(मी खरगपूर आय आय टी येथून एम टेक केले असून माझ्या बेधुंद या चारोळी संग्रहाचे सिंधुताई सकपाळ यांच्या हस्ते प्रकाशन झाले. तसेच आय आय टी खरगपूर येथे मी महाराष्ट्र मंडळाचा सांस्कृतिक सचिव होतो. माझे मित्र 'निमिष सोमार' यांनी विनंती केली की माझ्या परदेशातील अनुभवावर एखादा लेख लिही , कोणत्याही एखाद्या देशातील प्रवासवर्णन किंवा अनुभव ! माझ्या 'मेहता पब्लिशिंग हाऊसने' पब्लिश केलेल्या 'बेधुंद' ह्या कॉलेज विश्वावर आधारित कादंबरीनंतर मी अजूनतरी दूसरे काही लिहायला घेतले नाही! तेव्हा हा लेख कसा वाटला जरूर कळवा!)
मग मला प्रश्न पडला की नेमक्या कोणत्या देशबद्दल लिहावे? मग वाटले दोन देशांबद्दल लिहावे - जिथे मी भेट दिली आहे ते! आफ्रिकेतील इथिओपिया आणि इतर आणि यूएई मधले दुबई त्यामुळे लेख थोडासा मोठा होईल, पण इंजीनियर असल्याने प्रश्नांची उत्तरे ही मुद्देसूद, पॉइंट टू पॉइंट लिहायची सवय आहे.
आफ्रिका :
तर मी सुरुवात करेंन आफ्रिकेपासून! कामनिमित मी अफ्रिकेतील इथियोपिया, युगांडा आणि केनियामधे जाणार हे ठरल्यापासून, जगाच्या नकाशावर 'इथिओपिया' कुठे आहे, हे बघायला सुरुवात केली !
'जाऊन जाऊन जंगलात काय चाल्लायस? तिकडे आदिवासी लोकांनी पकडल्यावर आम्हाला फोन कर' असे बरेच विनोदी कॉमेंट जिवाभावाच्या मित्राकडून मिळाले! जाताना मनात थोडीशी भीतीही होती कारण आपल्याकडच्या सिनेमामध्ये किंवा इतर मीडियामध्ये जो आफ्रिका दाखवला आहे ते बघून भीती वाटत होती! खरंच असे असेल का?
इथिओपियातील अडिस अबाबा ह्या एअरपोर्टमध्ये पोहचल्यावर , आपण नक्कीच कुठेतरी वेगळीकडे आलो आहे , हे समजले, इथिओपियातील लोकांची चेहरेपट्टीही इतर आफ्रिकन देशातील लोकांपेक्षा वेगळी आहे , आणि त्यांचा रंग काळा, सावळा आणि गोरा ह्या कॅटेगरी मध्ये मोडतो. आपल्याकडे काळा, सावळा, गोरा असे रंगभेद आहेत पण भारताबाहेर गेल्यावर फक्त काळा आणि गोरा असे दोनच आहेत. आपण भारतीय काळा ह्यामध्ये मोडते! त्यावरून आपल्याला कशा ना कशात भेद करायची सवयच आहे असे जाणवले!
इतर कोणत्याही परकीय देशांचे इथिओपियावर आक्रमण झाले नसल्याने इथिओपियातील लोकांचे कल्चर प्युअर आहे! नक्कीच तुम्हाला इथे गरीब भिकारी रस्त्यावर दिसतील पण त्याचबरोबर मोठ्या मोठ्या बिल्डींग्ससुद्धा दिसतील, ऐकल्याप्रमाणे आपण जंगलात आलो नाही ह्याचेही समाधान मिळाले आणि ऐकीव माहिती किती खोटी असू शकते ह्याचे दर्शन उघड्या डोळ्यांनी भेटले.
इकडे येण्याआधी फक्त भारतातच देवाला लोक मानतात आणि बाकी सगळ्या जगात लोक कधीही कुणाबरोब जातात किंवा त्यांना संस्कृती नाही असा माझा भोळा - भाबडा समज होता. 'इथिओपिअन्स' देवाला इतके मानतात की कदाचित आपल्या भारतीयांपेक्षा जास्त किंवा तितकेच! इकडेही उपास - तापास आहेत, तसेच काळी जादूचंही समज आहे. फरक एवढाच की ह्यांचा देव येशू ख्रिस्त आहे.
ख्रिश्चन आणि मुस्लिम असे दोन प्रमुख धर्म आहेत - पण इथे धर्मावरून दंगल झाली नाही! देशाचा एरिया 10 लाख स्केवर किलोमीटर असून जवळपास 10 करोड एवढी लोकसंख्या आहे.
12 विभागामध्ये हा देश विभागाला आहे, त्यांना आपण राज्यही म्हणू शकतो. इथे पहिलीच गोष्ट माझ्या नजरेत भरली ती - रस्ता क्रॉस करताना जवळपास सगळेच लोक फक्त झेब्रा क्रॉस वरूनच क्रॉस करतील, आणि एकदा माणूस रस्ता क्रॉस करत असेल तर गाड्याही थांबतात , आपण ज्या देशाला मागासलेले म्हणतो त्यांच्या मनात एवढी शिस्त कशी ? हा प्रश्न मनाला सतावत असे !
गाडी थांबवताना, गाडीचे चाक झेब्रा क्रॉसवर जात कामा नये हा नियम आहे , आणि ही लोकं तो नियम पाळतातही! इकडे अपघात (ऍक्सीडेन्ट) मध्ये जर एखाद्या माणसाचा जीव गेला तर त्याला खून समजतात आणि त्याप्रमाणे शिक्षा होते. जर एखाद्याच्या शरीराचा कोणताही भाग अपघातामध्ये वाया गेला तर त्याप्रमाणे त्याला शिक्षा होते! इकडे माणसाच्या जीवाला किंमत आहे!
टॅक्सीची वाट बघतानाही 100 लोकं असो वा 10 लोकं असो सगळेजण शाळेतील मुलांच्या रांगेप्रमाणे रस्त्यावर उभे राहतात , आपल्यासारखे धक्का बुक्की करून एकमेकांवर चढत नाहीत! विश्वास ठेवा - बघायला ते खूप सुंदर दिसते!
लोक सरकारला घाबरतात , आता नवीन सरकारला लोकशाही आणायची असल्याने सगळीकडे उद्रेक होत आहे आणि सिस्टम थोडीशी गडबडत आहे ! 5/6 वर्षांपासून तरी इथे कुणी गुंड किंवा ग्रुप दिसत नाहीत, चोरी, बलात्कार ह्याचे प्रमाण एकदम कमी, मागील 5/6 वर्षात फक्त 1/2 बलात्काराच्या केसेस मी ऐकल्या आहेत.
इथे एकच गुंड तो म्हणजे सरकार! इथे दोनच जाती - एक गुन्हेगार आणि एक सामान्य नागरिक!
ह्यांनी गुन्हगारांना लगेच फिल्टर लावून जेल मध्ये डांबले आहे. इकडच्या जेलमध्ये जाण्यापेक्षा लोक आत्महत्या स्वीकारतात - कोंबड्याचे खुराडे जशे असते तसे येथील 'जेल्स' आहेत. त्यामुळे कोणताही गुन्हा करायला इथली लोक घाबरतात. सरकारच्या विरोधात सहसा कुणी ओपनली बोलत नाही. दुबईमध्ये ही असाच अनुभव आला.
'आपल्याकडे मुली कमी कमी कपडे घालतात, वेस्टर्न कल्चरचे अनुकरण करतात, त्याने रेपिस्टना रेपसाठी उत्तेजना मिळते ' - असे विधान करणाऱ्या संस्कृती रक्षकांवर हसू येते कारण इथिओपिया या देशामधेही मुली कमी कपडे घालतात! “क्लीवेज” दाखवणे ही इकडची फॅशनच असावी इतके टी शर्ट्स खाली आणि गळे खोल असतात, मग इकडे रेप का होत नाहीत? असाही प्रश्न पडला.
आपल्याकडे जसे साडी घातल्यानंतर स्त्रीचा सहजपणे कमरेचा खूप मोठा भाग दिसते आणि त्याची आपल्याला सवयही असते, आपल्याकडे स्त्रियांनी “क्लीवेज” (Cleavage) दाखवणे ह्यावर जेवढ्या भुवया उंचावतात तेवढ्याच भुवया त्या देशातील स्त्रीने कमर दाखवल्यावर उंचावतात.
आपल्या सारखे सेक्स आणि संस्कृतीची एकमेकांशी घातलेली सांगड (किंवा इंटरलॉक) ना मला युरोपमध्ये दिसला, ना अमेरिकेमध्ये दिसला. जेव्हा मी अमेरिकेत होतो तेव्हा न्यूयॉर्क मधील टाइम स्केअर वर भरदिवसा चालताना 100- 200 बायकांची फक्त पॅंटी आणि ब्रा मध्ये परेड होती - कसल्यातरी निर्णयाच्या विरोधात! तसे तर भारतात होत नाही, मग भारतामध्ये स्त्रियांवर जितके अत्याचार होतात तेव्हढे अमेरिकेत किंवा युरोप मध्ये का होत नाहीत? युरोप मधील ब्रुसेल्समध्येही अशीच एक रॅली बघितली होती. त्यावेळी त्यांच्या संस्कृतीचा ह्रास होतो का?
इथिओपियातील लोकं बॉलिवूडला मानतात, भारत देश हा शाहरुख खानच्या चित्रपटांत दाखवल्याप्रमाणे स्वच्छ आहे- असा समज आहे. इकडच्या लोकांनी अजूनही सत्या, गँग्स ऑफ वासेपूर सारखे सिनेमे पाहिलेले नाहीत. सगळे हम आपके हैं कौन किंवा कभी ख़ुशी कभी गम सारखे सिनेमे लागतात आणि आपण जे tv किंवा मीडिया वर बघतो तेच खरे असाही आपला समज होतो. भारतातील लोक प्रेमाचे पुजारी असून भारतात कसलाच द्वेष नाही असाही समज आहे.
इथिओपियामध्येही प्रॉब्लेम्स आहेत, इकडे लोक सहसा सरकारच्या विरोधात जात नाहीत. मोर्चे, सरकार विरोधी घोषणा देणे म्हणजे डायरेक्ट पोलीस गोळाबारी करतात. त्यामुळे मानवी अधिकाराच्या बऱ्याच केसेस ह्या देशावर आहेत. पण फॉरेनर्सना संरक्षण आहे.
इकडे मिडल क्लास नाही आहे. एक तर तुमच्याकडे 1 बीर (1 बीर – 2.50 रुपये) ही नाही किंवा तुमच्यासाठी 100 बीर म्हणजे 'कचरा 'आहे! इकडे 'ओपन प्रॉस्टिट्यूशन' आहे आणि भरपूर नाईट क्लब आहेत. अल्कोहोल (बिअर आणि वाईन) पिणे हे फॅमिली मध्ये आपण चहा पिण्यासारखे आहे. एकदा पाहुणा घरी आला की कोल्ड ड्रींक्स ऐवजी बिअर (5% अल्कोहोल) विचारणे प्रथा आहे! अजून एकदा आपण अल्कोहोल आणि संस्कृतीचा संबंध जोडला आहे असे वाटले!
इथिओपियामध्ये जुने चर्चेस, बहिरदार येथे ताना नावाचा तलाव आहे आणि आडिस अबाबा सोडले तर बाकीची शेहरे इतकी डेव्हलप नाहीत!
इथिओपियामध्ये 90 वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, कुणीही राज्य केले नसल्याने इकडे कुणालाही सर किंवा साहेब बोलायची प्रथा नाही, सगळे प्रत्येकाला नावाने बोलतात.
युगांडा येथील कंपाला येथे मी 1 आठवडाभर राहिलो होतो, तिकडेही ट्राफिक रूल्सची भारतासारखीच बोंबाबोंब आहे. मी काही मटेरियल विकत आणायला गेलो तेव्हा - साधारण सकाळी 11 च्या सुमारास तेथील बेंगॉली दुकानदाराने शटर ओढून घेतले - काय झाले हे विचारले तर त्याने सांगितले की दोन ग्रुप मध्ये भांडण झाले आहे आणि भरदुपारी आम्हाला गन शॉट्स ऐकू येऊ लागले, संध्याकाळी 5 वाजता मी हॉटेलवर आलो - आपल्यापेक्षाही वाईट व्यवस्था युगांडा मध्ये आहे, लाचखोरी जिथे येते - तिथे तेथील प्रजा सरकार अन पोलिसांना घाबरत नाहीत! युगांडामध्ये बरेच भारतीय आहेत - बरीच इलेकट्रोनिकसची दुकाने भारतीयांची आहेत. युगांडा मध्ये विकट्टोरिया नावाचे तलाव बघण्यासारखे आहे आणि त्याच्याच आजूबाजूला वॉटर स्पोर्ट्स पण आहेत.
युगांडामध्ये त्यांची करन्सी सीलिंग आहे, उगांडात 50000 (हो पन्नास हजार ) शिलिंग्सची नोट आहे - त्यामुळे तिथल्या करप्शनची तुम्ही कल्पना करू शकता. 1000 सिलिंग्सचे नाणे आहे.
भारतामध्ये काही लोक जास्त रकमेची नोट बाजारात आली किंवा जास्त रकमेचे नाणे बाजारात आले तर काहीतरी देशाने पराक्रम केला असे पोस्ट करतात. आपण अजून गरीब होत आहोत आणि ही नोट भ्रष्टाचारामध्ये किती भर घालेल ह्याची कल्पना करा. समजा एखादा 1 लाख रुपये ब्लॅक मनी म्हणून लपवत असेल किंवा कुणाला तरी लाच देण्यासाठी जात असेल तर तो पैसा नेण्यासाठी लागणारी जागा 2000 च्या नोटांनी 1 लाख साठी वेगळी आणि 100 च्या नोटांनी 1 लाख ही वेगळी असेल. जर सगळे व्यवहार इंटरनेटने झाले तर सगळा पैसा व्हाईट होईल. आता काहीजण म्हणतील की भारतातील जनता अडाणी आहे, त्यांना कळणार नाही इंटरनेट कसे वापरावे - मग जे अडाणी आहेत त्याच्याकडे एवढा पैसे नाही कीत्यांना व्यवहार करताना 100 पेक्षा मोठ्या नोटांची त्यांना गरज भासेल. 2000 तर खूप डोक्यावरून गेले!
केनिया मधील नैरोबी मध्येमी आठवडाभर होतो, नैरोबीमध्ये रस्त्यावर चालतानाही आपल्या मोबाईलची काळजी घ्यावी चोरीला जाण्याची शक्यता आहे. नैरोबी मधल्या नॅशनल पार्क बघण्यासारखे आहे, जंगल सफारी मध्ये बरेच प्राणी बघितले तिथेच सिहांची फॅमिली जवळजवळ 20 मीटरवरून बघितली, 1 सिंह , 1 सिंहीण आणि त्यांचे 2 बछडे एका बैलाचा फडशा पाडून मस्त खेळत बसले होते. जवळपास 5 मिनिटे आम्ही थांबलो होतो, सर्कशीत अन झूमध्ये वाघ, सिंह बघणे आणि जंगल सफरीत बघणे ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे, आमच्या ड्रायव्हरचे लक्ष त्यांच्याकडे होते, जेव्हा एक सिंह उठला तेव्हा त्याने लगेच गाडी पळवली.
तिथे बॅकग्राऊंडला सिंहांची फॅमिली सोबत घेतलेला सेल्फी सर्वात घाबरावणारा होता!
यूनाइटेड अरब एमिरेट्स:
युनाइटेड अरब एमिरेट्सह्या देशामध्ये दुबई हे एक एमिरेस्ट्स आहे ,एमिरेट्स म्हणजे आपण त्याला राज्य ही म्हणू शकतो - आजमान, फुजारा,रास - अल कोहिमा, शारजा, उम अल क्वेन अशी बाकीची एमिरेट्स आहेत.
त्यापैकी दुबईमध्ये 2 आठवडे आणि रास - अल कोहिमा मध्ये आठवडाभर राहिलो आहे, पहिल्यांदाच दुबईचा एअरपोर्ट बघून मन भरून जाते, मग बाहेर पडताना तेथील महागड्या कार्स आणि टॅक्सिस बघून आपण दुबईत आलो आहे हे समजते.
रस्ते एकदम स्वच् , ट्राफिक नियमामध्ये इथिओपियाच्या कितीतरी पुढे, भारतशी तुलनाच नको! रस्त्यावर सगळीकडे कॅमेरे, एकही ट्राफिक पोलीस तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही,गरजच नाही! प्रत्येक कारचे स्पीड मॉनिटर केले जाते आणि जर कुणी सिग्नल तोडला किंवा स्पीड लिमिट क्रॉस केले तर डायरेक्ट तुमच्या कार्ड मधून पैसे वजा होतील किंवा तुमच्या मोबाईल वर मेसेज येईल! ट्राफिक रूल्स एकदम कडक आहेत, इकडे ड्रायविंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला क्लास लावला लागतो मग थिअरी आणि प्रॅक्टिकल, आपल्यासारखे फक्त रिव्हर्स घे म्हटलं अन जमलं की लायसन्स मिळत नाही! इथिओपियामधेही जवजजवळ महिना - दोन महिने क्लासमध्ये जाऊन थेअरी शिकावी लागते मगच ड्राईव्विंग टेस्ट देता येते.
जर ड्रायव्हिंग करताना अपघातात मृत्यू झाला तर जेवढा फाईन ड्रायव्हरला आहे, त्याच्यापेक्षा 34 पट जास्त.
सौदी अरेबियामध्ये चोरी केली तरी हाथ कापण्याची सजा आहे असे ऐकले आहे, कोण चोरी करेल? दुबईमध्ये साधा ट्राफिकचा नियम मोडला तर त्याची शिक्षा १९ हजार रुपये पासून पुढे सुरु होते, स्पीड लिमिट वाढवले तर 58 हजार रुपये इतका दंड! जर अपघातात मृत्यू झाला तर कोर्ट ने ठरवलेली रक्कम आणि 6 महिने जेल, आता कोर्ट 19 लाख रुपये पेक्षा तर सजा नाही ठोठवणार!
दुबईमध्ये पहिल्याच दिवशी दुबई मॉल मध्ये गेलो - जगातील सर्वात मोठा मॉल आहे. तिथेच शेजारी जगातील सर्वात उंच बिल्डिंग बुर्ज खलिफा आहे, रस्त्याच्या बाजूला वॉकवे, रस्त्यावर किंवा आजूबाजूला अजिबात घाण नाही, लोकांसाठी मस्त बागा, विजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, सामान्य नागरिकाला संरक्षण, गुन्हेगारी खूप कमी अजून काय हवे असते सरकारकडून?
९० % ड्रायव्हर्स हे भारतीय किंवा पाकिस्तानी आहेत.
बुर्ज खलिफाच्या “अॅट द टॉप जाणे'' हा मस्त अनुभव आहे, इथे तुम्ही दिवसभर घालवू शकता. बुर्ज खलिफावर जाण्यासाठी तिकिटे आधीच बुक करा, डायरेक्ट गेलात तर ऐनवेळी खूप महाग भेटते, जितक्या टॅक्सिस महागड्या तितकेच मेट्रो स्वस्त आहे, इथे काही दिवसांचा पास मिळतो - टॅक्सी ऐवजी हा पास घ्यावा!
दुबई म्हणजे संस्कृती आणि आधुनिकतेचा ताळमेळ आहे, दुबई एअरपोर्टवर गेल्यावर सगळ्यात पहिले जे नजरेत भरले ते एक मोठे चित्र ज्यावर 1960 पासूनचे प्रत्येक दहा वर्षानंतरचे फोटोस! 50 / 60 वर्षात जर वाळूपासून दुबई घडवता येत असेल तर आपले भारतीय नेते किंवा जनता काय करत आहे हा - मोठा शॉक ब्रेनला लागू शकतो, मला तरी लागला!
चांगले लीडर्स जर एखाद्या देशाला मिळाले तर त्या देशाचा किती कायापालट होऊ शकतो ह्याचे उदाहरण म्हणजे दुबई! काहीजण म्हणतील की त्यांच्याकडे तेल आहे पण दुबईच्या इनकम मधला 5 पेरसेन्ट फक्त तेलाचा आणि पेट्रोलियमचा आहे, दुबईने त्यांच्याकडे काय आहे हे ओळखले आणि जगातली बेस्ट फॅसिलिटी असलेला प्रदेश बनवला. त्यांचा महत्वाचा इन्कम सोर्स हा मॅनुफॅक्चरिंग आणि टुरिझम आहे.
हे करत असताना तिथल्या सरकारने लोकल्सचाहि विचार केला, जर एखाद्या इन्व्हेस्टरला किंवा कंपनीला UAE मध्ये पैसे गुंतवायचे असतील किंवा फॅब्रिकेशन युनिट काढायचे असेल तर तिथल्या एकाद्या लोकल माणसाला पार्टनर घ्यावे लागते आणि त्या पार्टनरला त्या कंपनीच्या नफ्यातील हिस्सा मिळतो. त्यामुळे लोकल्स आपोआपच श्रीमंत होतात - किती डोके नेत्यांचे! त्यांनी फक्त स्वतःचीच घरे न बसवता, न भरता, सामान्य नागरिकांच्या भल्याचाही विचार केला.
अजून एक म्हणजे दुबईचा सर्वात जास्त कामगार वर्ग (टॅक्सी ड्रायव्हर्स, टॉयलेट क्लीनर, हॉटेल वेटर्स, वेल्डर्स / फिटर्स) भारतातून आणले जातात, हे ऐकून कदाचित आवडणार नाही. एका केरळच्या माणसाची चहा विकण्याची चेन प्रसिद्ध आहे. बाकी बरेच भारतीय लोकांचे व्ययसाय आहेत. दुबईत तुम्ही एकही रेपची केस ऐकणार नाही किंवा मर्डर ऐकणार नाही , किंवा भीक मागणे हा गुन्हा आहे. इथले लोक सरकारचा सन्मान करतात कारण सरकार लोकल्सची काळजी घेते. पूर्ण दुबईच्या लोकसंख्येच्या 20 टक्के लोक लोकल्स आहेत आणि बाकीची 80 % इतर देशातून आलेली आहेत. तरीही सगळी सूत्र लोकल्सकडे आहेत. सरकारी कामगार आणि पोलीसमध्ये लोकल्स आहेत, बाकीचे इन्वेस्टर्स आणि कामगार वर्ग हे बाहेरचे लोक आहेत. कामगारांमध्ये भारतीय, पाकिस्तानी, आफ्रिकन, फिलिपिन्स इथले बरेच आहेत.
पहिला दिवस दुबई मॉलमध्ये आणि बुर्ज खलिफाच्या आसपास घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी इतर मॉल्स बघायला सुरुवात केली, मग दुबई मारिन ह्या मस्त एरियामध्ये गेलो. समुद्रकिनाऱ्याचा वापर कसा करावा हे UAE ला नक्कीच समजले आहे. तिथून तुम्ही समुद्रात चक्कर मारू शकता. आपल्याकडच्या कोकण किनारपट्टी किती वाया जात आहे - नैसर्गिक संरक्षण आणि संस्कृतीच्या नावाखाली ! लास वेगसला गेल्यानंतर तिथले कसिनो आणि नाईट लाईफ बघून डोके फीरलं! तिथे ही लोक राहतात, समाज तिथेही आहे! मग हे सगळं आल्याने आपलंच समाज कसा बरबाद होईल, निदान वेगास सारखं नाही पण दुबई सारखा ब्लेंड तरी भारतात तयार करता येईल?
तिसऱ्या दिवशी सगळे महत्वाचे सोप्ट्स बघण्यात गेले, पुन्हा एकदा बुर्ज खलिफा जो 830 मीटर उंच आहे, 124 मजल्या वरून तुम्ही पूर्ण दुबई शहर बघू शकता. दुबई मॉलमध्ये दुबई मत्स्यालय बघण्यासारखे आहे - त्यामध्ये तुम्ही शार्कही बघू शकता. स्कुबा डायविंग बरोबरच त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात. दुबईच्या इनकम मध्ये टुरिस्टचा वाटा का आहे हे समजते!
त्याचबरोबर अटलन्टिस हॉटेल (जेथे हैप्पी न्यू इअर चे शूटिंग झाले होते ) मधल्या वॉटर पार्कचा अनुभव भयाण आहे. बॉलिवूडवाले आपल्याला किती मूर्ख बनवतात हे प्रत्यक्ष दुबई बघितल्यावर कळते. डेसर्ट सफारीचा अनुभव ही मस्त आहे.
दुबईमध्ये जाऊन पैसे कमावणे हे जरी शक्य असले तरी पैसे त्याच देशात खर्च करण्यासाठी सरकाने मस्त 'ट्रॅप' मांडला आहे, कामगारांना कर्ज काढायची सोप्पी व्ययस्था आहे त्यामुळे दुबईमध्ये कामासाठी गेलेल्या लोकांना खरंच किती 'सेविंग' पडत असेल हा प्रश्न आहे. भारतीय कामगारांचे पासपोर्ट्स त्यांच्या कंपनीकडे असतात, त्यामुळे अप्रत्यक्षित गळ्यात चैन असलेले गुलाम ह्या पेक्षा दुसरी तुलना इथल्या कामगाराची करणे काही वावगे नाही ठरणार!
लेखक: अविनाश लोंढे - इथियोपिया
मोबाईल: +251966215982
ईमेल: avi4u.iitkgp@gmail.com
(अविनाश लोंढे हे बेधुंद या मेहता पब्लिशिंग हाऊस ने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत. ते सध्या इथियोपिया या देशात कोका कोला कंपनीत मॅनेजर आहेत.)