विदर्भातील 'प्रति खजुराहो' म्हणवले जाणारे मार्कंडा महादेव मंदिर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात तालुका चामोर्शी पासून जवळच वैनगंगा नदीच्या तीरावर आठव्या शतकात बांधल्या गेले आहे. हे मंदिर शैव संप्रदायाचे असून भगवान शंकराच्या पूजा-अर्चना करिता बांधलेले आहे. या मंदिराचे नामकरण हे हरियाणातील मार्कंडेय ऋषींच्या नावावर आहे.
येथे स्थानिकांत अशी आख्यायिका सांगण्यात येते की, भगवान शंकराच्या कृपेने जन्म घेतलेले मार्कण्ड ऋषी हे वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्यूला सामोरे जाणार होते. आपल्या वडिलांच्या इच्छेखातर वयाच्या चौदाव्या वर्षी मार्कंडेय ऋषींनी येथे शंकराची तपश्चर्या केली. यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी मार्कण्ड ऋषींचा वयाच्या सोळाव्या वर्षी होणारा मृत्यू परतवून लावून त्यांना चौदा कल्पजीवनाचा आशीर्वाद दिला.
पूर्व विदर्भातील सर्वात मोठ्या अशा वैनगंगा नदीच्या तीरावर चामोर्शी पासून सात किलोमीटर दूर या ठिकाणी हे मंदिर चौदा एकर परिसरात विस्तारलेले आहे. येथे दक्षिणेकडे वाहणारी नदी उत्तरवाहिनी आहे. या मंदिराला वळसा घालून परत ही नदी दक्षिणवाहिनी होते. यामधील उंचवट्यावर हे मंदिर वसलेले आहे.
मंदिराचे आयुष्य साधारण बाराशे वर्ष आहे. हे मंदिर आठव्या शतकात 'एलिचपूर' सध्याचे 'अचलपूर' येथे राजधानी असलेल्या राष्ट्रकूट राजे यांच्या काळात बांधल्या गेल्याचे आढळते. मंदिराचे बांधकाम हे स्थानिक बेसाल्ट दगडाचे आहे. नदीच्या पात्राजवळच आढळणारे हे काळे, लाल काळे दगड सांधुन एकमेकांवर रचलेले आढळतात. त्याकरिता चुना व इतर नैसर्गिक चिकट रसायन घटक म्हणून वापरले आहेत व त्याआधारे दगड एकमेकांवर रचून नंतर कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिराचा बाह्यभागावर कलाकुसर व कोरीव काम क्वचितच आढळते किंबहुना ते टाळलेले दिसते. एकंदरीत रचनेवरून हे मंदिर हेमाडपंथी बांधकाम शैलीचे जरी वाटत असले तरीही ते तसे नाही कारण दगडांना जोडण्याकरिता वापरण्यात येणारे चुना व इतर रसायनांचे मिश्रण हे हेमाडपंथी शैलीत आढळत नाहीत व ही शैली यादवकालीन आहे राष्ट्रकूटांची नाही, परंतु मंदिर हे टणक दगडात असूनही अत्यंत आखीव-रेखीव व सुबक बांधण्यात आलेले आहे.
सदर परिसरात मुख्य मंदिरासोबतच इतरही मंदिर आहेत. यामध्ये दशावतार मंदिर, मारुती, गणपती व इतरही आहेत परंतु मुख्य मंदिर हे भगवान शंकराचे म्हणजेच 'मार्कंडेय' या नावाने प्रसिद्ध आहे. जे साधारण दोनशे वर्षांपूर्वी विद्युल्लता पातामुळे भंग पावले होते. त्याच्या जीर्णोद्धाराचे काम आता पुरातत्व विभाग भारत सरकारच्या अंतर्गत सुरू आहे. हे मंदिर व परिसर या पूर्वीच 'वर्ल्ड हेरिटेज साईट' म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
कळसाचा आकार व शैलीही उत्तर भारतीय मंदिराप्रमाणे आढळते. ज्या खाली शिखरावर क्लिष्ट पद्धतीचे जाळीदार किंबहुना गुढ वाटावे असे कोरीवकाम केलेले आहे. मंदिर व सभामंडपाच्या पृष्ठभागावर चितारण्यात आलेल्या कोरीव शृंगारिक भावातील मूर्त्यांमुळे यास 'प्रति खजुराहो' अशी बिरुदावली मिळाली आहे. परंतु ह्या मुर्त्यांचा भाव उत्सवी स्वरूपाचा आहे. रतिक्रिडा वा मिथुनरत नाही ज्यामध्ये वस्त्रालंकारीत ब्रम्हा, विष्णू व महेश तिघेही सपत्नीक चितारण्यात आलेले आहे. सोबतच विविध प्राणी, पक्षी व देवगंधर्व, यक्ष यांच्या प्रतिमा पाहण्यास मिळतात. या सर्व प्रतिमा एक पुरुष उंचीवर कोरण्यात आलेल्या आहेत. साधारणता पूर्ण वाढ झालेल्या संसारी पुरुष व स्त्रियांच्या नजरेच्या टप्प्यात भराव्या अशा ठिकाणी त्या आहेत व सपत्नीक त्रिमूर्ती देखील हेच दर्शविते की हे मंदिर संसारिक स्त्री-पुरुषांकरिता इतर मनुष्य, पशूपक्ष्यांसह आनंदित राहण्याचा व दीर्घ आयुष्य जगण्याचा जसा साक्षात्कार मार्कंडेय ऋषींना झाला तसा मार्ग सांगतात. यातील बहुतेक शिल्प आपल्याला इतर हिंदू मंदिरातही आढळतात ते येथेही आहेत. जसे हत्तीवर विजय मिळवित असलेल्या मुद्रेतील सिंह जो प्रत्येक मंदिरात दर्शनी स्थानी असतो. जो भाविकांना मार्ग दाखवितो अशीच त्याची रचना असते. तसेच कोपऱ्यांवर आढळणारे यक्ष किन्नर यांच्या मुर्त्या मध्यभागी असलेल्या मुख्य देवतांच्या मुर्त्या या दरम्यान नृत्य,गायन,वादन ह्या मुद्रेतील मग्न नर्तिका चितारलेल्या आहेत.
एकंदरीत उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना असलेल्या या मंदिरामुळे आपले तत्कालीन कला, स्थापत्य ज्ञानामुळे राजकीय, सामाजिक आर्थिक स्थितीची कल्पना येते. मूर्तीवरील अलंकार वस्त्र हे तत्कालीन लोकजीवनाचा आढावा देतात. त्यामुळेच असे हे पुरावे जतन करणे आवश्यक आहे व भारत सरकार पुरातत्व विभागाने याचा जो पुनर्विकास चालवलेला आहे तो योग्य आहे त्याकरिता आपल्या सरकारला धन्यवाद.
लेखक: आर्कीटेक्ट प्रतिक पुरकर. नागपूर. B.Arch., MBA
मोबाईल: 8600430005
ईमेल: pratikppurkar@gmail.com
(लेखक नागपूर येथील प्रसिद्ध आर्किटेक्ट असून त्याना समाज कार्याची फार आवड आहे)