कपाट आवरत होते आणि अचानक एक पत्र हाती आलं...जुनं दिसत होतं...

कवी गिरीश यांनी माझे सासरे कै.श्रीधर कारंजकर गुरूजी यांना लिहिलेलं..

मला ही गोष्ट आधीही माहिती होती..तरीही मला अलीबाबाची गुहा सापडल्याचा आनंद झाला..

सध्या रहिमतपूरमधे कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे...तिथे त्यांच्या काही वस्तू आठवणी जपलेल्या आहेत...विचार केला...माझे सासरे रहिमतपूर पंचक्रोशीत नि:स्वार्थी भावनेने तळमळीने काम करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते..आणि आहेत ही..

तर कवी गिरीश आणि गुरुजींचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते हे  स्पष्ट करणारं पत्र रहिमतपूरच्या संग्रहालयात असावं..म्हणून संबंधितांना फोन केला..तर या पत्राची एक झेरॉक्स कॉपी आम्ही आधीच संग्रहालयात लावली आहे..असं समजलं..

हे सगळं आमच्या लहान मुलांना नव्याने समजलं.त्यांची उत्सुकता वाढली..आणि आमची सहल ठरली...रहिमतपूर..

खरंतर रहिमतपूर आमचं गाव..पण नोकरीनिमित्त सगळेच आम्ही बाहेर पडलेलो..तसं कुलदेवतेच्या दर्शनाला..काही मित्रपरिवारांच्या सोहळ्याचे निमित्ताने..आणि काहीबाही कारणाने जाणं होतंच...

पण यावेळी वेगळं कारण होतं..

एक पर्यटन स्थळ म्हणून भेट देण्यास आम्ही निघालो..

सातारा शहरापासून जेमतेम  ३५ किमीचा प्रवास..

या प्रवासात कवी गिरीश यांच्याबद्दल काही जुजबी माहिती आम्ही मुलांना सांगितली..त्यांची शालेय जीवनातील पहिली कविताही वाचून दाखवली.मुलांची उत्सुकता शिगेला पोचली..कधी एकदा रहिमतपूर येतंय असं त्यांना झालं...

रहिमतपूरच्या वेशीत आम्ही प्रवेश केला..

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात कृष्णा नदीच्या परिसरात वसलेली रहिमतपूर नगरी...पूर्वेला देवदरीचा डोंगर आणि शेतीला व शहराला पाणीपुरवठा करणारं धरण..धरणाच्या भिंतीला सांडव्याच्या दोन्ही बाजूला दगडामधे हत्तीची डोकी कोरण्यात आली आहेत..त्यामुळे हे धरण गजधरण म्हणून ओळखलं जातं हे ऐकून पाहून मुलं हरखली...

रहिमतपूरच्या पश्चिमेला कृष्णा नदीच्या काठावर “पुण्यधाम” म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील पंढरपूरनंतर विठ्ठल-रुक्मिणीचे मंदीर असणारे वारक-यांचे तीर्थक्षेत्र प्रतिकाशी म्हणजेच ब्रम्हपूरी या तीर्थक्षेत्राबद्दल असं म्हणतात...

"ज्यांना घडेना पंढरी..त्यांनी जावे ब्रम्हपूरी"..

ब्रम्हपूरीचा घाट आजही सुस्थितीत आहे. संत गाडगे महाराज या ब्रम्हपूरी परिसरात अनेक दिवस वास्तव्यास होते.आता त्यांच्या स्मरणार्थ गाडगेमहाराज मिशनच्या वतीने आश्रमशाळा चालवली जाते..

गाडगेमहाराजांबद्दल मुलांनी पुस्तकात वाचलेले होते...त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं ठिकाण पाहून मुलं भारावून गेली.

रहिमतपूरच्या पूर्वेला कार्तिक स्वामींचे पुरातन मंदीर आहे..कमंडलू नदीचे उगमस्थान हेच...

इथे बाराही महिने वाहणारे झरे आहेत.अतिशय आल्हाददायक असे हे ठिकाण विविध औषधी वनस्पतींनी,गर्द झाडीने वेढलेली देवदरी घनदाट जंगलासारखी दिसते.हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

दक्षिणेकडे ग्रामदैवत चौंडेश्वरी देवीचे स्वयंभू स्थान, संत मीरा सय्यद कब्रस्तान, रणदुल्लाखान दर्गाह, मायलेकीचा घुमट, राममंदीर, चंद्रगिरी टेकडी अशी बरीच प्रेक्षणीय स्थळं शहर व परिसरात आहेत.

आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकिय, क्रीडा व शैक्षणिक वारसा जपणाऱ्या रहिमतपूर नगरीत नाटककार गो.पु.देशपांडे, प्रा.वसंत कानेटकर, बेबी शकुंतला, अभिनेत्री ज्योती सुभाष, गायिका बेला शेंडे सावनी शेंडे यासारखे अनेक साहित्यिक व कलाकार दिले यापैकी काहींचे निवासस्थान आजही पहायला मिळते.

डॉ.राजेंद्र शेंडे हे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ रहिमतपूरच्याच मातीतले...

ही सगळी माहिती ऐकून मुलांना अगदीच भरून आले..

आपले  आजीआजोबा,बाबा- काका  अशा नगरात जन्मले, वाढले, घडले..हे पाहून मुलं खूप खुश झाली..अभिमानाने त्यांची छाती भरून आली..

शेवटी कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्रात आम्ही गेलो..तिथली संपत्ती वैभव पाहून मुलांसह आम्हालाही नवल वाटलं..

कार्तिक योगी उलंडती निज कमण्डलू पिवळा...

रहिमतपूरला वळसा घालून आले सेवा या...

असं वर्णन कवी गिरीश यांनी रहिमतपूर नगरीचे केलेले आहे..हेही आमच्या वाचनात आले..

एकूणच खूप काही नवं ,वेगळं..पाहिल्याचं समाधान मुलांना मिळालं.आपल्या गावच्या सांस्कृतिक वारशाची ओळख आपण आपल्या पुढच्या पिढीला करून दिली याचा आभाळभर आनंद आम्हाला मिळाला..

सातारा जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांची कुणी विचारणा केली तर त्यात रहिमतपूरचे नाव आम्ही अग्रक्रमाने घेऊ..असं वचनही मुलांनी आम्हाला दिलं..आणि आमचा तो प्रवास अवर्णनीय ठरला.

(लेखिकेचा पत्ता: सातारा, मोबाईल नंबर - ९९२२८१४१८३)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel