बेंजामिनचें लक्ष मेणबत्यांत लागत नाहीं हें पित्याच्या नजरेंत आल्याशिवाय राहिलें नाहीं. अन्य धंद्यात तरी त्याचें लक्ष लागतें का हें पाहण्यासाठीं मुलास बरोबर घेऊन सर्व कारखाने जोशियानें दाखविले. बेंजामिन यास चाकू सु-या वगैरे तयार करण्याचा कारखाना आवडला. हा कारखाना बेंजामिनच्या चुलत्याचा होता. चुलत्याकडे राहावयाचे पूर्वी एक करार लिहून द्यावयाचा होता. परंतु कराराच्या अटी न जमल्यामुळें बेंजामिन यास हा धंदा सोडावा लागला. याच सुमारास बेंजामिनचा एक भाऊ जेम्स हा इंग्लंडमधून छापखान्याचें काम शिकून आला. त्यानें नवीन छापखाना काढला होता. त्याच्या छापखान्यांत बेंजामिननें काम कावे असें ठरलें. २१ वर्षाचे होईपर्यंत त्या काळीं उमेदवारांस उमेदवारी करावी लागे, व तसा करारनामा लिहून देणं भाग पडे. बेंजामिन यानें तसा करारनामा लिहून दिला व काम करूं लागला.

बेंजामिन कामांत अडतळे करणारा नव्हता. तो आपलें काम वक्तशीर करी. नवीन काम तो आस्थेंनें शिकूं लागला. त्यास वाचनाची गोडी लागली. त्यानें रात्रीं, जेवण्याचे आधीं, वेळ मिळेल तेव्हां पुस्तकें वाचण्याचा सपाटा चालविला. ' बनियन ' याचीं सर्व पुस्तकें त्यानें पुन: पु:न वाचलीं. यांत्रिक क्रमण (Pilgrim’s Frogress) हें बनियनचें सर्वमान्य पुस्तक त्यास फार आवडे. नंतर कांहीं ऐतिहासिक पुस्तकें त्यानें वाचली. एकदां ' मुलींचें शिक्षण ' या विषयावर त्यानें निबंध लिहून बापास दाखविला. तो निबंध बापानें वाचून पाहिला व  म्हणाला ''यांत व्यवस्थिपणा नाहीं, व्याकरणाच्या पण चुका आहेत. ''तेव्हां बेंजामिन यानें एक व्याकरणाचें पुस्तक मिळविलें. या पुस्तकांत शेवटीं अलंकार, भाषाशैली, तर्कशास्त्र वगैरेही प्रकरणें होतीं. या पुस्तकाचा व या शेवटच्या प्रकरणांचा बेंजामिन यांस फार फायदा झाला. आपणास नीट लिहितां यावें म्हणून ऍडिसनच्या ' स्पेक्टेटर ' या निबंधाची एक प्रत त्यानें मिळविली. ज्यास इंग्रजी नीट शिकावयाचें असेल त्यानें ऍडिसनच्या निबंधांचीं पारायणें करावीं असें म्हणतात. बेंजामिन हे निबंध वाची. त्यांतील मुद्ये मांडी व त्या मुद्यांवर न पाहतां स्वत:चें विवेचन लिही. नंतर हें स्वत:चें लिखाण व ऍडिसनचें लिहिणें यांची तो तुलना करी भाषेसाठीं असे परिश्रम करीत असतां त्यानें गणिताकडे दुर्लक्ष केलें होतें म्हणून त्यांतही त्यानें प्रगति करून घेतली.

ज्या दिवशीं सुट्टी असे त्या दिवशी बेंजामिन पोहावयास जाई. तो उत्कृष्ट पोहणारा होता. आपली पोहण्याची गती जास्त वाढावी म्हणून तो निरनिराळया युक्त्या करी. एकदां स्वत:स अनेक वल्ह्यांसारखे आणखी हात लावून तो वेगानें पोहत गेला. दुस-या एका वेळीं आकाशांत वर पतंग उडवून, त्याचा दोरा तोडांत धरून तो वा-याच्या वेगानें विनाश्रम पलीकडे गलबतासारख गेला. सर्व मुलांस बेंजामिनच्या या युक्त्यामुळें मोठें कौतुक वाटे. त्याचा मेंदु मोठा सुपीक यांत संशय नव्हता.

अशा प्रकारें छापखान्यांतील काम संभाळून बेंजामिन मनानें, बुध्दीनें, शरीरानें तयार होत होता. त्याचा भाऊ त्याचा जेवण्याखाण्याचा खर्च करी. एक दिवस बेंजामिन आपल्या भावास म्हणाला ''भाऊ, माझ्यासाठी तूं जे पैसे खर्च करितोस, त्यांतील मला अर्धा हिस्साच देत जा. आजपासून मी फलमूलाहारी, शाकाहारी होणार आहें. ''भावानें स्वत:च्या फायद्याची ही गोष्ट तात्काळ मान्य केली. तो बेंजामिन यास निम्मे पैसे देऊं लागला. बेंजामिन हा स्वत: स्वयंपाक करी. त्यास या अर्ध्या पगारांतीलही अर्धा भाग पुरा होत असे. आणि उरलेले पैसे शिल्लक टाकून तो पुस्तकें विकत घेई. बेंजामिनचें वाचन सदोदित चालू होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel