महाराष्ट्रातील दुष्काळ हा 1972 च्या दुष्काळापेक्षा मोठा असेल.  हा दुष्काळ निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य पाण्यासाठी भटकंती विहिरी कोरड्या, पाण्याची आगगाडी हे शब्द महाराष्ट्र वासियांसाठी आता नेहमीचेच झाले आहेत. कारण गेल्या काही मासांपासून दुर्दैवाने महाराष्ट्रातील सर्वच जनता अल्प-अधिक प्रमाणात कोरड्या दुष्काळाचा सामना करत आहे.

"मेरे देश की धरती, सोना उगले उगले हिरे मोती" या काव्यपंक्ती आता केवळ स्वप्नवतच वाटतील, अशी स्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. मध्यंतरी शासनाने 15 सहस्र 747 गावांमध्ये दुष्काळ असल्याचे घोषित केले. गेली 2 वर्षे अत्यल्प पडलेला पाऊस, वेळीअवेळी होणारी गारपीट आणि वाढती उष्णता यांची परिणती शेवटी दुष्काळात झाली.

या दुष्काळाची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक निसर्गनिर्मित आणि दुसरे मानवनिर्मित.

निसर्ग आणि मनुष्य हे एकमेकांना खरेतर पूरक असायला हवेत पण दुर्दैवाने आज मनुष्यच निसर्गाच्या जिवावर या ना त्याप्रकारे उठला आहे. मग ती वृक्षांची अमाप केली जाणारी तोड असो, समुद्राच्या पाण्यावर केले जाणारे बांधकाम असो किंवा या सर्वांच्या मुळाशी असलेला स्वार्थीपणा असो. हा दुष्काळ माणसाला गिळंकृत करणारा आहे, हे चिंताजनक आहे. याचा मनुष्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. पर्जन्यमान कमी आणि लोकसंख्या वाढ याचा कुठेच ताळमेळ बसत नाही, पाण्याची मागणी वाढतच जाणार, मोठी धरणे पूर्ण लाभक्षेत्रास पाणी पुरविण्यास असमर्थ होत राहतील.  हरितक्रांतीमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली हे जितके सत्य आहे तेवढेच काही चुका झाल्यामुळे घातक झाले आहे, रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके, अनैसर्गिक बियाणे वापरामुळे पर्यावरणाचे संतुलन नष्ट झाले. पाणी, हवा, अन्न दूषित झाल्यामुळे माणसाचे व जमिनीचे आरोग्य कायमचे बिघडले. पाण्याचा स्त्रोत फक्त पाऊस आहे. निसर्ग. पाऊस, पाणी, हवा यांचा उपभोग घेण्याचे ज्ञान जलशास्त्राच्या दृष्टीकोनातून अवगत झाल्यावरच दुष्काळाची व टंचाईची जाणीव कमी होवू शकते. आपल्याकडे टंचाई अनेक प्रकारे जाणवू शकते. पाणीटंचाई, चाराटंचाई, अन्नटंचाई, शेतीत मजुरांची टंचाई या सर्व टंचाई विचाराच्या टंचाईतून बोकाळतात.

यावर मात करण्यासाठी जलसाक्षरता, जलसंवर्धन, पाणी वापर साठवणूकीचे प्रबोधन, ललित वाङमयाच्या माध्यमातून हसत खेळत रंजकपणे, कथा, कविता, लेख, पत्रकारिता व त्यांची परिणामकारकता निश्चितच वाढवता येईल या विचारातून सर्व जलतज्ज्ञांनी महाराष्ट्र सिंचन सहयोग या व्यासपीठावरून महाराष्ट्रभर जन हितोपयोगी विचारांची व प्रबोधनाची ज्योत तेवत ठेवणे आवश्यक आहे.

जलस्त्रोत आणि उपभोक्ता यांचे भावनिक, भौतिक, अध्यात्मिक, व्यवहारिक, सांस्कृतिक आदि नाते अतूट असते. संवर्धन, विनियोग, काळापासून इंग्रजांच्या आगमनापर्यंत हजारो वर्षे अबाधित राहिली. परंतु इंग्रज सत्तेने जलसंवर्धन, जलसंरक्षण व जलउपभोक्ता यांची विभागणी केली. संवर्धन व संरक्षण यांची जबाबदारी एकीकडे आणि उपभोक्ता एकीकडे (परावलंबी) त्यामुळे माझे पाणी हे आपुलकीचे नाते नष्ट झाले. दुष्काळाने असंख्य संकटे समोर मांडून ठेवली आहेत, मात्र याचा सर्वाधिक फटका बसला आहे, तो अर्थातच शेतकर्‍यांना पिकांची झालेली हानी, बेताची आर्थिक परिस्थिती, चाराटंचाई, पाणीटंचाई यांमुळे या दुष्काळाशी दोन हात करतांना हा शेतकरी राजा कोलमडून गेला आहे. पावसानेच दगा दिला, तर आशा तरी कुणाची करायची या चिंतेत शेतकरी असल्याने त्यांच्यासाठी प्रत्येक क्षण प्रत्येक वर्षच जणू काही दुष्काळमय झाले आहे. दुष्काळाने त्याचे जीवन उद्ध्वस्त झाल्यामुळे त्याच्याजवळ एकच उपाय उरला आणि तो म्हणजे गळफास लावून आत्महत्या करणे.

वर्ष 2015 मध्ये राज्यात सहस्रावधी शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो, पण आज हाच कणा मोडून पडू लागला, तर अर्थव्यवस्था तरी कशी काय टिकेल, याचा राज्यकर्त्यांनी कधी गांभीर्याने विचार केला आहे का?

शेतकऱ्यांचे दुख हे धोरणाची अंमलबजावणी मध्ये नसून खरे तर ते शेतकरी विरोधी कायदयामध्ये आहे. शेती करण्यासाठी कधी मुक्त स्वातंत्र्य शेतकरी बांधवाना दिलेच नाही. सरकारने प्रथम शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे आणि महाराष्ट्रातील जनतेला जलसाक्षर, हवामान साक्षर व संविधान साक्षर यासाठी प्रकल्प तयार करावे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतरही आपण इंग्रजांनी घालून दिलेले कायदेच अमलात आणत असल्याने संस्कृतीचा वेगाने ऱ्हास होत आहे. माणूस आणि जलस्रोत यांचा एकमेकांशी असलेला संबंधच तुटत आहे. त्यामुळे पावसामुळे धरणे जरी भरली, तरी आवश्यक तेवढे पाणी मिळतच नाही. त्यामुळे कायमच पाणी टंचाई सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. पूर्वीच्या काळी खेडेगावे अधिक आणि शहरे अल्प असायची मात्र आता उलट झाले आहे. लोकसंख्येच्या विस्फोटामुळे शहरात ना शुद्ध अन्न, ना शुद्ध हवा, ना शुद्ध पाणी. शहरांना सिंचनाद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा ही अल्प होत आहे. या सर्वांचाच परिणाम म्हणून भविष्यात भीषण अन्नटंचाईलाही सर्वांनाच सामोरे जावे लागणार आहे. येणारा काळ भयावह असेल, याची काही अंशीतरी कल्पना सध्याच्या दुष्काळावरून करता येईल.

100 मिमी पाऊस म्हणजे हेक्टरी 10 लाख लिटर. याचा अर्थ अवर्षणप्रवण भागात हेक्टरी ३० ते ५० लाख लिटर पाणी भूमीवर पडते. या भागातील दर चौ. कि.मी.ची लोकसंख्या घनता विचारात घेतल्यास माणसी 15 ते 25 लाख लिटर पाणी वर्ष 2014 च्या पावसाळ्यामध्ये मिळाले.  एवढे पाणी किमान भरण पोषणांच्या आवश्यकता भागवण्यास नक्कीच पुरेसे आहे. या प्राथमिक साधन-साक्षरतेची आज नितांत आवश्यकता आहे. दुष्काळी जनतेची होणारी ससेहोलपट टाळावी, पशू-पक्ष्यांचे हाल होऊ नयेत, तसेच अन्नधान्य तुटवडा भासू नये, यासाठी दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा लागेल. पाणी हा विषय विज्ञान,तंत्रज्ञान, नियोजन आणि कृती यांच्याशी संबंधित आहे.  या सर्वच स्तरांवर प्रयत्न केल्यास दुष्काळासारख्या भीषण समस्येवर काही प्रमाणात मात करता येईल.  यासाठी शासनाने विविध पर्यायांचा अभ्यासपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. आज जलयुक्त शिवार, जलसंधारण, जलपुनर्भरण, रेनवॉटर हार्वेस्टिंग यांसारखे नवे प्रकल्प राबवले जात आहेत. मात्र याच जोडीला भूगर्भ पातळी वाढवण्यासाठीही सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. आज सर्वत्र केली जाणारी वृक्षतोड भूगर्भातील पाण्याची पातळी अल्प करत आहे.   

वृक्ष संवर्धनानेच खऱ्या अर्थाने भूमातेला आणि पर्यायाने मानवाला पाणी लाभू शकते. यासाठी सर्वांनी वृक्षतोड थांबवून अधिकाधिक झाडे लावण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. विकसित आणि अविकसित खेड्यांमध्ये जल नियंत्रणाच्या दृष्टीने उपाययोजना राबवायला हव्यात. लहान लहान बंधारे बांधणे,  नदी-नाले यांतील गाळ काढणे यांकडे लक्ष द्यायला हवे. राज्याच्या या भागात शेतीला कोणताही पुरक व्यवसाय नाही. नद्या आहेत पण त्यावर धरणं बाधलेली नाहीत. एखादा व्यवसाय करायला कर्ज दिल्या गेलं तर त्याची परतफेड होईलच याची कोणतीही शाश्वती नाही, कारण कर्जाची परतफेड होण्याला तो व्यवसाय फायद्यात चालायला हवा. अशा पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आजही लाखो लोक अशा परिस्थितीत जगत आहेत की त्यांना दोन वेळचं जेवण मिळण्याची भ्रांत आहे. कारण स्वार्थी राजकारणी वृत्तीने महाराष्टाच्या सगळ्या भागात सारखी विकासाची गंगा वाहिली नाही त्याचेच हे फळ आहे.

लेखक: मयुर बागुल, पुणे

मोबाईल: 9096210669

ईमेल: bagul.mayur@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel