आठ वाजताची क्रूज होती. सात वाजताच तिथे जाऊन पोहोचलो.एअरपोर्ट सारखाच सेक्यूरिटीचा सोपस्कार पार पडला आणि आम्ही एकदाचे मॅकरुज नावाच्या त्या आलिशान क्रूज मध्ये स्थानापन्न झालो. अतिशय आरामदायी. सगळ्या लहान मुलांनी एकत्र येऊन मस्ती करायला सुरुवात केली होती. एअरहोस्टेस सारख्या वॉटर होस्टेसही (मी दिलेलं नाव!) काय हवं नको ते बघत होत्या. साधारण दीड तासाने क्रूज हॅवलॉक ला पोहोचली. संपूर्ण ट्रॉपिकल फॉरेस्ट ने आच्छादलेलं असं ते एक अक्षरशः नंदनवन आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बांबूची मोठमोठी झाडे एकमेकांना गच्च धरून उभी होती. स्टेट बँक ऑफ इंडिया ची ब्रांच, अगदी ST बस ची सर्विसही आहे. इथे बंगाली लोकांचं प्राबल्य आहे. बंगाली मिडिअम च्या शाळा आहेत. आमच्या अल् डोरेडो या बीच रिसॉर्ट ला आलो. रिसॉर्ट पेक्षाही अतिशय देखणा समुद्र कॉटेजेस ला लागून होता. नवरा लगेचच अनन्याला डुंबायला घेऊन गेला. देखणा समुद्र; स्वच्छ अगदी खालचा तळ दिसत होता. मुंबईत आयुष्य गेलेल्या मला समुद्र इतका स्वच्छ कसा असू शकतो हे समजत नव्हतं. अक्षरशः हे मनाने समजून घ्यायला खूप उशीर लागला की इथल्या समुद्रात आपण अगदी मनसोक्त पाण्याच्या स्वच्छतेची काळजी न करता खेळू शकतो. समुद्राच्या अगदी जवळ खाली वाकलेलं झाड होतं.त्याची पाने समुद्राच्या पाण्यात पडत होती. अहाहा!! अतिशय विलोभनीय असं द्रुश्य. दोघांचे किती फोटो काढू आणि किती नको असं मला झालेलं.
आजच्या दिवशी आम्ही दोन डेस्टिनेशन करणार होतो. राधानगरी बीच आणि कालापठार बीच. आमचं रीसॉर्ट कालापठार बीच पासून बरचसं जवळ होतं. त्यामुळे दुपारी जेवून आम्ही तिथे जायला निघालो. या बीचच्या पाण्यात डेड कोरल्स असल्यामुळे याला कालापठार असं नाव पडलं. आमच्या रीसॉर्ट मागच्या बीच सारखाच हा सुद्धा बीच होता. जीवंत प्राणी असलेले कितीतरी शंख किनार्यावर पडलेले होते. खूप वेगवेगळे आकार, रंग असलेल्या शंख शिंपल्याची रास पडलेली होती तिथे.पण समुद्रातील कोणतीही वस्तू उचलायची परवानगी नाही.
एअरपोर्ट ला तुम्हांला त्या वस्तू तुम्ही विकत घेतल्यात याचा पुरावा सबमीट करायला लागतो.
थोडा वेळ थांबून आम्ही फेमस राधानगरी ला जायला निघालो. संपूर्ण रस्ता हा हिरवाई ने नटला होता. असं म्हणतात की कधी कधी डेस्टिनेशन पेक्षा तिथे जायचा मार्ग हा जास्त विलोभनीय असतो तसंच आमचं झालं होतं. इथे तर डेस्टिनेशन पण सुंदर होतं.आशिया मधला सातवा मोस्ट ब्यूटीफूल बीच चा मान राधानगरीने मिळवला आहे. पांढरीशुभ्र पुळण. शांत, फेसाळणाऱ्या लाटा मला बोलवत होत्या. नवरा आणि अनन्या कधीच आत गेले होते. मी पण त्यांच्या मागे अगदी धावत गेले. लहान असताना सुट्टीत कोणी पाहुणे आले की आई आम्हांला अर्नाळा बीच वर खेळायला घेऊन जायची. वडापाव खाऊन, खूप पाण्यामध्ये खेळून, मार्केट मधून ताजे फडफडित मासे घेऊन आम्ही बस मध्ये बसत असू. आज त्या अर्नाळयाच्या वाऱ्या बंद होऊन सुद्धा वीस बावीस वर्षं उलटून गेली होती. त्यानंतर फक्त समुद्र बाहेरून बघितला पण या समुद्राने वेड लावलं. पाण्याची ओढ किंचितही कमी झाली नव्हती. स्वच्छ पाणी ज्याचा तळही क्लिस्टर क्लियर दिसतो अश्या पाण्यात खेळण्याची एक वेगळीच गंमत होती. पण अंदमानच्या अंधाराचा पहिला फटका इथे बसला. दुपारी साडे चार पाचलाच अंधारून आलं. म्हणून पाण्यातून लवकर बाहेर यायला लागलं.
दिवस सातवा – हॅवलॉक आइलँड एलिफंट बीच.
दुसऱ्या दिवशी एलिफंट बीच. या बीचवर जेवढी मजा केली तेवढी पूर्ण ट्रीप मध्ये केली नाही. त्याही दिवशी आम्ही लवकरच सकाळी 7.30 ला निघालो. बीच वर जाण्या साठी छोट्या बोटीने जायला लागतं. तसा घनदाट जंगलाचा रस्ता आहे पण शक्यतो कोणी तो वापरत नाही. बीच वर वीस पंचवीस मिनिटात बोटीने पोहोचलो. 8.30 वाजले होते. परत बरोबर 11.30 ला बोट सुटेल असं आम्हांला सांगण्यात आलं. स्कूबा की स्नोर्क्लिँग यात आम्ही स्नोर्क्लिँग ठरवलं. अंदमान ला सी वॉक पण करायला मिळतो. पण आम्ही तो केला नाही आणि कोणी केलेले लोकं पण भेटले नाहीत. लॉकर शोधला. इथे नारळपाण्याशिवाय काहिही खायला मिळत नाही. (एक सांगायचं राहिलं; अंदमान ला आल्या पासून आम्ही रोज नारळपाणी पीत होतो. पाणी पण स्वर्गिय गोड आणि भरपूर होतं. त्यानेच पोट भरायचं) स्नोर्क्लिँगच थोडसं ट्रेनिंग दिलं आणि आम्हांला पाण्यात डुंबायला पाठवून तुमचा नंबर आला की बोलावतो असं सांगून स्नोर्क्लिँग एक्सपर्ट्स समुद्रात अंतर्धान पावले. आम्हीही पाण्यात खेळण्याचं स्वर्गिय सुख उपभोगत होतो अगदी आई सकट.
आजूबाजूला मराठीच मराठी होते. तास दीड तास गेला असेल आणि आमचा नंबर आला. स्नोर्किँग साठी आमची एक चेन बनवली. आम्हांला प्रत्येकी एक असा टायर दिला गळ्यात घालायला आणि लाइफ जॅकेट घालायला सांगितलं. प्रत्येकाला दुसऱ्याच्या टायर च्या दोरीला पकडायला सांगितलं. आई मध्ये आणि मी आणि नवरा बाहेर. आमच्या दोघांचा एक हात एक्सपर्ट ने पकडला होता आणि दुसरा हात टायर च्या दोरीला. अशी आमची चेन निघाली. ब्रीदिंग साठी मास्क दिले होते. या बीचचं वैशिष्ट म्हणजे हा बीच कोरल्स साठी खूप रिच बीच आहे.किनाऱ्यापासून लगेचच कोरल्स चालू होतात.आम्ही सुध्दा जसे पुढे गेलो तसे तसे कोरल्स दिसायला लागले. एक wow मात्र तोंडून गेलचं. खूप कोरल्स आणि माश्यांची विविधता होती. रंगीबेरंगी मासे सुळकन जात येत होते. किती प्रकारचे, रंगाचे, आकाराचे मासे दिसत होते त्याला गणतीच नाही. किती निळ्या, पिवळ्या, मोरपिशी, काळ्या, पट्यापट्याच्या माशांचं दर्शन झाल. सी कुकुंबर होतं. एक जांभळं फुलांच्या आकाराचं मनमोहक कोरल एका मोठया कोरलवर विसावलं होतं. किती गोड दिसत होतं ते. मानवी आभासाच्या खूप पलिकडे जाऊन पोहोचलो होतो. सगळी कडे अगदी निरव शांतता. त्या कोरल्सच्या आणि माश्यांच्या जगात मी पाहुणी. या सगळ्याचं वर्णन करणं माझ्या आवाक्याबाहेर आहे. निळ्या स्वच्छ पाण्यात विहरणारी जणू मी एक मासोळी झाले होते. तुम्ही कितीही you tube वर वीडियो बघा पाण्यात राहून खरंखुरं याची देही याची डोळा बघण्या सारखं सुख नाही. जवळपास वीस मिनिट्स आम्ही त्या निळ्या मोहमयी दुनियेत होतो आणि वेळ संपली तेंव्हा स्वप्नातून सत्यात आलो. त्या मनमोहक जगाचा निरोप घ्यायला खूप खूप जीवावर आलं होतं.अनन्या साठी ग्लास बॉटम राइड घेतली. पायाशी असणाऱ्या मोठ्या ग्लास मधून दिसणारे मासे तिने खूप एंजॉय केले. वेळ होत आल्यामुळे त्या एलिफंट बीच चा नाईलाजाने निरोप घेतला. अगदी बोटीमध्ये बसताना सुद्धा आजूबाजूला छोटे छोटे x-ray फिश सारखे फिश फिरत होते.खूप दमायला झालं होतं; पण नवऱ्याला आता बाईक रेंट वर घेण्याची हुक्की आली होती. आम्ही दुपारी अॅक्टीवा रेंट वर घेतली आणि त्या नंदनवनात फिरू लागलो. समुद्राचा किती तरी मोठा पट समोर मांडून ठेवला होता. कालापठारच्याही पुढे गेलो आणि आणि अखेरीस परत आमच्या रिसॉर्टवर आलो. परत येताना तो समुद्राचा देखावा मनामध्ये लॉक करून घेतला.. अखेरीस रात्र झाली तेव्हा दमले भागलेले आमचे जीव झोपेच्या अधिन झाले. स्वप्नात मात्र मी अजूनही समुद्राच्या पोटात मासे निरखत फिरत होते. त्यांच्या जगात जाऊन पोहोचले होते.
दिवस आठवा – नील आइलँड.
हॅवलॉक चा पुरेपूर आस्वाद घेतला, स्नोर्क्लिँग झालं, मनसोक्त पाण्यात डुंबून झालं. आता आम्ही नील आइलँड साठी सज्ज झालो होतो. हॅवलॉक च्या हार्बर वर आलो.समुद्रात खाली नजर गेली. अगदी काठावर किती तरी रंगीबेरंगी मासे पोहत होते. कितीही मासे पाहिले तरी नजरेची तहान म्हणा भूक म्हणा भागत नव्हती. दरवेळी तेवढ्याच उत्साहात आम्ही मासे न्याहाळायचो. आता तर एका सर्वस्वी वेगळ्या माश्याने दर्शन दिलं; पूर्ण व्हाईट कलरचा सापासारखा तो मासा त्याच्या सहकाऱ्यांबरोबर वेगाने पोहत होता. हॅवलॉकने समाधानाचं भरभरून माप आमच्या पदरात टाकलं. त्याला शेवटचं बाय केलं आणि मॅकरुझ मध्ये जाऊन बसलो. यावेळी विंडो सीट मिळाली होती. उन्ह पण जाड अल्ट्रा व्हॉयलेट काचेमुळे मायाळू होत होतं.
पाऊण तासाने नील आइलँड जवळ आलं. बाहेर आलो आणि नजरच खिळून बसली. नीळाई इतकी भरभरून होती तिथे. समुद्र, आकाश अगदी आकाशी. अंदमानचं हे एक वैशिष्टच म्हणा ना. आधी पाहिलेला सुंदर समुद्र दुसरा बघितला की पहिला फिका वाटायला लागतो. आम्ही इतके खिळून गेलो की अक्षरशः बॅग घेऊन टळटळीत उन्हात उभे होतो. नील, अगदी परफेक्ट नाव नील आइलँड ला मिळालं होतं. अथांग पसरलेला समुद्र; त्यावर एकही लाटेची चूणी नाही असा स्तब्ध,शांत. पाण्यात दोन स्कूबा डायवर होते. त्यांच्या वरून पाणी जात होतं पण पाणी इतकं नितळ होतं की आम्ही बघू शकत होतो. आमच्या बरोबर क्रूज मधून पायउतार झालेले पण भान हरपून स्तब्धपणे नील ची निळाई जणू काही पीत होते. नील आइलँड हनीमूनर्स साठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. इथे यावं आणि स्वतःला विसरून जोडीदाराच्या प्रेमात पड़ावं.
मला स्वतः ला बीच डेस्टिनेशन खूप आवडतात. आणि त्यातही ती आइलँड असतील तर वा क्या बात हैं!! (अश्याच एका स्वर्गिय आइलँड वर मला जायचंय. सँटोरिनी ग्रीक आइलँड.असो)
तर आम्ही शेवटी पुढे निघालो कारण आइलँड तर एक्सप्लोर करायचं होतं ना. कॅबड्राइवर कडून भरपूर माहिती मिळत होती. बोलका होता तो आणि माझे प्रश्न विचारण थांबत नव्हतं. मला लोकलाइज़्ड कनेक्ट व्हायला खूप आवडतं. माहिती ही मिळते. पूर्ण आइलँड हे बनाना प्लॅंटेशनने आच्छादलेले आहे. हॅवलॉक पेक्षाही एरिया वाईज खूप छोटं आइलँड आहे हे. इथेही बंगाली लोकांचं प्राबल्य. हिरवाईतून जाताना आमचं रीसॉर्ट कधी आलं ते समजलही नाही. 'पर्ल पार्क बीच रीसॉर्ट' अगदी आरामदायी, अगदी आलिशान असं होतं ते.सनसेट पॉईंट तर मागेच होता. आमच्या कॅब ड्राइवर ने सांगितलं की आता हाय टाइड आहे तर तुम्ही आताच चला. नंतर काही बघायला मिळणार नाही. (अंडर वॉटर वर्ल्ड वीजिबीलीटी ही हाय टाइड आणि लो टाइड वर डिपेंड आहे) तोपर्यंत साडे अकरा वाजून गेले होते त्या मुळे आम्ही जेवण स्कीप करायचं ठरवलं. थोडा जवळचा खाऊ खाऊन घेतला आणि निघालो. भरतपूर बीच. हार्बर वरून दिसलेला हाच तो बीच. भरपूर वॉटर आक्टिविटीज होत्या पण आम्ही फक्त ग्लास बॉटम राइड घेतली अनन्यासाठी. परत एकदा माश्यांनी भरभरून दर्शन दिलं. थोडा वेळ पाण्यात डुंबून घेतलं. छोटे छोटे रंगीबेरंगी मासे आमच्या जवळून पोहत होते. किती विलक्षण द्रुश्य होतं ते. अहाहा!!!
आता पर्यंत सपाटून भूक लागली होती. सी फूड लवर्स असलेल्या आम्ही क्रॅबना मोठ्या उदार मनाने उदरामध्ये आश्रय दिला. एका बंगाली महिलेच ते छोटसं रेस्तरां होतं. तिनेच क्रॅब ची शिफारस केली होती. तृप्तीचा ठेकर देउन पुढच्या डेस्टिनेशन ला निघालो. तो होता नॅचरल ब्रीज. हा पॉईंट कोणतीही पॉपुलर टूर कवर करत नाही पण आमच्या कॅबड्राइवर ने जोरदार शिफारस केली. शेवटी त्याला हो म्हटलं. 500 Rs. जास्त घेतले पण निर्णय चुकला नव्हता इतकं भरभरून समाधान तिथे मिळालं. पॉईंट जवळ आल्यावर गाईड ने स्टारफिश दाखवण्याचं आमिष दाखवलं. त्यालाही बरोबर घेतला. तोही आमचा निर्णय चुकला नाही. कारण फक्त आम्हीच जिवंत स्टारफिश हातात घेऊन पाहिला. माझी अल्-डोरडो हॅवलॉक ला मैत्रिण झालेली कोलकताची संयुक्ता परत इथे पण भेटली. आमचं असंच होतं होतं. सतत सगळ्या टूर मधील लोकं परत परत आम्हांला भेटत होती. माहितीची देवाणघेवाण होत होती. त्यांच सगळं फिक्स्ड होतं. बदल करण्याची परवानगी नव्हती. आम्ही आमचे मोकळे होतो म्हणूनच हे नॅचरल ब्रीजचं माप पदरी पडलं होतं.
संपूर्ण रस्ता हा मोठ मोठ्या दगडाचा होता. ते दगड पुढे जाऊन समुद्रात पण होते.खरंतर ती सगळी डेड कोरल्स होती जी आता दगडांच्या रूपाने घट्ट झाली होती. अगदी सावकाश जायला लागत होतं. इथे लोटांगण म्हणजे हात पाय तोडूनच बाहेर येणं. शेवटी पाण्यातून ब्रीज जवळ गेलो. या वेळेला आजूबाजूला सगळी बंगाली लोकं होती. हा ब्रीज सुद्धा डेड कोरल्सचाच बनला होता. अखेर ईप्सित स्थळी आल्यावर गाईडने दगडाखाली असलेला स्टारफिश दाखवला. तो असा लपला होता की पटकन कोणाला कळले पण नसते. त्याला आम्ही हातावर घेऊन बघितलं. OMG!! जिवंत स्टारफिश हातात घेतला होता पहिल्यांदाच. खूप मजा वाटली. ब्रीजच्या टोकाला समुद्राच्या लाटा जोरात आपटत होत्या आणि उन्हही होतं. पाणी स्थिर नव्हतं त्यामुळे आतले मासे नीट दिसत नव्हते. सगळं अनुभवून परत निघालो. खरंच हे पाहिलं नसतं तर नक्कीच खूप काही मिस झालं असतं.
सनसेट बघायला परत आम्ही आमच्या रीसॉर्ट च्या किनाऱ्यावर जाऊन बसलो आणि त्या गडद केशरी रंगाच्या सूर्याचा निरोप घेतला. धकाधकीच्या जीवनात जर चार क्षण शांतपणे घालवायचे असतील तर नील आइलँड एक बेस्ट प्लेस आहे. एक पूर्ण दिवस आम्ही नील आइलँड ला होतो पण अगदी सार्थकी लागला. त्या दिवशीच्या झोपेत मी कधीच भरतपूरला पोहचले होते. रंगीबेरंगी माश्यांमध्ये पोहत होते...
दिवस नववा – पोर्टब्लेअरला परत.
नील आइलँड मध्ये आमची सकाळ उजाडली. दाक्षिणात्य नाश्ता करताना अगदी ताज्या नारळाच्या चटणीचा आस्वाद घेतला. नील च्या हार्बर वर पोहोचलो. आजही आमची तीच मॅकरुझ होती. अंदमानच्या त्या नीलमणी नीलला शेवटचं अलविदा केलं. आणि मॅकरुझला सुद्धा अलविदा केलं कारण आमची बेटं फिरून संपली होती. जवळपास एक तासाचा प्रवास करून दुपारी बारा वाजता आम्ही पोर्टब्लेअर ला पोहोचलो. आमच्या आधीच्याच हॉटेल 'देवीयम मनोर' मध्ये रहायचं होतं. आम्हांला इथेही रूम अपग्रेड करून मिळाली. दुपारी साधसं जेवलो. आज काही करायचं नव्हतं. सततच्या प्रवासाचा थोडा थकवा आला होता त्यामुळे थोडा आराम केला. पण थोडया वेळाने रूममध्ये झोपून राहणे पाप वाटायला लागलं. आमचं खुद्द पोर्ट ब्लेअर काहीच बघुन झालं नव्हतं. काहीही न बघता आराम करण आमच्या मनाला पटलं नाही. शेवटी उठलो, तयारी केली आणि ऑटो करून म्यूज़ीयम ला जायला निघालो. (एक सांगायचं राहिलं, पूर्ण अंदमान मध्ये मोबाइल नेटवर्क हे 2G मध्ये आहे. Wifi सुद्धा हॉटेल रूम मध्ये मिळत नाही. लॉबी मध्ये मिळालं तर मिळतं. मोबाईल ला सरावलेले आम्ही आमची चिडचिड न होता उलट आम्हांला आतून शांत, बरं वाटत होतं)
तर ऑटो मध्ये माझं प्रश्न विचारण परत चालू झालं. ड्राईवर कडून कळलं की तो मूळचा कोलकताचा. गेली पंधरा वर्ष इथे राहत होता. त्याच्या द्रुष्टीने अंदमान राहण्यासाठी बेस्ट प्लेस आहे. इथे एका रेशन कार्ड वर(एका फॅमिली साठी) पूर्ण वर्षात फक्त तीन सिलींडर मिळतात. पण त्याची तक्रार नव्हती. पूर्ण अंदमान हे डिझेल च्या जेनरेटर वर चालतं. येथे प्रत्येक फॅमिली ला एक कार्ड मिळतं त्या कार्ड मुळे मेडिकल ट्रिटमेंट फुकट होतात.
गप्पांच्या ओघात अँथ्रोपोलोजिकल म्यूज़ीयम आलं. हे संपूर्ण म्यूज़ीयम जरूर बघण्या सारखं आहे. अंदमान आणि निकोबारच्या आदिवासी लोकांची माहिती आहे. ते वापरत असलेलं साहित्य, त्यांची केशभूषा, त्यांची राहणी सगळ्यांची माहिती होती तिथे. फार प्राचीन काळापासून माणूस तिथे राहत आला आहे. बारकाईने म्यूज़ीयम बघितलं. तो पर्यंत दुसरी ठिकाणे बंद झाली होती. पाच वाजले होते. अंधार पडला होता मग सरळ हॉटेल मध्येच निघालो.
दिवस दहावा – रॉस आणि नॉर्थ बे आयलँड.
दुसरा दिवस आम्ही नॉर्थ बे आणि रॉस साठी राखुन ठेवला होता. दोन्ही आइलँड्स पोर्ट ब्लेअर च्या जवळच आहेत. साध्या बोटीतून जायला निघालो. पहिलं आलं ते 'नॉर्थ बे'. हे आइलँड स्कूबासाठी पूर्ण अंदमान मध्ये बेस्ट समजलं जातं. मला स्कूबा च जसं आकर्षण होतं तसंच सब मरीन मधून दिसणार्या कोरल सफ़ारी सुध्दा होतं. मी कन्फ्यूज़्ड होते. पण मी कोरल सफारीची निवड केली. सब मरीनचं जास्त आकर्षण वाटलं. बस मध्ये बसल्यावर जसं आपण खिडकीतून बाहेर बघतो तसं विशिष्ट प्रकारच्या काचेतून बाहेर बघितल्यावर आतले रंगीबेरंगी मासे दिसत होते. तिथे अंब्रेला जेली फिश तर अगदी खिडक्याना लगटून जात होते. छोटे, मोठे मासे आमच्या जवळ येत होते. तितक्यातच एक विलक्षण, अदभुत दृश्य दिसलं. हजारो जेली फिशनी एकमेकांशी गुंफण करून तयार झालेलं फूल. अजूनही ते फूल नजरेसमोरून जात नाही. पण जसाजसा वेळ गेला तसा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सगळ्यांना त्रास व्हायला लागला. गरगरणे, चक्कर येणं, उलटी येणं, घाम येणं असे प्रकार व्हायला लागले. ज्या लोकांना त्रास झाला त्यांना वर डेक वर पाठवत होते. आई पण डेक वर जाऊन बसली होती. एकंदरीतच संमिश्र असा तो अनुभव होता. नंतर जेवताना एक पुण्याचा मुलगा भेटला. या आधीही तो तीनचार वेळा भेटला होता. तो स्कूबा करणार होता ते मला माहित होतं. त्याने मला आणखीनच जळवलं. त्याच्या मते फ़ारच अमेज़िंग एक्सपीरियेन्स होता. आणि मी मिस केलं होतं. ( ठीक आहे, मी मनाची समजूत काढली; आता खास स्कूबा साठी जगप्रसिद्ध अश्या दहाबला रेड सी मध्ये डुबकी मारून आल्याशिवाय चैन पडणार नाही)
नॉर्थ बे वरून बोट निघाली. या पुढचं डेस्टिनेशन होतं 'रॉस आइलँड'. तेवढ्यात आमच्या बोटीमधली लोकं जोरजोरात ओरडायला लागली. ते समुद्रात बघत होते. तिथे पहिलं तर एक मोठं पराती एवढं समुद्रकासव (turtle) भरसमुद्रात पोहत होतं. खरंच; अवर्णनीय असा आनंद झाला आम्हांला. आज त्या जेली फिश ने आणि टर्टल मुळे सगळ्या दिवसाला चारचांद लागले. रॉस जवळ आलं. तिकीट घेऊन आम्ही आत गेलो आणि बघितलं तर खूप सारे हरण, मोर, ससे आमच्या स्वागताला जणू काही उभे होते. नुसते बागडत होते. अनन्या त्यांच्या मागेच लागली. खूप सारे तिचे फोटो काढले. रॉस ला दोनशे वर्षापूर्वी ब्रिटिशांनी स्वतःला राहण्यासाठी मोठमोठे पॅलेस बांधले. स्विमिंग पूल पासून सगळ्या सोई तिथे होत्या पण आता आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर जंगल वाढतयं. जणू काही मोठ्या वेली ती बांधकामं गिळंकृत करत आहेत असं वाटतं होतं. सुनामीच्या तडाख्याखाली आलेल्या रॉस ला बाय केलं आणि पोर्टब्लेअर ला निघालो. संध्याकाळी आम्ही तिथल्या कार्बन बीच वर गेलो..परत पोहोण्याचा आनंद उपभोगला. पोर्टब्लेअरवरून इथे जायचा रस्ता इतका विलोभनीय होता की आपण जसं देखावा काढतो आणि डोंगराच्या जवळून नदी दाखवतो तसाच. पण नदी ऐवजी समुद्राची आपण कल्पनाच केलेली नसते..किती छान दिसत होतं.. खरंच..
गेले अकरा दिवस आम्ही मनमुराद भटकत होतो. खूप अनुभवलं, मजा केली. पण काही गोष्टी बघणं वेळेअभावी आम्हांला शक्य नव्हतं. त्यातलं महत्वाचं हुकलं ते म्हणजे बाराटांग आइलँड. हे आयसोलेटेड राहणार्या आदिवासींचं जारवा लोकांचं आइलँड आहे.तिथे आपल्या पेक्षा त्यांना जास्त हक्क दिलेले आहेत. कॅमेराला पूर्ण बंदी आहे तिथे गेल्यावर. तसंच वर्ल्ड हेरिटेज असलेल्या चुनखडीच्या गुंफा आहेत. अगदी नेहमीच्या जगापासून वेगळा असा तो भाग आहे. तो कवर नाही करता आला आम्हांला. त्यासाठी परमिटही लागतं. दुसरं आमचं हुकलं ते म्हणजे जॉली बो बीच आणि रेड स्की बीच. या पैकी एक बघितला तरी चालतो. दोन्हीसाठी परमिट घ्यावं लागतं. पण स्थानिक लोकांच्या मते जॉली बो बीच जास्त सुंदर आहे. या शिवाय पोर्टब्लेअर मध्ये असलेली दुसरी म्युजीअम. ती पण वेळेअभावी आम्हांला गाळायला लागली. कारण जेवढं अंदमानला बाहेर बघण्यासारखं आहे तेवढंच चार भितींच्या आतमध्येही आहे. असो!!
तर शेवटचा दिवस उजाडला. आमच्या प्लेन ने चेन्नई कडे उड्डाण केलं. अंदमान सोडताना खूप वाईट वाटलं. जे बघितलं ते आणि हुकलं ते दोन्ही आठवत होतं. समुद्र, मासे परत परत बोलवत होते. 'पुनरागमनायचं' असं जणू काही मला सांगत होते. त्यांना परत भेटायचं वचन देवून आले आहे.
[ लेखिकेचा पत्ता: पुणे, लेखिकेचा इमेल - anushkameher9@gmail.com ]
(छायाचित्रे मासिकाच्या शेवटी दिली आहेत)