दिवाळी झाली आणि आम्हांला कुठेतरी बाहेर फिरवुन आणावं म्हणून पप्पांनी ४-५ दिवस फिरवून आणण्याचा प्लॅन केला त्याप्रमाणे आम्ही निघालो आणि साताऱ्यामध्ये दाखल झालो.
रात्र झाली होती त्यामुळे आमच्या गेस्ट हाऊसवर आम्ही थांबलो आणि दुस-या दिवशी सकाळी कोल्हापुरच्या अंबाबाईच्या दर्शनाला निघालो. तेथुन संध्याकाळी आल्यावर सातारा बघण्यासाठी निघालो. आमच्या सोबत पप्पांचे तिथे राहणारे मित्र पण जॉइन झाले होते. असं म्हणतात की, सातारा जिल्हा म्हणजे शूरांची आणि वीरांची कर्मभूमी! छत्रपती शिवाजी महारांजाच्या पदपर्शाने पावन झालेला हा जिल्हा नैसर्गिक सौदर्याचे वरदान लाभलेल्या सह्याद्रिच्या कुशीत वसलेलं आहे. म्हणुनच, आम्ही मग थोडी सुरुवात केली.
सर्वात पहिले आम्ही फिरत फिरत मोती चौकाकडे जायला निघालो...त्यानंतर लांबुन चार भिंती हुतात्मा स्मारक पाहिलं. ते बघता बघता आम्ही देवी चौकाकडे आलो. तिथे पप्पांनी त्यांच्या सुरु झालेल्या त्या L.I.C.चे ऑफिस ही दाखवलं. ते बघुन झाल्यावर आम्ही मोती चौकात पोहचलो.
तेथे पोहचल्यावर अजिंक्य गणपतीचं सुंदर मंदिर आहे. ते दर्शन घेऊन आम्ही त्या राजवाड्यापाशी पोहचलो. तो अफाट राजवाडा बघून मी तर खूप थक्क झाले. त्या राजवाड्या समोर चौपाटीप्रमाणे खूप खाण्याच्या गाड्या होत्या. साता-याचे लोक ह्यास "मिनी चौपाटी" असे म्हणतात. तेथे आम्ही गरमा गरम पॅटीस खाल्ले. भरपूर खोबरं टाकून बनवलेला पॅटिस खरंच चवीला खूप मस्त होता. ते खाऊन मग आम्ही फुटका तलाव, पेशव्याचे आणखी राजवाडे बघितले . त्यांचे प्राणी पाणी प्यायला कुठे जात असे ते देखील आम्ही बघितले. चार हुतात्मा स्मारक देखील बघितले आणि परत आमच्या रूमवर आलो.
दुस-या दिवशी मग आम्ही सगळे सज्जनगड बघायला बाहेर पडलो. साधारण २० किमी गेल्यानंतर सज्जनगड येतो . सज्जनगड हा समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे. पठारा पासून १००० फुट हा गड आहे. २ एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिकूंन घेतला होता. शिवाजी महारांजाच्या विनंतीवरून रामदास येथे कायमसाठी वास्तवाला आले होते. साधारण १५० पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा दरवाजा येतो. कारण, पायथ्या पर्यंत आता गाडया जाऊ शकतात . ह्या पायऱ्या चढत असतांना मध्ये मध्ये रामदासांनी स्थापन केलेले ११ मारुतीचे छोटे मंदिर आहेत . ह्या पायऱ्या संपायच्या अगोदर एक झाड लागते. ५ मि च्या अंतरावर रामघळ नावाची जागा आहे. ती जागा म्हणजे समर्थांची एकांतात बसण्याची होती.
गडावर प्रवेश केल्यानंतर समोरच घोडयांना पाणी पाजण्यासाठी तळे होते. त्यास घोडाळे असे म्हणतात. त्याचप्रमाणे तळाच्या मागच्या बाजूस एक इमारत आहे. ते अंगाई देवीचे मंदिर आहे. समर्थाना चाफळच्या राममूर्ती बरोबर अंगापूरच्या डोहात ही मूर्ती सापडली आहे आणि मग पुढे रामदासांचे मंदीर येते. गडांवर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला "छत्रपती शिवाजी महाराजव्दार" असे नाव आहे. ह्या दरवाज्यातून आत गेल्यानंतर उजव्या हाताला एक उर्दू भाषेतला एक शिलालेख मराठीत भाषांतरासह आढळतो. अतिशय सुंदर असा त्या वाक्याचा अर्थ आहे.
आणि मग आत प्रवेश केल्यानंतर थोडं अंतर जाऊन समर्थांचं मंदीर आहे. मंदिराच्या सुरुवातीस गणपतीची सूंदर मुर्ती आहे. आणि मग समर्थाची मुर्ती आहे. मठात त्यांची ध्यानगुहा देखील आहे. त्याचप्रमाणे शेजघर खोली देखील आहे. त्यांमध्ये पितळी खुरांचा पलंग, कुबडी, गुप्ती आणि त्यात धारदार तलवार आहेत. दंडा , सोटा, पाण्याचे मोठे हंडे, तांब्या, पिकदाणी, बदामी आकाराचा पानांचा डबा, वल्कले, मारुतीची मूर्ती, असे त्यांचे सर्व साहित्य सुंदरपणे रचून ठेवले आहे. त्याच प्रमाणे जेथे दासांनी आपला देह ठेवला ती जागा पण दर्शविली आहे.
मंदिरातून बाहेर पडल्यानंतर पश्चिमेस गेल्यानंतर खाली उतरून धाब्याचा म्हणुन मारुतीचे मंदिर आहे. तेथेच बाहेर खाली येतांना एका चौथऱ्यावर शेंदूर फासलेला गोटा आढळतो त्यास "ब्रम्हपिसा"असे म्हणतात. रामामध्ये तहान-भूक विसरलेल्या रामदासांनी येथूनच उडी टाकली होती असे म्हणतात. गडावर आलेल्यासाठी राहण्याची आणि जेवणाची देखील उत्तम सोय आहे. तेथून निघाल्यानंतर आम्ही मग फेटे घालून फोटो काढले आणि तेथून निघालो.
त्यानंतर काही अंतर जाऊन खाली आल्यानंतर "समर्थ सृष्टी" पहायला मिळते. प्रवेशद्वारासमोर एक मारुतीची भव्य मूर्ती आढळते. तेथे प्रवेश करतांना मात्र तिकीट काढून आत जावे लागते. कारण, आत मध्ये समर्थावर त्यांच्या जीवनाची माहिती सांगणारा एक लघु चित्रपट तिथे असलेल्या चित्रपटगृहांमध्ये दाखवला जातो. त्याचबरोबर स्टॅच्यु मार्फत देखील त्या काळचे ग्रामीण जीवन उलगडून दाखवलेले आहेत. अशा तऱ्हेने आम्ही मग तेथून निघालो.
संध्याकाळच्या सुमारास परत तेथेंच जवळ असलेल्या "माहुली" गावात दक्षिण काशी विश्वेश्वराचं भव्य मंदिर आहे. ते संपूर्ण मंदीर दगडी बांधकाम केलेलं आहे. अतिशय प्राचीन असं ते मंदीर आहे. त्यानंतर तेथेंच जवळ असलेल्या नटराज मंदिर मध्ये आम्ही गेलो. अतिशय सुदंर फक्त लाकडी बांधकामातून ते मंदीर खूप मोठमोठया लोकांनी दिलेल्या देणगीतून उभारण्यात आलं आहे. संध्याकाळच्या शांततेच्या वातावरणांत ते लावलेल्या श्लोकांनी मन अतिशय प्रसन्न झालं होत. अश्या प्रकारे दुसऱ्या दिवशी आम्ही साताऱ्याचा निरोप घेतला आणि आमच्या गावी परतण्यास निघालो.
हे सातारा दर्शन ह्या विविध ठिकाणांमुळे आणि सौंदर्यसृष्टीमुळे मनात खूप ठासून गेलं ते परत येण्याच्या ओढीने!
(मो. ९८९००४८४७४)
(छायाचित्रे मासिकाच्या शेवटी दिली आहेत)