तसं पाहायला गेलं तर मला पर्यटनाची आवड लहानपासूनच. आई - बाबांना खूप फिरायला आवडतं त्यामुळे मला पण. मला सगळयात जास्त आवडतात त्या पुरातन काळातील जागा. ज्यांना गूढ असा काहीतरी इतिहास असतो आणि याच गोष्टींची आवड! मी 12 डिसेंम्बर 2018 ला भाजे लेणी बघायला गेले. तसं अजिंठा-वेरूळ मी पाहिलं होत म्हणून लोणावळतील मळवली गावापासून अवघ्या 11 किमो अंतरावर असणाऱ्या भाजे लेण्यांनी मला अतिशय आकर्षित केलं.
तुम्ही तिथे स्वतःच्या बाईकवर किंवा ट्रेनने पण जाऊ शकता. रेल्वे स्टेशन पासून अगदीच काही किमीवर या लेण्या असल्यामुळे रेल्वेचा प्रवास उत्तम. पण मी आणि माझी मैत्रीण गेलो ते आमचा scooty वर पुण्यातून.
आम्ही दोघी 7 वाजता निघालो. कधी ती कधी मी असं करत करत आम्ही जवळपास 70 किमीचा प्रवास 3 तासात पूर्ण केला आणि तिथे पोहोचलो. थंडी खूप होती. पण तिथला निसर्ग पाहता ती कुठला कुठे पळून गेली.
खरंतर इथे यायची योग्य वेळ ही पावसाळा.कारण म्हणजे इथला निसर्ग. या लेण्यांजवळच बाजूला विसापूर आणि लोहगड हे किल्ले आहेत. ते पण खूप पाहण्यासारखे आहेत.
जवळपास 150 पायऱ्या चढून गेल्यावर या लेण्या आहेत. पण त्याआधी त्या पाहण्यासाठी वर येतानाच एक ऑफिसवजा खोली आपल्याला दिसते जिथून 20 रुपयांचं तिकिट काढावं लागत.
वर गेल्यावर समोरच दिसतं ते एक भव्य स्तूप असणारं चैत्यगृह जे अतिशय सुंदर कोरलेलं आहे आणि लाकडाचा वापर करून वरती घोड्याचा नाळेसारखा आकार दिलेला आहे आणि सगळयात महत्वाचं म्हणजे जवळपास 2000 वर्षानंतर देखील ते लाकूड आणि ती वास्तू अतिशय उत्तम आहे.तिथली शांतता आणि थंड वातावरण मनाला शांत करणार आहे.एक वेगळाच प्रकारची ऊर्जा इथे सामावली आहे .2000 वर्षांपूर्वी बौद्ध भिक्षु इथे राहत असत, असे म्हटले जाते.बाजूला छोट्या छोट्या खोलीवजा लेण्या आहेत जिथे दगडात छोटीशी खिडकी, कदाचित दिवा ठेवण्यासाठी असावी अशी एक खोबणी आणि आरामासाठी एक पलंग अर्थात दगडाचा कोरलेला आहे जिथे बौद्ध शिष्य राहत असावेत, जे पाहून थक्क व्हायला होतं आणि वाटतं की त्याकाळातील लोक किती मेहनती आणि बलवान असावेत. तसंच काही लेण्या या दुमजली आहेत हे खूप जास्त विशेष!
पण मला सगळयात जास्त आकर्षित केलं ते म्हणजे ज्या बौद्ध भिक्षुचा तिथे मृत्यू झाला. त्यांचा स्मृतिप्रित्यर्थ कोरल्या गेलेले 14 स्तूपांनी. ते स्तूप अतिशय सुंदर आहेत आणि महत्वाचं म्हणजे ते सगळे स्तूप एकाच दगडात कोरलेले आहेत. यातील 3 स्तूपांवर भिक्षूंची नावे 'अंपिनिका, धम्मगिरी व संघदिना' देखील कोरलेली आहेत. त्यापुढे देखील काही लेण्या आहेत. इथे पाण्याची व्यवस्थादेखील केलेली आहे. हे तेथील छोट्या छोट्या दगडी विहिरींवरून लक्षात येते.
मला या लेण्यांनी खूप जास्त प्रभावित केलं आणि खरंच हे सगळं मानवानेच केलं असेल ना की खरंच कोणतातरी दैवी अथवा आपण ज्यांना एलीएन म्हणतो अशा कोणता जीवांचा यात हात असेल यासारखे कित्येक प्रश्न उपस्थित करून गेला. आम्ही 3 वाजता लेण्या उतरून खाली आलो आणि परतीचा प्रवासाला लागलो पण जे काही पाहिलं ते अतिशय उत्तम होतं हे नक्की.
लेखिका: स्नेहल घोलप, पुणे
ईमेल: snehalgholap940@gmail.com