आई! दोन अक्षरांनी बनलेला एक शब्द. भाषा, धर्म, रूढीनुसार तिला अनेक संबोधने वापरली जातात.
ती सुक्षिक्षित-अशिक्षित-अल्पशिक्षित कशीही असू शकते. इतकेच नव्हे तर ती जलचर, भूचर, खेचर (आकाशातील) या वर्गातील अगदी किडामुंगी पासून महाकाय हत्तीच्या रूपातही असू शकते. हिंस्त्र प्राणीही याला अपवाद नाहीत. असे असले तरी काही गुण तिच्यात जन्मजात असतात. ते म्हणजे आपल्या अपत्याबद्दलचे वात्सल्य, त्याचे पालनपोषण आणि संरक्षण करणे, त्याला मूलभूत अशा काही गोष्टींचे ज्ञान देवून जगासमोर उभा करणे, वगैरे. कोणत्याही सस्तन प्राण्याच्या नवजात अर्भकाला जन्मल्याबरोबर भूक लागते. त्यासाठी त्याला लागणारे दूध आईच्या स्तनात जेमतेम तासाभरात तयार होते आणि ते अर्भक पिऊही लागते. सर्व सजीव प्राणीमात्रांत अवयव, त्वचा, अस्थी, केस इत्यादी गोष्टी एकाच्या दुसऱ्याला चालत नाहीत. मानवाच्या बाबतीत तर रक्तगट जुळल्याशिवाय एकाचे रक्त दुसऱ्याला चालत नाही. परंतु यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आईचे दूध मात्र सर्वत्र चालते! मानवी अर्भकाला काही कारणाने आईचे दूध मिळू शकत नसेल तर त्याला इतर प्राण्याचे उदा. गाय अथवा शेळीचे दूध पाजतात.
पुराणात आईच्या दुधाला वंचित झालेल्या उपमन्यूची कथा आली आहे. त्याने तपश्चर्या केल्यावर परमेश्वराने त्याला क्षीरसागर म्हणजे दूधाचा समुद्र बहाल केला असे सांगितले जाते. पृथ्वीतलावरच्या सर्व सस्तन प्राण्यांच्या मातांकडे असलेले दूध म्हणजे क्षीरसागरच नव्हे कां?
परमेश्वराने उपमन्यूला क्षीरसागर बहाल केला म्हणजे - आईच दूध मिळत नसेल तर इतर प्राणीमातांचे दूध तू पिऊ शकतोस असे वरदान दिले. म्हणजे एका अर्थाने क्षीरसागरच दिला अशी उपपत्ती सहज लावता येते.
आईच्या ठिकाणी असलेला आणखी महत्वाचे गुण म्हणजे सखोल मार्गदर्शन आणि अचूक निर्णयक्षमता. या बाबतीत महाभारतातील पांडवांचे उदाहरण अत्यंत बोलके आहे. वास्तविक कौरव संख्येने शंभर आणि साधनसामुग्रीनेही वरचढ. तर पांडव संख्येने फक्त पाच आणि साधनसामुग्रीच्या बाबतीतही नगण्य. परंतू पांडव नेहमीच कौरवांना पुरून उरत. इतकेच काय तर शेवटच्या महाभारत युद्धात सर्वच्या सर्व कौरव मारले गेले पण पाचही पांडव जिवंत तर राहिले. याचे महत्वाचे कारण म्हणजे पांडव प्रत्येक गोष्ट आपल्या आईच्या सल्ल्यानुसार करत आणि तिचा निर्णय अंतिम समजून त्यानुसार वागत. याउलट कौरव आईच काय तर भगवान श्रीकृष्णालाही जुमानित नसत.
युद्धानंतर पांडवांचा जवळजवळ निर्वंश करणाऱ्या अश्वत्थाम्याला पकडून आणल्यानंतर, त्याला काय शिक्षा द्यायची हेसुद्धा पांडवांनी कुंतीला विचारले. आपल्या कुळाचा निर्वंश करणाऱ्याला कोण सोडेल? परंतु कुंतीने मात्र अश्वत्थामा गुरूपुत्र आहे म्हणून अवध्य आहे असे सांगून त्याला जिवंत सोडून द्यायला सांगितले. आणि पांडवांनी आपल्या आईचा निर्णय मानला.
शिवछत्रपतीही नेहमी आपल्या आईच्या सल्ल्यानेच वागत ही गोष्ट सर्वश्रुत आहेच. शिकागोच्या धर्मपरिषदेची माहिती कळल्यावर, अनेक जाणकारांनी स्वामी विवेकानंदांना तुम्ही त्यासाठी तिकडे जावे असे आग्रहपूर्वक सुचविले. परंतु स्वामीजींनी मातृतुल्य शारदामाता यांची परवानगी मिळाल्याशिवाय जायचे नाही असे ठरविले. याविषयीच्या पत्रव्यवहारात बराच काळ गेला. परंतु शारदामाता यांची परवानगी आणि आशीर्वाद मिळाल्यावच त्यांनी अमेरिकेकडे प्रस्थान ठेवले आणि विश्वविजयी होऊन परत आले! ही गोष्ट आईची महती आणखी अधोरेखित करते.
या जगात पदार्पण केल्यावर आपला पहिला गुरू म्हणजे आपली आई असते. आपण साधारणपणे 6 वर्षाचे होईपर्यंत, आपल्याला जगण्यासाठी लागणा-या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आणि मार्गदर्शन आईकडूनच मिळते. परंतु हे सर्व करता करता हीच आई आपल्याला अचानक आपल्या भावी जीवनाचे सूत्र आणि सारही सांगून जाते.
काही वर्षापूर्वी एका वर्तमानपत्रात 'माझी आई' नावाचे एक सदर रविवारच्या पुरवणीत येत होते. या सदरात अनेकांनी आपले अनुभव लिहीले होते. एक अनुभव न विसरण्यासारखा होता. अनुभवलेखिका जेमतेम दहाबारा वर्षांची असताना, तिची आई रोज सकाळी सडा संमार्जन करून, तुळशीवृंदावनासमोर ठिपक्यांची रांगोळी काढायची.
एक दिवस मुलीने विचारलं “हे काय गं आई, तू नेहमी टिपक्यांची रांगोळी का काढतेस? डिझाईनची का नाही काढत?' त्यावेळी आईने उत्तर दिलं 'मुली, अगं असे टिपके टिपके जोडूनच संसाराची रांगोळी फुलवायची असते!'.
एका वाक्यात आईने आपल्या मुलीला उभा संसार सुफळ संपूर्ण कसा करावा हे सांगितलं. थोडा विचार केला तर यात किती गहन अर्थ भरला आहे हे आपल्याला समजेल. हे ठिपके घरातील माणसांचे असतील, इतर नातेवाईकांचे असतील, त्यांच्या गुणावगुणांचे असतील, समज गैरसमजांचे असतील, अर्थिक किंवा इतर समस्येचेही असतील. परंतु, जी स्त्री हे सगळे ठिपके न थकता, न थांबता, न टाळता, वेळचेवेळी व्यवस्थित जोडू शकते, तिचा संसार उत्तम रीतीने फुलतो. जी जोडू शकत नाही, तिचा संसार अधुराच राहतो.
लेखिकेची आई जेमतेम दुसरीपर्यंत शिकलेली होती.परंतु, एखाद्या तत्वज्ञानी माणसाला शोभेल असं ज्ञान देणारी आई, शिकलेली असली तर उत्तमच, परंतु नसली तरी आपल्या मुलांना किती सुंदर मार्गदर्शन करते, हे यातून दिसतं. बालपण आठवलं तर आपल्यापैकी प्रत्येकाला आईने जीवनाविषयीचे काही ना काही मार्गदर्शन केल्याचं आठवेल.
मी आठ-दहा वर्षाचा असताना, पुण्यात घराजवळच्या श्री जंगलीमहाराज मंदिरात जात असे. दिवाळीच्या दिवसात एकदा मला तिथे कचऱ्यात पडलेली जाड उदबत्ती दिसली. क्षणार्धात माझे डोळे आनंदाने चमकले! कारण मोठे फटाके पेटवायला अशा जाड उदबत्या फार उपयोगी असतात. मी चटकन ती उदबत्ती कचऱ्यातून उचलली आणि घरी येऊन तिने अंगणात फटाके उडवायला सुरूवात केली. या जाड उदबत्तीने माझे फटाके पटापट पेटत होते. मी पळत घरात गेलो आणि माझी ही नवी मजा दाखवायला आईला बाहेर घेऊन आलो. पहिला फटाका पेटवतानाच आईचे लक्ष त्या उदबत्तीकडे गेले.
'अवि कुठून आणलीस रे ही उदबत्ती? आपल्याकडे तर इतकी जाड उदबत्ती नाही.' - आई.
मी समुद्रमंथनातून देवांनी मिळवलेल्या अमृताची गोष्ट सांगावी अशा थाटात त्या उदबत्तीच्या प्राप्तीची हकिगत सांगितली.
'म्हणजे ही उदबत्ती तू जंगलीमहाराजांच्या देवळातून चोरून आणलीस?' आईने रागावून विचारले.
'अग, चोरून कशाला आणिन? कचऱ्यात पडली होती म्हणून मी फटाके पेटवायला ती उचलून आणली.' मी काहीसा गडबडून म्हणालो.
'ती घेण्यापूर्वी कुणाला विचारलेस?' - आई.
'नाही.' - मी.
'मग ती चोरीच झाली!' - आई
'अगं पण आई, मी देवस्थानाच्या मालकीची कोणतीही किंमती वस्तू उचलली नाही. कचऱ्यात पडलेली उदबत्ती घेतली मी तर ती चोरी कशी होईल?' मी रडवेला होऊन म्हणालो.
'वेडा आहेस ! जगातल्या प्रत्येक गोष्टीला किंमत असते. मग ती कचऱ्यातील वस्तू असो किंवा हिरा असो. आणि ही उदबत्ती देवळातल्या कचऱ्यात आहे. जंगलीमहाराजांच्या मालकीची आहे. ती कुणाला न विचारता घेणे म्हणजे ती चोरीच आहे. आज तुला देवळातल्या कचऱ्यातली उदबत्ती उचलाविशी वाटली. उद्या देवासमोरचे पैसे - वस्तू उचलायची बुध्दी होईल. मुकाटयाने ती उदबत्ती विझव आणि देवळात होती तिथे ती ठेवून ये' आई माझा कान पिळत चढ्या आवाजात म्हणाली.
मी ती उदबत्ती विझवली आणि देवळात होती तिथे नेऊन ठेवली. यातून माझी चिडचिड झाली होती, पण ती शांत झाल्यावर आईने सांगितलेला विचार या प्रसंगाने मनात मात्र घट्ट बसला. वस्तू देवळातल्या कचऱ्यातील असल्या तरी त्या देवाच्या मालकीच्या असतात. त्या कुणाला न विचारता घेणे म्हणजे ती चोरीच आहे.
पुढे आईने सांगितलेल्या अशा अनेक बोधप्रद गोष्टी माझ्या मनात इतक्या घट्ट बसल्या की पुढील आयुष्यात कोणाकडून कुठलीही वस्तु फुकटात मिळवणे, घेतलेल्या वस्तूचा योग्य तो मोबदला न देणे अथवा सार्वजनिक पैशातून हिशेबात चलाखी करून चार पैसे लाटणे अशी बुध्दी कधीच झाली नाही.
एक दिवस कोणीतरी मला ईशवास्योपनिषदाचे पुस्तक वाचायला दिले.
पहिलीच ऋचा होती - ॐ ईशवास्यमिदंसर्व यत्किंञ्च जगत्यां जगत | तेन त्यक्तेन भुञ्जीथा मागृधाः कस्यस्विध्दनम् || म्हणजे या जगातील सर्व गोष्टी ईश्वरनिर्मित आहेत. त्यांचा त्यागपूर्वक उपभोग घ्यावा, पण कोणाच्याही वस्तुचे-धनाचे अपहरण करू नये.
जेमतेम सातवीपर्यंत शिकलेली आणि कोणत्याही वेदपाठशाळेत न जाता, माझी आई तरी वेगळे काय सांगत होती? हे ज्ञान तिला कुठून आले होते?
खेडेगावातल्या आया चुल सारवल्यानंतर ती पेटवताना एक प्रार्थना म्हणतात. ती म्हणजे 'चुली चुली तू शंभरांचं शिजव. शंभरांचं शिजव अन हजारांना पुरव. हजारांना पुरव पण तुझ्यापाठी हंडाभर उरव!'
वरकरणी अगदी साध्या शब्दात वाटणारी प्रार्थना, त्या माऊलीला केवळ एका कुटुंबाच्या पोषणापुरतीच मर्यादित न ठेवता, समाजासाठी 'अन्नपूर्णा' होण्याची महत्वाकांक्षा जागवते असे म्हटल्यावाचून रहावणार नाही. कारण 'हंडाभर उरव' ही मागणी घरातल्या व्यक्तींसाठी नसून अतिथी-अभ्यागत, कोणी भुकेलेला याचक यांच्यासाठी असायची. अशिक्षित असलेल्या या मातेच्या तोंडी ॐ सहनाववतु, सहनौ भुनक्तुं' यासदृष्य अर्थ असलेली प्रार्थना येते. कोणत्याही वेदपाठशाळेत न जाता. हे संस्कृतीचं देणं नाही तर काय?
सकाळच्या सप्तरंग पुरवणीत 'फिरस्ता' या सदरात लिहितांना सकाळ माध्यम समुहाचे संपादक श्री उत्तम कांबळे यांनी आपल्या भ्रमंतीत अशाच हृद्य मातृकथा सांगितल्या आहेत. उत्तमजी परदेशी जाणार असे कळल्यावर त्यांच्या मित्राच्या आईने 'वाटेत तुला खर्चासाठी असु देत' असे म्हणून काही रूपये देऊ केले. उत्तमजींनी संकोचून 'परदेशात हे चलन चालत नाही' असे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या माऊलीने 'अरे आईने दिलेले पैसे जगात कुठेही चालतात!' असे सांगून त्यांना निरूत्तर केले.
दुसऱ्या एका प्रसंगी एका मित्राच्या आईने जेवताना ताटात काही गोडधोड आग्रहाने वाढले. त्यावेळी उत्तमजींनी 'मला पथ्य आहे...जास्त खाल्ले तर त्रास होईल' वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या मातेने 'आईच्या हातचं खावून कुणाला कसलाही त्रास होत नाही' असे सांगून आणखी वाढले.
दोन्ही गोष्टींच्या बाबतीत सामाजिक व्यवहार्यता आणि आईचा जिव्हाळा यांची तुलना केली तर जिव्हाळ्याचे पारडे जडच रहाणार हे उघड आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. एका उत्साही प्राणीसंशोधकाने जंगलातील सिंहीणीशी दोस्ती जमवली होती. इतकी की तो जंगलात तिच्या आसपास सहज हिंडे फिरे. एक दिवस तिला पिल्ले झाली. आता प्रसंग बाका होता. प्राणी आपल्या बछाड्यांचे संरक्षण डोळयात तेल घालून करतात. कोणताही तिऱ्हाईत प्राणी त्यांच्या जवळ आला तर लगेच हल्ला चढवून त्याला ठार मारतात हे तो जाणून होता. खरेतर सिंहीण अशा बाबतीत सिंहालाही आपल्या पिलांजवळ येऊ देत नाही. त्यामुळे या मातेने आपल्याला जरी स्वीकारले असले तरी पिलांजवळ ती आपल्याला जाऊ देईल का याबाबत तो साशंक होता. शेवटी त्याने जिवावर उदार होऊन तेही धाडस केले. पिले तिच्या जवळपास बागडत असताना तो त्यांच्यापासून काही अंतरावर जाऊन शांतपणे बसला. काही मिनिटांत ती पिले जवळ येऊन अजाणता त्याच्या अंगाखांद्यावर चढू लागली. वाघिणीने लांबून ते बघितले पण तिने काहीही हालचाल केली नाही. याचा अर्थ सरळ होता. आपल्याच योनीतल्या आणि त्या बछाडयांचा पिता असलेल्या सिंहावरही विश्वास न ठेवणाऱ्या या मातेने, मानवावर मात्र विश्वास दर्शवला होता! एरवी हिंस्त्र प्राणी समजल्या गेलेल्या सिंहीणीच्या या वात्सल्याला काय म्हणवे?
एकंदरीत सर्व प्राणीमात्रांमधील आईच्या ठिकाणी असणारे जन्मजात गुण, व्यवहारज्ञान, दूरदृष्टी, समयसूचकता, निर्णयक्षमता इत्यादी गोष्टींचा विचार केला तर, आई ही केवळ हाडामासांची एक व्यक्ती नसून, संस्कृती नावाच्या विद्यापिठाची अनाभिषिक्त कुलगुरू असते, असं म्हटलं तर वावगे होणार नाही.
लेखक: श्री.अविनाश ब. हळबे, शिवतीर्थनगर, पुणे.
मोबाईल: 9011068472
ईमेल: avinash.halbe21@gmail.com
(लेखक टाटा मोटर्स मधील निवूत्त डिव्हिजनल मॅनेजर असून ते लेखक, प्रवचनकार, कथाकथन कार, व्याखाते, भारुड सम्राट आहेत आणि या सर्व क्षेत्रांत त्यांनी अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत)